(भाग-२)
अयोध्येतील राममंदिराकडे पहिल्यांदा वाकडी नजर गेली, ती अकराव्या शताब्दीत १०३४ मध्ये सैयद सालार मसूद गाजी याची. तो अयोध्येकडे निघाला. त्याअगोदर तो पोहचला उत्तरप्रदेशखच्या बहराईच येथे. येथे भगवान सूर्यनारायणाचे एक मोठे मंदिर होते, असे म्हणतात. मसूदने त्याच्या मृत्यूनंतर हे मंदिर पाडून तेथे त्याची मजार बनवण्याचे निर्देश सेनेला दिले होते. मसूदला रोखण्यासाठी श्रावस्तीचा राजा सुहेलदेव आसपासच्या राजांना सोबतीला घेऊन निघाला. मसूदच्या व राजा सुहेलदेवच्या सेनेत बहराईचमध्ये युद्ध झाले आणि मसूद सुहेलदेवच्या हाताने मारला गेला. अयोध्या त्यावेळी वाचली. मात्र नंतर हा परिसर मुस्लिम आक्रमकांच्या ताब्यात गेल्यानंतर बहराईचचे सूर्यमंदिर पाडले गेले व तेथे मसूदची मजार उभी झाली. हा पराभव इतका जबरदस्त होता की, त्यानंतर कुण्याही मुस्लीम राजाने अयोध्येवर हल्ला करण्याचा प्रयत्नही केला नाही.
मसूदच्या नंतर मखदूम शाह जुर्रम गोरी हा मुहम्मद गजनीचा सेनापती सैनिकाच्या एका तुकडीसह अयोध्येत आला होता. त्याने अयोध्येतील भगवान आदिनाथाच्या मंदिराची तोडफोडही केली. या जुर्रमचे काही वंशज अजूनही अयोध्येत राहतात, असे सांगितले जाते. अदिनाथाच्या मंदिराचे पुनर्निर्माण नंतर पुन्हा करण्यात आले. नंतरच्या काळात येथे इस्लामी राजवट राहिली. इ.स. १५१७ मध्ये लोधी घराण्याच्या सिकंदर लोधी याचा मृत्यू झाला. इथवर रामजन्मभूमीवर रामलल्लाचे मंदिर होते.
इ.स. १५२६ मध्ये ज़हीरुद्दीन मुहम्मद उर्फ बाबर भारतात आला. त्याने एप्रिल १५२६ मध्ये दिल्लीचा सुल्तान इब्राहीम लोदी याला पराभूत केले व मुघल साम्राज्याची स्थापना केली. बाबर मूळचा मंगोलवंशीय बार्लोस जमातीचा. जन्म उझबेकीस्तानातला. वडिलांकडून तो तैमूरलंगचा (तूर्क-मंगोल) वारस, तर आईकडून चंगीझखानचा (मंगोलिया). तैमूरलंग व चंगीझखान दोघेही क्रूर शासक होते. तैमूरलंगने भारतावर स्वारी केली. १३९८ मध्ये त्याने दिल्लीवरील स्वारीत कापलेल्या मुंडक्यांचा मनोरा रस्त्यावर रचला होता.
याच बाबरने तलवारीच्या बळावर इस्लामचा प्रसार करण्यास सुरुवात केली. त्यासाठी तो हिंदू मंदिराची तोडफोड करू लागला. त्याचा सेनापती मीर बाकी याने तोफखान्याने सज्ज अशा पावणे दोन लाख सेनेसह १५२७ च्या अखेरीस अयोध्येवर स्वारी केली. भिटीचा राजा महताबसिंगने त्याचा प्रतिकार केला. तीन महिने तुंबळ युद्ध सुरू होते. अखेर महताबसिंगाचे सर्व सैनिक मारले गेले. २१ मार्च १५२८ रोजी मीरबाकीने तोफेने राममंदिर ध्वस्त केले व तेथे मशीद उभारली. त्यालाच पुढे बाबरी मशीद म्हटले गेले. आर्किऑलॉजी सर्व्हे ऑफ इंडियाचे प्रथम अध्यक्ष जनरल कनिंगघम यांनी एका अहवालात तर स्पष्ट नमूद केले की, मीर बाकीने सुमारे पावणेदोन लाख रामभक्तांना मारून हे मंदिर उद्ध्वस्त केले.
