काँग्रेसचे राष्ट्रीया प्रवक्ते अलोक शर्मा यांचा दावा
लोकसभेच्या ४५० जागांवर इंडिया एकास- एकच उमेदवार देणार
येत्या निवडणूकीत महाराष्ट्राचे आकडे चकीत करणारे असतील
२०२४ मध्ये अपयश दिसताच पुन्हा ओपिनियन पोलची मदत
आम आदमी पार्टीचा भ्रष्टाचार दिसल्यास विरोध करणार
फक्त चार गुजरातींनी नव्हे तर देशातील प्रत्येक नागरिकांनी केला देशाचा विकास
नागपूर,२७ ऑगस्ट २०२३: देशातील विरोधी पक्षांच्या गटबंधनाची(इंडिया)तिसरी बैठक लवकरच मुंबईत होणार आहे.या बैठकीत अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात येणार आहे मात्र आज मोदी सरकारच्या एनडीएसोबत असलेले किमान पाच ते दहा पक्ष हे लवकरच इंडियामध्ये सहभागी होणार असल्याचा दावा अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्तेे अलोक शर्मा यांनी रवि भवन येथील पत्रकार परिषदेत केला.याप्रसंगी मंचावर आमदार विकास ठाकरे,प्रदेश प्रवक्ते अतुल लोंढे, काँग्रेसचे सोशल मिडीया प्रमुख विशाल मुत्तेमवार आदी उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना शर्मा म्हणाले,की एनडीएसोबत असणा-या अनेक पक्षांनी आमच्याशी संपर्क साधला आहे व लवकरच अनेक पक्ष व खासदार एनडीएची साथ सोडून इंडियामध्ये सहभागी होणार आहे.विशेष म्हणजे गेल्या अनेक वर्षात एडीएची बैठकच झाली नव्हती मात्र,इंडियाची बैठक पटनामध्ये होताच मोदींना जाग आली व तातडीने त्यांनी एनडीएची बैठक बोलवली.त्यांच्या बैठकीत ३८ पक्ष सहभागी झाले असल्याचे ते सांगतात मात्र त्यांच्याच पक्षाच्या एका नेत्याने एका वाहीनीवर बोलताना,त्यांना देखील कोणकोणते पक्ष बैठकीत सहभागी झाले व त्यांची काय नावे आहेत,हे माहिती नसल्याचे सांगितले!
मोदींच्या काळात देशात प्रचंड भ्रष्टाचार बोकाळला असल्याचा आरोप याप्रसंगी अलोक शर्मा यांनी केला.नुकतेच कॅगने आपल्या अहवालात राष्ट्रीय महामार्ग मंत्रालयाच्या कारभारावर ताशेरे ओढले.अारोग्य क्षेत्र असो,विमा क्षेत्र,भारत माला असो अनेक क्षेत्रातील घोटाळे समोर आले आहे मात्र,कॅगचा हा अहवाल आल्यानंतर ईडी,सीबीआयची चौकशी कधी होणार,हे मोदी सांगत नाही,केव्हा या घोटाळ्यातील भ्रष्टाचारी चक्की पिसिंग ॲण्ड पिसिंग ॲण्ड पिसिंग करताना देशातील जनता बघेल?असा सवाल त्यांनी केला.
२०१४ पासून अनेकांवर ईडी व सीबीआयने आराेप करीत अटक केली मात्र एक ही आरोप ते सिद्ध करु शकले नाहीत.मोदींना याचे उत्तर द्यावेच लागेल.मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांकडे अशी कोणती माहिती किवा फाईल आहे ज्यामुळे त्यांच्यावर मोदी मणिपूरच्या हिंसक आंदोलनानंतर देखील कारवाई करण्यास धजले नाहीत?बृज़भूषण शरणसिंगकडे असे कोणते गुपित आहेत ज्यामुळे एवढे गंभीर आरोप त्यांच्यावर लागले असतानाही त्यांचे पद काढून घेण्यात आले नाही.सर्वोच्च न्यायालयाला त्यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल करण्याचे निर्देश द्यावे लागले.त्यांच्या कृतीने भारतीय कुश्ती संघालाच दाव वर लावले व अखेर जागतिक कुश्ती संघाने आता भारतीय कुश्ती संघाची मान्यताच समाप्त केली!फक्त इव्हेंट्स मॅनेज करुन देश चालत नसल्याची टिका त्यांनी केली.२०२० साली छत्तीसगढमध्ये ईडीची कारवाई केली होती,ती आतापर्यंत संपुष्टात का आली नाही?असा प्रश्न त्यांनी केला.
मोदी सातत्याने लाल किल्यावरुन खोटे का बोलतात?हे देशाच्या मिडीयाने त्यांना विचारायला हवे,असे ते म्हणाले.
