फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeराजकारणनिवडणूकीत आघाडीचाच विजय: नागपूरात नसीम खान यांचा दावा

निवडणूकीत आघाडीचाच विजय: नागपूरात नसीम खान यांचा दावा


ही सरकार ‘टक्केवारीची’सरकार:नसीम खान यांची टिका

रवि भवनात काँग्रेस इच्छूकांच्या पार पडल्या मुलाखती

नागपूर,ता.१५ ऑक्टोबर २०२४: माजी मंत्री व काँग्रेस वर्किंग कमेटीचे सदस्य नसीम खान यांनी आज रवि भवनात काँग्रेसच्या इच्छूकांच्या मुलाखती घेतल्या.यानंतर त्यांनी पत्रकार परिषदेत ,महाराष्ट्रात विधान सभा निवडणूकीत महाविकासआघाडीचाच विजय होणार असल्याचा दावा केला.इच्छूक खूप आहेत मात्र,काँग्रेस विचारधारेप्रति एकनिष्ठता,प्रामाणिकता आणि जिंकून येण्याची क्षमता याचा विचार करुनच उमेदवारी दिली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

आजच्या बैठकीत जिल्हा अध्यक्षांसोबत व नागपूर जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांसोबत चर्चा झाली असल्याचे ते म्हणाले.माजी मंत्री अनिस अहमद, माजी खासदार विलास मुत्तेमवार,माजी आमदार नितीन राऊत आदी यांच्याशी चर्चा झाली.नावांचा प्रस्ताव हा आता सीएससी समोर ठेवला जाईल,त्यानंतरच उमेदवारांची घोषणा केली जाईल.काँग्रेस हा आघाडीचा घटक असल्याने शिवसेना(उबाठा)व राष्ट्रवादी काँग्रेससोबत मिळून निवडणूक लढणार असल्याचे त्यांनी सांगितले.विदर्भातील जनतेने लोकसभेत आघाडीच्या उमेदवारांना जास्तीत जास्त जागा जिंकून दिल्या व अनेक जागांवर भाजपाच्या उमेदवारांची तर अनामत रक्कम ही जप्त झाली.वैदर्भिय जनतेचा तसाच आर्शिवाद आम्हाला येत्या विधान सभेच्या निवडणूकीत देखील मिळेल,अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

शिंदे सरकारने आचारसंहितेच्या एक दिवस आधी मुंबईतील चार टोल नाक्यांवरील टोल बंद केले.हे टोल नाके बंद करण्याला काँग्रेसचा विरोध नाही मात्र,विदर्भ,मराठवाडा येथील टोल नाके का बंद करण्यात आले नाही?असा सवाल त्यांनी केला.बीओटी तत्वावर जितके टोल नाके आहेत ज्यांची मुदत संपली आहे,ती बंद करण्यात यावी,अशी मागणी करीत ,सरकारप्रणीत हा फार मोठा भ्रष्टाचार असल्याची टिका त्यांनी केली.

ही सरकार ‘टक्केवारी’ची सरकार असून लवकरच आघाडीतील तिन्ही घटक पक्ष मिळून महायुतीच्या भ्रष्ट कारभारावर’आरोपपत्र’जाहीर करणार आहे.आमचा दावा आहे त्या आरोपपत्रातील चार्टशीटवर शिंदे सरकार कोणतेही उत्तर देऊ शकणार नाही.

ज्या सेतूचे उद् घाटन आमच्या काळात झाले त्या सेतूचे नाव अटल सेतू ठेऊन पुन्हा त्याचे उद् घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले.सिंधूदूर्गमधील मालवण येथील ३६ कोटींचा छत्रपती शिवरायांचा पुतळा अवघ्या ८ महिन्यात कोसळला,महाराष्ट्राला पुरेपूर लृटणा-या अनेक विषयांची पोलखोल आम्ही करणार असल्याचे नसीम खान यांनी सांगितले.

महाराष्ट्रातील अनेक उद्योग गुजरातमध्ये पळवण्यात आले व महाराष्ट्राच्या तरुणांना बेरोजगार ठेवण्याचे काम या सरकारने केले. राज्यात महिलांची सुरक्षा हा तर अतिशय गंभीर विषय झाला आहे.या सगळ्यांचा हिशेब महाराष्ट्राची जनता घेणार असून आघाडीचाच विजय होईल,असा दावा खान यांनी केला.

राज्यातील व्यापारी वर्ग जीएसटीने त्रस्त आहे.व्यापा-यांकडून जीएसटी दादागिरीने वसूल केले जात आहे. बदल्यांमध्ये प्रचंड भ्रष्टाचार केला जात आहे.महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे.वीज बिलांमध्ये प्रचंड लृट सुरु आहे,त्यामुळेच हे सरकार आता फक्त ३०-४० दिवसांचे राहीले असल्याचा दावा नसीम खान यांनी केला.

