लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर करण्यात आलेल्या सर्वेक्षणानुसार कोणत्याही पक्षाच्या आघाडीली स्पष्ट बहुमत मिळत नसल्याचे चित्र समोर आले आहे. एबीपी न्यूज-सी वोटर च्या सर्व्हेमध्ये एनडीए सर्वात मोठी आघाडी ठरणार असल्याचे चित्र समोर येत आहे. भाजप आणि सहकारी पक्षांना 233 तर काँग्रेसच्या नेतृत्वातील युपीएला 167 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. इतर पक्षांना या सर्वेक्षणात 143 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
उत्तर प्रदेशात भाजपला सर्वाधिक नुकसान
या सर्व्हेतील अंदाजानुसार भाजपला उत्तर प्रदेशात सर्वाधिक नुकसान होऊ शकते. येथे 80 पैकी सपा-बसपा आघाडीला 51 जागा मिळू शकतात तर काँग्रेसला 4 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 2014 मध्ये भाजप आणि सहकारी पक्ष असलेल्या अपना दलने येथे 73 जागा जिंकल्या होत्या. यावेळी भाजप आघाडीला 25 जागाच मिळण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्रातही युपीए वरचढ
महाराष्ट्रातही 2014 च्या लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना आघाडीने 41 जागा जिंकल्या होत्या. पण सर्व्हेतील आकडेवारीनुसार 2019 मध्ये येथे काँग्रेस-राष्ट्रवादी वरचढ ठरण्याची शक्यता आहे. एनडीएचा आकडा यावेळी 16 पर्यंत खाली येऊ शकतो.
मध्यप्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्येही फटका
नुकत्याच झालेल्या मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड विधानसभा निवडणुकीत भाजपला पराभवाचा सामना करावा लागला. या तीन राज्यांतील एकूण 65 लोकसभा मतदारसंघांपैकी भाजपला 46 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवला असून काँग्रेसला 19 जागा मिळण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. जागांचा विचार करता भाजपला आधीच आघाडी मिळालेली असली तरी 2014 च्या तुलनेत भाजपला मोठास फटका मिळण्याची शक्यता आहे.
बंगालमध्ये लक्ष्यापासून खूप दूर..
सर्व्हेनुसार ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसला यावेळीही गेल्या वेळीप्रमाणेच 34 जागा मिळू शकतात. 2014 मध्ये याठिकाणी 2 जागा जिंकणाऱ्या भाजपचा आकडा 7 पर्यंत वाढू शकतो तर एक जागा काँग्रेसला मिळण्याचा अंदाज आहे. येथे डाव्यांचे अस्तित्व धोक्यात येण्याची शक्यता आहे.
असा असू शकतो एनडीएचा सत्तेचा फॉर्मुला
सर्व्हेनुसार आंध्र प्रदेशात जगन मोहन रेड्डी यांच्या वायएसआर काँग्रेसला 19 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर तेलंगणामध्येके चंद्रशेखर राव यांना 16 आणि ओडिशात नवीन पटनायक यांच्या बीजू जनता दलाला 9 जागा मिळण्याची शक्यता आहे. या तीन पक्षांचा आकडा 44 होतो. या सर्वांचा ओढा एनडीएकडेच अधिक आहे. जर त्यांनी एनडीएला साथ दिली तर बहुमताचा आकडा भाजप सहज मिळवू शकेल.