नागपूर शहरात देखील माजी मुख्यमंत्री,विद्यमान उपमुख्यमंत्री,राज्याचे गृहमंत्री तसेच नागपूरचे पालकमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस यांच्या विरुद्ध तिकीट जाहीर झालेले काँग्रेसचे उमेदवार प्रफूल्ल गुडधे पाटील हे देखील केदार यांच्याच गोटातले मानले जातात.२०१९ च्या निवडणूकीत केदार यांचा हा सावनेर मतदारसंघातून पाचवा विजय होता.त्यांनी भाजपचे उमेदवार व जिल्हाध्यक्ष डॉ.राजीव पोतदार यांचा पराभव केला होता.पोतदार यांच्यासाठी देशाचे गृहमंत्री अमित शहा व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सावनेरमध्ये केलेला प्रचार ही कामी पडला नाही.सवर्ण असलेले डॉ.राजीव पोतदार यांना कुणबी बहूल मतदारसंघातून उमेदवारी देणे हा भाजपसाठी ‘ब्लाईंड गेम‘ठरला.
सावनेरच्या राजकारणावर दबदबा असणा-या केदारांनी ही बाब अचूक हेरली.काँग्रेसच्या पहील्याच यादीत त्यांची उमेदवारी जाहीर झाल्याने त्यांचे राजकीय वजन ही वाढले होते,शिवाय भाजपवर दबाव वाढविण्यात ते यशस्वी झाले होते.उमेदवारी अर्ज भरताना केदार समर्थकांची जमलेली गर्दी त्यांच्या वर्चस्वाची पावती देणारी होती.यामुळे भाजपच्या गोटात धडकी भरली होती.
सिल्लेवाडा येथे झालेली अमित शहा यांची सभा देखील सावनेरच्या मतदारांच्या निर्णयात विशेष फरक पाडू शकली नाही.कळमेश्वर व सावनेर तालुक्यात धनोजे कुणबी समाजाला जोडून ठेवण्याचे कसब केदार यांनी लीलया साधले.याशिवाय अमित शहा यांनी चनकापूरच्या सभेत केदार यांचे नाव न घेता ‘सावनेरमधून गुंडगिरी संपविणार’अशी घोषणा केली होती.तर,मुख्यमंत्री फडणवीस यांनी केदार यांच्याच गावात ’हे गुंडांचे राज्य नाही’अशी चिथावणी दिली होती.भाजपच्या या दोन्ही कद्दावर नेत्यांना प्रत्युत्तर देताना केदार यांनी ’मी जनतेचा सालगडी’ असल्याचे सांगून भावनिक आवाहन केले होते.त्याचा मोठा फायदा केदारांना झाला.
सावनेरमध्ये २०१९ मध्ये ६६.२५ टक्के मतदान झाले होते.त्या निवडणूकीत एकूण आठ उमेदवार रिंगणात होते.सावनेरमध्ये भाजप विरुद्ध काँग्रेस असा सामना रंगत नसून फडणवीस विरुद्ध केदार असा थेट सामना रंगत असल्याचे निवडणूक जाणकारांचे म्हणने आहे.सावनरेची निवडणूक हाय व्होल्टेज श्रेणीतच गणल्या जाते.सुनील केदारांना १ लाख १३ हजार १८४ मते मिळाली तर भाजपच्या पोतदार यांना ८६ हजार ८९३ मते मिळवली होती.बसपाचे संचयता पाटील यांना ४ हजार ३८१ मते मिळाली.केदार यांनी पहील्याच फेरीत ७०० मतांची आघाडी घेतली होती.मात्र,त्यानंतर पोतदार यांनी १,२०० मतांची आघाडी घेऊन काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची धाकधूक वाढवली होती.त्यानंतर केदार यांनी प्रत्येक फेरीत चांगली मते घेतली आणि २६ हजार २९१ मतांनी पोतदार यांचा पराभव झाला.केदार यांच्या पराभवासाठी भाजपने जंगजंग पछाडले मात्र,यश पाचव्यांदाही भाजपच्या पदरात पडले नाही.
सुनील केदार आणि राजीव पोतदार यांच्यातील लढत रंगणार अशी अनेकांना अपेक्षा होती,या मतदारसंघाची पार्श्वभूमी बघता,येथे अनुचित घटना घडण्याचीही शक्यता असल्याने सावनेरमधील इंटरनेट ब-याच काळासाठी बंद असल्याचे सांगितले जाते.मात्र,पोलिस अधिक्षक राकेश ओला यांनी या वृत्ताला नकार दिला होता.
जिल्ह्यात भाजपच्या ५ पैकी केवळ २ जागांवर विजय मिळवता आला आणि ४ जागेवर पराभव झाल्याने पोतदार यांनी या पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारत पदाचा राजीनामा दिला होता.
२०२४ च्या निवडणूकीत आता केदार यांच्या पत्नी अनुजा केदार यांना उमेदवारी मिळाल्याने आता पुन्हा एकदा या मतदारसंघात ‘लोकसभा बारामती पार्ट-२’सारखी निवडणूक बघायला मिळणार असल्याची चर्चा रंगली आहे.बारामतीत यंदाची लोकसभेची निवडणूक उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनैत्रा पवार लढल्या होत्या व सुप्रिया सुळे यांनी त्यांचा पराभव केला.
कामठीत भाजपच्या विजयाची पुर्नरावृत्ती होणार का?
