(भाग-१)
२०१३ सालच्या न्यूयार्क टाईम्सच्या कार्टूनला इस्त्रोच्या वैज्ञानिकांचे प्रतिउत्तर
देता ना ’दशमलव’ भारत तो चांद पर जाना मुश्कील था..
राष्ट्राभिमानाचा जल्लोष भारतभर साजरा:भारतीय सैन्यानेही साजरा केला जल्लोष
एक कोटी भारतीयांनी बघितले चांद्रयान -३ च्या मोहिमेचे शेवटच्या सतरा मिनिटांचे प्रक्षेपण:नवा जागतिक रेकॉड घडला
बीबीसी वर्ल्डचा इस्त्रोच्या यशाने जळफळाट: भारताच्या गरीबीवर कुस्तितासारखा प्रश्न!
देशाभिमानाच्या सोहळ्याला देखील राजकारणाची किनार
डॉ.ममता खांडेकर
(Senior Journalist)
नागपूर,ता. २३ ऑगस्ट २०२३: पृथ्वीवरुन दिसणारा चंद्र हा कितीही सुंदर आणि मोहक असला तरी शेवटी तो एक ग्रह आहे.त्या ग्रहावर अगणिक रहस्य दडली आहेत जी प्रगत मानवाच्या ज्ञानाच्या कक्षेत येत नव्हती.जगभरातील अनेक देशांनी चंद्रावरील या रहस्यांचा शोध घेण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा गाठली,तीन देशांना चंद्राच्या पृष्ठभागावर पाय रोवण्यास यश देखील प्राप्त झाले मात्र जगाच्या पाठीवर भारत हा आज एकमेव असा देश ठरला ज्याने सर्वात पहीले चंद्राच्या सर्वात खडतर व अगम्य अश्या दक्षिण ध्रुवावर चांद्रयान-३ चा लँडर उतरवला.नुकतेच रशियासारख्या बलाढ्य देशाचा ‘लूना २५’ या चांद्र मोहिमेला आलेले अपयश बघता, भारतासारख्या देशाचे हे एवेढे मोठे यश म्हणूनच भारतीयांच्या अभिमानाला द्विगुणित करणारे ठरले.
भारतीय अवकाश संशोधन संस्थेच्या(इस्त्रो )वैज्ञानिकांच्या या यशाने संपूर्ण भारतीयांच्या राष्ट्राभिमानाच्या भावनेला अगदी चंद्रापर्यंतची जणू उंची गाठून दिली.संपूर्ण देशात चांद्रयान-३ च्या यशानंतर जल्लोष साजरा झाला.शाळा,मैदाने,शासकीय व खासगी कार्यालये,रहदारीचे चौक,धार्मिक स्थळे,अगदी सीएसटीच्या रेल्वे स्टेशनवर देखील हा जल्लोष गगनाला भिडणारा होता.देशाचे पंतप्रधान नरेंद्र माेदी,राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू,उपराष्ट्रपती पासून तर सर्वच राजकीय पक्षाचे शीर्षस्थ नेते,खेळाडू,सिनेजगतातील कलावंत पासून तर शालेय विद्यार्थ्यांपर्यंत गगनाला भिडणारा हा राष्ट्राभिमानाचा जल्लोष बघण्यासारखा होता. सर्वच जाती,धर्म,प्रांत,भाषाचे मतभेद गळून पडले व फक्त ‘भारतीय’म्हणून संपूर्ण राष्ट्र पराकोटीच्या राष्ट्राभिमानाच्या भावनेत आकंठ बुडण्याचा प्रसंग हा क्वचितच राष्ट्राच्या वाटेला येतो.इस्त्रोच्या महान वैज्ञानिकांनी हा आनंद,हा जल्लोष साजरा करण्याची संधी समस्त भारतीयांना दिली आणि भारताचा तिरंगा झेंडा हा प्रत्येकाच्या हाती पराकोटीच्या अभिमानाने लहरवला.अगदी ऑटो,दुचाकी,चारचाकी,रिक्शा,खासगी व शासकीय वाहनांपासून तर सार्वजनिक परिवहनाच्या गाड्यांवर देखील देशाचा तिरंगा अभिमानाने सायंकाळच्या सुमारास ही दिमाखदारपणे लहरवत होता.
