भाजपचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवारांच्या विरोधात दिला कमकुवत उमेदवार!
दिल्लीत ‘सेटिंग’,‘गेटिंग’चा आरोप!
सत्तेसाठी भाजपच्या ‘लाडकी बहीण’ उक्तीत व कृतीत फरक
डॉ.ममता खांडेकर
(Senior Journalist)
संविधानाची प्रत हातात घेऊन सध्या अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे दिल्लीपासून तर गल्लीपर्यंतचे नेते भारताचे संविधान कशाप्रकारे धोक्यात आहेत,हा कंठशोष करताना दिसतात.त्यांच्या प्रत्येक भाषणात हूकूमशाहीपासून संविधानाचे व लोकशाहीचे रक्षण हा मुद्दा असतो मात्र,प्रत्यक्षात खरंच त्यांना संविधानाचे रक्षण करायचे आहे का?कि फक्त सत्ता मिळवण्यासाठी व विरोधकांवर मात करण्यासाठी ते संविधानाचा मुद्दा उचलत आहेत?हा प्रश्न पडतो तो चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लापूर विधानसभा मतदारसंघाचा फेरफटका मारल्यावर,तेथील जनतेसोबत संवाद साधल्यानंतर.‘सत्ताधीश‘ने या मतदारसंघाचा दौरा केल्यावर अनेक धक्कादायक बाबी जनता व उमेदवारांनीच उघड केल्या.
हा मतदारसंघ काँग्रेसचाच बालेकिल्ला होता मात्र,भारतीय जनता पक्षाचे कद्दावर नेते व राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या मतदारसंघातून गेल्या तीन निवडणूकीत काँग्रेसला या मतदारसंघातून हद्दपार केले.२००९,२०१४,२०१९ मध्ये त्यांनी बल्लारपूर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. यंदा देखील भाजपतर्फे त्यांची उमेदवारी घोषित झाली आहे.महत्वाचे म्हणजे याच वर्षी मे महिन्यात पार पडलेल्या लोकसभेच्या निवडणूकीत मुनगंटीवार यांना लोकसभेच्या चंद्रपूर मतदारसंघातील त्यांचाच बालेकिल्ला असलेल्या याच बल्लारपूर विधानसभा मतदारसंघातून कमी मतदान झाले होते व त्यांचा पराभव झाला होता.काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर यांनी लोकसभेच्या निवडणूकीत त्यांचा पराभव केला होता.विधानसभेत मात्र,पुन्हा मुनगंटीवारांनी बल्लारपूर मतदारसंघातून राज्याच्या सत्ताकेंद्रात जाण्यासाठी शड्डू ठोकला आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील मूल,पोंभूर्णा,बल्लापूर या तालुक्यांचा या विधानसभा मतदारसंघात समावेश होतो.काँग्रेसतर्फे बल्लापूरात संतोष रावत यांना तिकीट देण्यात आली आहे मात्र,सर्वात आश्चर्याची बाब म्हणजे रावत यांना तेथील अनेक मतदार ‘डमी’उमेदवार समजत असून खरी लढाई भाजपचे कद्दावर मंत्री सुधीर मुनगंटीवार तसेच अपक्ष उमेदवार डॉ.अभिलाषा गावतुरे(बेहरे)यांच्यात रंगली आहे!डॉ.अभिलाषा यांना काँग्रेसची तिकीट मिळाली असती तर किमान चाळीस हजारांनी मुनगंटीवार यांचा पराभव‘निश्चित’होता,हे केवळ मतदारच सांगत नाहीत तर भाजपच्याच कार्यकर्ता,पदाधिकारी देखील खासगीत मान्य करतात!
