ॲड.उके यांनी केली होती तक्रार दाखल
ॲड.उके वरच्या न्यायालयात अपील करणार:ॲड.कमल सतुजा
नागपूर,ता.९ सप्टेंबर २०२३: २०१४ च्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात दोन गुन्ह्यांची माहिती लपविण्यात आल्याचा आरोप करीत ॲड.सतीश उके यांनी तत्कालीन मुख्यमंत्री व विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता.प्रथम श्रेणी न्यादंडाधिका-यांनी आज फडणवीस यांना या गुन्हातून दोषमुक्त ठरवले आहे.याच प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाकडून फडणवीस यांना खटला रद्द करण्याची सूट मिळाली नव्हती हे विशेष.
नव्वदीच्या दशकात फडणवीसांविरुद्ध दोन फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आली होती.यात त्यांना जामीनही मिळाला होता.मात्र,२०१४ च्या निवडणूकीसाठी दखल केलेल्या शपथपत्रात फडणवीसांनी या प्रकरणांची माहिती लपविली असा आरोप ॲड.सतीश उके यांनी केला होत.फडणवीसांनी ही माहिती लपविल्याने त्यांच्याविरुद्ध फौजदारी कारवाई करण्यात यावी,अशी मागणी याचिकेद्वारे करण्यात आली होती.
या प्रकरणात साक्षी व पुरावे नोंदविण्याची प्रक्रिया पार पडली.स्वत:फडणवीस १५ एप्रिल २०२३ रोजी जातीने प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी न्यायालया पुढे उपस्थित राहीले होते.
या तक्रारीवर ॲड.उके यांच्या बाजूने युक्तीवादाची तसचे साक्षी,पुरावे नोंदविण्याची प्रक्रिया पूर्ण झाली होती.यानंतर कायदेशीर प्रक्रियेनुसार फडणवीस प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी वी.ए.देशमुख यांच्यासमक्ष उपस्थित राहीले होते.न्यायालयाने फडणवीस यांना लेखी स्वरुपात प्रश्नावली दिली होती.न्यायालयाने दिलेल्या ११ पानांच्या प्रश्नावलीत १०४ प्रश्न होते.त्याची लेखी उत्तरे फडणवीस यांनी स्वत: दिली.यात ॲड.देवेंद्र चौहान,ॲड.उदय डबले आणि ॲड.प्रफूल्ल मोहगावकर यांनी सहकार्य केले. या संपूर्ण प्रक्रियेसाठी फडणवीस दीड तास न्यायालयात हजर होते.
फडणवीस यांनी शपथपत्रात ज्या गुन्ह्यांची माहिती लपविली असा अारोप होता,त्या दोन्ही आरोपातून त्यांची मुक्तता झाली आहे.यातील एक प्रकरण मानहानिचे तर दुसरे प्रकरण फसवणूकीचे होते.नजर चुकीने शपथपत्रात या गुन्ह्यांची माहिती नमूद करण्याचे राहून गेले,असा युक्तीवाद फडणवीस यांच्या वकीलांनी केला होता.
ॲड.उके यांना गेल्या वर्षी ३१ मार्च २०२२ रोजी रामेश्वरीतील निवासस्थानावरुन सक्तवसूली संचालनालय(इडी)द्वारे अटक झाली असून मुंबईतील कारागृहात ॲड.सतीश उके व त्यांचे बंधू प्रदीप उके बंदिस्त आहेत.उके यांनी दूरदृष्यप्रणालीद्वारे न्यायालयीन कामकाजात भाग घेतला होता.२००५ मधील एका भूखंड व्यवहाराशी संबंधित खटले उके बंधूंवर दाखल करण्यात आले आहे.उके यांनी भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावणकुळे यांच्यावर अवैध संपत्तीचा आरोप करणारी पत्रकार परिषद घेतली होती.यानंतर त्यांना लगेच चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले होते.
अवैध फोन टॅपिंग प्रकरणात ॲड.उके यांनी वरिष्ठ पोलिस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्यावर ५०० कोटी रुपयांचा दावा दाखल केला होता.या शिवाय न्या.लोया यांच्या नागपूरातील रवि भवनातील गूढ मृत्यूच्या प्रकरणात नव्याने प्राप्त काही साक्षी पुराव्यांच्या आधारावर हे प्रकरण रि-ओपन करण्यासाठी त्यांनी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांची देखील भेट घेतली होती.अनिल देशमुख यांनी हे प्रकरण रि-ओपन करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाला विनंती करणार असल्याचे विधान अधिवेशनात विधान सभेत केले होते.
महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात उके यांनी फडणवीसांविरुद्ध आणखी एक याचिका दाखल केली होती जी उच्च न्यायालयाने फेटाळली होती.२०१४ साली राज्यात भाजप-सेनेची सत्ता स्थापित झाली व फडणवीस हे मुख्यमंत्री बनले.त्याच वर्षी सोनेगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका तरुणीचा मृतदेह सापडला होता.ती तरुणी हिंदी भाषिक राज्यातून अभिनेत्री होण्यासाठी नागपूरला आली होती.रामदासपेठेतील एका नामांकित हॉटेलमध्ये एका चित्रपटासाठी नायिकेच्या भूमिकेसाठी घेण्यात आलेल्या ऑडिशनमध्ये ती सहभागी झाली होती.यानंतर तिची हत्या झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला.या प्रकरणात देवेंद्र फडणवीस आरोपी असल्याचा दावा करणारी एक याचिका उच्च न्यायालयात दाखल होती.उके यांच्यानुसार फडणवीस हे या याचिकेत प्रतिवादी नव्हते.त्यामुळे,याचिकेतील प्रत केवळ सरकारी वकील व पोलिसांकडे उपलब्ध होती.पण,फडणवीस यांनी मध्यस्थी अर्ज दाखल केला व याचिकेचे दस्तावेज चोरीने मिळवल्याचा आरोप ॲड.उकेंनी केला होता.या करिता उकेंनी पोलिसात तक्रार दिली होती मात्र,पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नसल्याने, उके यांनी उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला होता.उकेंची ही याचिका उच्च न्यायालयाने १२ जुलै २०२१ रोजी फेटाळून लावली होती.चित्रपट निर्माण करण्यासाठी तरुणींचे ऑडिशन हॉटेलमध्ये घेणा-या त्या निर्मात्याचे फडणवीस यांच्याशी घनिष्ठ मैत्र संबध असल्याचा आरोप उके यांनी एका पत्रकार परिषदेत केला होता.याच पत्रकार परिषदेत न्यायालयाच्या आदेशानंतर तरुणीच्या मानवी सांगाड्या ऐवजी मृत श्वानाचे सांगाडे ठेवल्याचा आरोप देखीत उके यांनी केला होता.सोनेगाव पोलिस ठाण्यातील अधिका-यांच्या कार्यप्रणालीवर उके यांनी कठोर ताशेरे ओढले होते.
सध्या इडीच्या सर्व आरोपांविरोधात मुंबईतील ऑर्थर रोडवरील कारागृहातून न्यायालयीन लढाई ॲड.उके हे स्वत: लढत आहेत. नागपूर सुधार प्रन्यासची बाबुळखेड्यातील ४ एकर जमीन बळकावित त्यावर अनाधिकृत बांधकाम केल्याप्रकरणी व त्यातून ७ कोटींची फसवणूक केल्याची तक्रार नासुप्रचे अधिकारी पंकज पाटील यांनी अजनी पोलिस ठाण्यात नोंदवली होती.याशिवाय बनावट दस्तावेजाच्या अाधारे बोखारा येथे भूखंडाची खरेदी-विक्रीच्या प्रकरणात सदर पोलिस ठाण्यात ही उकेंविरुद्ध गुन्हा दाखल आहे.
गेल्याच महिन्यात १५ ऑगस्ट रोजी उकें यांच्यासह सहा जणांविरुद्ध आर्थिक गुन्हे शाखेने मोक्काअंतर्गत गुन्हा दाखल केला.यात उके यांचे बंधू शेखर उके,मनोज सुभाष बघेल,चंद्रशेखर मते,माधवी उके यांचा समावेश आहे.बाबुळखेडा व बोकारा याच जमीनींच्या संदर्भात इडीने उके बंधूंना अटक केली असून याच प्रकरणात आता उकें यांच्यावर मोक्का लावण्यात आला आहे.
उके हार मानणारा माणूस नाही: ॲड.कमल सतूजा(माजी अध्यक्ष, सत्र न्यायालय बार असोसिएशन)
ॲड.सतीश उकेंनी राज्यातील काही प्रस्थापित राजकीय नेत्यांविरुद्ध पुरावे गोळा केले होते व त्यांच्याविरुद्ध न्यायालयीन लढाई ते लढत होते.या खटल्यात उकेंच्या बाजूने काही प्रमाणात निकाल ही लागत होते मात्र,अचानक इडीने उकेंना अटक केली व मुंबईच्या कारागृहात बंदिस्त केले.नुकतेच उके यांच्यावर मोक्का ही लावण्यात आला.याच प्रकरणात उके यांचे भाऊ व वैणी यांना अंतरिम जामीन मिळाला आहे.मीच त्यांचा खटला लढत आहे.उके हा हार मानणारा माणूस नाही.फडणवीस यांची निर्दोष मुक्तता झाली असली तरी उके या निकालाच्या विरोधात वरच्या न्यायालयात दाद मागतील हे मात्र निश्चित असे ॲड.कमल सतूजा यांनी सांगितले.वकीली क्षेत्रात उकेंवरील राजकीय सूडाच्या कारवाईमुळे बरीच नाराजी असल्याचे देखील ते म्हणाले.
……………………………………………..