काँग्रेसने आज जाहीर केलेल्या दुस-या यादीत कामठीतून पुन्हा एकदा केदार यांच्या प्रभावातून सुरेश भोयर यांनाच उमेदवारी दिली असून,२०१९ च्या निवडणूकीत भाजपचे टेकचंद सावरकर यांनी त्यांचा पराभव केला होता.राज्यातील हेवीवेट नेते चंद्रशेखर बावणकुळे यांचा कामठी हा बालेकिल्ला असून २०१९ मध्ये त्यांना भाजपतर्फे उमेदवारी मिळू शकली नव्हती.त्यामुळे ऐन वेळेवर जिल्हा परिषद सदस्य टेकचंद सावरकर यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडली,अन् अखेरच्या काही दिवसात बावणकुळे यांच्या झंझावती प्रचारातून सावरकर यांच्या विजयाची निश्चिती झाली.
भाजपचे टेकचंद सावरकर यांनी काँग्रेसचे भोयर यांचा ११ हजार ११६ मतांनी पराभव करुन कामठी मतदारसंघ भाजपकडे कायम राखला होता.या मतदारसंघात २ हजार ३४७ मतदारांनी ‘नोटा’लाही पसंती दिली होती.पालकमंत्री चंद्रशेखर बावणकुळे यांनी १५ वर्ष या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले होते.त्यांचा विजय हा पक्का समजला जात असे मात्र,उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी बावणकुळे यांचा पत्ता कटला आणि हा मतदारसंघ संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेत आला.बावणकुळे यांना उमदेवारी नाकारली असली तरी भाजपतर्फे त्याच समाजातील टेकचंद सावरकर यांना उमेदवारी देण्यात आली होती,हे विशेष.
खैरी येथील दिल्ली पब्लिक शाळेतील केंद्रावर सकाळी ८.३० वा.पासून मतमोजणी सुरु झाली तेव्हा सुरवातीच्या तब्बल १३ फे-यांमध्ये काँग्रेसचे सुरेश भोयर हे आघाडीवर होते.आघाडी खूप मोठी नव्हती पण,आघाडीत सातत्य होते.त्यामुळे कमी फरकाने हा होईना,भोयर बाजी मारणार असा विश्वास कार्यकर्त्यांना होता.मात्र,नागपूर ग्रामीण मधली मतमोजणी सुरु झाली आणि चित्र बदलायला लागले.हळूहळू सावरकरांची आघाडी वाढू लागली आणि २४ व्या फेरीपर्यंत त्यांचा विजय निश्चित झाला.
कामठी शहर हा काँग्रेसचाच बालेकिल्ला मात्र,वंचित व एमआयएममुळे काँग्रेसला या पण मतदारसंघात पराभव पत्कारावा लागला.नागपूर ग्रामीणने ख-या अर्थाने भाजपला साथ दिली.भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष अजय बोढारे यांनी मतदानापूर्वीच त्यांच्या भागात सावरकरांना १० हजार पेक्षा जास्त मताधिक्य मिळण्याचा दावा केला होता,तोच खरा ठरला.बेसा,बेलतरोडी,खापरी,वेळाहरी,गोटाड पांजरी,शंकरपूर,हुडकेश्वर या भागातील मतदार सावरकर यांच्या पाठीशी उभे राहीले आणि सावरकर यांचा विधानसभेत प्रवेशाचा मार्ग मोकळा झाला.
यंदा पुन्हा काँग्रेसने सुरेश भोयर यांची उमेदवारी जाहीर केली असली तरी यावेळी त्यांचा सामना बावणकुळे या कद्दावर नेत्याशी होणार आहे.त्यामुळे पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या जनतेचे लक्ष या मतदारसंघाकडे असणार आहे.
थोडक्यात,भाजपने विदर्भातील अनेक जागांवर अद्याप आपले पत्ते उघडले नाही.भाजप गेल्या निवडणूकीच्या परिणामांपासून चांगलीच सावध झाली असून काँग्रेसमध्ये मात्र,केदारसारख्या बलशाली नेत्याने,प्रदेशाध्यक्ष व पश्चिम महाराष्ट्रातील कद्दावर काँग्रेसी नेत्यांना डावलून, नागपूर जिल्ह्यात स्वत:ची पत्नी व पराभूत उमेदवार मैदानात उतरवून ‘आतूरतेची’कृती केली असल्याची चर्चा समाज माध्यमांवर चांगलीच रंगली आहे.केदार यंदाच्या निवडणूकीत सावनेरमध्येच अडकून असणार असल्याने कामठी व दक्ष्ीण -पश्चिम नागपूर,रामटेक आदी मतदारसंघातील त्यांच्या समर्थकांना किती वेळ देऊ शकतील,याकडे आता त्यांच्या समर्थकांचे लक्ष लागले आहे.
………………………………
तळटीप:-
काँग्रेसने आज आपल्या तिस-या यादीत दक्ष्ण नागपूर मतदारसंघातून पुन्हा एकदा गिरीश पांडव यांना उमेदवारी दिली आहे तर भाजपने देखील विद्यमान आमदार मोहन मते यांची उमेदवारी कायम ठेवली आहे.नागपूरातील सहाही विधानसभा मतदारसंघातील विस्तृत विश्लेषण ‘सत्ताधीश’ने आपल्या शुक्रवारच्या बातमीत ‘नागपूरात काँग्रेस यशाची पुर्नरावृत्ती करणार का?‘या मथळ्याखाली प्रसिद्ध केली आहे.www.sattadheesh.com या वेबसाईटला भेट देऊन संबंधित बातमी वाचकांना वाचता येईल)
………….
हे ही वाचा…
नागपूरात काँग्रेस यशाची पुनरावृत्ती करणार का?