फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeनागपूर मनपामनपा मुख्यालयात 'कायदेशीर'अट्रासिटी!

मनपा मुख्यालयात ‘कायदेशीर’अट्रासिटी!

ॲड.राहूल झांबरे यांचा गंभीर आरोप
लाड पागे समितीच्या दिशानिर्देशांना हरताळ
उच्चविद्याभूषित स्वच्छता कर्मचारी दहा वर्षांपासून पदोन्नतीपासून वंचित
नियुक्ती देतानाच केला भेदभाव:अभियंते करतात नाले सफाई!
नागपूर,ता.२४ सप्टेंबर २०२४: नागपूर महानगरपालिकेत स्वच्छता कर्मचारी म्हणून २०१४ साली नियुक्ती झालेल्या १४६ कर्मचा-यांपैकी १५ कर्मचारी हे अभियंते आहेत,५ एमबीए आहेत तर इतर सर्व हे बी.एससी,एम.एससी तसेच इतर शाखेचे पदवीधर आहेत.लाड पागे समितीनुसार उच्च शिक्षीत कर्मचा-यांना नियुक्ती देतानाच वर्ग-३ च्या श्रेणीत नियुक्ती देणे बंधनकारक असताना २०१४ मध्ये या १४६ कर्मचा-यांना मात्र,स्वछता कर्मचारी म्हणून श्रेणी-४ पदावरच नियुक्ती देण्यात आली.महत्वाचे म्हणजे,लाड पागे समितीनुसार दर तीन वर्षांनी नियुक्त कर्मचा-यांची पदोन्नती करणे बंधनकारक असताना, गेल्या दहा वर्षांपासून हे उच्च विद्याभूषित स्वच्छता कर्मचारी अद्यापही मनपा मुख्यालय तसेच नागपूर शहरातील  विविध झोनमध्ये नाले सफाई करीत आहेत.परिणामी,मनपा प्रशासन हे शासकीय नियमांनुसार प्रशासकीय कारभार चालवित नसून ‘मनुस्मृति‘च्या ग्रंथानुसार कारभार करीत असून, या कर्मचा-यांवर ‘कायदेशीर’अट्रासिटी सुरु असल्याची खरमरीत टिका नागपूर जिल्हा मनपा कामागार संघटनेचे अध्यक्ष ॲड.राहूल झांबरे यांनी आज पत्रकार परिषदेत केला.
याप्रसंगी बोलताना त्यांनी सांगितले,की या १४६ उच्च शिक्षीत स्वच्छता कर्मचा-यांना नियुक्ती देतानाच अभियंता असलेल्यांना विविध आस्थापनेत सहाय्यक तंत्रज्ञ पद देता आले असते.यापूर्वी देखील १९९८ साली लाड पागे समितीनुसार मनपात रुजू होणार-या उच्च शिक्षीत कर्मचा-यांना कनिष्ठ लिपिक,मोटर लीडर,कर संग्राहक,मोहरीर इत्यादी वर्ग-३ च्या श्रेणीत नियुक्त्या देण्यात आल्या आहेत.२००९ मध्ये पुन्हा लाड पागे समितीनुसार नियुक्त झालेल्या उच्च शिक्षीत कर्मचा-यांना माेहरीर तर २०११ इलेक्ट्रीकल अटेंडेट म्हणून नियुक्ती मिळाली आहे.असे असताना २०१४ साली नियुक्त झालेल्या उच्च विद्या भूषित स्वच्छता कर्मचा-यांना वर्ग-३ च्या श्रेणीत नियुक्ती न देता,शहर भरातील नाले सफाई व कचरा उचलण्याच्या कामात मनपा प्रशासनाने जुंपले असल्याचा आरोप,ॲड.झांबरे यांनी केला.
