फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeदेश-विदेश‘त्या’.......

‘त्या’…….

(भाग-१)

डॉ.ममता खांडेकर
(Senior Journalist)

नागपूर,ता.२० जुलै २०२३: ईशान्यकील छोटे राज्य असणारे मणिपूर गेल्या सहा महिन्यांपासून दंगलीमध्ये धगधगतंय.४ मे रोजी याचा कडेलोट झाला.बराच काळ या राज्यातील इंटरनेट सेवा बंद असल्यामुळे दंगलीदरम्यानच्या माणुसकीला काळीमा फासणा-या अनेक घटना समोर येऊ शकल्या नाहीत.आज मात्र एक व्हिडीयो जगाच्या समोर आला आणि…..!उर्वरित भारत स्तब्ध झाला!देश एका कणखर नेतृत्वाच्या हातात आहे,या धारणेला पार तडा गेला.प्रश्‍न दोन असहाय महिलांची नग्न धिंड काढून शेतात त्यांच्यावर बलात्काराचा नव्हता,प्रश्‍न होता तो पुन्हा एकदा उफाळून आलेल्या युद्धखोर मानसिकतेचा!शत्रू गटातील समाज किवा धर्माच्या असल्या तरी त्या दोन स्त्रिया याच देशाच्या नागरिक होत्या.या देशाचा संविधान स्त्री असो किवा पुरुष प्रत्येकाला सन्मानाने जगण्याचा हक्क प्रदान करतो,तरी देखील देशातील मणिपूर राज्यात असे आक्रित घडले?

संपूर्ण जगात या घटनेमुळे भारताची निंदा होत आहे.संपूर्ण सोशल मिडीयामध्ये याच अतिशय संतापजनक व निंदनीय घटनेची वांझोटी चर्चा झडत आहे.मोदी समर्थक किंवा मोदी विरोधी माध्यमे, आपापल्या परिने या घटनेचे विश्‍लेषण करुन आपापली भूमिका देशाच्या नागरिकांच्या गळी उतरवित आहे. मात्र,या घटनेने देशाच्या कणखर नेतृत्वावरच अनेक प्रश्‍नचिन्ह निर्माण केले आहे. मणिपूर धगधगत असताना या दंगलीकडे ‘हेतुपुरस्सर’दुर्लक्ष केल्याचे परिणाम, तेथील दोन महिलांना अश्‍या रितीने स्वतंत्र भारताच्या इतिहासात इतके क्रोर्य सहन करुन भोगावे लागले आणि…येथेच पंतप्रधानांचा सन्मान नाहीसा झाला.

प्रश्‍न मणिपूर मधील ५३ टक्के असलेल्या मैतेई समाजाला अनुसूचित जमातीमध्ये(एसटी)आरक्षण देण्याचा व त्याला नागा व कुकी या आदिवासी समाजाच्या विरोधाचा नव्हता.प्रश्‍न मैतेई समाजातील उन्मत तरुणाईचा आहे ज्यांनी कुकी समाजातील दोन महिलांना संपूर्णत:नग्न करुन(र्निवस्त्र हा शब्द ही या कृती मागील वीभत्सता झाकोळू शकणार नाही)त्यांच्या जननागांना वाटेल तसा स्पर्श करुन,त्यांच्या स्तनांना चुरगाळीत त्यांची धिंड काढत रस्त्यावरुन नेले,या क्रोर्याचा आहे. काही तरुण याचा व्हिडीयो काढत होते, एवढ्यावरच काहींची वीभत्स वासना शमली नाही तर काहींनी या भेदरलेल्या,अगतिक महिलांना शेतात नेऊन आपली शारीरिक पुरुषी वासना ही शमवून घेतली…!

हा व्हिडीयो समोर आला आणि……!संपूर्ण देश शहारला.पंतप्रधान नरेंद्र मोदींना देखील संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहील्या दिवशीच व्हायरल ‘करण्यात’आलेल्या या व्हिडीयोची दाहकता जाणवली….! या देशाचा नागरिक कितीही,कोणताही,अगदी पराकोटीचा भ्रष्टाचार सहन करुन घेईल पण,अश्‍या रितीने आपल्या क्रोधाची आग निरपराध स्त्रियांच्या जननांगांना भर रस्त्यावर विकृतीने स्पर्श करणारी कृती,या देशाचा कोणत्याही जाती,धर्माचा नागरिक कधीही सहन करणार नाही,हे देशाच्या पंतप्रधानांही माहीती आहे,त्यामुळेच त्यांनी यावर कठोर भूमिका घेतली असल्याचे माध्यमेच आता सांगत आहेत.

