व्हेरायटी चौक ते बोले पेट्रोल पंपपर्यंत केबल वायर्स टाकण्यासाठी झाडांची मुळेच कापली
नागपूर शहरच झाडमुक्त करण्याची मोहीम आणि मानसिकता
नागपूर,ता.२१ जुलै २०२३: काही वर्षांपूर्वी महानगरपालिकेच्या सभागृहात राणा भीमदेवी थाटात भारतीय जनता पक्षाच्या सत्ताधा-यांनी निर्णय पारित केला होता,येत्या दोन वर्षात शहरात केबल टाकण्यासाठी जितके खोदकाम करायचे आहे करुन टाका,यानंतर काहीही झाले तरी चांगले रस्ते उखडून टाकण्याची परवानगी मिळणार नाही.या मुद्दावर सभागृहात बरीच चर्चा देखील झडली होती.विरोधी पक्षातील नगरसेवकांनी देखील खासगी कंपन्यांनी व सरकारी विभागांनी भूमिगत केबल टाकण्यासाठी आपापल्या प्रभागतील कश्याप्रकारे चांगले सिमेंटचे रस्तेच उखडून टाकले,याचा पाढाच वाचला होता.भाजपचीच सत्ता तब्बल १५ वर्ष असणा-या,भाजपचेच बहूमत मनपात असताना,भाजपच्याच सत्ताधा-यांनी सभागृहात निर्णय घेतला असतानाही,त्यावर अंमलबजावणी तर झालीच नाही उलट आता तर खासगी कंपन्यांनी शहरात भूमिगत केबल टाकण्यासाठी जो अक्षरश:उच्छाद मांडला आहे,ते बघता शहरातील नागरिकांच्या जिविताला निर्माण झालेल्या धोक्यासह शहराचे पर्यावरण चांगले ठेवणा-या हजारो झाडांचीच कत्तलच करण्याचा सपाटा सुरु असल्याचे चित्र बघायला मिळत आहे.
व्हेरायटी चौक ते बोले पेट्रोल पंपपर्यंत उजव्या बाजूला शेकडो हिरवीगार झाडे आहेत जे मे महिन्याच्या रणरणत्या उन्हात किमान या लेनमधील दूकानांसमोर दुचाकी व चारचाकी पार्क करण्यासाठी सावली देतात,ही संपूर्ण झाडेच कापण्याची परवानगी राज्य महामार्ग विभागाने नागपूर महानगरपालिकेच्या उद्यान विभागला मागितली होती मात्र,अशी परवानगी न मिळाल्याने या भागातून भूमिगत केबल टाकण्यासाठी या विभागाद्वारे या कामासाठी दिलेल्या खासगी कपंनीने चक्क शेकडो हिरवेगार,डोलदार झाडांची मुळे कापत नेत, खड्डे खणले .एवढ्यावरच ते थांबले नाहीत तर सिमेंटचे पक्के काम या खड्ड्यांमध्ये केले जात असून आता या झाडांना वाढीसाठी देखील या सिमेंटच्या बांधकामांमुळे प्रतिबंध बसला,परिणामी या लेनमधली संपूर्ण झाडे ही कमकुवत झाली असून,वादळ वा-यासह पाऊस कोसळल्यास ही झाडे सहज उन्मळून पडण्याची भीती निर्माण झाली आहे.
राज्य महामार्ग विभागाच्या या कंपनीच्या कारभारामुळे या अतिशय रहदारीच्या ठिकाणी कोणतीही दूर्घटना होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.राज्यात सत्ता पर्यायाने भाजपचीच असल्याकारणाने व हे शहर उपमुख्यमंत्री व केंद्रिय मंत्र्याचेच असल्याकारणाने या विभागाने, खासगी कंपनीला दिलेल्या कंत्राटदाराद्वारे मनपाच्या उद्यान विभागाची परवानगी नसताना व्हेरायटी चौक ते बोले पेट्रोल पंप पर्यंतच्या शेकडो झाडांची मूळे खोलवर कापत नेली,यावरुन या कपंनीला कोणाचा आर्शिवाद आहे,असा प्रश्न विचारला जात आहे.कोणतेही कायदे-नियम पाळण्याची गरज या कंपनीला का वाटली नाही?
