नागपूर जिल्ह्यातील १२ विधानसभा मतदारसंघातील ४ हजार ६१० मतदान केंद्र
राज्य सीमेवर विशेष दक्षता: सोशल मीडिया, फेक न्यूजवर विशेष लक्ष
समाज माध्यमांवर राहणार विशेष लक्ष
नागपूर, दि. १५ ऑक्टोबर २०२४: जिल्ह्यातील १२ विधानसभा मतदारसंघातील ४ हजार ६१० मतदान केंद्रांवर २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. सुमारे ४४ लाख ९४ हजार ७८४ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. २३ नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता लागू झाली असून, सर्वांनी आचारसंहितेचे पालन करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी, सहपोलिस आयुक्त निसार तांबोळी, जिल्हा पोलिस अधीक्षक (ग्रामीण) हर्ष पोद्दार, उपजिल्हा निवडणूक अधिकारी प्रवीण महिरे आदी उपस्थित होते.
जिल्हा प्रशासनाचे ७५ टक्क्यांवर मतदानाचे लक्ष्य आहे. केवळ प्रशासनाने मानस व्यक्त करून हा संकल्प साध्य होणार नाही. यासाठी मतदारांनीही प्रशासनाच्या या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत अधिकाधिक संख्येने मतदानासाठी पुढे येण्याचे आवाहन जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डॅा. इटनकर यांनी यावेळी केले.
सहाय्यक पोलिस आयुक्त निसार तांबोळी यांनी शहरी भागात तर जिल्हा पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी ग्रामीण भागात पोलीस विभागाने केलेल्या तयारीची माहिती यावेळी दिली. यामध्ये कायदा व सुव्यवस्था, चेक पोस्टवरील बंदोबस्त, मनुष्यबळाची उपलब्धता, प्रतिबंधात्मक कारवाई आदी विषयांची माहिती देऊन निवडणुका शांततेत पार पाडण्यासाठी पोलिस विभागामार्फत सुरक्षेच्या सर्व उपाययोजना करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
असा असणार निवडणूक कार्यक्रम –
जिल्ह्यात १२ विधानसभा मतदारसंघ असून या मतदारसंघातील निवडणूक कार्यक्रम पुढीलप्रमाणे असणार आहे. दि. २२ ऑक्टोबर रोजी निवडणूकीची अधिसूचना प्रसिध्द करण्यात येईल. २९ आक्टोबर हा नामनिर्देशन पत्र सादर करण्याचा अंतिम दिनांक असणार आहे. ३० ऑक्टोबर रोजी नामनिर्देशन पत्राची छाननी करण्यात येणार आहे. ४ नोव्हेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहे. २० नोव्हेंबर रोजी मतदान तर २३ नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. निवडणूक प्रक्रिया २५ नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे.
जिल्ह्यात ४ हजार ६१० मतदान केंद्र
जिल्ह्यात एकूण ४ हजार ६१० मतदान केंद्र असणार आहेत. यात काटोल विधानसभा मतदारसंघात ३३२, सावनेर ३७०, हिंगणा ४७२, उमरेड ३९५ कामठी ५२४, रामटेक ३५९, नागपूर दक्षिण पश्चिम ३७८, नागपूर दक्षिण ३५०, नागपूर पूर्व ३६४, नागपूर मध्य ३०८ नागपूर पश्चिम ३५१, आणि नागपूर उत्तर ४०७ अशी एकूण ४ हजार ६१० मतदान केंद्र असणार आहेत. यात उंच इमारतींमधील ११ आणि झोपडपट्टी भागातील ९ मतदान केंद्रांचा समावेश आहे.
राज्य सीमेवर विशेष दक्षता-
मतदारांना सुलभपणे मतदान करता यावे यासाठी मतदार चिठ्ठी, एकाच ठिकाणी ५ पेक्षा जास्त मतदान केंद्र असल्यास गर्दी नियंत्रणासाठी विशेष उपाययोजना करण्यात येणार आहे. तसेच मध्य प्रदेशलगतच्या राज्य सीमेवरील चेकपोस्टवर विशेष दक्षता घेण्यात येणार आहे. राज्य उत्पादन शुल्क, परिवहन, वन तसेच पोलीस विभागांच्या पथकांमार्फत चेक पोस्टवर विशेष दक्षता घेण्यात येणार आहे.
सोशल मीडियावर राहणार विशेष लक्ष-
सोशल मीडिया, फेक न्यूजवर विशेष लक्ष देण्यात येणार आहे. मतदानाच्या काळात सोशल मीडियावर प्रसारित होणारे, गैरसमज पसरविणारे संदेश व इतर घटनांवर लक्ष ठेवून अशा घटनांचे त्वरीत खंडन करण्याची व कारवाई करण्याची खबरदारी घेणार असल्याचे जिल्हाधिकारी यावेळी म्हणाले.
मतदारांनो, व्होटर हेल्पलाईन ॲपवर नाव शोधा-
व्होटर हेल्पलाईन ॲपवर मतदारांना आपले नाव शोधता येणार आहे. या ॲपच्या माध्यमातून मतदारांनी मतदानासाठी आपले नाव शोधून मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॅा. विपीन इटनकर यांनी केले. नागरिकांना मतदार यादीतील नाव शोधण्याबाबत माहिती देऊन त्यांना मतदानासाठी प्रोत्साहित करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी यावेळी म्हणाले.
लोकसभेत आचारसंहिता भंगाविरुद्ध ११ एफआयआर दाखल-
लोकसभा निवडणूकीत भारतीय जनता पक्षाचे उमेदवार व केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांच्या नावाची चिठ्ठी व पक्ष चिन्ह अनेक बूथवर मतदारांना देत असल्याची तक्रार अपक्ष उमेदवारांनी केली होती,या विरोधात एका अपक्ष उमेदवाराने न्यायालयात धाव घेतली असून,या तक्रारीच्या विरोधात कार्य कारवाई करण्यात आली?असा प्रश्न केला असता,भाजपचे ते बूथ मतदान केंद्राच्या २०० फूटांच्या बाहेर हाेते असे उत्तर इटनकर यांनी दिले.याशिवाय ग्रामीण मध्ये ९ तसेच शहरी भागात २ आचारसंहिता भंगासाठी अशा ११ एफआयआर नोंदवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.विधान सभा निवडणूकीत देखील या विषयी दक्षता घेण्यात येईल,अशी ग्वाही त्यांनी दिली.