उद्या अति.आयुक्तांच्या बैठकीत निर्णय!
नागपूर,ता.१८ डिसेंबर २०२४: नागपूर महानगरपालिकेचे निलंबित वरिष्ठ अग्निशमन अधिकारी राजेंद्र उचके यांच्या पुर्नवापसीसाठी उद्या १९ डिसेंबर रोजी मनपाचे अति.आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होणार असल्याची माहिती सूत्राने दिली.उचके यांच्यावर २ नोव्हेंबर २०२२ मध्ये नातेवाईक असणा-या एका तरुणीला हस्तमैथून करतानाचे अश्लील व्हिडीयो पाठवण्यासंबधी छत्तीसगड येथील राजनंदगावच्या कोतवाली पोलिस ठाण्यात गंभीर गुन्हा दाखल झाला होता,या गुन्ह्याची स्वत:आरोपी राजेंद्र उचके यांनी न्यायालयात कबुली सुद्धा दिली होती,हे प्रकरण न्यायप्रविष्ट असून उचके हे जामिनावर असताना,त्यांची कोणतीही विभागीय चौकशी न करता पुन्हा त्यांना मनपातील विभागात घेण्यास अति.आयुक्त उत्सुक़ असल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त होेेत आहे!
उचके यांच्यावर भा.द.वि १८६० अंतर्गत कलम ५०९(ब)५०६(ब)आणि आयटी ॲक्ट २००० अंतर्गत ६७(अ)नुसार गुन्हा नोंद झाला आहे.पिडीतेचा उचके हे नात्याने मामा लागतात.नातेसंबधातील भाचीला उचके हे १७ जून २०२२ पासून अश्लील मॅसेज पाठवित होता,तसेच स्वत:चे हस्तमैथून करतानाचे व्हिडीयो आणि अश्लील संभाषणातील ऑडियो क्लिप उचके यांनी पिडीतेला पाठवली.याशिवाय पोर्न व्हिडीयो पाठवून संभोग करण्यासाठी पिडीतेला प्रेरित करित होता.एवढंच नव्हे तर याची वाच्यता केल्यास माहेरकडील संपूर्ण कुटूंबियांना संपविण्याची धमकी देखील देत होता.उच्च अधिकारी असल्यामुळे माझी राजकीय नेत्यांपासून तर पोलिस अधिका-यांपर्यंत सर्वदूर ओळख असल्याची धमकी पिडीतेला देण्यात आली.मनपातील सर्व वरिष्ठ अधिकारी,निगम आयुक्त,अति.आयुक्त तसेच कर्मचारी यांना मी महिन्याला लाखो रुपये कमावून देतो,माझे कोणताही अधिकारी काहीच वाकडे करु शकत नाही,माझ्यावर कोणत्याच प्रकारची कारवाईसुद्धा होऊ शकत नाही,मी पैसे देऊन सर्वांना खरेदी केले आहे,माझे कोणीच काहीच बिघडवू शकत नाही,अश्या प्रकारची धमकी आरोपीने पिडीतेला दिली,जी पिडतेच्या एफआयआरमध्ये नोंद आहे.
(छायाचित्र :उचके यांना राजनंदगाव पोलिसांनी केलेली अटक)
या प्रकरणात अटक होऊ नये म्हणून आरोपीने राजनंदगावच्या सत्र न्यायालयात धाव घेतली होती.त्यावर तृतीय अपर सत्र न्यायाधीश सिद्धार्थ अगरवाल यांनी सुनावणी केली.पिडीतेने उचके यांच्यावर केलेले आरोप ते शासकीय अधिकारी असल्याने अधिक गंभीर असून ते अंतरिम जामीनासाठी अपात्र आहे,असे न्यायाधीशांनी बजावून उचके यांचा अंतरिम जामीन अर्ज फेटाळून लावला होता.हा अर्ज फेटाळ्यामुळे तत्कालीन मनपा आयुक्त राधाकृष्णन बी.यांनी उचके यांच्या विरोधात कारवाई करावी अशी मागणी ज्येष्ठ माहिती अधिकार कार्यकर्ते टी.एच.नायडू यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली होती.मात्र,मनपा आयुक्तांनी कोणतीही विभागीय चौकशी उचके यांच्या विरोधात सुरु केली नाही!
पिडीतेने आरोपीच्या मागणीला दाद न दिल्याने पिडीतेच्या पतीलाच १ कोटी रुपये खंडणी मागितल्याच्या आरोपात अडकविण्याची घटना नागपूरच्या एका मोठ्या हॉटेलमध्ये घडली होती.आरोपीचे लाचलुचपत खात्यातील खास मित्राने धाडीची ही कारवाई केली.मात्र,आरोपी विरोधात राजनंदगाव येथे तक्रारीची नोंद होताच, नागपूर पोलिसांची या घटनेबाबतची कारवाई थंड बसत्यात गेली!या आरोपात पिडीतेच्या पतीला न्यायालयातून जामीन मिळाला.
