फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeराजकारणनागपूरात भाजपचं ‘ठरलं!’

नागपूरात भाजपचं ‘ठरलं!’

मध्य नागपूरातून दटके भरणार उमेदवारी अर्ज!
पश्‍चिमेतून कोहळे यांना उमेदवारी: ’मैत्री‘जपल्याची चर्चा
उत्तर नागपूरातून पुन्हा एकदा डॉ.मिलिंद माने!
डॉ.ममता खांडेकर
(Senior Journalist)
नागपूर,ता.२८ ऑक्टोबर २०२४: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांनी कोट्यावधीची विकास कामे खेचून आणली असतानाही,त्यांच्या पक्षाच्या तीन आमदारांना निवडणूकीत धोका असल्याची धक्कादायक माहिती आमदारांच्या रिपोर्टकार्डमधून पुढे आली होती.मुख्यमंत्र्यांनी केलेल्या सर्व्हेत उत्तर आणि पश्‍चिम मतदारसंघ धोक्यात तर दक्षिण काठावर असल्याचे निदर्शनास आले होते.२०१९ च्या विधान सभेसाठी ते सर्वेक्षण होते.घडले ही तसेच,उत्तर आणि पश्‍चिम भाजपने गमावले तर दक्षिणेतही भाजपचे उमेदवार मोहन मते यांना विजयासाठी कडवी झुंज द्यावी लागली होती.
गेल्या पाच वर्षात पूला खालून बरेच पाणी वाहून गेले आहे.२०२४ ची निवडणूक ही महाराष्ट्रासह उपराजधानीत देखील फार वेगळी असल्याचे मतदार अनुभवत आहे.सूत्राने दिलेल्या माहितीनुसार नागपूरात भाजपचं ‘ठरलं!’मध्य मधून भाजपचे विद्यमान विधान परिषदेचे आमदार प्रवीण दटके हे परवा दिनांक २९ ऑक्टोबर रोजी उमेदवारी अर्ज भरणार असून,उत्तरेत पुन्हा एकदा गडकरी व फडणवीस यांचे पहील्या क्रमांकाचे पसंतीचे उमेदवार असलेले व २०१९ च्या निवडणूकीत २० हजार ८९४ मतांनी काँग्रेसचे डॉ.नितीन राऊत यांच्याकडून पराभूत झालेले डॉ.मिलिंद माने यांनाच पुन्हा उमेदवारी मिळणार असल्याची खात्रीलायक माहिती समोर आली आहे.पश्‍चिमेत भाजपने जिल्हाध्यक्ष सुधाकर कोहळे यांनाच काँग्रेसचे विद्यमान आमदार विकास ठाकरे यांच्या विरोधात मैदानात उतरविण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती सूत्राने दिली.महत्वाचे म्हणजे लोकसभा निवडणूकीतील ‘मैत्री’जपली जात असून काेहळे यांना बळीचा बकरा बनविण्यात आल्याची,खासगीत भाजपच्या कार्यकर्त्यांमध्येच चर्चा आहे.
भाजपने आपल्या पहील्याच यादीत नागपूरातील सहा पैकी तीन जागांवर उमेदवारांची घोषणा केली असून यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दक्षिण-पश्‍चिमचा समावेश आहे.दक्षिण नागपूर मतदारसंघातून पुन्हा एकदा मोहन मते तर पूर्व नागपूरातून पुन्हा एकदा कृष्णा खोपडे यांच्या नावांची घोषणा झाली आहे मात्र,उत्तर,मध्य व पश्‍चिम विषयी अद्याप ससपेन्स कायम ठेवला आहे.गेल्या दोन महिन्यांपासून नागपूरात ठाण मांडून बसलेले भाजपचे वरिष्ठ नेते कैलास विजयवर्गीय ज्यांच्यावर नागपूर शहर व ग्रामीणच्या मिळून १२ जागांची जबाबदारी सोपविण्यात आली आहे,त्यांनी या तिन्ही ‘संभावित’उमेदवारांना उमेदवारी अर्ज भरण्यासाठी तयार राहण्याची सूचना केली असल्याची माहिती समोर आली आहे.