राज्यात २०१९ मध्ये महाविकासआघाडीची सरकार स्थापन झाल्यानंतर गडकरी यांनी भाजपच्या वर्धापन सोहळ्यातील आपल्या भाषणात,‘आता महानगरपालिकेची तरी सत्ता गमावू नका’असे आवाहन कार्यकर्त्यांना व नगरसेवकांना मार्गदर्शन करताना केले होते.यावरुन मनपाची सत्ता भाजपला कशासाठी हवी?त्यांच्या कोणत्याही विकासकामांमध्ये अडथळे निर्माण न होण्यासाठी व सहज परवानग्या मिळण्यासाठी किंबहूना कोणत्याही कायदेशीर परवानगीशिवाय कामे रेटून नेण्यासाठी भाजपला मनपात सत्ता हवी,असा विरोधकांचा आराेप आहे.
व्हेरायटी चौकापासून तर बोले पेट्रोल पंपापर्यंत ज्या पद्धतीने झाडांना राज्य महामार्ग विभागाद्वारे कायमची इजा पाेहोचवण्यात आली,ते बघता नागरिकांमध्ये चांगलाच रोष निर्माण झाला आहे.या अतिशय वर्दळीच्या रहदारीवरुन येणे-जाणे करणारे वाहन धारक, कंपनीची झाडांप्रतिची ही क्रूरता बघून संताप व्यक्त करीत आहेत.
या बाबत मनपाच्या उद्यान विभागाचे अधिक्षक अमोल चोरपगार यांना ‘सत्ताधीश’ने विचारणा केली असता,या कंपनीने ही संपूर्ण झाडे तोडण्याची परवानगी मागितली होती मात्र अशी परवानगी नाकारण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.तरी देखील कोणत्याही परवानगी शिवाय या कपंनीने शेकडो झाडांची मूळे कापत नेत, केबल टाकण्यासाठी खड्डे खणले.या विरोधात तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. राज्य महामार्ग विभागाल कारणे दाखवा नोटीस पाठवण्यात आली असून या विरोधात लवकरच पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविली जाईल,असे उत्तर त्यांनी दिले.
मूळात मनपाला फक्त तक्रार नोंदविण्यापुरतेच अधिकार असल्याचे माजी मनपा आयुक्त राधाकृष्णन.बी यांनी माध्यमांना एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले होते.या नंतर मनपाचा रोल संपतो,असे ते म्हणाले होते.तपास करने,गुन्हा नोंदवणे,न्यायालयात जाणे,शिक्षा करने हे पोलिसांचे काम आहे,मनपाचे नाही,अशी मुक्ताफळे त्यांनी उधळली होती.टी.एन.शेषण हे मुख्य निवडणूक अधिकारी असताना त्यांनी देशातील राजकीय दिग्गजांना चांगलाच घाम फोडला होता.एखादा विभाग कशाप्रकारे संविधानाने दिलेल्या अधिकारांचा वापर करुन जनतेच्या हितासाठी चालवायचा,याचा आदर्शच शेषण यांनी घालून दिला होता.शेषण आणि राधाकृषण्न बी.शासकीय अधिका-यांमधील ही तफावत त्यामुळेच ठलकपणे अधोरेखित होते.
मनपाच्या उद्यान विभागाद्वारे अश्या शेकडो तक्रारी विविध पोलिस ठाण्यात नोंदविण्यात आल्या आहेत.या तक्रारींचे पुढे काहीच होत नसून, कोणत्याही नियम मोडणा-या व नागपूर शहराच्या पर्यावरणाची अपरिमित हानि करणा-या कंत्राटदारांवर व त्यांच्या कर्मचा-यांवर गुन्हा दाखल होऊन शिक्षा झाली नाही,हेच या शहराच्या नागरिकांचे दूर्देव म्हणावे लागेल.