तेव्हापासून मुगल काळात रामजन्मभूमीच्या मुक्तीसाठी ७६ लढाया झाल्यात व त्यात दहा लाखांहून अधिक हिंदू शहीद झालेत. मीरबाकीने मंदिर पाडून तेथे वादग्रस्त ढाचा उभारल्यानंतर लगेच काही महिन्यातच अयोध्या परिसरातीलच सनेथी गावातील एक रामभक्त पंडित देवीदिन पांडेय याने ७० हजारांची फौज उभी केली. त्याने जन्मभूमी मुक्त करण्याचा प्रयत्न केला. पाच दिवस तुंबळ युद्ध झाले. बाबरने स्वतः लिहू ठेवले की एकट्या देवीदिनने ७०० सैनिकांना ठार केले. अखेर देवीदिनला गोळी लागली.
देवीदीन पांडेय शहीद झाल्यानंतर १५ दिवसांनी हंसवरचे राजा रणविजयसिंग यांनी सेनेसह जन्मभूमी मुक्त करण्याचा प्रयत्न केला. राजा रणविजयसिंगही या लढाईत शहीद झाले. त्यानंतर त्यांची विधवा राणी जयराज कुंवारी हिने तीन हजाराहून अधिक स्त्रियांची सेना उभारून जन्मभूमीमूक्तीचा प्रयत्न केला. यावेळी दिल्लीत बाबरचा मुलगा हुमायून सत्तेत आला. त्याच्या सेनेसोबत लढाई सुरू होती. राणी जयराज कुंवारीच्या सेनेच्या सोबतील स्वामी महेश्वरानंदांची साधू-सन्याशांची सेनाही आली. पण त्यात यश आले नाही. राणी जयराज कुंवारी व स्वामी महेश्वरानंद दोघेही शहीद झाले.
हुमायूननंतर अकबर दिल्लीच्या गादीवर आला. त्याने हुशारी केली व बाबरी ढाच्याच्या परिसरात एक चबुतरा उभारून एक छोटेसे मंदिर उभारले. तेथे हिंदूंना पूजा करण्याची परवानगी दिली. मात्र हिंदू त्यावर संतुष्ट नव्हते. त्यामुळे अकबराच्या व नंतर जहांगीर व शाहजहानच्या काळात जन्मभूमी मुक्त करण्यासाठी छोटेमोठे प्रयत्न झालेत. अकबराच्याच काळात संत बलरामाचार्यांच्या साधूसंतांच्या सेनेनेही एक प्रयत्न केला. त्यात संत बलरामाचार्य शहीद झाले.
शहाजहानच्या नंतर औरंगजेब दिल्लीच्या गादीवर बसला. अतिशय कट्टर मुसलमान असलेल्या औरंगजेबाने हिंदूंची मंदिरे पाडण्याची मोहीमच सुरू केली. अयोध्येतीलही अनेक मंदिरे त्याने त्याच्या काळात पाडलीत. या काळात बाबा वैष्णवदास, कुंवर गोपालसिंह, ठाकूर जगदेवसिंग यांच्या नेतृत्वात तब्बल तीस वेळा लढाया झाल्यात. या युद्धात १० हजार हिंदू शहीद झालेत.
औरंगजेबानंतर अयोध्येचा ताबा नवाब नसरुद्दीन हैदरला मिळाला. यावेळी महिवरच्या राजांनी जन्मभूमी मुक्त करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर सत्तेत आलेल्या नबाब सहादत अलीच्या काळात अमेठीचे गुरुदत्तसिंह यांनी अयोध्येवर स्वारी केली. त्यांच्या सोबतीला चिमटाधारी नागा व नाथपंथी साधूंची सेनाही आली. यावेळच्या तुंबळ लढाईत नवाबाच्या सेनेचा पराभव झाला व जन्मभूमी मुक्त झाली. तेथे परत चबुतरा उभारला गेला व छोटे मंदिरही उभे झाले. पण चिडलेल्या नवाबाने परत चढाई केली व अयोध्या ताब्यात घेतली. नंतरच्या नवाब वाजीद आलीच्या काळातही दोन लढाया झाल्यात. निर्मोही आखाड्यानेही जन्मभूमीमुक्तीचा प्रयत्न केला.