लाड पागे समितीनुसार नागपूर महानगरपालिकेच्या कर्मचा-यांच्या सेवानिवृत्तीनंतर किवा मृत्यूनंतर त्यांच्या अपत्यांना (वारसा नसला पाहिजे)वारश्‍यांना नियुक्ती दिली जाते.मनपाच्या सामान्य प्रशासन विभागाअंतर्गत मनपाच्या विविध आस्थापनेत या नियुक्त्या केल्या जातात मात्र,स्वच्छता कर्मचारी यांना सामान्य प्रशासन विभागाने वगळले आहे.कुठल्याही प्रशासकीय कार्यालयात दोन आस्थापने नसतात मात्र,नागपूर महानगरपालिका ही एकमेव अशी स्थानिक स्वराज्य संस्था आहे ज्यात दोन आस्थापना कार्यरत असल्याचे ॲड.झांबरे सांगतात.मनपाचा सामान्य प्रशासन विभाग हा स्वच्छता कर्मचा-यांबाबत असंवैधानिक व भेदभावपूर्ण व्यवहार करीत असल्याचा आरोप झांबरे यांनी केला.
मनपाच्या आकृतिबंधामध्ये अद्यापही ९५० च्या जवळपास पदे रिकामी असताना या उच्च शिक्षीत स्वच्छता कर्मचा-यांची नियुक्ती विविध आस्थापनेत केली जात नाही.मनपाचे झोनस्तरावरचे काही प्रशासकीय अधिकारी तर खासगीत, हा ‘घनकचरा’आम्हाला आमच्या झोनमध्ये नको,अश्‍या प्रकारचे विधान करीत असल्याचा खळबळजनक आरोप याप्रसंगी ॲड.झांबरे यांनी केला.गेल्या दहा वर्षांपासून या उच्च शिक्षीत स्वच्छता कर्मचा-यांना श्रेणी-३ मध्ये नियुक्ती न देता त्यांच्यावर अन्याय करण्यात आला,दूसरीकडे तीन वर्षात पदोन्नतीचा नियम असताना त्यांना अद्यापही त्याच श्रेणीत ठेवण्यात आले आहे,हा वेगळा अन्याय झाला.
काल आम्ही मनपा आयुक्त डॉ.अभिजित चौधरी यांना भेटून विभागीय पदोन्नती समितीची बैठक रद्द करावी,अशी मागणी केली होती मात्र,ती मान्य झाली नाही.या बैठकीत श्रेणी-१ व श्रेणी-२ च्या पदोन्नतीविषयी निर्णय संमत झाले मात्र,श्रेणी-३ व श्रेणी-४ च्या कर्मचा-यांच्या पदोन्नती विषयी कोणताही निर्णय घेण्यात आला नाही.२०१४ मध्येच मनपाच्या सर्वसाधारण सभेत विविध आस्थापनेत ५० टक्के जागा ही स्वच्छता कर्मचा-यांच्या नियुक्ती करुन भरण्यात यावा,असा ठराव मंजूर करण्यात आला आहे.२०१७ मध्ये ३९८ जागे पैकी २६६ जागा भरण्यात आल्या मात्र,आजपर्यंत त्यांनाही पदोन्नती देण्यात आली नाही,याकडे ॲड.राहूल झांबरे यांनी लक्ष वेधले.
महत्वाचे म्हणजे मनपाच्या आरोग्य विभागाने उच्च विद्याभूषित स्वच्छता कर्मचा-यांची यादीच विभागीय पदोन्नती समितीला पाठवली नाही,त्यांचा हेतू या कर्मचा-यांना कायम स्वच्छता कर्मचारी म्हणूनच राबवून घेण्याचा आहे,अशी टिका ॲड.झांबरे यांनी केली.