मध्य नागपूरात हलबा समाजाची ६० हजार पेक्षा अधिक मते असून हा मुस्लिम,हलबा व ओबीसी बहूल प्रभाग आहे.गेल्या तीन टर्मपासून भाजपचे विकास कुंभारे मध्य नागपूरातून केवळ हलबा मतदारांच्या भरवश्‍यावर विजयी झाले आहेत.यंदा मात्र त्यांची उमेदवारी धोक्यात आली असून ,भाजपचे शहरातील तिस-या क्रमांकाचे कद्दावर नेते,विद्यमान विधान परिषदेचे आमदार व माजी शहराध्यक्ष प्रवीण दटके यांना उमेदवारी दिली जाणार आहे.२०१९ मध्येच दटके या मतदारसंघातून निवडणूक लढण्यास प्रबळ दावेदार होते मात्र,जाती-पातीच्या मतपेढीतून त्यांना तिकीट मिळाले नाही.हलबांच्या नाराजीचा व हा मतदारसंघ गमावण्याच्या भितीतून भाजप श्रेष्ठींने ‘आंधळी कोशिंबिर खेळणे टाळले होते.
परिणामी,मुख्यमंत्री फडणवीसांच्या मुंबईतील बैठकीतील ज्या सर्व्हेक्षणात मध्य नागपूराने धोक्याची पातळी आेलांडली होती,त्याच धोकदायक पात्रात ,त्याच उमेदवाराला घेऊन उतरणे फडणवीसांना भाग पडले होते.यंदा मात्र,चित्र पूर्णपणे पालटले आहे.दटके हे आता शहराध्यक्ष पदापुरते सिमित नसून,भाजपचे विद्यमान आमदार आहेत.याशिवाय मध्य नागपूरसह शहरात देखील बूथ स्तरावरील मोठी फळी त्यांच्याशी एकनिष्ठ आहे,कार्यकर्त्यांची मोठी फौज दटके यांच्या मागे उभी असल्याने,दटके यांची नाराजी पक्षाला पेलवणारी नव्हती.दटके यांना उमेदवारी न दिल्यास,बूथ,मंडळ,पन्ना प्रमुखांसह जमीनीशी जुळलेले हजारो कार्यकर्ते यांनी निवडणूकीवरच ‘बहीष्काराचे‘अस्त्र उगारण्याची ‘शंका’असल्याने,संघाला देखील हा धोका पत्करणे शक्य नव्हते!
दटके यांचा हा प्रयास म्हणजे भविष्यातील लोकसभेसाठी भावी ‘खासदारकी’चा प्रवास मानल्या जात आहे!दटके यांची उमेदवारी घोषित झाल्यास त्यांचा सामना काँग्रेसचे बंटी शेळके यांच्यासोबत होणार आहे मात्र,याच मतदारसंघातून वंचितकडून अनिस अहमद,एमआयएमकडून आसिफ कुरैशी तर बसपातर्फे रमेश पुणेकर मैदानात असणार आहे.परिणामी,अनिस अहमद व आसिफ कुरैशी दोघेही मुस्लिम असल्याने मुस्लिम मतदारांची मते विभागली जातील याचा फायदा बंटी शेळकेंना मिळणार नाही तर हलबा समाज पुणेकरांच्या मागे उभा राहील्यास काँग्रेसचेच यात नुकसान होणार असल्याचे निवडणूक जाणकार सांगतात.त्यामुळे बंटी शेळकेंना ही निवडणूक २०१९ प्रमाणे इतकी सोपी नसणार,गेल्या निवडणूकीत फक्त पावणे चार हजार मतांनी त्यांचा पराभव झाला होता.
उत्तरेत देखील २०१९ च्या सर्वेक्षणात डॉ.मिलिंद माने हे नापास झाले होते मात्र,माने हे गडकरी व फडणवीस या दोघांच्याही पहील्या पसंतीचे उमेदवार असल्याचे मानले जाते.माने यांनी २०१९ च्या निवडणूकीत ६६ हजार १२७ मते मिळवली होती,तर काँग्रेसचे नितीन राऊत यांना ८६ हजार ८२१ मते मिळाली होती.बसपचे सुरेश साखरे यांनी २३ हजार ३३३ मते घेऊन भाजपच्या पराभवाला हातभार लावला होता.बसपाचे प्रदेशाध्यक्ष असलेले सुरेश साखरे यांना या निवडणूकीनंतर तडकाफडकी निलंबित करण्यात आले होते.त्यांनी पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचाराऐवजी इतर मतदारसंघात कमकुवत उमेदवारी देत विरोधी पक्षांच्या नेत्यांच्या संपर्कात असल्याचा त्यांच्यावर ठपका ठेवण्यात आला होता.