उचकेंविरोधात मनपा आयुक्तांचे तीन ते चारवेळा चौकशी करण्याची परवानगी देणारे पत्र लाचलुचपत विभागाच्या अधिका-यांना गेले असता,पुन्हा उचके यांची मनपात पुर्नवापसी,अनेकांना बुचकळ्यात टाकणारी ठरत आहे.शहरातील नेत्यांच्या अनेक प्रकल्पांना नियमबाह्यरित्या ना-हरकत प्रमाणपत्र देण्याची पुण्याई उचके यांच्या पाठीशी असल्याची चर्चा आहे.त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गृहशहरात मनपातील एक बडा अधिकारी एखाद्या ‘लाडकी बहीणीच्या’सन्मानाला ठेस पोहोचवित असला व त्यावर न्यायालयानेही कठोर ताशेरे ओढले असले तरी,ते क्षम्य आहे कारण उचके हे शहरातील हेवीवेट नेत्यांच्या मोठ्या ‘कामाचे ’अधिकारी असल्याची कुजबुज मनपात सहज ऐकू येत आहे.
पिडीतेने आपल्या एफआयआरमध्ये उचके कश्याप्रकारे मनपाच्या अति.आयुक्त आदींना पैशांनी खरेदी करतो,याचा आधीच उल्लेख केला आहे,त्यामुळे अश्या भ्रष्ट व मुख्यमंत्र्यांच्या शहरालाच बदनाम करणा-या आरोपी अधिका-याला, ज्याच्यावर लैंगिक गुन्ह्यासारखे गंभीर आरोप आहेत ,त्याची विभागीय चौकशी न करता पुर्नवापसीसाठी ‘खास’बैठक घेतल्या जात आहे,यावर सर्वत्र संताप व्यक्त होत आहे.उचके याची न्यायालयीन चौकशीसह लाचलुचपत विभागाची देखील चौकशी सुरु आहे मात्र,मनपाला या आरोपीची कोणतीही विभागीय चौकशी करण्याची गेल्या दोन वर्षांपासून गरज वाटली नाही,यामुळे पाणी कुठे मुरतंय,हे लक्षात येतं.
निलंबित असताना उचके हे गेल्या दोन वर्षांपासून पगार घेत आहेत,या सबबीखाली त्यांचे पुर्नवापसीचे समर्थन केले जात आहे,मनपा आयुक्तांना आणि अति.आयुक्तांना न्यायालयाच्या निर्णयाची देखील वाट बघाविशी वाटत नाही,यावरुन मनपा प्रशासन राजकीय दबावात आहे का?अशी शंका व्यक्त होत आहे.
केवळ मनपाच नव्हे तर लाचलुचपत विभागाचे अधिकारी हे देखील उचके यांच्या चौकशीसाठी विलंब करीत आहेत!प्रसिद्ध ‘‘फरियास’’हॉटेलचे प्रकरण माध्यमांमध्ये खूप गाजले.नियमबाह्यरित्या या हॉटेलला उचके यांनी ना-हरकत प्रमाणपत्र दिल्याचा आरोप टी.एच.नायडू यांनी केला व यासाठी झालेल्या अर्थपूर्ण व्यवहाराच्या चौकशीची मागणी करणारे पत्र नायडू यांनी शासनाच्या विविध विभागांना दिले.या पत्रामुळे या हॉटेलची खूली चौकशी सुरु आहे.या व्यवहाराची संपूर्ण फाईल विभागाद्वारे मागवण्यात आली आहे.नागपूरच्या एस.पी ने तर उचके यांच्या संपूर्ण अर्थपूर्ण व्यवहारावर अतिशय ‘खतरनाक’अहवाल जिल्हाधिकारी,मनपा आयुक्त,मुंबईचे महानिदेशक यांना दिला असल्याची चर्चा आहे.नागपूर शहरात भूखंडाचे अनेक घोटाळे व अग्नानिशमन विभागाचे वरिष्ठ अधिकारी म्हणून ना-हरकत प्रमाणापत्र देण्याच्या घोटाळ्यांसाठी उचके तसेच चंदनखेडे यांच्या चौकशीची मागणीही त्या अहवालात असल्याचे बोलले जात आहे.
थोडक्यात,‘पार्टी विथ डिफरेन्स‘चा टेंभा मिरविणा-या भाजपची, गेल्या पंधरा वर्षांपासून एकहाती सत्ता असणा-या मनपात पुन्हा एकदा, भ्रष्टाचार व लैंगिक शोषण असणा-या अधिका-याची पुर्नवापसी होणार असेल तर पुन्हा एकदा मनपा समोर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा विविध सामाजिक संघटनांनी दिला आहे.
………………………….