यंदा कामठीतून पहील्याच यादीत मिळाली उमेदवारी
डॉ.ममता खांडेकर
(Senior Journalist)
नागपूर,ता.२१ ऑक्टोबर २०२४: महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीसाठी भारतीय जनता पक्षाने काल ९९ उमेदवारांची यादी जाहीर केली,यातील एक नाव हे लक्षवेधी होते ते म्हणजे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावणकुळे यांचं.पहील्याच यादीत कामठीतून उमेदवारी मिळालेले बावणकुळे यांना २०१९ च्या विधानसभेचे तिकीट ही मिळाले नव्हते.महत्वाचे म्हणजे तिकीट मिळण्या पूर्वीच बावणकुळे यांचे मतदारसंघातील संपूर्ण जिल्ह्यांमध्ये सभा नियोजित होत्या.सर्वदूर बावणकुळे यांची जाहिरात करणारे मोठमोठे फलक झळकत होते,बावणकुळे नावाचं ‘वादळ’त्यांच्या मतदारसंघात सर्वदूर झंझावात होतं,बावणकुळे यांच्या विजयाची खात्री त्यांच्या मतदारांनाच नाही तर विराेधकांना देखील होती मात्र,‘न भूतो ना भविष्यती’असे अघटित घडले आणि पहीली यादी तर सोडा,अखेरच्या यादीत देखील बावणकुळे यांचे किंवा त्यांच्या पत्नी किंवा मुलाचे नाव गडकरी,फडणवीस यांच्या महत प्रयासानेही येऊ शकले नाही.या पार्श्वभूमीवर यंदाच्या निवडणूकीत अगदी पहील्याच यादीत बावणकुळे यांचे नाव जाहीर होणे,दिल्लीश्वरांच्या या कृतीलाच आता सामान्य मतदार ‘बावणकुळे रिर्टन्स’संबोधित आहेत.
जिलह्यातील कामठी विधानसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार टेकचंद सावरकर चौथ्यांदा विजयी होणारे उमेदवार होते मात्र,त्यांना पूर्वीचे मताधिक्य राखता आले नव्हते.२०१९ पूर्वीच्या निवडणूकीत चंद्रशेखर बावणकुळे हे ४० हजारांहून अधिक मताधिक्याने विजयी झाले होते,सावरकर हे ११ हजार मतांनी विजयी झाले.मताधिक्याची ही घसरण भाजपला या निवडणूकीत भरुन काढावी लागणार आहे.
राज्यातील हेवीवेट मंत्री व विद्यमान प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावणकुळे यांचा कामठी हा मूळ मतदारसंघ आहे.गेल्या निवडणूकीत १२ जण रिंगणात होते मात्र खरी लढत भाजपचे टेकचंद सावरकर आणि काँग्रेसचे सुरशे भोयर यांच्यातच होती.बावणकुळे यांनी सलग तिन टर्म म्हणजे पंधरा वर्ष या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले होते.निवडणूकी आधीच भाजपमध्ये ज्या नेत्यांचा विजय पक्का मानला जात होता त्यात बावणकुळे यांचे नाव अग्रस्थानी होते.मात्र,अखेरच्या क्षणी बावणकुळे यांचा पत्ता कटला व कोणीही कल्पनाही केली नसेल ते जिल्हा परिषदेचे माजी सदस्य टेकचंद सावरकर यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडली !वास्तवतेत सावरकर यांनी पक्षाकडे उमेदवारी देखील मागितली नव्हती.फक्त एकदाच भाजपकडून त्यांनी रामटेकमधून उमेदवारी दाखल केली होती मात्र,शिवसेनेला रामटेक मतदारसंघ युतीमध्ये सूटताच त्यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला होता.
