फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeदेश-विदेशसंविधान चौकात महिला काँग्रेसची लाल क्रांती:सत्ताधा-यांना इशारा

संविधान चौकात महिला काँग्रेसची लाल क्रांती:सत्ताधा-यांना इशारा

बलदापूरच्या घटनेतील पोलिसी दिरंगाईला काँग्रेसने केले ‘कॅश’
महिलांची राजकीय भागीदारी वाढवा,अत्याचार थांबवा:३३ टक्के आरक्षणाची केली मागणी
नागपूर,ता.२९ ऑगस्ट २०२४:बदलापूरच्या घटनेनंतर संपूर्ण समाजमन ढवळून निघाले आहे.विरोधकांनी या घटनेला चांगलेच तापवले असून,अखिल भारतीय काँग्रेसच्या नेत्या अलका लांबा यांच्या नेतृत्वात आज संविधान चौकात जोरदार आंदोलन झाले.क्रांतीचा रंग लाल असल्यामुळे आम्ही आज लाल रंग परिधान करुन आलो असल्याचे लांबा यांनी सांगितले.महाराष्ट्रात परिवर्तन घडवून आणायचे आहे,असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.महत्वाचे म्हणजे २०१२ च्या डिसेंबर महिन्यात राजधानी दिल्लीत दूर्देवी घटना ‘निर्भया’सोबत घडली होती,यामुळे संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली होती.काँग्रेसने या संतापाची दखल घेत महिलांविरोधी गुन्ह्यांसाठीचे कायदे आणखी कठोर केले,निर्भया फंडची तरतुद केली मात्र,‘बुंद से गई वो हौद से नही आती’या उक्तीप्रमाणे काँग्रेसप्रतिचा रोष २०१४ मध्ये मतपेटीतून उमटला व काँग्रेसला आपली सत्ता गमवावी लागली.महाराष्ट्रात बदलापूर येथील शाळेत दोन चिमुकलींसोबत जे पराकोटीचे क्रोर्य घडले व ते ज्या पद्धतीने सत्ताधा-यांनी हाताळले ते बघता सत्ताधा-यांच्या प्रति असणारा रोष,मतपेटीत परिवर्तित करण्यासाठी देशातील काँग्रेस हा प्रमुख विरोधी पक्ष सरसावला असून, महाराष्ट्रात ‘निर्भया रिटन्स’च्या धर्तीवर,सत्ताधा-यांची सत्ता उलथवण्याचा प्रयोग साधल्या जात असल्याचा दावा केला जात आहे.
आज संविधान चौकात ’कोमल है कमजाेर नही तू,शक्ती का नाम ही नारी है’या प्रेरणादायी गीतावर लांबा यांच्यासह  महाराष्ट्राच्या कानाकोप-यातून उपस्थित झालेला प्रचंड महिला वर्ग समरस झाला.इतक्या मोठ्या संख्येने उपस्थित झालेल्या महिला वर्गामुळे महाराष्ट्रातील पिडीत महिलांना खूप मोठी हिंमत मिळाली असल्याचे लांबा म्हणाल्या.हा लढा देशाची अर्धी लोकसंख्या असणा-या आपल्या मुलींसाठीचा लढा असल्याचे त्यांनी सांगितले. आम्ही आज फक्त हेच मागतोय आमच्या मुलींना सुरक्षा द्या.महाराष्ट्राच्या बदलापूरमध्ये जे घडले त्यात फक्त पावणे चार वर्षांच्या चिमुकल्यांचा काय दोष होता?याचे उत्तर आज संपूर्ण  महाराष्ट्र मागत आहे.हे कृत्य भाजपच्या नेत्याच्या शाळेत घडले.आपल्या चिमुरड्यांसोबतचा हा अन्याय तुम्ही सहन करणार आहात का?असा प्रश्‍न लांबा यांनी विचारला असता,महिला समर्थकांनी ’नाही’असे उत्तर दिले.

संविधान की रक्षा कौन करेगा?बेटीयो की रक्षा कौन करेगा?’असा प्रश्‍नाचा गजर केला असता,’हम करेंगे’चा प्रतिसाद मिळाल्यानंतर,आता आम्ही हा प्रण घेतला आहे की आम्ही संविधान व मुलींचे रक्षण करणार, आता आम्हाला कुण्या सरकार किवा त्यांच्या प्रशासनाची गरज नसल्याचे लांबा म्हणाल्या.भाजपाच्या सरकारने आमच्या मुलींच्या बलात्का-यांना वाचवण्याचे महापाप केले असल्याचा आरोप त्यांनी केला.पंतप्रधान नरेंद्र मोदी नुकतेच जळगाव येथे आले व पुन्हा एकदा पोकळ घोषणा आणि पोकळ भाषण करुन गेले.’बेटी पढाओ,बेटी बचाओ’पण मुलींचे आई-वडील मुलींना शिक्षणासाठी शाळेत पाठवतात,पुढे जाऊन त्या डॉक्टर,अभियंते बनतील म्हणून,पण तुमच्याकडून आमच्या मुलींचे रक्षण  करण्यास तुम्ही सक्षम नसल्याचा आरोप त्यांनी केला.