पंतप्रधानांनी देशाचा प्रमुख म्हणून आपल्याच देशातील एक राज्य आंदोलनाच्या आगीत जळत असताना त्याकडे दूर्लक्ष करुन, तीन राज्यांच्या निवडणूकीत जातीने लक्ष घातल्याने काय घडू शकतं?याचे एक दूर्देवी उदाहरण म्हणजे मणिपूरच्या….त्या गावात दोन महिलांची एका समाजाच्या तरुणांनी काढलेली ही नग्न धिंड आहे.

या आंदोलनाकडे राज्य सरकारने केलेले जाणीवपूर्वक दुर्लक्ष व या राज्यात प्रादेशिक पक्षासोबत युतीत असणा-या भाजप सरकारला पाठीशी घालणारे देशाचे पंतप्रधान,या दोघांच्याही अक्षम्य दूर्लक्षतेतून या दोन महिलांच्या देहाला नग्न करुन, त्यांची धिंड काढत त्यांच्या जननागांना स्पर्श करण्या इतकी र्निढावलेली हिंमत एका समाजाच्या तरुणांमध्ये आलीची कशी?हा प्रश्‍न आता अनेकांना छळत आहे.

९० टक्के डोंगराळ भाग आणि उर्वरित मैदानी प्रदेश अशी भौगोलिक विभागणी असलेल्या या राज्यात,मैदानी भागातील मैतेई समाजाचे वर्चस्व आहे..सत्तेवर कोणीही असले तरी त्यामध्ये हाच समाज सहभागी असतो.त्यामुळेच सरकारच्या निर्णयांकडे या राज्यातील आदिवासी कुकी व नागा समाज संशयाने बघत आला आहे.नागा व कुकी यांचे मणिपूरच्या एकूण लोकसंख्येतील प्रमाण ४० टक्के असून,ते प्रामुख्याने डोंगराळ व जंगली भागात राहतात.त्यांचे वास्तव्य असणा-या जंगलाचे रुपांतर आरक्ष्त वनांमध्ये करण्याची मोहीम याच वर्षी फेब्रुवरी महिन्यापासून सुरु झाली.परिणामी जंगल भागातील आदिवासींना मोठ्या प्रमाणात निर्वासित व्हावे लागत आहे.

पुर्नवसनाची कोणतीही तयारी न करता आपल्याला हूसकावून लावत असल्याची भावना आदिवासी समाजात प्रबळ झाली.त्यामुळे अधूनमधून या दोन्ही समाजात चकमकी उडत होत्याच.अखेर त्याचा कडेलोट झाला.मोठ्या प्रमाणात हिंसाचार या राज्यात उफाळून आला.अादिवासी हिंसक बनले,त्यांनी मैतेई समाजाच्या लोकांवर हल्ले केले.घरांची आणि दूकानांची जाळपोळ केली.अखेर लष्कराला पाचारण करावे लागले.मुख्यमंत्री बीरेन सिंह व त्यांच्या सरकारने आदिवासींचा भडका वेळेवर समजून घेण्याचा कोणताही प्रयत्न केला नाही.

मैतेई समाजाचा एक गट २०१२ पासूनच अनुसूचित जमातीचे आरक्षण देण्याची मागणी करीत आहे.या मागणीबाबत केंद्र सरकारने शिफारस सादर करण्याचा तसेच राज्य सरकारने विचार करण्याचा आदेश मणिपूर उच्च न्यायालयाने १९ एप्रिलला दिला त्यातून या असंतोषात आणखी भर पडली.विधानसभेत दोन तृतीयांश असणारा मैतेई समाज हा अनुसूचित जमातीत कसा येऊ शकतो?मैतेई समाजाला आधीच अनुसूचित जातीचे आरक्षण लागू आहे,त्यात आर्थिक दुर्बल घटकाचेही आरक्षण हा समाज घेतो,एकाच समाजाला इतक्या सवलती कश्‍या?हा असंतोष तेथील सरकारने समजून घेण्याचा प्रयत्न ही केला नाही.

आरक्ष्त वनासाठी मोहीम सुरु करताना,आदिवासींना विश्‍वासात घेण्याची व त्यांचे योग्य पुर्नवसन करण्याची हमी तेथील सरकारने घेतली नाही.उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर चुराचंदपूर येथे ‘इंडिजिनस ट्रायबल लीडर्स फोरम’या आदिवासी संघटनेने बंद पुकारला.राज्याच्या विविध डोंगराळ जिल्ह्यात मोर्चे काढण्यात आले.सभा होऊ लागल्या.हिंसाचाराला सुरवात झाली.लष्कराला ‘दिसेल त्याला गोळी मारा’चे आदेश द्यावे लागले…!इंटरनेट सेवा बंद झाली…!