मध्यप्रदेशमध्ये एका दलित व्यक्तीची हत्या झाली यावर प्रश्न केला असता,मध्यप्रदेश तर दलितांवर अत्याचार करणा-यांची भूमि झाली असल्याचा आरोप त्यांनी केला.दलितावर भाजपच्या एका नेत्याने केलेले मूत्र विसर्जन किवा इतर अनेक जघन्य अपराध असो,घडत असतात.कठूआच्या आरोपींच्या समर्थनार्थ भाजपच्या नेत्यांनी तर रॅली काढली होती.उत्तर प्रदेशच्या हाथरसच्या मुलीला मातीचे तेल ओतून ज़ाळून टाकण्यात आले,भाजप शासित राज्यात तर मुख्यमंत्रीच आरोपींना पाठीशी घालताना दिसून पडतात,मणिपूरमध्ये एक साधा पोलिस शिपाई देखील निलंबित मोदी सरकारने केला नाही.सर्वोच्च न्यायालयाने फटकारल्यानंतर गुन्हे दाखल होत आहेत.दिल्लीत निर्भयाच्या घटनेनंतर हेच भाजपवाले दिल्ली ही ‘रेप कॅपिटल’झाली असल्याची ओरड करत होते.दोन निरपराध महिलांची मणिपूरमध्ये नग्न धिंड काढण्यात आली मात्र महिला व बाल विकास मंत्री स्मृती इराणी यांना एका हत्तीणीची हत्या झाली त्यावर व्यक्त व्हावसं वाटलं,त्या महिलांविषयी मात्र इराणी यांनी एक शब्द ही उच्चारला नाही,या वेळी अमेठीत इराणी यांची जमानत आमचा एखादा ब्लॉक अध्यक्ष ही उभा राहीला तरी जप्त होणार असल्याचा दावा,यावेळी अलोक शर्मा यांनी केला.
मोदींच्या काळात राष्ट्रीय अपराध रेकॉर्ड ब्यूरो(एनसीआरबी)मध्ये दलितांवर होणा-या अत्याचारांचा डेटाच अपलोड होत नाही.गुन्हेगारीचा डेटा लपविण्याची कला कोणाकडून शिकायची असेल तर ती मोदींकडून शिकली पाहिजे,असा टोला हाणत,२०१८ पासून अत्याचाराचे आकडेच गायब आहेत,त्यामुळेच मध्यप्रदेशमध्ये २०२४ च्या निवडणूकीनंतर भाजप सरकार जात असून काँग्रेसची सरकार येत असल्याचा दावा त्यांनी केला.
काँग्रेस केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांच्या मंत्रालयाच्या विरोधात कॅगचा जो अहवाल आला त्याविरोधात पूर्ण ताकदीने विरोध करीत नसल्याकडे लक्ष् वेधले असता,मुंबई येथील इंडियाच्या बैठकीत यावर रणनीती तयार करणार असल्याचे ते म्हणाले.
बहूजन समाजवादी पार्टी(बसप)च्या नेत्या मायावती या इंडियामध्ये सहभागी नसल्याकडे लक्ष वेधले असता,मायावती गेल्या दहा वर्षांपासून जेव्हापासून मोदी सत्तेत आले त्या गप्प आहेत,एक तर त्यांचा मोदींच्या कारभाराला समर्थन आहे किवा कोणत्या तरी भीतीमुळे त्या गप्प असल्याचे सूचक विधान याप्रसंगी अलोक शर्मा यांनी केले.
काँग्रेस किवा भाजपा सोडून देशात तिसरी आघाडीची शक्यता,यावर प्रश्न केला असता १९८९ नंतर देशात एक तर काँग्रेस प्रणित आघाडी किवा भाजप प्रणित युतीचेच सरकार यशस्वी झाले असल्याचे ते म्हणाले.तिस-या आघाडीच्या सरकारचा प्रयोग यशस्वी झाले नसल्याचे त्यांनी सांगितले.यावर त्यांनी भाजपची बी टिम म्हणून ओवैसीवर देखील निशाणा साधला.यावेळी भाजप विरुद्ध इंडिया अशीच लढत होणार असून आम्ही देशातील ४५० लोकसभेच्या जागांवर एकास-एकच उमेदवार देणार असल्याचे अलोक शर्मा म्हणाले.
मात्र,विविध माध्यमांच्या मत सर्वेक्षण (ओपिनियन पोल)मध्ये एनडीएचे सरकार पुन्हा येत असल्याचे भाकीत वर्तवल्या जात अाहे,या प्रश्नावर बोलताना जेव्हा जेव्हा मोदींची प्रतिमा डागाळू लागते तेव्हा तेव्हा भाजप ओपिनियन पोलचा आधार घेतो.यासाठी दिल्लीच्या नोएडमध्ये ५-६ लोकांची चमू बसविण्यात आली आहे,माध्यमांना हाताशी धरुन नागरिकांचा माईंड सेट करण्याचे काम ही मंडळी करते.१४० कोटींच्या देशात एकूण किती नागरिकांची नमुना निवड त्यांनी केली.मणिपूरच्या घटनेनंतर मोदींची प्रतिमा देशात ढासळली,अशा वेळी ओपिनियन पोल्स येऊ लागलेत.यावर देशातील नागरिकांनी किती विश्वास ठेवावा,हे येणारा काळच सांगेल,असे उत्तर त्यांनी दिले.छत्तीसगढमध्ये काँग्रेसला फक्त १५ ते २० जागाच मिळणार असल्याचे मत सर्वेक्षण प्रसिद्ध करण्यात आले मात्र छत्तीसगढमध्ये काँग्रेसची सत्ता आली,कर्नाटकच्या बाबतीत ही हेच घडले.