हा एकमेव अपवाद वगळता विधानसभा निवडणूकीशी त्यांचा थेट संबंध नव्हता.पण,ज्या पद्धतीने २०१९ मध्ये अचानक त्यांना उमेदवारी अर्ज भरण्यास सांगण्यात आले,त्यामुळे त्यांना देखील आश्चर्याचा धक्काच बसला होता तर दूसरीकडे ज्या पद्धतीने बावणकुळे यांनाच नव्हे तर त्यांच्या ऐवजी एबी फॉर्म ,त्यांची पत्नी ज्योती किवा मुलगा संकेत यांना तरी मिळावा यासाठी, गडकरी व फडणवीसांनी अखेरपर्यंत अमित शहा यांचे मन वळवण्याचा प्रयत्न केला ते सगळे प्रयत्न निष्फळ ठरले होते.
बावणकुळे यांनी त्यांच्या मतदारसंघात भरपूर विकासकामे केली होती.विशेषत:दहा गावांसाठी आणलेली नळ योजना ही खूप लोकप्रिय ठरली.त्यांचे तिकीट कापले जाईल याची कल्पना
अगदी विरोधकांनी देखील केली नव्हती.निवडणूकीच्या फार पूर्वीच आत्मविश्वासाने भरपूर बावणकुळे यांनी मतदारसंघ पिंजून काढण्यास सुरवात केली होती.कुठे सभा,कुठे पदयात्रा,कुठे पदाधिका-यांसोबतच्या बैठका सुरुच होते,मात्र,आत्मविश्वासू बावणकुळेंच्या आत्मविश्वासालाच फार मोठा धक्का पोहोचवणारी कृती दिल्लीतील भाजच्या श्रेष्ठींनी केली.त्यांचे नाव पहील्याच यादीत येणे अपेक्षीत असताना देखील ते आले नाही अन्,येथेच सर्वांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली.शहांची मनधरणी सुरु झाली मात्र,शहा अखेरपर्यंत बधलेच नाही…!
बावणकुळेंचे तिकीट कटले आणि ते सावरकरांच्या नशीबी आले.बावणकुळेंच्या मतदारसंघात तेली आणि कुणबी जातीच्या मतदारांची संख्या सर्वाधिक आहे.त्यामुळे ओबीसी समाज मोठ्या प्रमाणात नाराज होण्याची भीती भाजपला होती,त्यामुळे त्याच समाजाचे टेकचंद सावरकर यांना उमेदवारी देऊन ओबीसी समाजाची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न करण्यात आला.तरीही बावणकुळे यांना ज्या पद्धतीची वागणूक पक्ष श्रेष्ठींकडून मिळाली,त्याचा परिणाम भाजपच्या मताधिक्यावर झालाच.दूसरी बाब म्हणजे,बावणकुळेंना आपला नेता मानणारे पदाधिकारी व समर्थक हे कमालीच्या मानसिक धक्क्यात होते.मौदा हे सावरकरांचे मूळ गाव,पण त्या गावात देखील सावरकरांना मताधिक्य मिळाले नाही.या पूर्वी जिल्हा परिषद निवडणूकीतही सावरकरांचा पराभव झाला होता.
याच निवडणूकीत २,३४७ मतदरांनी ‘नोटा ’चा वापर करुन उमेदवार नाकारले होते.नोटाचा वापर करणार मतदार हा बहूतांश भाजपचा परंपरागत मतदार होता.काँग्रेसचे उमेदवार सुरेश भोयर यांचे वडील यादवराव भोयर हे कामठीचे आमदार राहीले होते. त्यामुळे कामठीच्या राजकारणात त्यांचा दबदबा होता.तसेच स्वत:सुरेश भोयर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष होते.यादवराव भोयर यांची पुण्याई व स्वत:सुरेश भोयर यांचा दांडगा जनसंपर्क,यामुळे भोयर यांनी कामठी विधानसभा निवडणूकीत १ लाखावर मते घेतली आणि सावरकर यांचे मताधिक्य कमी झाले.
