संवैधानिक नैतिकता नसणारे राज्यकर्ते झाले:ॲड असीम सरोदे यांची खंत
आचार संहिता लागण्याच्या काही तासांपूर्वी ७ आमदारांना विधान परिषदेच्या सदस्यत्वाची शपथ!
महाविकासआघाडीला यावेळी ‘सशर्त’पाठींबा: ‘निर्भय बनो’चळवळीचे विश्वंभर चौधरी यांचे विधान
नागपूर,ता. १५ ऑक्टोबर २०२४:संविधान निर्माते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना संविधान निर्माण करताना याची कल्पना नव्हती की पुढील काळात संवैधानिक नैतिकता नसणारे लोक राजकारणात येतील,त्यामुळे त्यांनी राज्यपालांवर निर्णय घेण्यासाठी‘वेळेचं ’बंधन संविधानात, लिखितमध्ये निश्चित केले नाही .सरकार द्वारे नामनिर्देशित केलेल्या व्यक्तिंना किती काळात विधान परिषदेच्या सदस्यत्वाची शपथ द्यावी,किती काळात सरकारद्वारा पाठवलेल्या विधेयकांवर स्वाक्षरी करावी,बाबासाहेबांनी राज्यपाल यांच्या सारासार विवेकबुद्धीवर सोपवलेली ही बाब होती,पुढे जाऊन याचाच वापर सत्ताधारी यांनी असंवैधानिक राजकीय कृतींसाठी घेतला, आज आचार संहिता लागण्या पूर्वी महायुती सरकारने ज्या तातडीने १२ पैकी ७ सदस्यांना राज्यपालांतर्फे विधान परिषदेच्या सदस्यत्वाची शपथ दिली,हे त्या कृतीचेच एक उदाहरण असल्याचे,एका प्रश्नावर सुप्रसिद्ध विधितज्ज्ञ व ‘निर्भय बनो’चळवळीचे संयोजक ॲड.असीम सरोदे यांनी सांगितले.आज प्रेस क्लब येथे पत्रकार परिषदेत त्यांनी आपली भूमिका मांडली.
भारताचे संविधान हे जगातले सर्वात मोठे व लिखितमध्ये असलेले संविधान आहे.काही गोष्टी या पायंडा म्हणून असतात,काही गोष्टी या नैतिकता म्हणून असतात,संविधानाचा उद्देश्य हा महत्वाचा असतो कोणतीही गोष्ट करण्या मागे.त्या उद्देश्या प्रति राज्यपालांनी काम करणे अपेक्षीत असतं मात्र,राज्यपाल तसं करताना दिसत नाही.त्यामुळेच विधान परिषदेचे सदस्य देखील संविधानात सांगितल्याप्रमाणे नियुक्त होत नाहीत.अनेकदा तर हा विषय चर्चेत आलेला आहे की विधान परिषद असावी कि नसावी.भारतातीत अनेक राज्यात विधान परिषद नाही,हे वास्तव आपण लक्षात घेतलं पाहिजे.तसंच राज्यपाल हे राष्ट्रपतींचे राज्यातील दूत असतात,त्यांनी त्याच मर्यादेत काम करणे अपेक्षीत आहे,परंतू ते मर्यादा आेलांडून काम करताना दिसतात व तटस्थ राहत नाहीत.त्यामुळेच संविधानाचा उद्देश्य त्यांना कळला नाही.परिणामी ‘स्टॅर्ण्ड ऑपरेटीव्ह प्रोसेस ’अशी नियमावली तयार करुन ती संविधानाच्या एखाद्या परिशिष्टामध्ये जोडली जाऊ शकते,असे ॲड.असीम सरोदे म्हणाले.
संविधानातून ‘विवेकशक्ती’ हा शब्दच काढून टाकायला हवा,ना राज्यपालांना,ना मुख्यमंत्र्यांच्या संदर्भात त्याचा उपयोग झाला पाहिजे.विवेकशक्ती हा शब्द लोकशाहीच्या विरोधात आहे,तो शब्द संविधानातून काढणे गरजेचे आहे,असे माझे मत आहे,असे‘निर्भय बनो’चळवळीचे संयोजक विश्वंभर चौधरी याप्रसंगी म्हणाले.