इस्त्रोच्या यू ट्यूबवर चॅनलवर तर चांद्रयान मोहीमेचे लाईव्ह प्रक्षेपण बघणा-यांची संख्या जवळपास एक कोटी इतकी होती.थोड्याच वेळात चांद्रयान-३ मोहीमेच्या यशानंतर ही संख्या सात कोटींपर्यंत पोहोचली.कोट्यावधी भारतीयांनी वारंवार यू ट्यूब तसेच इतर समाज माध्यमांवर चांद्रयान-३ मोहिमेच्या यशाचे शेवटच्या सतरा मिनिटांचे प्रक्षेपण बघितले.हा एक नवा जागतिक रेकॉर्ड प्रस्थापित झाला आहे.
हिच ती सतरा मिनिटे होती जेव्हा भारताच्या चांद्रयान -२ च्या मोहिमेला २०१९ मध्ये अपयश आले होते.इस्त्रोचे तत्कालीन माजी अध्यक्ष के.सिवान यांच्या डोळ्यात अपयशाचे अश्रू तरळले होते.देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे सांत्वन करीत,भारत या अपयशातून धडा घेत आणखी जाेमाने यशासाठी प्रयत्न करणार असल्याचा विश्वास व्यक्त केला होता.परिणामी आजचे हे यश जरी चांद्रयान-३ चे यश गणल्या जाणार असले, तरी याची पायभरणी गेल्या अनेक दशकात इस्त्रोच्या वेगवेगळ्या शास्त्रज्ञांनी वेगवेगळ्या काळखंडात केली,हे विसरता येणार नाही.त्यामुळेच आज चांद्रयान-३ च्या झपाटलेल्या यशाने चांद्रयान-२ चे ही अपयश धूवून काढले,असेच आता म्हणावे लागेल.
शेवटच्या या सतरा मिनिटांच्या काळालाच शास्त्रज्ञांच्या भाषेत ‘टेरर ऑफ १७ मिनिट्स’संबोधल्या जातं.आज देखील लँडर मोड्युलचे चंद्राच्या दक्षिण धृव्रावर सहज आणि सुरक्ष्त लँडिगच्या शेवटच्या सतरा मिनिटांचा तो ‘थरार’ संपूर्ण भारतीयांच्या ह्दयाचा ठोका चुकविणाराच होता.मात्र,कोणत्याही अडथळ्यांशिवाय चांद्रयान-३ च्या लँडरने सुरक्ष्तरित्या चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लँडिंग केली आणि इस्त्रोच्या कार्यालयापासून तर संपूर्ण देशात एकच जल्लोष उमटला.या शेवटच्या १७ मिनिटांनी ‘न भूतो ना भविष्यती’असा इतिहास जगात घडवला.संपूर्ण जगाचे लक्ष इस्त्रोच्या या मोहिमेकडे लागले होते.४० दिवसांची निर्णायक यात्रा करुन आपल्या गंतव्य ठिकाणी संपूर्ण अडथळे पार करीत सुरक्ष्त लँडिंग करणारा लँडर हा जणू संपूर्ण भारतीयांसाठी आयकॉन झाला,महत्वाचे म्हणजे या लँडरने इस्त्रो तसेच संपूर्ण भारतवासियांसाठी लँड झाल्यावर जो सर्वात पहीला संदेश पाठवला तो प्रत्येकाचा ऊर अभिमानाने ओतप्रोत भरवणाराच होता.‘भारत मै अपनी मंजिल पर पहोच गया हूं और तुम भी अपनी मंजिल पर पहोच गये हो’असा तो संदेश होता….!
नावातच व्रिकम असणा-या विक्रम नावाच्या लँडरच्या या संदेशने सोशल मिडीयावर देशप्रेमाच्या भावनेत जल्लोष भरला.अंतरिक्ष का नया बॉस भारत,रच दिया किर्तीमान.. चांद पर चंद्रयान,अशा कितीतरी संदेशांनी देशातील सोशल मिडीया हा व्यापून टाकला.पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी जोहानिसबर्गमधून देशवासियांना संबोधित केले.’ब्रिक्स’च्या संमेलनासाठी पंतप्रधान हे दक्ष्ण अफ्रिकेत असताना देखील ते इस्त्रोमधील या मोहिमेशी थेट जुळले होते. क्षणोक्षणी त्यांची उत्सुकता ताणली गेली होती.शेवटच्या क्षणी विक्रम लँडर हे जसे चंद्राच्या अतिशय खडतर दक्षिण ध्रृवावर सुरक्षीतपणे उतरले तसे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हातातील लहानसा तिरंगा झेंडा अभिमानाने उंचावला.आपल्या ८ मिनिटांच्या देशाला केलेल्या संबोधनात त्यांनी चांद्रयान-३ चे हे यश म्हणजे ऐतिहासिक घटना असल्याचे सांगितले.