मतमोजणीच्या वेळी १८ व्या फेरीपर्यंत भोयर हे आघाडीवर होते.मात्र,१९ व्या फेरीपासून चित्र बदलले आणि कमळ उमळायला सुरवात झाली. १९ व्या फेरीपर्यंत जवळपास ७५ टक्के मतदारसंघात काँग्रेस आघाडीवर होती.भाजपच्या या विजयाचे शिल्पकार ही बावणकुळेच ठरले.ही निवडणूक बावणकुळे यांनी ‘पक्षनिष्ठेतून’प्रतिष्ठेची केली व सावरकरांसाठी मते खेचून आणली.टेकचंद सावरकर यांना १,१८,१८२ मते मिळाली तर सुरेश भोयर यांना १,०७,०६६ मते मिळाली.सावरकर यांनी प्रतिस्पर्धी भोयर यांचा ११ हजार ३६ मतांनी पराभव केला.
कामठी मतदारसंघातील मतांच्या समीकरणाची, जाती-धर्म व शहरी-ग्रामीण अशी विभागणी होते.नागपूर शहरालगतचा मोठा भाग कामठीत समाविष्ट आहे.या भागातून भाजपला आघाडी मिळते.अखरेच्या दिवशी या भागात बावणकुळे यांनी या भागात प्रचार करुन सावरकरांना विजयी करण्याचे आवाहन केले होते.त्यांचे हे प्रयत्न यशस्वी झाले.सावरकर यांचा विजय बावणकुळे यांच्यामुळे झाला असल्याचे त्यांचे समर्थक आणि विरोधक ही मानतात.
कामठी शहरातून दरवेळी काँग्रेसला आघाडी मिळते.त्यावेळी प्रथमच एमआयएमचा उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात होता.त्यामुळे ८ हजार मुस्लिम मते, ही एमआयएमकडे वळली.त्यामुळे काँग्रेसला मिळणारी आघाडी कमी झाली.याशिवाय प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहूजन आघाडीने सुमारे दहा हजार मते मिळवल्याने भोयर यांना मोठा फटका बसला.भोयर यांच्या पराभवाचे आणखी एक कारण प्रभावी प्रचार नसणे हे देखील एक होते.
२०१९ च्या विधानसभा निवडणूकीच्या वेळी देखील गडकरी यांना बाजूला सारणे व बावणकुळे यांचे तिकीट कापणे भाजपला महागात पडले होते.त्या निवडणूकीत भाजपला फार मोठा फटका विदर्भात बसला होता.नागपूर शहर व नागपूर ग्रामीणच्या १२ पैकी ६ जागा भाजपला गमवाव्या लागल्या होत्या.सर्वाधिक फटका ग्रामीणमध्ये बसला असून नागपूर शहर सारखेच,दोन आमदार पराभूत झाले होते तर बावणकुळे यांच्या कामठी मतदारसंघातून सावरकर यांना विजय मिळवण्यासाठी शेवटच्या फेरीपर्यंत वाट बघावी लागली होती.बावणकुळे यांनी तीन वेळा कामठी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले असून माजी राज्यमंत्री सुलेखा कुंभारे,त्यानंतर जिल्हा परिषद अध्यक्ष सुनीता गावंडे व राज्यमंत्री राजेंद्र यांना पराभूत केले होते.
बावणकुळे यांना पक्ष श्रेष्ठींनी तिकीट नाकारल्यानंतर त्यांच्या पत्नी ज्योती बावणकुळे यांनी मिरवणूकीद्वारे उमेदवारी दाखल केली मात्र,पक्षाने त्यांनाही एबी फॉर्म दिला नाही.परिणामी,संपूर्ण जिल्ह्यात ओबीसी मतदार नाराज झाले.भाजपचे श्रेष्ठी ओबीसी नेतृत्व संपवायला निघाले,असा प्रचार करुन विरोधकांनी त्यांच्या नाराजीत आणखी भर घातली.तेली समाजातही नाराजी पसरली.जिल्ह्यातील अनेक उमेदवारांना याचा फटका बसला.जिल्हाध्यक्ष राजीव पोतदार यांनी ही याची जाहीर कबुली दिली होती.या पराभवाची जबाबदारी घेत त्यांनी जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला.