देशाच्या महिला राष्ट्रपती द्रोपदी मुर्मु म्हणतात की त्या चिंते मध्ये आहेत,त्यांना भीती वाटतेय,ज्या देशाची राष्ट्रपती ही स्वत: चिंतातुर आणि भयग्रस्त असतील तर देशाच्या महिलांचे काय होईल?असा सवाल त्यांनी केला.त्यांनी घाबरु नये,स्वत:च्या आणि आमच्या काळजीला संपवा,गप्प बसू नका,आवाज उठवा,न्याय मिळवून द्या आपल्या या अर्ध्या लोकसंख्येला.एक महिना आधी २९ जुलै रोजी भारताच्या राजधानीत जंतरमंतर समोर असेच आंदोलन झाले त्यावेळी आम्ही प्रण घेतला की देशातील मुलींना त्यांचा हक्क आणि न्याय मिळेपर्यंत क्रांतीची ही मशाल विझू देणार नाही.२९ ऑगस्ट रोजी आज आम्ही नागपूरात आलो आहोत,संपूर्ण देशात ही क्रांती पेटलेली असून आमच्या भगिनी बाहेर निघाल्या असल्याचे लांबा म्हणाल्या.आता खूप झाले,कोणी आमच्या रक्षणासाठी येईल आता आम्हाला याची वाट पाहायची नाही.ते तुम्हाला संरक्षण देण्या ऐवजी गुन्हेगारांचे रक्षण करण्यासाठी तत्पर असतात,असा आरोप त्यांनी केला.

कोण होते बृजभूषण शरण सिंह?भाजपचे खासदार होते.विनेश फोगाट,साक्षी मलिक,बजरंग पुनियासाख्या कुश्‍तीपटूंनी आपल्या देशाला पॅरिस ऑलंपिकमध्ये सुवर्णपदक जिंकून दिले,देशाला गौरान्वित केले मात्र,भाजपच्या या खासदाराविरोधात लैंगिक शोषणासारखे गंभीर आरोप लागले असताना देखील भाजपने गुन्हेगाराला पाठीशी घालण्याचे महापाप केले.कुश्‍तीपटूंना अतिशय कष्टाने मिळवलेले स्वत:चे सुवर्ण पदक गंगेत वाहण्याची किवा रस्त्यावर ठेवण्याची वेळ आली मात्र,भाजपचे शीर्षस्थ नेते बधले नाहीत.देशाचे गृहमंत्री अमित शहा यांचा इतका दबाव होता की बृजभूषण शरण सिंहच्या विरोधात दिल्ली पोलिसांनी देश की बेटीये की एफआयआर दाखलच केली नाही. शेवटी सर्वोच्च न्यायालयाने खडे बोल सुनावल्यानंतर दिल्ली पोलिसांना भाजपचे खासदार बृजभूषण शरण सिंहच्या विरोधात एफआयआर दाखल करावी लागली.एक वर्ष झाले एफआयआर दाखल होऊन मात्र,एकदा ही दिल्ली पोलिसांनी भाजपच्या त्या आरोपी खासदाराला पोलिस ठाण्यात बोलावून विचारपूस करण्याची हिंमत दाखवली नाही.
राष्ट्रपतींनी तेव्हा काय केले?आपल्या दोन्ही कुश्‍तीपटू महिलांना राष्ट्रपती भवनात का नाही बोलावले.त्यांना गळ्याशी का नाही लावले?बेटीयो को राष्ट्रपतीने कोणताही भरवसा दिला नाही की न्याय होईल,निश्‍चित होईल.त्या गप्प बसल्या.त्यामुळे हा लढा फक्त बदलापूर किवा दिल्लीचा नाही,हा लढा कोणाचा आहे?कोणाच्या विरोधात आहे?असा सवाल करीत,हा लढा आपल्या अर्ध्या लोकसंख्येच्या सन्मानाने जगण्याचा असल्याचे लांबा म्हणाल्या.