यानंतर भारतावर इंग्रजांचे राज्य सुरू झाले. देशात स्वतंत्रतेचे वारे वाहत होते. या स्वतंत्रतेच्या संघर्षात अयोध्येतील हनुमानगढीचे महंत रामचरणदास व त्यांचे एक मित्र मौलाना आमीर अली हे सहभागी होते. मौलाना आमीर अली यांनी यावेळी रामजन्मभूमी हिंदूंना देण्याचे वचन दिले. ते कट्टरपंथीय मुस्लिमांना आवडले नाही. इंग्रजांनी महंत रामचरणदास व मौलाना आमीर अली यांना अटक केली व दोघांनाही फासावर लटकवले. स्वातंत्र्याच्या लढाईमुळे मुक्तीसंघर्षात काही काळ शिथिलता आली. इ.स. १८५७ मध्ये इंग्रजांनी मशिदीच्या समोर भिंत बांधली. आत मुसलमान व बाहेर हिंदूंना पूजा करण्याची परवानगी दिली.
१९ जानेवारी १८८५ रोजी हिंदू महंत रघुबर दास यांनी फैजाबाद न्यायालयात याचिका करून जन्मभूमीवर राममंदिर बांधण्याची परवानगी मागितली. न्यायालयाने परवानगी नाकारली. पण तारखांवर तारखा होत गेल्या. १९३४ मध्ये अयोध्येतच दोन समाजात संघर्ष झाला व बाबरी ढाच्याच्या भिंतीला व गुंबदाला क्षती पोहचली. छोटेमोठे संघर्ष सुरूच राहिले. १९४७ मध्ये इंग्रजांनी वादग्रस्त ढाच्याच्या मुख्य दाराला कुलूप ठेवले. मात्र हिंदूंना दर्शनासाठी वेगळा रस्ता दिला.
१९४९ मध्ये २२ डिसेंबरला रात्री एक घटना घडली. ज्याने या साऱ्या वादाला वेगळे वळण मिळाले. या दिवशी रात्री वादग्रस्त इमारतीत गुंबदाखालीच रामलल्लाची एक छोटी मूर्ती आढळून आली. या घटनेने प्रचंड वादळ उफाळले. मुस्लिमांनी तेथील नमाज पठन बंद केले. वाद वाढला. पुन्हा याचिका न्यायालयात गेल्या. सरकारने (इंग्रज) जन्मभूमी स्थळाला वादग्रस्त घोषित करून कुलूप ठोकले.
त्यानंतर जन्मभूमीचा वाद न्यायालयात पोहोचला. गोपालसिंह विशारद यांनी फैजाबात कोर्टात याचिका दाखल करून मूर्तींच्या पूजेची परवानगी मागितली. निर्मोही आखाडा, सुन्नी वक्फ बोर्ड यांनीही न्यायालयात धाव घेतली. दरम्यान १९८४ मध्ये विश्व हिंदू परिषदेने रामजन्मभूमी मुक्ती समिती स्थापन केली. याच वेळी गोरखपूरचे गोरखनाथ पीठाधिश्वर महेत अवैद्यनाथ यांनी रामजन्मभूमी मुक्ती यज्ञाची स्थापना केली आणि रामजन्मभूमी मुक्तीसंघर्षाला नव्याने सुरवात झाली.
फेब्रु. १९८६ मध्ये फैजाबाद जिल्हा न्यायदंडाधिकाऱ्याने पूजेसाठी विवादित जागेचे कुलूप काढण्याचा आदेश दिला. त्याविरोधात बाबरी मस्जिद ॲक्शन कमेटीची स्थापना झाली. विहिंप नेता देवकीनंदन अग्रवाल यांनी मंदिराच्या दाव्यासाठी कोर्टात याचिका दाखल केली. जून १९८९ मध्ये भारतीय जनता पक्षाने आंदोलनाला पाठिंबा दिला. नोव्हेंबर १९८९ – वादग्रस्त ढाच्यापासून काही अंतरावर मंदिराच्या शिलान्यासाला सरकारने परवानगी दिली. शिलान्यास झाला.
दरम्यान एका मोठ्या लढाईला सुरुवात झाली होती. मुक्ती समितीने ३० ऑक्टोबर १९९० रोजी अयोध्येत कारसेवा करण्याचा निर्णय घेतला. त्याच्या समर्थनार्थ २५ सप्टेंबर रोजी भाजपा नेते लालकृष्ण अडवाणी सोमनाथ ते अयोध्या अशी रामरथयात्रा सोमनाथवरून सुरू केली. या यात्रेला २३ ऑक्टोबर रोजी बिहारमधील समस्तीपूर येथे बिहारचे मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांनी अडवली व अडवाणींना अटक केली. यावेळी केंद्रात भाजपच्या पाठिंब्याने व्ही. पी. सिंग सरकार होते. भाजपने पाठिंबा काढला व सिंग सरकार कोसळले.
