नागपूर: सिमेंट रोडला गेलेले तडे, पावसाळ्यात शहर जलमय होण्याचा अनुभव किंवा मग वेगवेगळ्या करांमुळे त्रस्त झालेले सर्वसामान्य नागरिक, यालाच जर तुम्ही विकास म्हणत असाल तर भाजपवाले लोकांची फसवणूक करीत आहेत आणि येत्या निवडणुकीत मतदारच त्यांचा हा बुरखा फाडल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी दिला आहे.
केंद्रीय मंत्री व नागपूरचे खासदार नितीन गडकरी यांनी काय विकास केला हे जाणून घ्यायचे असेल तर ते सोनिया गांधी यांना विचारा, असे वक्तव्य काल भाजपचे पश्चिम नागपूरचे आमदार सुधाकर देशमुख यांनी पत्रपरिषदेत केले होते. अतुल लोंढे यांनी या वक्तव्याचा आज खरपूस समाचार घेतला.
ते म्हणाले की, लोकसभेत सोनिया गांधी यांनी गडकरी यांचे बाक वाजवून अभिनंदन केले हे खरे आहे. खरे तर विरोधी पक्षातील नेत्याचे असे जाहीर अभिनंदन करण्यासाठीही मनाचा मोठेपणा लागत असतो. जो सोनियांजीकडे आहे. मात्र सोनियाजींनी जे अभिनंदन केले ते गडकरींनी केलेल्या तथाकथित कामांसाठी नव्हते, तर नरेद्र मोदींना आरसा दाखविणारा कुणीतरी भाजपात आहे, म्हणून त्यांनी बाक वाजवून अभिनंदन केले. जो आपले घर सांभाळू शकत नाही तो देश काय सांभाळणार, असा प्रश्न काही दिवसांपूर्वी गडकरी यांनी केला होता. त्यांनी कुणाचे नाव घेतले नसले तरी तो प्रश्न कुणाला उद्देशून होता हे वेगळे सांगण्याची गरज नाही.
जनमंचही गप्प
सुधाकर देशमुख यांनाच, गडकरी यांनी काय कामे केली हे समजून घ्यायचे असेल तर त्यांनी जनमंचकडे विचारणा करावी. अलीकडे
जनमंचही गप्प आहे हा भाग वेगळा मात्र गडकरींनी केलेल्या रस्त्यांच्या कामाचा लेखाजोखा जनमंचकडे आहे. ३० वर्षे सिमेंट रोडला काहीच होणार नाही असे गडकरी सांगत होते मात्र नागपूर शहरात अनेक ठिकाणी सिमेंटच्या रस्त्यांना तडे गेले आहेत. रेशीमबागेतील सुरेश भट सभागृहासमोरील रस्त्यालाही क्रॅक पडल्या आहेत. रस्ते केले म्हणून सांगता तर मग या क्रॅक्सची जबाबदारी कुणाची? ७ जुलै २०१८ रोजी नागपुरात अतिवृष्टी झाली होती. सारे नागपूर जलमय झाले. विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन पहिल्यांदाच नागपुरात सुरू होते आणि विधानभवनातही पाणी शिरले. लोकांच्या घरांमध्ये, मंगल कार्यालयांमध्ये पाणी शिरले. या पाण्यांत कित्येकांचे संसार वाहून गेले. आम्ही त्यावेळी लोकांच्या मदतीसाठी धावलो. हे सारे का घडले, कारण पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी पुरेसे नियोजन नव्हते. यात झालेले नुकसान लोक कसे विसरतील? एकीकडे अशी स्थिती असताना दुसरीकडे वेगवेगळ्या करांचा बोझा लोकांच्या डोक्यावर आहे. मेट्रो सुरू व्हायच्या आधीच तिच्यासाठीचा कर सुरू झाला, दुष्काळामुळे असलेला सेस सुरूच आहे. पिण्याचे पाणी विकणे, कचरा विकणे, लोकांना कराच्या ओझ्याखाली ठेवणे याला तुम्ही विकास म्हणत असाल तर ही शुद्ध फसवणूक असल्याची टीका लोंढे यांनी केली आहे.
तुम्ही काय केले हे कदाचित तुम्हाला आठवत नसेल पण लोक विसरलेले नाही. त्यामुळे येत्या निवडणुकीत त्याचा प्रत्यय भाजपला येईल, असेही लोंढे यांनी म्हटले आहे.
….