भारत राष्ट्र समिती इंडियामध्ये सहभागी होणार का?असे विचारले असता,बीआरएसमधील अनेक नेते आमच्या संपर्कात असल्याचे त्यांनी सांगितले.
गडकरी यांच्या मंत्रालयाचा गैरव्यवहार हा २५० कोटींचा आहे यावर काँग्रेस येत्या १ सप्टेंबरपासून जनआंदोलन करणार आहे मात्र महामेट्रोचा घोटाळा हा १ हजार कोटींचा आहे, यावर काँग्रेसची पाहीजे तशी ओरड होताना दिसत नाही,काँग्रेसचे शीर्षस्थ नेते यावर बोलताना दिसत नाही,यावर बोलताना आमदार विकास ठाकरे म्हणाले की,त्यांनी महामेट्रोचे माजी व्यवस्थापकीय संचालक ब्रृजेश दीक्षीत यांना तिस-यांदा राज्य सरकारकडून मिळालेल्या मुदत वाढीविरोधात दिल्लीतील पंतप्रधान कार्यालयापर्यंत तक्रार नोंदवली व त्यांची मुदतवाढ रद्द झाली.याशिवाय पावसाळी अधिवेशनात देखील महामेट्रोच्या भ्रष्टाचाराबाबत प्रश्न उपस्थित केल्याचे विकास ठाकरे यांनी सांगितले.सप्टेंबरमधील आंदोलनात देखील हा विषय समाविष्ट करणार असल्याचे ते म्हणाले.
एका प्रश्नाच्या उत्तरात,महाराष्ट्राच्या जनतेला ५० खोकेंची गोष्ट समजून चुकली आहे,राजकीय पक्षामध्ये तोडफोड करा,स्वत:ची सरकार बनवा असे कृत्य करुन देखील महाराष्ट्राची जनता ही महाविकासआघाडीसोबत असल्याचे ते म्हणाले.येत्या निवडणूकीत महाराष्ट्राचे आकडे हे चकीत करणारे असतील,असे भाकीत त्यांनी वर्तवले.मोदी यांना सर्वाधिक धोका महाराष्ट्र आणि बिहारमधून असल्याचे उमजले आहे.त्यामुळेच ते सीबीआयच्या संचालकाला सर्वोच्य न्यायालयाच्या विरोधात जाऊन तिस-यांदा मुदत वाढ देण्यास बाध्य झाले आहेत,असा टोला त्यांनी हाणला.
भाजपकडे सर्वात मोठी एल.जी ची वॉशिंग मशीन आहे ज्यातून सर्वात मोठा भ्रष्टाचारी हा स्वच्छ होतो आणि तितक्याच मोठ्या पदावर रुजू होत असल्याची खोचक टिका त्यांनी केली.
राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या भूमिकेविषयी छेडले असता,शरद पवार हे फार अनुभवी नेते असल्याचे ते म्हणाले.त्यांना राजकारणाची खोलवर समज आहे.ते आज देखील इंडियासोबत आहेत,पुढे देखील राहणार,असा विश्वास याप्रसंगी शर्मा यांनी व्यक्त केला.
देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी एकदा देशाच्या विकासात सर्वाधिक योगदान हे चार गुजराती,महात्मा गांधी,मोरारजी देसाई,सरदार वल्लभभाई पटेल व नरेंद्र मोदी यांचे असल्याचे विधान केले,यात तुम्ही आता अंबानी व अदानी या आणखी दोन गुजरातींना जोडणार का?असा प्रश्न केला असता,देशाच्या स्वातंत्र्यांच्या ७५ वर्षांच्या कारकीर्दीत देशाचा मजूर,शेतकरी,सामान्य नागरिक,नोकरीपेशा,ग्रामीण व शहरी माणूस,प्रत्येक नेता,प्रत्येक पंतप्रधान,असा प्रत्येकाचा वाटा असल्याचे ते म्हणाले.राष्ट्राची निर्मिती दाेन चार लोकं करु शकत नाही,असं ते म्हणाले.
इंडियामध्ये देशाचे नेतृत्व कोण करणार?या प्रश्नावर बोलताना ते म्हणाले,हे महत्वाचे नाही.आम्हाला देशातील अंहकारी शासनाला हटवायचं आहे.सिमेंटिंग फोर्सचं काम काँग्रेस करेल.२०१४ मध्ये मोदींनी जो स्पेक्ट्रम घोटाळा,निर्भया कांड इत्यादीच्या नावावर देशाला गुमराह केले त्यातील फोलपणा आता देशाला समजला आहे..‘अबकी बार’ चा नारा यावेळी चालणार नाही. विरोधी पक्षांची विश्वाह्यर्ता देशाची जनताच वाढवत असल्याचे ते म्हणाले.
……………………………
.