एकीकडे नुकतीच नागपूरचे खासदार असणारे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या केंद्रिय रस्ते वाहतूक आणि महामार्ग प्राधिकरण(एनएचएआय)तर्फे अमृत महोत्सवानिमित्त ३६ हजार झाडांचे वृक्षारोपण देशभरात करण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली,दूसरीकडे त्यांच्याच शहरात शेकडो झाडांची कत्तल मात्र कोणत्याही अडथळ्यांशिवाय सर्रास सुरु आहे.नुकतेच माऊंट रोड भागातील मॉईलच्या रिकाम्या जागेवर डोलदारपणे उभी असणारी २५ हिरवीगार झाडे कापून टाकण्यात आली.महत्वाचे म्हणजे २५ झाडांची कत्तल होऊन खोंडासह वाहनांमध्ये लाकूड भरुन वाहने निघून देखील गेली मात्र ना मनपाच्या उद्यान विभाग ना मॉईलच्या सुरक्षा रक्षकांना याचा पत्ता लागला….!मनपाच्या उद्यान विभागाने या ही घटनेत फक्त सदरच्या पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपींविरुद्ध तक्रार नोंदवून इतिश्री मानली.
माऊंट रोड परिसरात मॅगनीज व इंडिया लिमिटेडची १२ हजार वर्ग फूटांची जागा आहे.अनेक वर्षांपूर्वी मॉइलची इमारत तोडून ही जागा रिकामी सोडून देण्यात आली होती.लोखंडी टीन टाकून संरक्षक भींत बनवून महाराष्ट्र सुरक्षा दलाचे जवान निगरानीसाठी तैनात करण्यात आले.मात्र, २५ झाडांची कत्तल होतानाही या सुरक्षा दलाच्या जवानांना कानोकान माहितीच झाली नाही?यावर नागरिकांचा विश्वास नसून या जागेवर आता कोणाचा डोळा आहे,यावर चांगलीच चर्चा झडत आहे.
या जागेवर बोर,सूबाभूळ आणि आडजातीचे ५० पेक्षा जास्त झाडे होती.त्यांचे वय १० ते २० वर्ष अंदाजे होते.सामाजिक कार्यकर्ता सचिन खोब्रागडे यांच्या सूचनेनंतर मनपाच्या उद्यान विभागाला जाग आली व घटनास्थळाचा पंचनामा करुन सदर पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपींच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली.तक्रारीत मॉइलच्या अधिका-यां ऐवजी इतर व्यक्तीला समोर करण्यात आले,जे की खूप संशयास्पद आहे.
महत्वाचे म्हणजे सचिन खोब्रागडे यांच्यासारखे दक्ष सामाजिक कार्यकर्ते, एखाद्या बिल्डरविरोधात उद्यान विभागात तक्रार दाखल करतात तेव्हा उद्यान विभाग त्यांनाच सिद्ध करण्यास सांगतो अमूक त्या बिल्डरनेच झाडे कापली आहेत का?याचा अर्थ राजकारणी व धनदांडग्यांवर एफआयआर दाखल करण्यास उद्यान विभागच घाबरतो,असा आरोप केला जात आहे.
