वारसा अधिकारांचा नव्हे तर कर्तव्याचा: चंद्रपुरात ब्रिजभुषण पाझारे यांची अपक्ष लढा
भाजपात तीस वर्ष कार्यकर्ता असूनही उमेदवारी नाकारली:पाझारे यांची खंत
चंद्रपूर,ता.८ नोव्हेंबर २०२४: मी भारतीय जनता पक्षाचा गेल्या तीस वर्षांपासून समर्पित कार्यकर्ता आहे मात्र,भाजपने मला उमेदवारी नाकारली त्यामुळे मी चंद्रपूर मतदारसंघातून अपक्ष लढण्याचा निर्धार केला.माझी पूर्ण तयारी झाली होती मात्र,ज्या उमेदवाराने नेहमी पक्षासोबत वाद केले,त्या भाजपच्या हितशत्रूलाच किशाेर जोरगेवारांना उमेदवारी देण्यात आली,ही उमेदवारी धनशक्ती विरुद्ध मनशक्तीची असल्याचे चंद्रपूर विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून लढणारे ब्रिजभूषण महादेव पाझारे यांनी प्रचार सभेनंतर खास ‘सत्ताधीश‘सोबत बोलताना सांगितले.
याप्रसंगी बोलताना ते म्हणाले की,माझा लढा भाजपच्या उमेदवाराशी असून त्याच्याकडे धन आहे मात्र माझ्याकडे जनतेचे प्रश्न समजून घेणारे मन आहे,त्यामुळेच मी ही निवडणूक ‘धनशक्ती विरुद्ध मनशक्तीची ’असल्याचे सांगत आहे.मी एक सामान्य ,गरिब कुटूंबातील कार्यकर्ता असून जनतेच्या प्रश्नांसाठी आजपर्यंत झटत आलो आहो.विधानसभेत जाऊन मला चंद्रपूरमधील सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडायची होती,त्यामुळेच येथील जनतेने मला अपक्ष लढण्यासाठी प्रोत्साहित केले,असे त्यांनी खास ‘सत्ताधीश’सोबत बोलताना सांगितले.
चंद्रपूरातून भाजपचे जे उमेदवार आहेत किशोर जोरगेवार त्यांनी चंद्रपूरातील मतदारांची फसवणूक केली असं वाटतं का?पहीले अपक्ष लढलेत मग महाविकासआघाडीत गेले,नंतर महायुतीमध्ये आले,आता भाजपतर्फे निवडणूक लढत आहेत,असा प्रश्न केला असता,जोरगेवार हे अपक्ष म्हणून निवडणूक लढले यानंतर काँग्रेस,राष्ट्रवादी ,शिवसेना,पुन्हा अपक्ष पुन्हा भाजपा,त्यांना फक्त ‘आमदार’बनायचं आहे,सेवक नाही,असा आरोप पाझारे यांनी केला.ते जर जनतेचे सेवक असते तर आज चंद्रपूरचा चेहरामोहरा बदलला असता,आज बेरोजगारीची आकडेवारी ही वाढली असून प्रत्येक दहा घरांमध्येच दहा बेरोजगार आढळतात.शासन याेजनेतील घरे देखील जनतेला मिळत नाही आहेत.पंतप्रधान नरेंद्र मोदींची अमृत योजना ही फक्त देखावा करुन ठेवण्यात आली असून घरोघरी पाईपलाईन पाेहोचली मात्र,पाणीच नाही,असा आरोप त्यांनी केला.रस्ते,फूटपाथ यांची दूर्दशा जनसामान्यांना माहिती आहे.आरोग्य सेवा कोलमडली आहे.गेल्या पाच वर्षांपासून आमदारकी भोगत असलेले जोरगेवार यांनी एकच काम केले ते म्हणजे ‘दिल्ली-मुंबईच्या चकरा मारने’,जोरगेवारांना फक्त आमदार बनायचे आहे सेवक नाही,मला सेवक बनायचे आहे पण त्यासाठी मला आमदार व्हावे लागेल,अशी पुश्ती त्यांनी जोडली.
चंद्रपूर हा देशातील दिल्लीनंतर सर्वाधिक प्रदुषित शहर आहे मात्र,चंद्रपुरातील कोणत्याही उमेदवारांच्या जाहीरनाम्यात पर्यावरण व प्रदुषणाचा उल्लेखच नाही,चंद्रपूरात घरोघरी श्वसनाच्या त्रासाने लहान मुले,ज्येष्ठ नागरिक आजारी आहेत,याकडे लक्ष वेधले असता,प्रदुषणाचा प्रश्न सोडवण्यासाठी प्रदूषण अधिकारी असतात मात्र,पाच वर्ष प्रदुषण अधिका-यांनी शहराचा सर्व्हे केला नाही,आमदार जोरगेवारांनी ही माहिती मागवली का?जिल्हाधिकारी यांच्याकडे कधी प्रदुषणाच्या प्रश्नावर बैठक घेतली आहे का?ज्यांनी मत दिले त्यांना कधी विचारले का?भाजपची उमेदवारी घेतलेले जोरगेवारांनी आमदार असताना प्रदुषणाच्या प्रश्नावर काहीही केले नाही,असा आरोप करीत,मी जर आमदार झालो तर सर्वात आधी चंद्रपुरातील कोणकोणत्या कारखान्यांकडून सर्वाधिक प्रदुषण होत आहेत याचा शोध घेत त्यांना नोटीस पाठवली जाईल,चंद्रपुरातील प्रदुषणाची पातळी कमी करण्याचा सर्वात पहीला मुद्दा मी हाच घेईल यासाठी प्रयत्न करील,अशी ग्वाही त्यांनी दिली.
एका प्रश्नाच्या उत्तरात त्यांनी सांगितले की जल ,वने हे जीवन आहे,आज एखादे झाड ही कापायचे असेल तर शासनाची परवानगी लागते,अधिकाधिक झाडे लावणे व ती जगवणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे.वनमंत्री सुधीर मुनगंटीवारांनी महाराष्ट्रात ३३ कोटी झाडे लावण्याची घोषणा केली होती,चंद्रपुरात किती झाडे त्या योजनेतील लावण्यात आली?असा प्रश्न केला असता,मुनगंटीवारांनी अनेक झाडे चंद्रपुरात लावली,त्यातील काही झाडे वाळली,ती पुन्हा लावण्याचा त्यांनी प्रयत्न केला,निदान एका मंत्र्यांनी झाडे लावण्याचा प्रयत्न तर केला,इतर कोणी असा प्रयत्न केला का?असा सवाल त्यांनी केला.
मतदारांना आव्हान करताना त्यांनी ईव्हीएमवर दहाव्या क्रमांकावर ‘कपाट’या चिन्हासमोरील बटण दाबून प्रचंड बहूमताने निवडून देण्याचे आवाहन त्यांनी केले.