याशिवाय ज्या गडकरींनी विदर्भात भाजप उभी करण्यात आपली अख्खी हयात घालवली,त्यांची लोकप्रियता व कामाच्या झपाट्यातून ते सर्वाधिक लोकप्रिय असतानाही,त्यांनाच जाहीर सभा वगळता,बाजूला सारण्यात आल्याचे दृष्य उमटले होते.मोठ्या प्रमाणात प्रचारयंत्रणा,मोठ्या नेत्यांची सभा गाजवल्यानंतर देखील भाजपच्या मतपेढी आणि जागेत घट झाल्याने आश्चर्य व्यक्त होत होते.
यानंतर पक्षश्रेष्ठींकडे ओबीसी समाजाची नाराजी व निवडणूकीतला फटका यांची माहिती‘हेतुपरस्सर’शहरातील भाजपच्या दोन्ही नेत्यांनी पुरवली व बावणकुळे यांचे पुर्नवसन झाले नाही तर ओबीसी समाजाची नाराजी पक्षाला भविष्यातही भोवणार,याची खात्री पटवली.विधानसभा निवडणूकीनंतर बावणकुळे यांना महाराष्ट्राच्या पक्ष संघटनेत जबाबदारीचे मोठे पद देण्यात आले होते.मनातली नाराजी विसरुन आणि पक्षात झालेला अपमान विसरुन ‘एकनिष्ठेने’बावणकुळे यांनी संघटनेच्या कामासाठी स्वत:ला झोकून देऊन काम करने सुरुच ठेवले होते.त्याचे फळ त्यांना मिळाले.विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य मतदारसंघातून पक्षाने त्यांना उमेदवारी घोषित केली.
याच निवडणूकीत काँग्रेसने, स्वयंसेवक असलेले व रेशीमबाग येथील भाजपचे बंडखोर नगरसेवक डॉ.रवींद्र भोयर यांना गळासी लावले.यासाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पुढाकार घेतला मात्र,त्यांच्या पक्षातील ‘परंपरागत ‘विरोधक आमदार सुनील केदार यांनी त्यांच्यावरच हा डाव उलटवला.२३ नाेव्हेंबर २०२१ रोजी भोयर यांनी काँगेसकडून उमेदवारी अर्ज दाखल केला.मात्र,नाराज केदार यांनी छोटू भोयर यांना ‘असमर्थ ‘ठरवित अपक्ष मंगेश देशमुख यांच्यामागे पाठबळ उभे केले!देशमुख हे महादुला नगर परिषदेचे सभासद होते.
यानंतर ही निवडणूक ‘रोड पती विरुद्ध करोडपती’अशी रंगली होती.स्वयंसेवकाला फोडण्याचे धाडस काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांच्या चांगलेच अंगलट आले होते.भोयर यांना त्या निवडणूकीत फक्त एकच मत मिळाले!बावणकुळे यांना ३६२ तर मंगेश देशमुख यांना १८३ मते मिळाली,५ मते ही अवैध ठरली.बावणकुळे यांनी निर्विवाद यश संपादित करुन विधान परिषदेची आमदारकी मिळवली.यावर,तीन पक्ष एकत्र येऊन भाजपचा सहज पराभव करु अशी दर्पोक्ती कॉंग्रेस नेते करीत होते,मात्र,६ पैकी ४ जागा जिंकून भाजप किती मजबूत आहे,हे आम्ही दाखवून दिले,तीन पक्ष एकत्रितपणे भाजपचा पराभव करु शकतो,असा त्यांचा समज पार मोडीत निघाला,भविष्यात ही आम्ही एकटे लढून विजय प्राप्त करु,असे विधान देवेंद्र फडणवीस यांनी केले होते.