शहरात शंभरपेक्षा अधिक जागांवर बिल्डर लॉबीकडून बांधकाम होत आहेत.अनेक ठिकाणी जुन्या हेरिटेज झाडांना रसायन टाकून आधी पोकळ केले जाते यानंतर त्या वाळलेल्या झाडांना कापण्याची परवानगी मिळवली जाते.पंचशील टॉकीज जवळ रिलायंस मॉलमध्ये दुचाकी ठेवण्यासाठी जागा अपुरी पडते म्हणून दोन हिरवीगार झाडे आधी अशीच रसायन टाकून वाळवून टाकण्यात आली.यानंतर उद्यान विभागाची परवानगी घेऊन कापून टाकण्यात आली!जानकी टॉकीज परिसरातील ६ हेरिटेज झाडे अशीच रसायन टाकून वाळवून टाकण्यात आली व यानंतर कापण्यात आली. अलंकार टॉकीज जवळील धरमपेठ कला विद्यालयाजवळील जागेवर बिल्डरकडून ३६ हजार वर्ग फूट जागेवर बांधकाम केले जात आहे.या बांधकामाच्या मध्यभागी ५० वर्ष जुने हेरिटेज पिंपळाचे व करंजचे झाड असून या झाडांना वाचविण्यासाठी खोब्रागडे यांनी उद्यान विभागाला सूचना पत्र दिले असतानाही, जूनमध्ये ही दोन्ही झाडे कोणत्याही परवानगी शिवाय बिल्डरने कापून फेकली!
(छायाचित्र: पंचशील टॉकीज जवळील रिलायंस मॉलमधील पार्कींगच्या जागेवरील झाडे अशी रसायन टाकून वाळवण्यात आली!)
खोब्रागडे यांनी आक्षेप नोंदवला असता,इतक्या ठिकाणी बिल्डर्सची कामे सुरु असतात त्यामुळे तक्रारीच्या आधारवर पत्ते शोधण्यासाठी कर्मचा-यांना कामावर लाऊ शकत नसल्याचे अजब कारण उद्यान अधिक्षक अमोल चोरपगार यांनी माध्यमांकडे सांगितले!ज्या विभागावर शहरातील झाडांच्या सरंक्षण आणि संवर्धनाची जवाबदारी आहे त्या विभागाचा कारभार कसा चालतोय?याचे हे ज्वलंत उदाहरण म्हणावे लागेल.
उद्यान विभागाचे अधिकारी कोणत्याही सर्वेक्षणाशिवाय तात्काळ झाडांना कापण्याची परवानगी देताना दिसतात असा खोब्रागडे यांचा आरोप आहे.नियमाप्रमाणे कोणतेही झाड कापण्यापूर्वी जाहीर सूचना देणे बंधनकारक आहे.वाळलेल्या झाडांच्या कापणीसाठी देखील जाहीर सूचना देणे बंधनकारक आहे,त्यामुळेच मेडीकल परिसरातील २९४ झाडे कापण्याबाबत दिलेल्या जाहीर सूचनेत ३ वाळलेल्या झाडांचा उल्लेख करण्यात आला मात्र,बिल्डर्स आणि धनदांडग्यांच्या प्रकरणात हाच उद्यान विभाग सोयीस्करपणे वाळलेल्य किंबहूना वाळवलेल्या झाडांकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप केला जात आहे.
(छायाचित्र: सिव्हील लाईन्स लेबर कोर्ट जवळील पामची सहा झाडे!अनेक ठिकाणी छिद्र करुन रसायन टाकण्यात आले!)
एका सर्वेक्षणात गेल्या दहा वर्षात आम्ही इतकी झाडे कापली आहेत की आता त्याचे नुकसान भरुन काढण्यासाठी दर वर्षी चार अरब झाडे फक्त दहा वर्षात जगभरात लावावी लागणार आहेत,असे सांगण्यात आले.नागपूरचेच उदाहरण घ्यायचे झाल्यास एका अजनीवन प्रकल्पासाठीच शहरातील मध्यभागातील एकमेव फूफ्फूस असणारे ४० हजार झाडे कापण्याचा डीपीआर गडकरी यांच्या विभागाने तयार केला होता.या प्रकल्पाला शहरातील पर्यावरणवाद्यांनी न्यायालयात आव्हान दिल्यानंतर यावर स्थगिती मिळाली असतानाही, राज्यात सत्तांतर होताच हाच प्रकल्प वेगळ्या नावाने आणण्यात आला व रेल्वे विभागाद्वारे अजनीवनमध्ये दिवस रात्र हिरवेगार तब्बल दोनशेच्या वर झाडांवर मशीनी चालवण्यात आले,त्यांची कत्तल करण्यात आली.अजनीवनात शंभर नव्हे तर दोनशेच्याही वर झाडे कापली गेली अशी माहिती, स्वत: मनपानेच नागपूर खंडपीठात सादर केली!