नागपूरातील सहा ही विधानसभेच्या जागांवर काँग्रेसच लढण्यास इच्छूक आहे मात्र,याचा निर्णय महाराष्ट्रातील वरिष्ठ समिती घेईल,नागपूर ग्रामीणमध्ये देखील ६ पैकी ५ जागा काँग्रेस लढण्यास इच्छूक असल्याचे त्यांनी सांगितले.वाटाघाटीत कुठली जागा कोणत्या पक्षाला सुटेल,हे प्रक्रिया सुरु झाल्यावर कळेलच त्यामुळे त्यावर आताच भाष्य करने योग्य नसल्याचे खान म्हणाले.

एका प्रश्‍नाच्या उत्तरात त्यांनी आघाडीमध्ये विधानसभेच्या २८८ जागांपैकी ८० टक्के जागांवर निर्णय झाला असल्याची माहीती दिली.अल्पसंख्यांकसह सर्व समाजाला योग्य प्रतिनिधित्व देण्याचा प्रयत्न आमचा पक्ष करेल अशी ग्वाही त्यांनी दिली.महिलांना किती टक्के उमेदवारी द्याल?असे विचारले असता,आज तर मुलाखती घेतल्या आहेत,स्क्रीनिंग होईल त्यानंतर ठरवू,असे ते म्हणाले.

‘संविधान बचाओ’हा नेरेटीव्ह लोकसभेत चालला,पुन्हा तोच नेरेटीव्ह विधानसभेत चालेल का?असा प्रश्‍न केला असता,भाजप हा खोटे बोला अन् जोरात बोला,नीती अवलंबिणारा पक्ष आहे,त्यांच्याच मोठ्या नेत्यांनी बडबोलेपण करीत भाजपला लोकसभेत ४०० जागा मिळाल्यानंतर संविधानात बदल करणार असल्याची वल्गना केली होती.त्यांना कशासाठी हव्या होत्या ४०० जागा?यावरुन त्यांची मानसिकता लक्षात येते,हा नेरेटीव्ह नाही तर सत्य आहे.काँग्रेसनेच देशात संविधान लागू केला,संविधानाला वाचवण्यासाठी आम्ही टोकाचा लढा देऊ,असा इशारा त्यांनी दिला.

हरियाणात काँग्रेसच्या अति-आत्मविश्‍वासाने घात केला का?असा प्रश्‍न केला असता,यात तथ्य असल्याचे त्यांनी मान्य केले,हा पराभव आम्ही गांर्भीयाने घेतला असून,येणा-या निवडणूकीत त्याचे परिणाम दिसतील,असे ते म्हणाले.महाराष्ट्राला वाचवण्यासाठी रणनीती बनवित असल्याची पुश्‍ती त्यांनी जोडली.
काँग्रेसचे कार्यकर्तेच खासगीत म्हणतात,काँग्रेसला भाजप नाही तर काँग्रेसच हरवते,हरियाणाच्या निकालने हे पुन्ह सिद्ध केले.पश्‍चिम नागपूरात नरेंद्र जिचकार ज्यांना पक्षातून याच वर्षी जानेवरीत निलंबित करण्यात अाले ते काँग्रेसच्या विद्यमान आमदारांच्या विरोधात प्रचार करीत आहेत,त्यांना काँग्रेसचेच माजी आमदार सुनील केदार यांची फूस आहे,अशी चर्चा आहे,जिचकार यांच्या सर्व बॅनरबाजीवर केदार यांचे छायाचित्र आहे,याकडे कसे बघता?असा सवाल केला असता,जिचकार हे काँग्रेसमधून निलंबित झाले असून ते सध्या आमच्या पक्षात नसल्याचे नसीम खान म्हणाले.त्यांच्या कुठल्याही भूमिकेशी काँग्रेस पक्ष सहमत नाही,असे ते म्हणाले,यावर,केदार यांचं जिचकारांच्या बंडखोरीला समर्थन आहे असं म्हटलं जातंय,यावर काय सांगाल?असे विचारले असता,आम्हाला अजून अश्‍या प्रकारची माहिती नाही आहे,याची आम्ही माहिती घेऊ,असे सांगून त्यांनी प्रश्‍न टोलवला.
पत्रकार परिषदेला आमदार विकास ठाकरे,अभिजित वंजारी,प्रदेश प्रवक्ते अतुल लोेंढे आदी उपस्थित होते.
……………………………..
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या