संपूर्ण महाराष्ट्राच्या महिल्या ज्या या आंदोलनात येऊ शकल्या नाहीत ते हे आंदोलन लाईव्ह बघत आहेत,जे कालपर्यंत स्वत:ला एकट्या समजत होत्या,त्या महिलांना,मासूम बेटीयो को,विश्‍वास झाला आहे की आपण त्यांच्यासोबत आहोत.त्यांच्या न्यायासाठी कोणताही त्याग,कुर्बानी,बलिदानासोबतच तुरुंगात ही जावे लागेल तरी आम्ही ते स्वीकारु कारण आता आम्ही हा प्रण घेतला आहे,देश की रक्षा कौन करेगा?हम करेंग,असा नारा त्यांनी दिला.मंचावर येण्यापूर्वी आम्ही डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला माल्यार्पण केले.आंबेडकरांच्या संविधानात स्पष्टपणे लिहले आहे की या देशातील प्रत्येक गोष्टीवर देशातील महिलांचा बरोबरीचा हक्क आहे.आज त्याच बाबासाहेबांचा संविधानाच धोक्यात आला आहे.
आमची मागणी आहे,३३ टक्के महिला आरक्षणाचा कायदा संमत झाला आहे त्याला त्वरित लागू करा.स्वर्गीय राजीव गांधी यांनी पंतप्रधान असताना देशातील महिलांना ग्रामपंचायत,महापालिकासारख्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ३३ टक्के आरक्षण दिले आहे. आज देशातील १४ लाख महिला या सरपंच आहेत,जनप्रतिनिधी,नगरसेविका आणि महापौर आहेत.राजीव गांधी यांचा विचार होता की ज्या महिला मत देतात त्यांना प्रतिनिधित्व देखील मिळाले पाहिजे. त्यांचे स्वप्न अद्याप अपूर्ण आहे.विधान सभा व लोकसभेत महिलांना ३३ टक्के आरक्षण त्यांना द्यायचे होते.मोदींनी कायदा तर बनवला मात्र,लागू केला नाही.आमची मागणी आहे देशातील सर्व निवडणूकांमध्येच महिला आरक्षणाचा कायदा लागू करा.

महाराष्ट्रात येत्या दोन-तीन महिन्यात विधानसभेच्या निवडणूका होणार आहेत.हा कायदा जर लागू झाला असता तर २८८ पैकी ३३ टक्के जागेवर महिला उमेदवार हमखास विधानसभेत पोहोचल्या असत्या.त्यांच्या हातात लेखणी असती,त्या लेखणीतून निर्णय घेतले गेले असते आणि त्यातून अर्धी लोकसंख्या ही सुरक्षीत झाली असती.मात्र,त्यांनी अर्ध्या लोकसंख्येला त्यांच्या हक्कापासून आणि न्यायापासून वंचित ठेवण्याचा डाव आखला.संविधानानेच महिलांच्या आर्थिक सशक्तीकरणाची तत्वे समाविष्ट केली आहेत.महिलांचे आर्थिक सशक्तीकरण झाले पाहिजे.काँग्रेसने त्यामुळेच ‘महालक्ष्मी‘योजना आणली.या योजनेतून एक लाख रुपये वार्षिक महिलांच्या खात्यात सरळ जमा होतील.यामुळे महिला या गरीबी आणि महागांईतून तग धरु शकतील.

त्यामुळे आमची मागणी आहे,महाराष्ट्रात सरकारी नोकरीत ५० टक्के आरक्षण महिलांना मिळाले पाहिजे.राजकीय आरक्षण,आर्थिक आरक्षणासोबतच सामाजिक न्याय महिलांना मिळाला

पाहिजे.महाराष्ट्रात लहानलहान अजाण मुलींना बघून नराधमांना भीती वाटत नाही तर वासना हावी होते,बदलापूरच्या चिमुकल्यांच्या आरोपीला फांशी देण्याची मागणी त्यांनी केली.बंगालच्या आर.जी.कर रुग्णालयातील डॉक्टर बेटीच्या गुन्हेगाराला देखील त्वरित फाशी देण्याची मागणी त्यांनी केली.आज देशातील डबल इंजिनच्या सरकारमध्येच बलात्कारी बसले असतील तर देशाच्या बेटींचे रक्षण कोण करणार?असे सांगून भाजपच्या आरोपींची संपूर्ण यादी त्यांनी वाचून दाखवली.
याप्रसंगी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले,माजी खासदार मुकुल वासनिक यांची देखील समयोचित भाषणे झाली.मंचावर खासदार प्रतिभा धानोरकर,माजी खासदार विलास मुत्तेमवार,आ.विकास ठाकरे,सुनील केदार,गुजरातच्या प्रभारी सोनल पटेल,आ.श्‍याम बर्वे,मा.आमदार सतीश चर्तुवेदी,आ.नितीन राऊत,अनिस अहमद,काँग्रेसचे मुख्य प्रदेश प्रवक्ते अतुल लोंढे,महासरचिटणी विशाल मुत्तेमवार,प्रफूल्ल गुडधे पाटील,जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मुक्ता कोकड्डे,माजी अध्यक्षा रश्‍मी बर्वे, काँग्रेसच्या शहराध्यक्ष ॲड.नंदा पराते ,रुबिना खान,पोरोमिता गोस्वामी आदी उपस्थित होते.
प्रास्ताविक काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष संध्या सव्वालाखे यांनी केले.
………………………..
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या