यावरुन डॉ.अभिलाषा यांच्या बदलापूरातील कामगिरी व नेतृत्वाचा अंदाज येतो.त्यांच्या पाठीशी ऑल इंडिया बॅकवर्ड ॲण्ड मायनोरिटी कम्यूनिटीज एम्पलाॅईज फेडरेशनचा(बामसेफ)प्रदीर्घ अनुभव असून, त्यांची पार्श्वभूमी ही आंदोलानाची आहे.त्या उच्चशिक्ष्त आहेत.चंद्रपूर जिल्ह्यात सामाजिक कार्यासाठी प्रसिद्ध असलेली भूमिपुत्र ब्रिगेड संघटनेची स्थापना त्यांनी केली.२०१५ मध्ये ईव्हीएम विरोधी आंदाेलनाचे चंद्रपूर येथे त्यांनी प्रमुख नेतृत्व केले होते.२६ नोव्हेंबर २०२० रोजी ओबीसीच्या जात निहाय जनगणनेसाठी विशाल ओबीसी मोर्चा त्यांनी काढला.कारोना काळात दोन वर्षे लोकांचे प्राण वाचवण्यासाठी त्या तत्पर राहील्या.वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात जखमी झालेल्यांसाठी डॉ.अभिलाषा या साक्षात ‘देवदूत’ ठरत असतात.त्यांचे सामाजिक कार्य देखील उल्लेखनीय असून सत्यशोधक बुक बँकेची स्थापना तसेच ‘गाव तिथे वाचनालय’ हा उपक्रम त्यांनी सुरु केला.क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व महात्मा ज्योतिबा फूले यांचा अवमान करणा-या राज्यपालांच्या विरोधात देखील आंदोलनाचे रणशिंग त्यांनी फूंकले,सर्वात महत्वाचे म्हणजे बिल्किस बानो प्रकरणात चंद्रपूरमध्ये महिलांचे मोठे आंदोलन त्यांनी उभारले होते.सीटीपीएस येथे प्रकल्पग्रस्तांच्या हक्कासाठी कामगार आंदोलनाचे त्यांनी नेतृत्व केले तसेच कुपोषित बालकांना दत्तक घेऊन आपले सामाजिक दायित्व हिरिरीने जपले.
अशी प्रगल्भ सामाजिक पार्श्वभूमी असलेल्या डॉ.अभिलाषा यांनी काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी मागितली होती,त्यांचे तिकीट देखील निश्चित झाले होते मात्र,अगदी दिल्ली दरबारी दोन दिवस मतदारसंघातील एक कद्दावर नेता शड्डू ठोकून बसला अन् डॉ.अभिलाषा यांना तिकीट मिळू नये यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले.यात पन्नास ते शंभर कोटींचे वारेन्यारे झाले,असा देखील आरोप होत आहे.म्हणूनच डॉ.अभिलाषा या, ही निवडणूक ‘धनशक्ती विरुद्ध जनशक्ती‘ची असल्याचे आपल्या सभेत खुलेआम सांगताना आढळतात.शिक्षण,आरोग्य,शेती व सिंचन,रोजगार,महिला सक्षमीकरण,क्रीडा,मुस्लिम वसत्यांमधील रहीवाश्याचे जीवनमान उंचावणे इत्यादी मुद्दे घेऊन त्यांनी ‘जनतेचा जाहीरनामा‘प्रसिद्ध केला आहे.
‘सत्ताधीश‘ने बल्लारपूरमध्ये अनेक मोक्याच्या ठिकाणी फेरफटका मारुन,जनतेच्या मनातील उमेदवाराबाबत अदमास घेण्याचा प्रयत्न केला असता,अनेक बल्लारपूरवासियांनी ही निवडणूक डॉ.अभिलाषा व सुधीर मुनगंटीवार यांच्यातच रंगली असल्याचे सांगितले.काँग्रेसच्या उमेदवाराचे कोणतेही ‘अस्तित्वच’या मतदारसंघात नाही,असे ते स्पष्ट सांगतात.ठिकठिकाणी काँग्रेसच्या उमेदवाराचे फलक लागलेले पँडोल टाकून फक्त भोंगे सुरु आहेत.सभा,प्रचार रॅली ,जनतेशी संवाद,पदयात्रा या पातळीवर सगळे ‘सामसूम’आहे,इतकंच नव्हे तर ते सतत ‘नॉटरिचेबल’असतात.दूसरीकडे डॉ.अभिलाषा या दररोज संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढत आहेत.त्यांच्या सभेला प्रचंड गर्दी होत असून महिला व युवांची लक्षणीय गर्दी बघायला मिळते.
येथील काही जाणकारांशी संवाद साधला असता त्यांनी देखील बल्लारपूरमध्ये लढत ही अपक्ष उमेदवार डॉ.अभिलाषा व सुधीर मुनगंटीवार यांच्यातच असल्याचे सांगितले.काँग्रेस हा मतमोजणीत तिस-या स्थानावर असणार आहे,असा दावाच ते करतात.परिणामी,काँग्रेसला डॉ.अभिलाषासारख्या इतक्या सशक्त उमेदवार मिळाल्या असताना त्यांनी कमकुवत उमेदवार का दिला?याचे कोडे राज्यातील एखादे शेंबडे पोर देखील सहज उलगडू शकतो. महाराष्ट्रातील जनतेला सत्तेसाठी,मतांचा जोगवा मागत फिरणा-या काँग्रेसच्या दिल्लीश्वरांनी डॉ.अभिलाषा यांना तिकीट देण्यासाठी ‘हात‘मागे का घेतला?त्यांच्या ‘हातावर’वजन पडले अन ‘हात’खाली बसला,असे येथील युवा सांगतात,ही लोकशाहीची थट्टा मात्र भयंकर अस्वस्थ करुन जाते!