लाड पागे समितीनुसार दोनच दिवसांपूर्वी मनपात ३०९ स्वच्छता कर्मचा-यांची नियुक्ती करण्यात

आली.यात ही १०० च्या वर कर्मचा-यांची नियुक्ती मनपा मुख्यालयात करण्यात आली आहे.एवढ्या संख्येने मनपा मुख्यालयात स्वच्छता कर्मचा-यांची नेमणूक म्हणजे संपूर्ण मुख्यालय चकाकून निघालेले दिसायला हवे मात्र,प्रत्यक्षात मुख्यालयाची स्वच्छता यावर अनेक वृत्त प्रसिद्ध झाले असल्याची कोटी त्यांनी केली.आज ही आस्थापनेत आठ हजार पैकी चार हजार पदे रिक्त आहेत.तरी देखील या उच्च विद्याभूषित स्वच्छता कर्मचा-यांची नियुक्ती किवा पदोन्नती त्या पदांवर केली जात नसल्याचे त्यांनी सांगितले.
२०१७ मध्ये तत्कालीन सत्ता पक्ष नेते संदीप जोशी यांनी ठराव पारित करीत ,स्वच्छता कर्मचा-यांना विविध आस्थापनेत सामावून घेण्याचा निर्णय दिला होता मात्र,मनपा प्रशासनाने त्या ठरावालाही वाटाण्याच्या अक्षता लावल्याचा अारोप त्यांनी केला.१ ऑक्टोबर २००३ च्या शासननिर्णयानुसार स्वच्छता कर्मचारी या पदावर वारसा हक्काने नियुक्ती ही वारसदाराने केलेल्या अर्जाच्या अनुषंगाने थेट देण्यात यावी.तथापि,पदे उपलब्ध नसल्यास वारसदाराची शैक्षणिक अर्हता विचारात घेऊन अन्य पदावर(वर्ग-३)नियुक्ती देण्यात यावी.एखाद्या स्वच्छता कर्मचा-याचा वारस हा वर्ग-३ तसेच वर्ग-४ च्या पदासाठी शैक्षणिक अर्हतेनुसार पात्र ठरत असेल आणि त्याने वर्ग-३ च्या पदासाठी इच्छूकता दर्शविली असेल,मात्र,संबंधित कार्यालयात वर्ग-३ चे पद रिक्त नसेल तर संबंधित वारसास भविष्यात वर्ग-३ च्या रिक्त पदावर नियुक्ती मिळण्याच्या अधिन राहून वर्ग-४ मधील रिक्त पदावर वारसा हक्काने नियुक्ती देण्यात यावी व तसे नियुक्ती आदेशात नमूद करावे.इतका सुस्पष्ट शासन निर्णय असतानाही,नागपूरच्या मनपा मुख्यालयात मात्र,शासन निर्णयाची क्रूर थट्टा करण्यात आली असल्याचे ॲड.झांबरे म्हणाले.
हा दलित,शोषित,पिडीत अनुसूचित जातीतील सुशिक्षीत स्वच्छता कर्मचा-यांवर  एकप्रकारे कायदेशीर ‘अट्रासिटी’ सुरु असून नुकतेच उत्तर नागपूरचे आमदार नितीन राऊत यांनी सदर पोलिस ठाण्यात,मनपा प्रशासनावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.रविवारी स्वच्छता दौड कार्यक्रमात राष्ट्रचिन्ह अशोकचक्रावरच चक्क झाडूचे चित्र लावण्यात आले,तो राष्ट्रध्वजाचा अपमानच होता,दूसरीकडे मनपा प्रशासन हे संविधान आणि शासन निर्णय यांचा देखील आपल्या मनुवादी कार्यशैलीतून सर्रास अवमान करीत असल्याचा आरोप झांबरे यांनी केला.

आमची मागणी आहे की विभागीय पदोन्नती समितीच्या निर्णयाला स्थगिती देण्यात यावी,सामान्य प्रशासन विभागाप्रमाणेच सेवा ज्येष्ठतेनुसार व शैक्षणिक अर्हतेनुसार स्वच्छता कर्मचा-यांना नियुक्ती व पदोन्नती देण्याची मागणी त्यांनी केली,अन्यथा लवकरच मनपाच्या या मनुवादी कारभारा विरोधात न्यायालयात दाद मागितली जाईल,असा इशारा त्यांनी दिला.
………………….
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या