पश्‍चिम नागपूरात भाजपचे जिल्हाध्यक्ष सुधाकर कोहळे यांची उमेदवरी निश्‍चित झाल्याची चर्चा आहे.ग्रामीण भागातून त्यांना उमेदवारी दिली जाईल,अशी अपेक्षा होती मात्र,लोकसभेत साढे पाच लाखांच्यावर मते घेणारे काँग्रेसचे विकास ठाकरे यांच्या विरोधात कोहळे यांना उमेदवारी देऊन लोकसभेतील ‘मैत्री’जपण्याचे काम भाजप करीत असल्याचा आरोप खासगीत भाजपच्या गोटात केला जात आहे!२०१९ च्या निवडणूकीत काँग्रेसचे विकास ठाकरे यांनी भाजपच्या सुधाकर देशमुख यांचा ६ हजार ३६७ मतांनी पराभव केला होता.विकास ठाकरे यांना ८३ हजार २५२ तर सुधाकर देशमुख यांना ७६ हजार ८८५ मते मिळाली होती.यंदा विकास ठाकरे विरुद्ध सुधाकर काेहळे अशी लढत होणार असून ही लढत विकास ठाकरेंसाठी ‘एकतर्फी‘असल्याचे बोलले जात आहे.
कोहळे यांची तिकीट २०१९ मध्ये दक्षिण नागपूरातून कापण्यात आली होती व मोहन मते यांना देण्यात आली,मते फडणवीसांच्या जवळचे समजले जातात.काँग्रेसचे गिरीश पांडव यांनी मते यांना जोरदार टक्कर देत मते यांचा विजय निसटती ‘मते’असा केला होता.२०१४ मध्ये सुधाकर कोहळे यांना तसेच गडकरी यांना २०१४ च्या लोकसभेत ४३ हजारपेक्षा अधिक मतांची आघाडी या मतदारसंघात होती.त्यातील ४० हजार मते २०१९ च्या निवडणूकीत ‘गायब’होती!भाजपचे दक्षिण नागपूरातील संघटन अत्यंत मजबूत मानले जाते त्यामुळे मतेंचा निसटता विजय हा भाजपसाठी धोक्याची घंटाच होती.मते यांना ८३ हजार ८७४ मते मिळाली तर काँग्रेसचे गिरीश पांडव यांना ७९ हजार ८८७ मते मिळाली.या निवडणूकीत एका आमदारकी न मिळालेल्या उमेदवारानेच पांडव यांची पडद्या मागून मदत केली असल्याची चांगलीच चर्चा त्यावेळी रंगली होती.यंदा देखील मोहन मते व गिरीश पांडव यांच्यातच चुरशीचा सामना रंगणार आहे.
थोडक्यात,‘राजकारण’हे भल्याभल्यांना न समजणारी गोष्ट असून सोशल मिडीयावर ’कुणी गोविंद घ्या,कोणी गोपाळ घ्या,निष्ठवंतांनो तुम्ही तंबोरा घ्या’यासारखे लक्षवेधी मिम्स धूमाकूळ घालत मतदारांचे चांगलेच मनोरंजन करताना दिसून पडत आहेत.येत्या निवडणूकीत नागपूरकर हे कोणत्या पक्षाच्या कोणत्या उमेदवारांच्या गळ्यात यशाची माळ टाकतील,हे २३ नोव्हेंबर रोजीच कळू शकेल कारण ‘उमेदवार कोणते उभे करायचे ते तुम्ही ठरवा..आता पाडायचे कोणते हे आम्ही ठरवू‘हा मतदारांचा मिश्‍किल संदेश बरंच काही सांगून जातो.
…………………..
तळटीप:
(२०१९ च्या निवडणूकीत ग्रामीण भागातून एका मोठ्या नेत्याचे अचानक तिकीट कापले गेल्याने एका सामान्य कार्यकर्त्याला लॉटरी लागली अन्..विधान सभेचा आमदार होण्याचे भाग्य त्यांना लाभले.यंदा,तिकीट कापलेल्यांना पुन्हा उमेदवारी मिळाली अन्..लॉटरी लागेलेले ते माजी आमदार, नागपूरात हेवीवेट नेत्यांच्या दरबारी पोहोचले…यावर त्या हेवीवेट नेत्याने या माजी आमदाराला चांगलेच लताडले व एक लाख रुपये पेंशन मिळत आहे ना?यावरच खूश रहा,म्हणून चक्क हाकलून लावल्याचा किस्सा नागपूरात चांगलाच चर्चिला जात आहे)
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या