विशेष म्हणजे मैतेई समुदायाच्या मणिपुरी भाषेचा राज्यघटनेच्या आठव्या परिशिष्टामध्ये समावेश करण्यात आला असून, या गटातील अनेक समुदाय हे हिंदू धर्मामध्ये मोडतात पण त्यांना अनुसूचित जाती आणि अन्य मागास वर्गाचा दर्जा मिळाला आहे.हा दर्जा मिळाल्याने त्यांना अन्य सवलतीही मिळू शकतात,ही बाब अन्य समुदायांना मान्य नाही.याशिवाय कुकी समाजातील अनेक आदिवीसी हे धर्मांतरित झाले आहेत.ईसाई धर्म स्वीकारला असल्यानेच राहूल गांधी यांनी मणिपूरमध्ये येऊन, मैतई समाजाची उधवस्तता जाणून घेण्याचा प्रयत्न न करता फक्त कुकी समाजाच्या छावण्यांना भेट दिल्याचा आरोप देखील ठलकपणे उमटला.मणिपूरमध्ये फेब्रुवरी पासून सुरु झालेली धुसफूस व नंतर त्याचे हिंसेत झालेले परिवर्तन यामुळे विरोधकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही टिकेची झोड उठवली. २६ जून रोजी मोदी हे विदेशातून परतताच त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडून हिंसाचारग्रस्त मणिपूरची माहिती घेत उचललेल्या पावलांबाबत चर्चा ही केली होती.

मणिपूरमध्ये ३ मे पासून सुरु झालेल्या हिंसाचाराच्या दुस-याच दिवशी अर्थात ४ मे रोजीची ही घटना आज जगासमोर आली आणि….!जूनमध्ये संतप्त जमावाने केंद्रिय मंत्री आर.के.रंजनसिंह यांच्या मणिपूरमधील घरावर हल्ला करुन त्यांचे घर पेटवून दिले.या संपूर्ण हिंसाचारात आतापर्यंत १०० पेक्षा जास्त नागरिक मृत्यूमुखी पडलेत.खामेनलोक परिसरात संतप्त जमावाने ९ जणांची हत्या केली.इंफाळमध्ये हिंसाचाराच्या वणव्यात शेकडो घरे भस्मसात झाली.इंफाळमध्ये प्रार्थनास्थळांची तोडफोड झाली.मैतेई समुदायातील हजारो नागरिक विस्थापित झाले.कांगपोगपी जिल्ह्यात वीस घरांची जाळपोळ झाली.म्यामार सीमेवरील तेंगनौपालमध्ये हिंसाचार उफाळला.शेकडो विस्थापितांनी चुराचांदपूर,इंफाळ व मोरेहमथीच्या छावणीत आश्रय घेतला.

मुष्टियोद्धा मेरी कोमने ट्वीट करीत ‘माझं राज्य हिंसाचाराच्या वणव्यात जळत आहे,कृपया मदत करावी’अशी आर्त साद पंतप्रधान व गृहमंत्री अमित शहा यांना टॅग करीत घातली.हिंसा रोखा,संवाद साधा,अश्‍या शब्दात राष्ट्रीस स्वयंसेवक संघाने देखील मोदी,शहांचे कान टोचले.

मणिपूरच्या एका गावात तपासणी माेहीम सुरु असताना भारतीय जवानांना शेकडो महिलांनी घेरले व लष्करावर दबाव टाकून १२ दहशतवाद्यांची सोडवणूक केली.लष्काराच्या स्पीयर कॉर्प्सला मिळलेल्या माहितीनुसार,२४ जून रोजी लष्कराकडून इम्फाळ ईस्टच्या इथम गावात तपासणी मोहीम राबविण्यात आली.यात केवायकेएलच्या(कांगलोई यावोल कन्ना लूप)१२ फुटीरवाद्यांना लष्कराने पकडले होते.त्यांच्याकडून शस्त्रे,स्फोटकं असे अनेक साहित्य जप्त करण्यात आले.केवायकेएल हा मणिपूरचा फुटीरवादी गट आहे.त्याची स्थापना १९९४ साली झाली होती.भारत सरकारने ही संघटना दहशतवादी असल्याचे जाहीर केले.या १२ जणांमध्ये मोईरांगथम तांबा उर्फ उत्तम या दहशतवादाचाही समावेश होता.त्यानेच २०१५ मध्ये डोग्रा रेजिमेंटवर हल्ला करण्याचा कट रचला होता.या हल्ल्यात १८ जवान हुतात्मा झाले होते…!