हिस्लॉप कॉलेज जवळ चिटणीस सेंटर विरुद्ध दिशेला ६ पामच्या झाडांना जागोजागी छिद्र करुन रसायन टाकून वाळवण्यात आले यांनतर कापण्याची परवानगी मागण्यात आली.ही जागा हल्दीरामने घेतली आहे,हे विशेष!कामठी रोडवर एका मंदिराच्या पुर्ननिर्माणासाठी १२५ वर्ष जुने लिंबाचे झाड कापण्यात आले,याच ठिकाणी ७५ वर्ष जुने पिंपळाचे झाड देखील कापून टाकण्यात आले!
शहरातील अतिशय वर्दळीचे ठिकाण मोरभवन येथे बस डेपो विकसित करण्यासाठी स्वत: उद्यान विभागद्वारे १९० झाडे कापण्यात आली.मात्र,या परिसरातील अनेक दूकानदार २ हजारच्या वर झाडे कापण्यात आल्याची माहिती सांगतात.सोमलवाडा तलाव परिसरात देखील काही महिन्यांपूर्वी विमानतळ मार्गावरील २५ झाडे झाड माफियांकडून कापून पळवण्यात आली.शहरात झाडाच्या फांद्या छाटून देण्याची आरोळी ऐकून, अनेक जण त्यांच्या अंगणातील किवा पसिरातील झाडांच्या फांद्या कापण्याचे काम अशा झाड कापणा-याला देतात मात्र,हे झाड माफिया झाडांना संपूर्ण बोडखे करुन त्वरित वाहनांमध्ये भरुन पळून जात असल्याच्या शेकडो घटना शहरात घडल्या आहेत.
याशिवाय महामेट्राने अनेक ठिकाणी स्टेशन व मेट्रो मार्ग विकसित करण्यासाठी शेकडो झाडांचा आधीच बळी घेतला आहे.
वरील सर्व कारणांमुळे नागपूर शहराच्या पर्यावरणाचा समतोल पार ढासळला असून, गेल्या आठ- नऊ वर्षात तापमानातील उमसने नागपूरकर हैराण झाले आहेत.धो-धो पाऊस कोळसतो मात्र,पावसाने अल्प विश्रांती घेताच वेगळीच उमस नागपूरकांना हैराण करते.
अनेक विकास प्रकल्पांसाठी झालेली भरमसाठ वृक्षतोड,शहर भर पसरविण्यात आलेले सिमेंट काँक्रिटचे रस्ते,बिल्डर्स लोकांचा हव्यास,दूकानदारांची, दूकानाचे फलक ग्राहकांना ठलकपणे दिसायला हवे म्हणून रस्त्यालगतची झाडे कापून फेकण्याची वृत्ती,अंगणात कचरा साचतो म्हणून अंगणात झाडेच नको म्हणून कापून टाकण्या-या नागरिकांचा कोतेपणा,मनपाच्या उद्यान विभागातील अधिका-यांची ‘राजकीय’ उदासिनता इत्यादी अनेक कारणांमुळे पर्यावरणावर मनापासून प्रेम करणारे व भावी पिढीसाठी हिरवेगार नागपूर जपण्याचा,जगवण्याचा प्रयत्न करणारे काही मोजक्याच पर्यावरणवाद्यांची तळमळ,अपुरी पडत आहे.
या सगळ्यांमध्ये जागरुक नागरिक म्हणून आपण कुठे असतो याची नागपूरक नागरिकांनी, निदान करोनानंतर तरी शुद्ध प्राणवायु देणा-या झाडांसाठी जाणीव ठेवावी,अशी अपेक्षा पर्यावरणवादी व्यक्त करताना दिसतात.
……………………………………….