२८८ पैकी १५० जागांवर ’भारत जोडो अभियान’करणार काम
‘संविधान’ हाच आमचा उमेदवार
महाराष्ट्रातील गैरकारभार आणि भ्रष्टाचार हाच संविधानाला धोका
नागपूर,ता.१९ ऑक्टोबर २०२४: भारतीय जनता पक्षाचे एक वैशिष्ठ आहे,ते पानांनी सूर्याला झाकू शकत नसल्याने जनतेच्या डोळ्यांवर पाने झाकून देतात,हरियाणाच्या निवडणूकीत देखील असेच घडले.लोकसभेत हरियाणामध्ये भाजप व काँग्रेसचा मत टक्का हा ४२ आणि ४६ टक्के होते,खूप जास्त फरक नसताना विधान सभेचे निकाल आमच्यासाठी अपेक्षेनुरुप नाही आले मात्र,महाराष्ट्रात परिस्थिती फार वेगळी आहे.महाराष्ट्रात आम्ही भाजपच्या यशाला ब्रेक लावण्याचे काम करु,असा दावा ‘भारत जोडो अभियानाचे’संयोजक योगेंद्र यादव यांनी आज प्रेस कल्ब येथे पत्रकार परिषदेत केला.याप्रसंगी मंचावर काँग्रेसचे नेते प्रफूल्ल गुडधे पाटील व भारत जोडो अभियानाचे महाराष्ट्रातील पदाधिकारी उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना,योगेंद्र यादव म्हणाले की लोकसभेच्या ५४७ जागांपैकी भारत जोडो अभियानाने १५० लोकसभा जागांवर प्रभावी काम केले तर महाराष्ट्रातील ४८ जागां पैकी २६ जागांवर यश मिळाले.महाराष्ट्र असे राज्य होते ज्यामध्ये आमच्या कामात म्हणजे भाजपला रोखण्यात सर्वाधिक यश मिळाले.लोकसभेत आमचे कार्य अपूर्ण राहीले होेते ते आम्ही महाराष्ट्रात पूर्ण करु.लोकसभेच्या निकालाने तानाशाहीला ब्रेक लावले मात्र,‘गाडी अभी रिव्हर्स नही हूयी’भारत जोडो अभियान हे अपूर्ण कार्य पूर्ण करेल,येणा-या काळात देशात होणा-या सगळ्या विधान सभा निवडणूकीत आमचे कार्य सुरुच राहील,असे त्यांनी सांगितले.देशात भाजपचे सत्ता जाऊन इतर पक्षांची सत्ता आल्यानंतर देखील आमचे अभियान हे सुरु राहणार असल्याचे ते म्हणाले.विचार,संस्कृतीसाठी आम्ही लढत रहाणार आहोत.मागील ३० वर्षांपासून देशात जे विष कालवले गेले आहे,त्याचे डिटॉक्सीफिकेशन आम्हाला करायचे असल्याचे ते म्हणाले.
हरियाणात आम्हाला यश मिळाले नाही त्यामुळे आमची जबाबदारी जास्त वाढली आहे.जम्मू-काश्मीरमध्ये आम्हाला यश मिळाले मात्र,त्या यशात आमचा कोणताही वाटा नव्हता.त्यामुळे महाराष्ट्रासारख्या राज्यालाच देशाला वाचवण्याचे काम करायचे आहे.भाजप हरियाणाच्या परिणामांनी अति उत्साहित झाली आहे.मात्र,महाराष्ट्राची स्थिती ही हरियाणापेक्षा फार वेगळी आहे.भारत जोडो अभियानासोबत महाराष्ट्राच्या या निवडणूकीत अनेक संघटना जुळल्या असल्याचे त्यांनी सांगितले.आम्ही महाराष्ट्रात भाजपची सत्ता उलथवून टाकण्यासाठी संपूर्ण ताकद लाऊ.महाराष्ट्रातील २८८ पैकी १५० जागांवर भारत जोडो अभियान काम करत आहे.
विदर्भातील ६२ पैकी ४० जागांवर आम्ही लक्ष केंद्रित केले असल्याचे त्यांनी सांगितले.इंडिया गठबंधनच्या उमेदवारांचे आम्ही समर्थन करु.महाराष्ट्रात आपली जबाबदारी पूर्ण करु.
भारत जोडो अभियानाचे महाराष्ट्राचे समन्वयक संजय मंडाल म्हणाले की,आम्ही राजकीय पक्ष कोणता आहे याकडे लक्ष देत नाही,तिस्ता सेटलवाड,निखिल वागळे,भारत पाटणकर,हम भारत के लोग,निर्धार महाराष्ट्राचा इत्यादी विविध गटांनी लोकसभेत मिळून काम केले होते.निवडणूक आयोगाने ज्याप्रकारे हरियाणा व जम्मू काश्मीरसोबत महाराष्ट्र व झारखंडची निवडणूक न घेता,शिंदे सरकारला एक महिना घोटाळा करण्याची संधी दिली ती आम्ही आमच्या अभियानातून जनतेसमोर उजागर करणार असल्याचे त्यांनी सांगितले.राज्यात आचार संहिता लागल्यानंतर देखील ज्याप्रकारे जनतेला प्रलोभनाच्या योजना जाहीर झाल्या,ते उजागर करु,आम्हाला खात्री आहे,यश आमचेच आहे,असा दावा त्यांनी केला.
एका प्रश्नाच्या उत्तरात योगेंद्र यादव म्हणाले की इंडिया गठबंधनमधील कोणता पक्ष कोणाला उमेदवारी देत आहे,हा आमचा विषय नाही मात्र,महायुतीमध्ये देखील जागांना घेऊन ओढताण सुरु आहे,त्यांची बातमी मुखपृष्ठावर छापून येत नाही,आघाडीतील ओढताणीच्या बातम्यां वृत्तपत्रांच्या मुखपृष्ठांवर ठलकपणे प्रसिद्ध होतात,संघ व मोदी-शहा यांचे नाव न घेता,नागपूर आणि दिल्लीमध्ये भरपूर तनाव आहे पण ते ही छापून येत नाही,आम्ही मोठे उद्देश्य घेऊन चालत असतो,संविधान वाचवणे हा आमचा मुख्य उद्देश्य आहे.आघाडीमध्ये जागावाटप लवकरात लवकर होऊन उमेदवारांची घोषणा झाली पाहिजे,अशी पुश्ती त्यांनी जोडली.