मी जरी जोहानिसबर्गमध्ये असलो तरी माझं संपूर्ण मन हे या मोहिमेत होतं असे ते म्हणाले.या यशाने राष्ट्राला चिरंजीव बनवले,हा क्षण अभूतपूर्व असून विकसित भारताचा हा शंखनाद असल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले.ये नये भारत का जयघोष है.मुश्कीलो के महासागर को पार करके अमृतकाल के प्रथम प्रभा मे सफलता की अमृत वर्षा हूयी है,धरती का संकल्प चांद पर साकार हूआ है,इंडिया इस नाऊ इन द मून,आज हम नये भारत की नई उडान के साक्षी बने है’अशा शब्दात त्यांनी इस्त्रोच्य शास्त्रज्ञांना व संपूर्ण भारतवासीयांना शुभेच्छा प्रदान केल्या.इतकंच नव्हे तर इस्त्राेचे अध्यक्ष एस.सोमनाथ यांच्याशी मोबाईलवर संवाद साधून तुमच्या नावातच ‘साेम’ म्हणजे ‘चंद्र’ असल्याचे कौतूक केले.विशेष म्हणजे चांद्रयान मोहिमेत विक्रम लँडरसोबत जे रोवर संलग्न करण्यात आले त्याचे नाव ‘प्रज्ञान’आहे,हा संस्कृत शब्द असून याचा अर्थ ‘बुद्धिमत्ता’ असा होतो.जगातील महाशक्तीशाली देश जिथे अनेक मोहिमा राबवूनही पोहोचू शकले नाहीत तिथे भारतासारख्या विकसनशील देशाने यशाचा तिरंगा फडकविण्याचा सन्मान आज प्राप्त केला.
मनोज कुमार यांचा एक चित्रपट आहे ‘पूरब और पश्चिम’.या चित्रपटात एक गाणं आहे.‘है प्रित जहां की रित सदा मै गीत वहां के गाता हूं,भारत का रहनेवाला हूं भारत की बात सुनाता हूं.जब ‘झिरो’ दिया मेरे भारत ने दूनिया को तब गिनती आयी,तारो की भाषा भारत ने दूनिया को पहले सिखलायी,देता ना ‘दशमलव’ भारत तो ,यूं चांद पे जाना मुश्किल था,धरती और चांद की दूरी का अंदाजा लगाना मुश्लिक था…..!’भारताने चांद्रयान -३ मोहिम आखली आणि रशियाने घाईगर्दीने भारताच्या आधी ही मोहिम फत्ते करण्यासाठी कंबर कसली. त्यांचा ‘लूना-२५’ हा अंतराळ यान अनियंत्रित कक्षेत फिरल्यानंतर चंद्रावर काेसळले.मात्र,रशियाच्या या अयशस्वी चांद्र मोहिमेचा कोणताही परिणाम इस्त्रोच्या मोहिमेवर झाला नाही….!
२०१३ साली इस्त्रोच्या मंगळावरील मोहिमेची थट्टा करणारे एक कार्टून न्यूयार्क टाईम्समध्ये प्रसिद्ध झाले होते….!यात भारतातील एक गरीब माणूस एका गायीला सोबत घेऊन स्पेस क्लबचे दार ठोठावतोय आणि क्लबच्या आत उच्चभ्रू असणारी दोन माणसे हातात वृत्तपत्र घेऊन त्यावरील भारताच्या मंगळावरील मोहिमेवर प्रसिद्ध झालेल्या मजकूरावर कुत्सितपणे हसतात आहे…!भारताच्या इस्त्रोच्या आजच्या या यशाने २०१३ मधील त्या उपहासात्मक काटूर्नला फक्त ठोस उत्तरच दिले नाही तर अंतराळ मोहिमेचे जे दार पाश्चात्य देशांनी बंद करुन ठेवले होते,त्या दारावर लाथ घालून ते दारच उखडून टाकल्याची प्रतिक्रिया, हे जुने काटूर्न बघून सोशल मिडीयावर उमटली,हे विशेष!
