नागपूर,ता.२१ डिसेंबर २०२४: भारतामध्ये असं एक ही शहर नाही जिथे एकाच शहरासाठी चार-चार विकास प्राधिकरण कार्यरत आहेत,नागपूरात नागपूर महानगरपालिका,नागपूर सुधार प्रन्यास,एनएमआरडीए तसेच महामेट्रो हे चार शासकीय विकास प्राधिकरण कार्यरत असून याचा फार मोठा बोजा नागपूरकरांना सहन करावा लागत आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या मुख्यमंत्री पदाच्या पहील्या काळात शेवटच्या वर्षात नागपूर सुधार प्रन्यास बर्खास्त करण्याचा निर्णय घेतला होता.मात्र,त्यानंतर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले व महाविकास आघाडीची सरकार आली.या सरकारमध्ये पालकमंत्री व उत्तर नागपूरचे काँग्रेसचे आमदार नितीन राऊत यांनी ठाकरे यांच्या करवी हा निर्णय फिरवला व पुन्हा नासुप्रला पुर्नजिवित केले.आता पुन्हा फडणवीस हे नासुप्रला बर्खास्त करणार आहेत का?असा सवाल केला असता,हा मुद्दा विचाराधीन आहे,योग्य वेळी निर्णय घेणार असल्याची स्पष्टोक्ती फडणवीस यांनी दिली.ते आज नागपूर हिवाळी अधिवेशनाचे सूप वाजल्यानंर पत्रकार परिषदेत बोलत होते.
मध्य नागपूरचे भाजपचे आमदार प्रवीण दटके यांनी देखील सभागृहात नासुप्र पुन्हा बर्खास्त करण्याची मागणी केली होती,हे विशेष.चुकीच्या पद्धतीने सर्व नियम धाब्यावर बसून कोणालाही सार्वजनिक मोकळे भूखंड देणे,उद्याने,मैदाने विकासासाठी देणे असे अनेक कारनामे नासुप्र गेल्या अनेक दशकांपासून करीत असल्याचा आरोप दटके यांनी केला.एकीकडे मनपाला घर बांधणीचे शुल्क वेगळे द्या,नासुप्रचे शुल्क वेगळे भरा,अश्या रितीने एकाच शहरात दोन विकास प्राधिकरण असल्याने नागपूरकरांची खूप परवड होत असल्याची व्यथा आमदार दटके यांनी सभागृहात मांडली.नागपूरात हे अधिवेशन होत असल्याने नासुप्रसारखी संस्था ही तत्काळ बर्खास्त करण्याची मागणी त्यांनी केली.
नासुप्र हे भ्रष्टाचाराचे कुरण बनले असून नासुप्रच्या अनेक अधिका-यांच्या भ्रष्टाचाराच्या अनेक सुरस कथा नागपूरकरांना सर्वज्ञात आहेत,अनेक प्रकरणात न्यायालयाने देखील नासुप्रच्या कारभारावर कठोर ताशेरे ओढले आहेत,त्यामुळे नागपूर महानगरपालिकेला आर्थिकरित्या अधिक सक्षम करुन नागपूरकरांसाठी पांढरा हत्ती ठरलेल्या नासुप्रचा हा बोजा नागपूरकरांच्या खांद्यावरुन उतरविण्याचा विचाराला शहरातील अनेक अर्थतज्ज्ञ सातत्याने पाठींबा देताना दिसून पडतात.
नासुप्रकडून काँग्रेसच्या काळात शहरातील अनेक मोक्याच्या जागा विकासाच्या नावावर लीजवर लाटण्यात आला ज्यावर काँग्रेसच्या अनेक माजी मंत्र्यांची महाविद्यालये,रुग्णालये पासून अगदी शाळा,अंगणवाड्या देखील उभ्या झाल्या आहेत.परिणामी, आज नागपूर शहर चौफेर अस्ताव्यस्त वाढले आहे ,तीस लाखांच्या पल्ल्याड लोकसंख्या पोहोचली आहे मात्र,सार्वजनिक वापराच्या जागाच उपलब्ध नसल्याने,नागपूरकरांना उद्यान,मैदाने व सार्वजनिक सुविधांपासून वंचित राहवे लागत आहे.किमान नासुप्र बर्खास्त झाल्यास किमान एका स्थानिक स्वराज्य संस्थेकडून होणारी भूखंडांची लृट तरी कायमची थांबेल,असे मत तज्ज्ञ व्यक्त करतात.