३० ऑक्टोबरच्या कारसेवेला उ.प्र.चे मुख्यमंत्री मुलायमसिंग यादव यांनी परवानगी नाकारली. अयोध्या परिसरात ३० हजार पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त लावला. २९ ऑक्टोबर १९९२ रोजी पत्रकारांसोबत बोलताना मुलायम सिंग यांनी ‘वहाँ परिंदा पर भी नही मार सकता’अशी दर्पोक्ती केली होती. कारसेवक अयोध्येपर्यंत पोहचू नयेत म्हणून त्यावेळचे मुख्यमंत्री मुलायमसिंह यादव यांनी सर्व वाहतुकीचे मार्ग बंद केले होते. वीस हजार सशस्त्र जवान अयोध्येच्या रस्त्यांवर तैनात होते. तरीही लाखो रामभक्त अयोध्यत पोहोचले.
३० ऑक्टोबर, हा कारसेवेचा दिवस उजाडला. सकाळी ९ वाजून ४४ मिनिटे हा कारसेवेचा मुहूर्त होता. सकाळी ९ पर्यंत साऱ्या अयोध्येत शुकशुकाट होता. ९ वाजून १० मिनिटे झाले आणि मणिराम छावणीचा दरवाजा किलकिला झाला. त्यातून या साऱ्या लढ्याचे प्रमुख नेते व विश्व हिंदू परिषदेचे अध्यक्ष अशोकजी सिंघल तेथून बाहेर आले. सोबतीला फक्त चारपाचच कारसेवक… पण अशोकजी रस्त्यावर येताच पाच मिनिटांत अगदी फुटलेल्या वारुळातून मुंग्या बाहेर पडाव्यात तशा अयोध्येतील गल्लीबोळांमधून कारसेवक रस्त्यांवर प्रकटू लागले.. अयोध्येच्या गल्लीबोळा कारसेवकांनीच भरून गेल्या
एवढ्यात हनुमान गढीजवळ उभ्या असलेल्या राखीव पोलिसांच्या एका बसचा ताबा धरमदास पहेलवान नावाच्या साधूने घेतला. अनेक कारसेवकांना घेऊन ती बस पोलिसांनी रचलेले अडथळे तोडीत निघाली. अडथळे तुटल्यामुळे अक्षरशः हजारो कारसेवक तिच्यामागे पळू लागले. जन्मभूमीचा परिसर कारसेवकांनी अक्षरशः भरून गेला. कित्येक कारसेवक वानरासारखे घुमटांवर चढले. जय श्रीरामच्या घोषणांनी आसमंत दणाणून गेला. रामलल्ला हम आये है, मंदिर यही बनाऐंगे- च्या ललकाऱ्या उमटत होत्या. दोन दिवस अयोध्या शांत दिसत होती… पण ती आतून धुमसत होती.
अयोध्येत येणारे सर्व रस्ते दोन दिवसांपासून बंद केलेले असतानाही ३० ऑक्टोबरच्या सकाळी कारसेवकांच्या झुंडीच्या झुंडी वादग्रस्त वास्तूवर चालून गेल्या.काहींनी सीमाभिंतींची मोडतोड करण्यातही यश मिळवले.त्या वेळी सुरक्षा दलांनी संयमाने परिस्थिती हाताळून,बळाचा फारसा वापर न करता त्यांना रोखण्यात यश मिळवले,पण यामुळे मुलायमसिंग यांची चांगलीच नाचक्की झाली.