भगतसिंह कोश्यारी राज्यपाल असताना आघाडी सरकारने १२ नावे सुचवली होती मात्र,त्याची शहनिशा ही न करता त्यांनी ती यादी तशीच अडीच वर्षे तातकळत ठेवली,कारण काय सांगितले तर मला कोणत्याही प्रकारचे वेळेचे बंधन नाही,त्यामुळे निर्णय कधी घेईल हे मी सांगू शकत नाही. सर्वोच्च न्यायालयाने देखील त्यांच्या या कृतीवर कठोर ताशेरे अोढले होते तरी देखील त्यांनी ती नावे मंजूर केली नाही.राज्यपाल पदावरची व्यक्ती ही कोणत्याही पक्षाची नसते,ते संवैधानिक पद आहे.आजच्या शपथविधीच्या घटनेत राज्यपालांना महायुतीच्या पक्षांनी नावे कधी सूचवली,राज्यपालांनी त्या नावांची शहनिशा किती वेगवान पद्धतीने केली?हा मुद्दा महत्वाचा असून यात निर्णयाची पारदर्शिता आढळून येत नाही.साधारणत: राज्यपालांच्या निर्णयाला न्यायालयात आव्हान देता येत नाही.त्यामुळेच उच्च न्यायालयाने आज विधान परिषदेतील सदस्यांच्या नियुक्तीला स्थगिती देण्यास नकार दिला मात्र,संविधानाचे उल्लंघन झाले असल्यास न्यायालयात राज्यपालांच्या निर्णयांना देखील आव्हान देता येतं,असे सरोदे यांनी सांगितले.
आज ज्यांना राज्यपालांनी शपथ दिली ते कुणी सामाजिक किवा विविध क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळी नव्हती तर ते दुहेरी व्यक्तीमत्वाचे धनी आहेत.विधान परिषदेत किवा राज्यसभेत जाता यावं म्हणून आपली स्वत:ची सामाजिक संस्था काढायची,सामाजिक कार्यकर्ता म्हणून प्रस्थापित करायचे व आपल्या राजकीय फायद्यासाठी सरळ विधान परिषदेत किवा राज्यसभेत प्रवेश करावा,असे राजकारण घडत असल्याचे सरोदे यांनी सांगितले.आज ज्या ७ लोकांचा शपथविधी झाला ते सगळेच राजकीय पक्षांतील आहेत.महाराष्ट्रात सामाजिक परिवर्तनासाठी,समाजाच्या प्रबोधनासाठी काम करणारे लोकं नाही आहेत का?विषयातले तज्ज्ञ नाहीत का?सगळेच राजकीय पक्ष हे राजकीय लोकांनाच परिषद किवा राज्यसभेत पाठवतात.आज दुपारी बारा वाजता जो शपथविधी झाला तो पुन्हा एकदा राजकीय स्वार्थासाठी राज्यपाल पदाचा दुरुपयोग असल्याची टिका सरोदे यांनी केली.
महाराष्ट्रातील सत्तापिपासूंनी आचार संहितेच्या दोन दिवसांपूर्वी ‘महामंडळांची’ जी खैरात वाटली,त्यावर तर काही बोलायलाच नको,असे चौधरी म्हणाले.शिंदे-फडणवीसांनी महाराष्ट्राच्या गौरवशाली परंपरांना खूप खालच्या स्तरावर नेऊन पोहोचवले,माजी राज्यमंत्र्यांची,बाबा सिद्दीकी यांची दिवसा ढवळ्या हत्या झाली यावरुन महाराष्ट्र कुठे पोहोचला याची कल्पना येते,अशी टिका चौधरी यांनी केली.
