‘वंचित’ आघाडीने स्वबळावर लढून फायदा नाही,सत्ता हवी असेल तर त्यांनी भाजप-शिवसेना युतीसोबत यावे.२००९ मध्ये आम्ही तिसरी आघाडी करून बघितली मात्र फायदा झाला नाही. सभेला लोक येतात पण मते देतात असे नाही,वंचित आघाडीला मते म्हणजे भाजपलाच फायदा असे मत केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज दि.१४ फेब्रुवारी रोजी रवी भवन नागपूर येथे आयोजित पत्र परिषदेत व्यक्त केले. माईसाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त ते नागपूरला आले होते. या प्रसंगी बोलताना पुढे ते म्हणाले,की गोर गरीबांच्या प्रश्नासाठी सत्ता मिळाली पाहिजे असे डॉ.आंबेडकर देखील म्हणत असत.’वंचितांना’ तिकडे जाऊन सत्ता मिळणार नाही. एका प्रश्नाचे उत्तर देताना आठवले म्हणाले, मी संधीसाधू नाही,मी जिथे जातो त्यांना सत्ता मिळते. मी आंबेडकरवादी आणि शुद्ध बुद्धिस्ट आहे त्यामुळे मी भूमिका मांडतो,टिका करत नाही. आज मी एकटा मंत्री आहे ते ही सोबत आलेत तर ते ही मंत्री होतील.
राफेलमुळे आम्ही गाफील राहणार नाही असेही ते म्हणाले. भाजप-शिवसेनेने मोठा भाऊ छोटा भाऊ या वादात न पडता एकत्रीत यावे,काँग्रेस-राष्ट्रवादीला आव्हान देण्याची क्षमता फक्त युतीत आहे असेही ते म्हणाले. प्रियांका गांधी यांचे राजकारणात स्वागतच आहे मात्र फक्त इंदिरा गांधी यांच्यासारख्या दिसण्या पलीकडे त्यांनी कामही करून दाखवावे. दलित-मुस्लिम समाज एकतेचा आम्ही आदर करतो पण हिंदू समाजावर आक्रमण करणे हे धोरण मंजूर नाही. मुस्लिम समुदायाला मात्र न्याय मिळाला पाहिजे. राम मंदिर मुद्द्यावर बोलताना ते म्हणाले की एकूण ६५ एकर मधील साढे चार एकर जागा ही बुद्ध मंदिराची असून अढीच एकर जागेवर मज्जीद उभारता येईल मात्र वाद टाळण्यासाठी मजीदीसाठी दुसरी जागाही देता येईल. कायदा हातात घेऊन राम मंदिर बनवू नये, ते बेकायदेशीर ठरेल मात्र न्यायालयाने राममंदिराबाबत लवकर निर्णय घ्यावा. बुवा- भांजा युती प्रश्नावर बोलताना ते म्हणाले,की भाजपच्या सहकार्याने मायावती तीन वेळा उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री बनल्या तेव्हा भाजप मनुवादी नव्हता, आता भाजप मनुवादी कसा झाला? तरुणाईमध्ये मोदींचे खूप आकर्षण आहे,तीन तलाकच्या मुद्द्यावर मुस्लिम महिलाही भाजपलाच मते देतील. तीन राज्यात भाजप हरली याला कारण स्थानिक मुद्दे होते. या तिन्ही राज्यात ना भाजप हरली ना काँग्रेस जिंकली. देशभरात भाजपसाठीच वातावरण चांगले असून यावेळी भाजपला २६० जागा मिळण्याचा कयास आठवले यांनी वर्तवला. ममता बेनर्जी यांच्या बंगालमध्येही भाजप चांगल्या जागा मिळवेळ. बिहारमध्ये नितीश कुमार-भाजपसोबत आहेत त्यामुळे २०१९ चा सामना हे आम्हीच जिंकू असे ते म्हणाले. महागठबंधनात पंतप्रधान पदासाठी इच्छुकांची लाईन लागली लागली असल्याची कोटी त्यांनी केली. यावेळी ‘मोदीच’ तर पुढील पाच वर्षांनंतर गडकरी यांचं नाव आलं तरी चालेल,असेही सूचक उदगार त्यांनी काढले.