नागपूर : महिला रेडिओ जॉकी (वय ३३) सोबत चॅटिंग करून तिला व्हिडीओ कॉल करण्याची मागणी केल्याच्या आरोपावरून वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक बागुल यांच्याविरुद्ध सीताबर्डी ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
बागुल वाहतूक शाखेत प्रभारी सहायक आयुक्त म्हणून कार्यरत आहे. तक्रार करणारी तरुणी रेडिओ जॉकी म्हणून नागपुरात काम करते. कार्यालयीन कामाच्या निमित्ताने तिने बागुल यांना बुधवारी दुपारी १२.२२ वाजता मेसेज करून डीसीपी ट्रॅफिकचा नंबर मागितला होता. बागुल यांनी तिच्याशी चॅटिंग करताना तिला व्हिडीओ कॉल करण्यास सांगितले. तिने कशासाठी विचारले असता तुझा सुंदर चेहरा बघायचा आहे, असे ते म्हणाले. त्यामुळे तरुणी संतप्त झाली. तिने आपल्या फेसकबुकवर बागुल यांच्यासोबत झालेली चॅटिंग स्क्रीन शॉटच्या रुपाने शेअर केली. त्यामुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली. फेसबुक फ्रेण्ड, नेटीझन्सने या तरुणीच्या शेअर चॅटवर संतप्त प्रतिक्रिया नोंदवून तिला पोलिसांत तक्रार करण्याचा सल्ला दिला. दरम्यान, बागुल यांच्यासोबतची चॅट सोशल मिडियावर व्हायरल झाल्यामुळे वरिष्ठ पोलीस अधिका-यांनी त्याची गंभीर दखल घेतली. त्यानंतर तरुणीने बुधवारी रात्री सीताबर्डी पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिला. काही जणांनी तिला तक्रार परत घेण्यासाठी विनवणी केली तर काहींनी तिच्यावर दडपण आणण्याचाही प्रयत्न केला. मात्र, तिने दाद दिली नाही. पोलीस दलात वरिष्ठ पातळीवर या संबंधाने गंभीर चर्चा झाली. त्यानंतर बागुल यांची तडकाफडकी नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली. तर, उशिरा रात्री बागुल यांच्याविरुद्ध सीताबर्डी ठाण्यात विनयभंगाच्या आरोपाखाली कलम ३५४ (अ) आणि ३५४ (ड)अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
या घडामोडीमुळ पोलीस दलात प्रचंड खळबळ उडाली आहे. पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी महिला-मुलींवरील अत्याचाराच्या घटनांच्या संबंधाने कडक कारवाईच्या उपाययोजन आखल्या असून, कडक कारवाईचे निर्देश दिले आहे. दुसरीकडे गेल्या महिनाभराच्या कालावधीत दोन पोलीस निरीक्षकावर बलात्काराचा तर आता एकावर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला. त्यामुळे सर्वसामान्यांमध्येही उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे. या प्रकरणाचा तपास वरिष्ठ पोलीस अधिका-यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.