रामटेक लोकसभा मतदारसंघातून पक्षाचे सरचिटणीस मुकुल वासनिक यांनाच उमेदवारी द्यावी, अशी आग्रही मागणी ग्रामीण काँग्रेसच्या नेत्यांनी पत्रपरिषदेत केली. दस्तूरखुद्द वासनिक यांनी निवडणूक लढण्यास इन्कार केल्याची माहिती असतानाही त्यांच्या समर्थनार्थ एक गट समोर आल्याने पक्ष वर्तुळात आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. या पत्रपरिषदेस जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक व ग्रामीणमधील पक्षाचे एकमेव आमदार सुनील केदार उपस्थित नव्हते. विद्यमान खासदार कृपाल तुमाने यांनी गेल्या पाच वर्षात कोणतीही विकास कामे केली नसल्याचा आरोप बाबुराव तिडके यांनी पत्र-परिषदेत केला. तुमाने यांना रामटेक मध्ये किती गावे,नगर परिषदा आहेत हे देखील माहिती नसल्याचा आरोप तिडके यांनी केला. राष्ट्रवादीचे अनिल देशमुख, रमेश बंग यांचा देखील वासनिक यांच्या नावाचा आग्रह असल्याचे त्यांनी सांगितले. नितीन राऊत,किशोर गजभिये या इच्छुकांच्या प्रश्नावर वासनिक यांनी कधीही गटबाजी केली नसल्याचे तिडके यांनी सांगितले. मुकुल वासनिकांना नितीन राऊत आणि किशोर गजभिये हे दोघेही जवळचे असल्याचे ते म्हणाले.
रामटेक लोकसभा मतदारसंघातून माजी सनदी अधिकारी किशोर गजभिये यांची उमेदवारी निश्चित झाली असल्याचा दावा त्यांच्या समर्थकांकडून केला जात आहे. पक्षाच्या अनुसूचित जाती आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन राऊत यांचेही नाव चर्चेत आहे, हे विशेष. वासनिक यांचा हायकमांड नेत्यांमध्ये समावेश होत असतानाही समर्थकांकडून करण्यात आलेल्या शक्तिप्रदर्शनावर आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. या घडामोडींमुळे ग्रामीणमधली गटबाजी चव्हाट्यावर आल्याची चर्चाही सुरू झाली. माजी केंद्रीय मंत्री व पक्षाचे सरचिटणीस मुकुल वासनिक यांना उमेदवारी दिल्यास संपूर्ण विदर्भात त्याचा फायदा होईल. यापूर्वीची पाच वर्षे त्यांनी या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. या काळात त्यांनी विकासाची अनेक कामे केली. यावेळी निवडणूक प्रचारासाठी मोजके दिवस मिळणार आहेत. अशा स्थितीत नवा चेहरा दिल्यास प्रचाराला वेळ मिळणार नाही व त्याचा फटका पक्षाला बसेल. त्यांचा प्रदीर्घ अनुभव, पक्षातील त्यांचे वजन आणि अनुकूल परिस्थितीमुळे ही जागा आम्हाला मिळेल, असा दावा नाना गावंडे यांनी केला.
वासनिक यांनी नकार कळवला असल्याकडे लक्ष वेधले असता, त्यांच्याकडे तामिळनाडू, केरळ, पुड्डुचेरी आदी राज्यांची जबाबदारी आहे. केंद्रीय निवडणूक समितीचे ते प्रमुख आहेत. त्यामुळे त्यांची व्यस्तता लक्षात घेता निवडणूक न लढण्याचा निर्णय योग्य असला तरी, विदर्भाला बळ मिळावे, यासाठी त्यांना उमेदवारी देण्यात यावी, असेही गावंडे म्हणाले. वासनिक यांच्या उमेदवारीसाठी थेट दिल्लीत शक्तिप्रदर्शन शक्य आहे. मात्र, मीडियाच्या माध्यमातून कार्यकर्त्यांच्या भावना श्रेष्ठीपर्यंत पोहोचाव्यात म्हणून पत्रपरिषद घेण्यात आल्याचे प्रदेश सचिव मुजीब पठाण, बाबुराव तिडके, संजय मेश्राम आदी नेत्यांनी स्पष्ट केले. कुणालाही आमचा विरोध नाही, पक्षाने कोणताही उमेदवार दिल्यास त्यांचा प्रचार करण्यात येईल, असा दावाही या नेत्यांनी केला. पत्रपरिषदेला महिला आघाडी अध्यक्ष तक्षशीला वागधरे, कुंदा राऊत, भीमराव कडू, अनिल पाटील, नंदा नारनवरे, बाबा आष्टनकर, अॅड. हेमंत रंभाड, रजत वर्धने, जयमाला शेंडे, राजेश थोराणे, अश्विन बैस आदी उपस्थित होते