अनेक दशकांपूर्वी सायकलवर रॉकेट घेऊन जात असल्याचा फोटो ही चांगलाच व्हायरल झाला.त्यावेळी भारताकडे ना पैसा होता ना तंत्रज्ञान होते.मात्र आज नव्या भारताने तब्बल ७०० कोटी रुपये खर्च करुन अंतराळात एक इतिहास घडवला.संपूर्ण जगाने याचे कौतूक ही केले,अनेक देशांना भारताचे हे यश बघून चांगलाच जळफळाट ही झाला.भारताला गुलाम बनवून दीडशे वर्ष राज्य करणारे ग्रेट ब्रिटेनच्या बीबीसी वर्ल्ड न्यूज या वाहीनीवरही हा ज़ळफळाट चांगलाच दिसून पडला.एका भारतीयाला या यशाबद्दल विचारतानाच,भारतात इन्स्फ्रास्ट्रक्चरची इतकी कमतरता आहे,भारतात ७० कोटी लोकांसाठी शौचालय नाहीत तरी देखील इस्त्रोच्या या चांद्र मोहिमेवर ७०० कोटी रुपये खर्च करने कितपत योग्य आहे?असा तो तिरकस आणि पूर्वग्रहदूषित मानसिकतेतून प्रश्न उमटला होता.अर्थातच याला चर्चेत सहभागी असणा-या भारतीय पाहूण्याने देखील तितकेच खरमरीत उत्तर दिले.पाकिस्तानचे माजी मंत्री फवाद चौधरी यांनी एकदा अशीच भारताची खिल्ली उडवत,चांद्र मोहिमेची काय गरज आहे?चंद्र तर पृथ्वीवरुन दिसतोच ना तिथे यान पाठविण्याची गरज काय?असा उपहास उडवला होता.आज तेच फवाद चौधरी भारताचे अभिनंदन करताना झळकले.पाकिस्तानातील संपूर्ण मिडीया आज भारताच्या चांद्र मोहिमेच्या याच यशाचे गुणगान गाताना दिसून पडला.
चांद्रयान मोहिमेच्या या यशाला भारतासारख्या देशात राजकीय किनार लाभणार नाही,हे शक्यच नव्हते.लगेच काँग्रेसच्या अधिकृत ट्वीटर हँडलवर हे यश पंडित नेहरु यांच्या दूरदृष्टिकोणातून साकारल्याचे झळकले.इस्त्रोची संकल्पना पं.नेहरु यांनीच १९६२ साली मांडली असल्याचे राहूल,प्रियंका गांधी तसेच मल्लिकार्जून खरगे यांच्यावर ट्टिटर हँडलवर उमटले.याला अर्थातच त्याच राजकीय भाषेत चोख उत्तर मिळणार होते.मात्र,आजचे हे अभूतपूर्व यश साजरे करण्यात दंग असणा-या भारतीयांनी राजकीय विधानांना कोणतेही महत्व न देता मनसोक्त आनंदाची उधळण केली.
(छायाचित्र : लैंडरपासून वेगळे झालेल्या प्रज्ञान रोवरने पाठवलेले अभूतपूर्व व अगम्य असे चंद्राच्या दक्षिण धुव्रावरील पहीले छायाचित्र.छायाचित्रे रोवर आधी लैंडरकडे पाठवित असतो.लैंडर ती पृथ्वीवरील इस्त्रोच्या ग्राऊंड स्टेशनकडे पाठवतो.)
शास्त्रज्ञ सांगतात,चंद्राच्या दक्षिण धृव्रावर यशस्वीपणे उतरणे हे जगभरातील अनेक देशांसाठीही आव्हानात्मक होते.चंद्राच्या पृष्ठभागावर त्याच्या कक्षेतून उतरणे सोपे नाही याचे पहिले कारण म्हणजे अंतर,दूसरे वातावरण आणि तिसरे गुरुत्वाकर्षण.ऊर्ध्व रेषेत यान चंद्रावर उतरविताना इंजिनचा दाब योग्य प्रमाणात राखणे हे मोहिम अयशस्वी होण्यासाठी चौथे कारण ठरले तर थ्रस्टर योग्य वेळी सुरु असणे,वेग नियंत्रित ठेवणे,उतरण्याचे ठिकाण समतल सापडणे अशी अनेक कारणे इस्त्रोच्या शास्त्रज्ञांनी सांगितली.
गेल्या सात दशकात विविध देशांनी १११ चांद्र मोहिमा आखल्या.त्यातील ६६ यशस्वी झाले तर ४१ अयशस्वी झाले.८ अंशत यशस्वी झाले.
(क्रमश:)