२ नोव्हेंबर रोजी पुन्हा कारसेवेचा निर्णय झाला. या दिवशी कारसेवकांची एक छोटी तुकडी अयोध्येच्या गल्ल्यांमधून घोषणा देत फिरु लागली.त्या वेळी काहीही कारण नसताना पोलिसांनी त्यांच्यावर बेछूट गोळीबार केला,त्यात कोलकत्ताचे कोठारी बंधूंसोबतच २५-३० तरुण मृत्यूमुखी पडले. ९ वाजता ५० हजार कारसेवक भजन गात जन्मस्थानाकडे निघाले. दिगंबर आखाड्याजवळ पोलिसांनी त्यांना अडवले. त्यात कोलकात्यातील शरदकुमार कोठारी, रामकुमार कोठारी या सख्ख्या भावंडांचाही समावेश होता.तेव्हा कोठारी बंधू हे तरुण होते.सुरक्षारक्षकांच्या गोळीबारात ते शहीद झाले.पौर्णिमा काेठारी या आपल्या भावांच्या स्मरणार्थ महर्षी वाल्मीकी चौक(टेेडी बाजार चौक)जवळ राम भक्तांसाठी अल्पोहार आणि चहाचे शिबिर चालवित आहे.सुमारे दोन महिने त्या हे शिबिर चालवणार आहेत.भावांनी पाहीलेले व दोन तरुण मुले गमावलेल्या आई-वडीलांचे स्वप्न पूर्ण होत असल्याने पोर्णिमा आनंद व्यक्त करताना दिसून पडते.
३० ऑक्टोबर रोजीचा नाचक्कीचा राग मुलायमसिंग यांनी अशारितीने काढला होता.त्यातून संघर्ष आणखी चिघळला.पण या धामधुमीत काही कारसेवक गनिमी काव्याने बाबरीच्या परिसरात घुसले व त्यांनी घुमटावर चढून भगवा फडकावला.
शहीद कारसेवकांच्या रक्ताने अयोध्येच्या गल्लीबोळा व शरयूचे पात्र लाल झाले. या अत्याचारामुळे संतप्त झालेल्या रामभक्तांच्या क्रोधाचा फटका मुलायमसिंग सरकारला बसला. या घटनेनंतर आठ महिन्यांनी झालेल्या विधानसभा निवडणुकीत मुलायमसिंगांचा पक्ष पराभूत झाला व भाजपच्या नेतृत्वातील कल्याणसिंगांचे सरकार अस्तित्वात आले.
१९९२ च्या धर्मसंसदेत पुन्हा दुसऱ्या कारसेवेची घोषणा करण्यात आली. ६ डिसेंबर १९९२ ही तारीख ठरली. संयोजकांचे आदेश होते की, कारसेवा म्हणजे बाबरी ढाच्यासमोरील चबुतऱ्यावर शरयूच्या काठची एकएक मूठ रेती आणून टाकायची. बस्स… एवढेच. ६ डिसेंबरला देशभरातून लाखो कारसेवक अयोध्येत पोहोचले. जन्मभूमी परिसरात नेत्यांची भाषणे सुरू झाली. मात्र कारसेवकांच्या जमावातील काहींना ही मूठभर रेती टाकण्याची कारसेवा पटत नव्हती. त्यापैकी काही कारसेवक वादग्रस्त वास्तूसमोर घोषणा देत होते. सकाळचे ११.४५ झाले होते. नेत्यांची भाषणे सुरूच होती. इतक्यात कुण्या एका साधूने जोरात शंखनाद केला. तितक्यात शंभरेक कारसेवक वादग्रस्त वास्तूच्या मागील बाजूने आत घुसले व पाहता पाहता समोरून, आजूबाजूनेही शेकडो कारसेवक बाबरी ढाच्याच्या परिसरात शिरले.
एका मागोमाग एक असे अनेक कारसेवक ढाच्याच्या तीनही घुमटावर चढले. काही कारसेवकांनी कुदळी, फावडी, पहारी अशी तोडकामाची हत्यारे आधीच दडवून ठेवली होती, ती बाहेर काढली. सर्वात प्रथम चढणाऱ्याने आपल्या शर्टात लपवून ठेवलेला भगवा ध्वज घुमटावर फडकवला. आणि बेभान होऊन बाबरी ढाचा पाडायला सुरुवात झाली. जमाव नियंत्रणाबाहेर गेला होता. हिंदू संघटनेच्या नेत्यांनाही तो आवरेनासा झाला.