महाराष्ट्राच्या रणसंग्रामात काँग्रस पक्ष अनेक ठिकाणी महायुतीच्या विरोधात महाविकासआघाडीसाठी मतदारांना मतांचा जोगवा मागत आहे.दूसरीकडे बल्लापूरसारख्या मतदारसंघात तीच काँग्रेस भाजपच्या मंत्र्यांविरुद्ध,सशक्त व टक्करीचा उमेदवार उपलब्ध असतानाही कमकुवत उमेदवार देऊन निवडणूकीची ‘औपचारिकता‘पूर्ण करते,त्या काँग्रेस पक्षश्रेष्ठींना खरंच ‘संविधान’कळला का?‘लोकशाही’कळली का?की ते जनतेच्या डोळ्यात फक्त धूळफेक करीत आहे,असा सवाल उपस्थित होतो.
जनतेचा आर्शिवाद पाठीशी असला तर कितीही मोठा मंत्री असू देत किवा कुबेराने आपले संपूर्ण धन जरी बल्लारपूरात ओतले तरी विजय हा सत्याचाच होणार,असे डॉ.अभिलाषा ठामपणे सांगतात.तीन टर्म या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणा-या भाजपचे सुधीर मुनगंटीवार यांच्या ‘विकासा’वर देखील जनता भरभरुन बोलली.बल्लापूरात ‘विकास’झाला हे निश्चित मात्र,विकास ‘थांबला’ आता हा चर्चेचा मुद्दा असल्याचे ते सांगतात.
सध्या राज्यात सर्वत्र बोलबाला असलेल्या महायुतीच्या ‘लाडकी बहीण’योजनेविषयी छेडले असता,लाडक्या बहीणीचे तिकीट कापण्यासाठी एक मोठा नेता, उमेदवार घोषित होण्याच्या दोन दिवसांपूर्वीच दिल्लीत दोन दिवस मुक्काम ठोकून बसतो व निश्चित होऊन परततो,यावर या सरकारच्या आणि त्या सरकारच्या नेत्यांच्या लाडकी बहीणीच्या संकल्पना जनतेसमोर उघड्या पडतात,असे खास वैदर्भिय भाषेत येथील जनता सांगते.
चंद्रपूरच्या कॉंग्रेसच्या खासदार प्रतिभा धानोरकर यांनी देखील डॉ.अभिलाषा यांना तिकीट मिळू नये,यासाठी हातभार लावला असा आरोप करीत, एकाच मतदारसंघात दोन समान ताकदीचे महिला उमेदवार त्यांना न परवडणारे होते,असा सरळ आरोप केला गेला.या उलट प्रतिभा धानोरकर यांनी आपल्या भावासाठी वरोरा येथून किशाेर जोरावार यांच्यासाठी काँग्रेसची तिकीट खेचून आणली,या मतदारसंघात विजय मिळाल्यास राज्यातील धानोरकर यांचे दिल्ली दरबारी वजन वाढणार हे निश्चित.
‘सत्ताधीश‘ने डॉ.अभिलाषा गावतूरे यांच्या रुग्णालयात जाऊन त्यांच्याशी संवाद साधून अनेक मुद्दांवर त्यांची देखील मते जाणून घेतली. त्याचे दोन्ही व्हिडीयो बातमी सोबत अपलोड करण्यात आले आहेत.
थोडक्यात,गेल्या पाच वर्षात महाराष्ट्रात राजकारणाचा जो चिखल झाला आहे त्याची मतदारांना एक प्रकारे भयंकर चीड आली आहे,अश्या परिस्थितीत समाजातील कर्तृत्वान,बुद्धीवंत,उच्चविद्याभूषित महिला किवा पुरुष यांना उमेदवारी न देता ,अश्याप्रकारे पैश्यांच्या बळावर सर्वोच्च पातळीवर उमेदवारी ‘फिक्स’होत असल्याचा आरोप जनतेकडूनच होत असेल व यात सत्ताधारी भाजप तसेच स्वत:ला शुर्चिभूत असल्याचा टेंभा मिरविणा-या काँग्रेससारख्या पक्षाकडे अंगुलीनिर्देश होत असले तर ….खरंच देशाचे संविधान गंभीर संकटात आहे ,असेच आता म्हणावे लागेल.
………………………….