नवी दिल्ली : आर्थिक अफरातफर केल्याप्रकरणी काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वड्रा सक्तवसुली संचलनालयासमोर (ईडी) हजर झाले. यावेळी त्यांची पत्नी आणि काँग्रेसच्या नवनियुक्त सरचिटणीस प्रियंका गांधी त्यांच्यासोबत होत्या. रॉबर्ट वड्रा यांना सक्तवसुली संचलनाल कार्यालयात सोडून प्रियंका गांधी परतल्या. पटियाळा न्यायालयाने आर्थिक अफरातफर केल्याप्रकरणी रॉबर्ट वड्रा यांना १६ फेब्रुवारीपर्यंत अंतरिम जामीन मंजूर केला आहे. रॉबर्ट वड्रा यांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता.
जामिनाबरोबर वड्रा यांना न्यायालयात एक लाख रुपये भरावे लागणार असून त्यांना ६ फेब्रुवारीला चार वाजता कोर्टात हजर रहाण्यास सांगण्यात आलं आहे. सुनावणीदरम्यान ईडीने वड्रा यांची परदेशातही संपत्ती असून त्यासाठी त्यांची चौकशी करणं गरजेचं असल्याचं सांगितलं होतं. स्कायलाइट हॉस्पिटॅलिटी प्रा. लि. या वढेरा यांच्याशी संबंधित कंपनीने २००८ मध्ये ओंकारेश्वर प्रॉपर्टीजकडून ३.५ एकर जमीन ७.५० कोटी रुपयांना खरेदी केली. त्यानंतर स्कायलाइटने डीएलएफला हीच जमीन ५८ कोटी रुपयांना विकली आणि ५०९ कोटी रुपये नफा कमाविला, असे एफआयआरमध्ये म्हटले आहे. त्या वेळी काँग्रेसचे नेते हुडा हे मुख्यमंत्री होते. वढेरा यांनी यापूर्वीच या आरोपांचे खंडन केले आहे. त्या बदल्यामध्ये राज्य सरकारने नियमांचे उल्लंघन करून डीएलएफला ३५० एकर जागा मंजूर केली, असा पोलिसांचा दावा आहे.