या अनपेक्षीत प्रकाराने गोंधळून गेलेल्या अडवाणींनी लाऊडस्पीकरवरुन त्या तरुणांना खाली उतरण्याचं आवाहन केलं.त्याकडे कोणी लक्ष देत नाही हे पाहिल्यावर त्यांनी प्रमोद महाजन आणि उमा भारती यांना पाठवून त्यांना रोखण्यास सांगितले,पण कारसेवकांनी त्यांना अक्षरश: पिटाळून लावलं.विश्व हिंदू परिषदेचे अध्यक्ष अशोक सिंघल यांनी दोन्ही हात पसरुन काहींना थांबविण्याचा प्रयत्न केला.त्यांना ढकलून देऊन तरुण पुढे जात राहिले.त्या दिवशी जमलेले कारसेवक म्हणजे फक्त संघाचे कारसेवक नव्हते.रामजन्मभूमीवरची मशीद पाडणं या एकाच उद्देशाने बेभान झालेले ते स्वयंस्फूर्त युवक होते.त्या वेळी एका बिहारी तरुणाने ओरडून सांगितले ’हम बिहारी है,इस बार खाली हाथ नही जायेंगे,यह ढाँचा गिराकर ही जाऍंगे’त्या सर्वांच्या अंगात एवढा त्वेष चढला होता, की मशिदीभोवतालचे लोखंडी खांब उपटून त्याचे प्रहार भिंतीवर होऊ लागले. ती ‘कारसेवा’ करणा-यांच्या असंख्य पटीने अधिक तेथे उपस्थित प्रेक्षक त्यांना घोषणांचे बळ देत होते.काही तासांत पहिला घुमट पडला,तसा जमावानं नाचत-ओरडत जल्लोष केला.जी वास्तू पाडायला कित्येक दिवसांचा वेळ लागला असता,ती अवघ्या पाच तासात सामुहिक ताकदीने भुईसपाट करण्यात आली.
यानंतर दुपारी २.४५ झाले आणि अचानक मोठा आवाज झाला. ढाच्याचा उजवीकडील घुमट कोसळला आणि धुराळयाचा प्रचंड लोट आकाशाला भिडला. एका तासातच ३.४५ वाजता डावीकडचा घुमटही कोसळला. आता उरला होता. ढाच्याचा मधला व मुख्य घुमट. पुन्हा एका तासाने शेवटचा धक्का बसला. धरणीकंपासारखा आवाज होत कित्येक फुट उंच हवेत धुरळा उडाला… सीयावर रामचंद्र की जय, जय श्रीराम, रामलला हम आये है, मंदिर वही बनायेंगे, च्या घोषणांमध्ये ४६४ वर्षांच्या त्या ढाच्याचा मधला मुख्य घुमटही जमीनदोस्त झाला होता. ढाचा उद्ध्वस्त झाला. पण कारसेवक थांबले नाहीत. लगेच ढिगारा हटवून सपाटीकरण करण्यात आले. छोटा चबुतराही तेथे तयार झाला व रात्रीच तेथे मूर्तीची पुन्हा प्रतिष्ठापना करण्यात आली.
बाबरी मशीद पाडल्याची बातमी रात्री देशभर पसरली आणि ठिकठिकाणी दंगली उसळल्या.अनेक मोठ्या शहरात शेकडो निष्पापांचे बळी गेले ज्यांचा या कारसेवेशी कोणताही संबंध नव्हता..!मालमत्तेचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं.त्यातूनच पुढे देशाची आर्थिक राजधानी मुंबईतही साखळी बॉम्बस्फोट घडवून आणण्यात आले.या घटनेनंतर संपूर्ण देशभरात प्रचंड सामाजिक व राजकीय स्थित्यंतरे झालीत.केंद्रातील काँग्रेसच्या सरकारने उत्तरप्रदेशातील कल्याणसिंगचे सरकार बर्खास्त केले व राष्ट्रपती राजवट लावली….!सीआरपीएफचे सशस्त्र जवान तैनात झाले.त्या वादग्रस्त जागेवर एके काळी बाबरी मशीद नावाची वास्तू होती,याची बारीकशी खूण ही ठेवण्यात आली नव्हती.
संपूर्ण जागा सपाट करुन,मलबा वापरुन तयार केलेल्या छोट्याशा डोंगरावर ‘रामलल्ला’ची मूर्ती विराजमान झाली होती. जानेवारी २००२ मध्ये विहिंपने मंदिराचे बांधकाम १५ मार्चपासून सुरू करण्याची घोषणा केली. मात्र, सुप्रिम कोर्टाचे तेथे यथास्थिती ठेवण्याचे आदेश देले. त्याचवेळी जन्मस्थानाच्या जमिनीवरील मालिकाना हक्कावर लखनौ हायकोर्टात सुनावणी सुरू झाली. हायकोर्टाने पुरातत्व विभागाला तेथे खोदकाम करण्यास व पुरातन मंदिराचे काही अवशेष तेथे सापडतात का, हे पाहण्यास मंजुरी दिली. या खोदकामात पुरातन मंदिराचे अनेक अवशेष सापडलेत. ३० सप्टेंबर २०१० रोजी हायकोर्टाने या प्रकरणाचा निकाल देऊन रामजन्मभूमीची विवादित जमीन तीन भागात विभाजित करण्याचे आदेश दिले. या आदेशाला सर्वच पक्षकारांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले.