मणिपूरच्या शांततेसाठी बिहार नागरिक अधिकार मंचच्या कार्यकर्त्यांनी पाटणा येथे मेणबत्ती मोर्चा काढला.या मोर्च्यात सर्वाधिक ईसाई समुदायाचा समावेश होता…!पर्वतीय भागातील गोळीबारापासून तर द-याखो-यातील नागरी भागातील हिंसाचारात ‘बाहेरच्या’ लोकांचा हात असल्याचा दावा मुख्यमंत्री एन.बिरेन सिंह यांनी केला.सुरक्षा दल व पोलिसांनी ७ जिल्ह्यात तपासणी माेहिम राबवून दहशतवाद्यांचे २६ जून रोजी १२ बंकर नष्ट केले.

थोडक्या युद्ध कुठलेही असो,देशांतर्गत किवा जगाच्या पातळीवर,युद्धखोर परिस्थितीत माणूसकी,भावना आणि विवेकाला कुठेही जागा नसते.देशाचाही विचार नसतो.समोरची स्त्री ही शत्रू गटातील आहे फक्त हेच लक्षात घेऊन तिची विटंबना केली जाते…तिच्या विटंबनेचे साधन हा तिचा स्त्री देह असतो.शत्रूच्या स्त्रीयांच्या देहाची विटंबना म्हणजे शत्रू पुरुषांच्या वर्मावर घाव घालणे हा पहील्या महायुद्धापासून तर आधुनिक युगापर्यंतच्या मानसिकतेच यत् किंचितही बदल झालेला नाही,मणिपूरच्या कांगपोगपी जिल्ह्यात दोन स्त्रियांची नग्न धिंड,बलात्कार हा त्याच मानसिकतेचा परिपाक आहे….!

आता संसदेच्या पावसाळी अधिवेशनात मणिपूरसह सर्व मुद्दांवर चर्चा करण्याचे आश्‍वासन अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सर्वपक्षीय बैठकीमध्ये दिले गेले आहे.मणिपूरच्या हिंसाचारावर चर्चा करण्याचे मोदी सरकारने मान्य केले.संसदेच्या ग्रंथालय इमारतीत पार पडलेल्या सर्वपक्षीय बैठकीत विरोधकांनी चर्चे माणगी लावून धरली.संरक्षण मंत्री राजनाथ सिंह,संसदीय मंत्री प्रल्हाद जोशी व राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाळ सरकारच्या वतीने उपस्थित होते.या बैठकीला ३४ पक्षांचे ४४ नेते उपस्थित होते मात्र, इतक्या महत्वाच्या पंतप्रधान उपस्थित नव्हते…..!

मात्र…केंद्र हे नागरिकांना आवाहन करत आहे हा व्हिडीयो कृपा करुन शेअर करु नका…!सूर्याला हाताने झाकोळण्याचा या केविलवाण्या प्रकाराने सत्य लपणार आहे का? असा प्रश्‍न समाज माध्यमांवर विचारला जात आहे….!दृष्यच बघून रक्त संतापून उठतंय तिथे ‘त्या’स्त्रियांनी हे सगळं अमानवीय कृत्य अनेक तास सहन केलं त्यांच्या आंतरिक व शारीरिक जखमांचं काय?केंद्र सरकार त्या जखमांवर फूंकर ते सगळं भोगलेलं लपवून घालणार आहे का…..!

उद्या गुरुवार दिनांक २१ जुलै पासून सुरु होणा-या संसदेच्या पावसाळी अधिवेशनात मणिपूरमधील या घटनेचे ‘राजकारण’कोणता पक्ष कोणत्या हेतूने करतो याकडे आता संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.लोकशाहीच्या या पवित्र मंदिरात याच देशातील दोन असहाय महिलांच्या नग्न देहांना, संसद नावाच्या या न्याय मंदिरात खरंच न्याय मिळतो, की त्यांच्या आत्मसन्मानाची झालेली लक्तरे, हा देहासोबतच आरोप-प्रत्यारोपांच्या राजकारणात, मन आणि विश्‍वासालाही आणखी रक्तबंबाळ करतो,याकडे आता संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे….!

……………………….

- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या