याप्रसंगी बोलताना चौधरी म्हणाले की,लोकसभा निवडणूकीच्या वेळी ‘निर्भय बनो’चळवळीच्या माध्यमातून आम्ही संपूर्ण महराष्ट्रात ७५ सभा घेतल्या.हीच मोहिम आम्ही विधान सभेच्या निवडणूकीमध्ये देखील सुरु ठेवणार आहोत.ही मोहिम कोणाविरुद्ध नसून लोकशाही आणि संविधानातील मूल्यांच्या संरक्षणासाठी असल्याचे ते म्हणाले.मात्र,आमचा पाठींबा महविकास आघाडीला ’बिन शर्त’नाही.यावेळी आघाडीला आमचा पाठींबा ‘सर्शत’आहे.आघाडीची सत्ता येणार आहे असे चित्र आम्हाला सर्वदूर बघायला मिळत आहे.त्यामुळेच आघाडीने शिक्षण व आरोग्यावर एकूण अर्थसंकल्पापैकी १२ टक्क्यांची तरतूद करावी,अशी आमची अट आहे.पर्यावरण,नद्यांची स्वच्छता यासाठी त्यांनी धोरणे राबवावी.महाराष्ट्रातील जनता राजकारणाला आता कंटाळली आहे.विचार करणारे मतदार तयार करण्याचा आमचा उद्देश्य आहे.धर्मांध वातावरण नको,सत्ताधा-यांना खुलेपणाने प्रश्न विचारण्यासाठी माध्यमांना मोकळीक असावी,सत्ताधा-यांच्या चूकांवर प्रश्न विचारणारे नागरिक तयार करण्याचा आमच्या चळवळीचा उद्देश्य आहे,असे चौधरी यांनी सांगितले.
आघाडी सरकारकडून आम्हाला अपेक्षा आहे नागरिकशास्त्रसारखा अतिशय महत्वाचा विषय हा संपूर्ण १०० गुणांचा असावा,तो केवळ २० गुणांचा नसावा,त्यात ५० गुणांची राज्यघटना असावी,अशी आमची मागणी आहे.याशिवाय शिक्षण हे आनंददायी करण्यात यावे.शिक्षण ही फक्त पदवी नाही.याशिवाय महिला व बालविकास विभागासाठी चांगल्या निधीची तरतूद असावी.सध्या फक्त उधळपट्टीच्या शासकीय योजना राबविताना दिसून पडत आहेत ,गरीब,आदिवासी,अल्पसंख्यांक,महिला,बालके तसेच ज्यांना घटनेने विशेष संरक्षण दिले आहे,त्या सर्वांचा विकास हा आघाडी सरकारसाठी प्राधान्यक्रम असावा,असं आम्हाला वाटतं.आम्ही त्यांना ‘जनतेचा जाहीरनामा’देणार असून त्यांची सत्ता आल्यावर त्याची अंमलबजावणी करने अपेक्षीत असल्याचे चौधरी म्हणाले.
याप्रसंगी बोलताना असीम सरोदे म्हणाले,की अशाच प्रकारचे प्रश्न आम्ही काँग्रेस-राष्ट्रवादीची सरकार असताना ही विचारले आहे,सध्या आघाडीचे जे घटक पक्ष आहेत ते आम्हाला लोकशाहीच्या जास्त जवळ असल्याचे वाटतात.त्यांना आम्ही सांगू शकतो काय बदल करायचा आहे,राजकारण हे कोणाच्या विरुद्ध नसतं,सत्ता ही बदलत राहीली पाहिजे,नागरिकांसाठी हे चांगले असते.केवळ एकाच पक्षाने राज्य करीत राहायचं ही नागरिकांच्या आणि लोकशाहीच्या दृष्टिने चांगली बाब नसल्याचे सरोदे म्हणाले.
यावेळी शिवसेने उबाठातर्फे विधानसभेची निवडणूक लढणार आहात का?असा प्रश्न केला असता,मी कोणतीही निवडणूक लढणार नाही,मी बार असोशिएशनचीही निवडणूक लढत नसल्याचे त्यांनी सांगितले.
अजित पवार,एकनाथ शिंदे आणि भाजप यांना निवडणूकीत हरवणे हे किती गरजेचे आहे हे आम्हाला लोकांना सांगायची गरज नाही मात्र,अनेक जिल्ह्यात आज ही आठ दिवसांनतर पाणी मिळत आहे.लोकांचे प्रश्न सुटणे हे आम्हाला गरजेचे वाटतात,त्यामुळे आम्ही जिल्हास्तरावर सभा घेतो,असे चौधरी यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.