सुप्रिम कोर्टानी हायकोर्टाच्या या निर्णयाला स्थगिती दिली व प्रकरण पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठासमोर निर्णयार्थ पाठवले. सरन्यायधीश रंजन गोगई, न्या. शरद अरविंद बोबडे, न्या. डी. वाय. चंद्रचूड, न्या. अशोक भूषण, न्या. अब्दुल नझीर या पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठासने ९ नोव्हेंबर २०१९ रोजी या प्रकरणाचा निकाल घोषित केला व संपूर्ण जमीन हिंदूंच्या स्वाधीन केली.
प्रभू रामचंद्रांचे जन्मस्थळ मुक्त करण्याचा तब्बल पाचशे वर्षे चाललेला हा संघर्ष अखेर सर्वोच्च न्यायालयाच्या ऐतिहासिक निर्णयाने संपला व तेथे रामलल्लाचे मंदिर उभारण्याचा मार्ग प्रशस्त झाला.
संघाचे स्वयंसेवक असणारे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काल शास्त्रोक्त विधीने रामलल्लाची प्रतिष्ठापणा केली अन् संपूर्ण देशात रामनवमी आणि दिवाळी एकत्र साजरी झाली.
आमचे रामलल्ला आता तंबूत राहणार नाही,तर दैवी मंदिरात ते राहतील’असे भावोद्गार मोदींनी काढले.हे राम मंदिर उभारले तर देशात आग लागेल….असे सांगणा-यांना मोदींनी उत्तर देत,राम आग नाही उर्जा आहे,असे सांगत राम हा भारताचा विश्वास असल्याचे सांगितले.रामजन्मभूमीच्या भूमीपूजनाच्या वेळी संयत भाषण देणारे मोदी यांनी कालच्या प्रतिष्ठापणेच्या सोहळ्यात देखील राजकारणविरहीत मात्र तितकेच जाज्वल्य भाषण देत जगभरातील हिंदूंची मने सहज जिंकली.
भारताच्या राज्यघटनेच्या अगदी पहिल्याच प्रतीमध्ये प्रभू रामाचा वास होता मात्र तीच राज्यघटना देशाला लागू झाल्यानंतर प्रभू रामाच्या अस्त्विावरुन अनेक दशके कायदेशीर लढाई लढली गेली,असे सांगत न्यायव्यवस्थेचे त्यांनी आभार मानले ज्यांनी न्याय दिला आणि प्रभू श्रीरामांचे मंदिर कायदेशीररित्या उभारता आले,असे मोदी म्हणाले.
याच वेळी पुन्हा एकदा काँग्रेसचे राहूल गांधी यांना आपल्या न्याय यात्रेदरम्यान असामच्या श्री श्री शंकरदेव सत्र देवस्थानात दर्शन घ्यायचे होते ज्याची परवानगी भाजपच्या असाम सरकारने नाकारुन दूपारी ३ नंतर दर्शन घेण्याची विनंती राहूल गांधींना केली.मंदिरात कोणी व कधी जायचे हे सुद्धा मोदी ठरवणार का?आम्ही केवळ मंदिरात प्रार्थना करणार होतो,असे राहूल गांधी म्हणाले व रस्त्यावरच ठिय्या मांडला.ज्या काँग्रेस पक्षाच्या सत्ताकाळात श्रीरामाची जन्मभूमी अनेक दशके वादग्रस्त राहीली,ऊन,थंडी,पाऊसातही रामलल्लांना तंबूत राहावे लागले,मंदिर निर्माणासाठी काँग्रेसने कोणतेही राजकीय-अराजकीय प्रयत्नच केले नाही वरुन,राजकीय हेतूने त्यांच्या प्रतिष्ठापनेचा आनंद झुगारुन राहूल गांधींना त्याच वेळी श्री श्री शंकरदेव सत्र देवस्थानात दर्शन घेण्याची तीव्र ईच्छा कशाचे द्योतक होते,यावर समाजमाध्यमांवर भरपूर प्रतिक्रिया उमटल्या.