महत्वाचे म्हणजे,त्या निवडणूकीत केदार यांचे वर्चस्व असलेल्या जिल्हा परिषदेतील मते ही फूटली!‘क्राॅस वोटिंग‘करुन ‘लक्ष्मी दर्शन’घेणारे नेमके ते कोण?याचा शोध अखेरपर्यंत काँग्रेस श्रेष्ठींनाही घेता आला नाही.मात्र,त्या निवडणूकीत भाजपची देखील ‘२२’मते फूटली असल्याचे उघड झाले होते!मतदानाच्या दिवशी सकाळी थेट बसनेच मतदान केंद्रावर भाजपचे मतदार आले.३३४ मतदार भाजपच्या खेम्यात होते,त्यामुळे बावणकुळेंचा विजय निश्चित होता तरी देखील बावणकुळेंनी घरभेद्यांचा अंदाज घेऊन आघाडीच्या सर्वच मतदारांशी संपर्क साधून मतदान करण्याची विनंती केली होती.त्यांना ३६२ मते मिळाली.मंगेश देशमुख यांना १८६ मते मिळाली.बावणकुळेंनी १७६ मतांची आघाडी घेऊन ती निवडणूक जिंकली.त्यांना मिळालेल्या अतिरिक्त मतांमध्ये काँग्रेस,राष्ट्रवादी,शिवसेना व अपक्ष मते त्यांच्याकडे वळल्याचे स्पष्ट झाले होते.
त्या निवडणूकीच्या दरम्यान बावणकुळेंच्या शपथपत्रावर कॉंग्रेसने आक्षेप नोंदवला होता.
रवींद्र भोयर यांनी घेतलेल्या आक्षेपावरील अर्जावर तत्कालीन निवडणूक निर्णय अधिकारी विमला आर.यांच्या समोर ९ तास सुनावणी पार पडली होती.हा अर्ज विमला आर.यांनी २४ नोव्हेंबर २०२१ रोजी फेटाळून लावला होता.यानंतरच २८ नाेव्हेंबर रोजी तीन कोटींच्या एका कर्ज प्रकरणात भोयर यांनी हमी दिलेल्या भाजप नेते संचालक असलेल्या नागपूर नागरिक सहकारी बँकेच्या प्रकरणात विमला.आर यांच्याकडे भाजपने तक्रार दाखल केली होती.डॉ.भोयर यांनी हमी घेतलेल्या लताकिशन इन्फ्रा प्रा.लि.कंपनीला राष्ट्रीय विधी प्राधिकरणाने दिवाळखोर घोषित केले.या संबधीची प्रक्रिया राष्ट्रीय विधी प्राधिकरणाकडे प्रलंबित असल्याची तक्रार भाजपने केली होती.यावर कंपनीला ४४ कोटींचे कर्ज देण्यात आले असल्याचे भोयर यांनी सांगितले.
त्यावेळी मी अगदी जवळचा असल्याने माझी हमी घेतली गेली.मी नकार देऊ शकलो नाही.मुळात जी कंपनी केवळ चौदा,पंधरा हजार रुपये आयकर भरते,ती कंपनी एवढ्या कोटींच्या कर्जास पात्र आहे काय?हे तपासण्याची जबाबदारी बँकेच्या अध्यक्षांची होती,असा बचाव भोयर यांनी केला होता.
याच निवडणूकीत सत्ताधारी नगरसेवक हे तब्बल १३ दिवस पर्यटनावर गेले होते.भाजपने आपले सगळेच नगरसेवक गुप्तस्थळी पाठवले होते.नगरसेवकांच्या अनुपस्थित प्रभागाच्या वॉर्ड अध्यक्षांच्या माध्यमातून नागरिकांच्या समस्या सोडवल्या जातील,असे तत्कालीन सत्तापक्ष नेते अविनाश ठाकरे यांनी सांगितले होते.या निवडणूकीत १५५ महानगरपालिकेचे नगरसेवक,७१ जिल्हापरिषद सदस्य,नगर परिषद,नगर पंचायतीचे ३३३ सदस्य असे एकूण ५५९ मतदार होते.नागपूर शहरात ३ तर ग्रामीण भागात १२ मतदार केंद्र होते.या निवडणूकीत महाविकासआघाडीची ४४ मते फूटली होती तर भाजपने घोडाबाजार केल्याचा आरोप काँग्रेसने केला होता.बसपात उभी फूट पडली तर एमआयएमचे सदस्य तटस्थ राहीले.