त्यामुळेच मोदींच्या हस्ते अयोध्येत रामलल्लांची प्रतिष्ठापणा,त्यांची साधना,कठोर व्रत आणि जाज्वल्य भाषण यामुळे त्यांनी २०२४ ची लोकसभेची निवडणूक जिंकली असल्याचा भाव समाजमाध्यमांवर उमटल्या आणि यात कोणतेही आश्चर्य दिसून पडत नाही.देशाच्या आराध्य दैवताच्या या प्रतिष्ठापने मागे एक काळाकुट्ट,विद्वेषी,हिंदूंना नामोहराम करणारा आणि तितकाच रक्तरंजित इतिहास दडला आहे.त्यामुळेच वर्तमानातले हे प्रतिष्ठान काँग्रेसच्या भूतकाळातील केलेल्या चुकांच्या मानगुटीवर जाऊन बसणार,हे निश्चित.निवडणूकांचा निकाल जणू आजच लागला आहे,या सूचक विधानाने रंगलेल्या आभासी भिंती लवकरच सत्यामध्ये परिवर्तित होतील का?याकडे देशवासियांचे ही लक्ष लागले आहे.
जाता जाता-
रामराज्य अवतरले,पंतप्रधानांच्या शब्दात नव्या कालचक्राचा आरंभ झाला,हे केवळ अध्यात्मिक मंदिर नसून राष्ट्रीय चेतनेचे मंदिर आहे.देवापासून देशापर्यंत व रामापासून राष्ट्रापर्यंत विस्तार करणारे मंदिर साकारले.या पवित्र क्षणी राष्ट्रनिर्माणासाठी आम्ही जीवनाचा क्षणक्षण,कणकण समर्पित करु,हा संकल्प यानिमित्ताने सोडायला हवा,अशी भावना पंतप्रधानांनी व्यक्त केली त्याच्या अादल्या रात्री, गुजरातमधील २००२ च्या दंगलीदरम्यान,बिल्किस बानोवरील सामूहिक बलात्कार आणि कुटूंबातील सात जणांच्या हत्येप्रकरणातील ११ आरोपींनी रविवारी मध्यरात्री गोध्रा उपजिल्हा तुरुंगात शरणागती पत्करली,ख-या अर्थाने याला रामराज्याची सुरवात म्हणता येईल.
गेल्याच वर्षी देशाच्या स्वातंत्र्य दिनी १५ ऑगस्ट रोजी गुजरात सरकारने या सर्व आरोपींची तुरुंगातून सुटका केली होती,इतकंच नव्हे तर सुटका झाल्यावर आरोपींच्या कुटूंबियांनी आणि समर्थकांनी त्यांची आरती देखील ओवाळली होती,बलात्कारी आणि खूनी मग ते कोणत्याही धर्माचे किवा जातीचे असो,रामराज्यात अश्या कृत्याला स्थान नाही.जेव्हा हे कृत्य घडले त्यावेळी बिल्किस बानो ही पाच महिन्यांची गर्भवती होती…गर्भात वाढणारे ते अजाण बाळ हिंदू किंवा मुस्लिम नव्हते…!ती निसर्गाची कोवळी स्पंदने होती जी जगात येऊ पाहत होती.ज्या ११ नराधमांनी असहाय बिल्किस बानोवर अत्याचार केला,त्यांच्या जन्मठेपेची शिक्षा माफ करण्याच्या गुजरात सरकारच्या निर्णयावर मात्र सर्वोच्च न्यायालयाने कठोर ताशेेरे ओढले व निर्धारित मुदतीत या नराधमांना शरण येण्याचे आदेश दिले.
जसवंत नाई,गोविंद नाई,शैलेश भट्ट,राधेश्याम शाह,बिपिनचंद्र जोशी,केसरभाई वोहनिया,प्रदीप मोरधिया,बकाभाई वाहनिया,राजूभाई सोनी,मितेश भट्ट आणि रमेश चंदन अशी या आराेपींची नावे आहेत.पाच महिन्याच्या गर्भवती महिलेवर बलात्कार करुन तिच्या समोरच तिच्या कुटूंबातील सात जणांची नृशंस हत्या करणारे,यात तिची दोन मुले देखील होती, जन्मठेपेच्या शिक्ष्ेतून सूट मिळवते झाले असते तर असे रामराज्य देशातील कोणत्याही संवेदनशील मन असणा-या भारतीयाला अपेक्षीत नाही,यात दूमत नाही.
(समाप्त)
हे ही वाचा….