या विजयानंतर बावणकुळे स्वागत लॉनमध्ये आले.त्यांच्या पाठोपाठ तत्कालीन विधान सभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांचे आगमन होताच,बावणकुळे यांनी त्यांना मिठीच मारली.त्यावेळी भावना अनावर झाल्यामुळे त्यांना आपले अश्रू आवरता आले नाही.फडणवीसांचे डोळे ही पानावले होते.हा भावनिक प्रसंग बघून त्यावेळी उपस्थित भाजपचे अनेक आमदार,पदाधिकारी व कार्यकर्त्यांचेही मन गहीवरले.यानंतर ढोल ताशे आणि आतिशबाजीने एकच जल्लोष साजरा झाला.बावणकुळे विधान परिषदेत ‘सुखरुप’पोहोचले होते.
(छायाचित्र : हाच तो क्षण…बावणकुळे यांच्या विजयाचा…!)
बावणकुळे यांची राजकीय कारर्कीद संपली,त्यांचे तिकीट कापल्यानंतर असे बोलले जात होते.पत्ता कोणी कट केला हे माहिती असूनही बावणकुळे २०१९ ते २०२१ दरम्यान तब्बल दोन वर्ष विधी मंडळापासून दूर होते.कोणाविरुद्ध ही ‘ब्र ‘उच्चारला नाही.संघटनेत पद घेऊन कामात व्यग्र राहीले.विधान परिषदेची उमदेवारी देऊन भाजपने त्यांच्या ‘निष्ठेचे’बक्षीस त्यांना दिले.त्यांना निष्ठा आणि संयमाचे फळ मिळाले.पटोले यांचा मात्र त्यांच्याच पक्षातील आमदारांनी चांगलाच ‘पोपट’केला.
यानंतर बावणकुळे यांच्या गळ्यात, राज्यातील शीर्षस्थ पद असलेले भाजप प्रदेशाध्यक्ष पदाची माळ देखील पडली.
आता बावणकुळे यांचा, त्यांचा मतदारसंघ कामठीत ‘कमबॅक’झाले आहे.कामठी मतदारसंघातून भाजपच्या पहिल्याच यादीत बावणकुळे यांचे नाव जाहीर झाले अन् त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये एकच उत्साह संचारला.काँग्रेसने अद्याप आपले पत्ते उघडले नाही,ग्रामीण भागातील मतदारसंघातील उमेदवार हे काँग्रेसचे ‘नामधारी’प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ठरवित नसून ,केदार यांच्याच वर्चस्वाने ठरणार आहे,असे उघडपणे बोलले जाते.त्यामुळे केदार गटातील यंदा कोणाची वर्णी बावणकुळे यांच्या विरोधात लढण्यासाठी लागते,याकडे संपूर्ण महाराष्ट्राचेच लक्ष लागले आहे.
मात्र,तरीही ’बाहूबलीने कटप्पा को क्यो मारा’याचा उलगडा होण्यासाठी मायबाप प्रेक्षकांना त्या चित्रपटाचा दूसरा भाग बघावा लागला होता,त्याच पार्श्वभूमीवर २०१९ मध्ये ‘बावणकुळे यांचे तिकीट का कापण्यात आले?’याचा उलगडला होण्यासाठी सोशल मिडीया धुंडाळावा लागतो.उर्जामंत्री असणारे बावणकुळे यांनी मोदी-अमित शहा यांचे खासमखास उद्योगपती गौतम अदानी यांची एका उर्जा प्रकल्पात अडवणूक करुन खप्पामर्जी पत्करल्यानेच त्यांचा पत्ता कट झाला,असा ही शोध नेटक-यांनी लावला आहे…..!
……………………………………