•गुजरात उच्च न्यायालयाच्या निर्णयात राहुल गांधी दोषी
•ओबीसी समाजाच्या विरोधातील अपमानास्पद वक्तव्य भोवले
नागपूर,ता.७ जुलै: लोकसभेच्या २०१९ च्या निवडणुकीत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलेल्या ओबीसींवरील अपमानास्पद वक्तव्यासंबंधी गुजरात उच्च न्यायालयाच्या निर्णयात राहुल गांधी यांची शिक्षा कायम ठेवण्यात आली आहे.
राहुल गांधी यांनी संपूर्ण ओबीसी समाजाचा अपमान केला असून, त्यांनी ओबीसी समाजाची जाहीर माफी मागावी, अशी मागणी माजी आमदार डॉ. आशिष देशमुख यांनी काँग्रेसमध्ये असताना केली होती. त्यानंतर ओबीसींच्या मुद्यावर त्यांना काँग्रेसमधून बडतर्फ करण्यात आले होते.
आज, दि. ७ जुलै २०२३ रोजी गुजरात उच्च न्यायालयाने ‘मोदी आडनाव’ टिप्पणीविरोधातील खटल्यात राहुल गांधींना दोषी ठरवण्याचा सत्र न्यायालयाचा आदेश कायम ठेवला आहे.
यावर प्रतिक्रिया देताना नुकतेच भाजपामध्ये प्रवेश घेतलेले डॉ. आशिष देशमुख म्हणाले, “संपूर्ण देशात ५४ टक्के ओबीसी समाज असून त्यांच्या भावना दुखावल्या असल्यास राहुल गांधी यांनी माफी मागून हा विषय इथेच संपवावा, ही माझी भूमिका होती.
राहुल गांधी यांनी ओबीसी समाजाचा अपमान केला तर राहुल गांधी अडचणीत येतील, असे मी त्यावेळी म्हटले होते. माझे ते वक्तव्य आज खरे ठरले. हा निर्णय देऊन उच्च न्यायालयाने ओबीसींच्या भावनांचा आदर केला आहे. पुढील आठ वर्ष राहुल गांधी कोणतीही निवडणूक लढू शकणार नाहीत. ओबीसी समाजाला या निर्णयामुळे आनंद झाला आहे. मी उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत करतो,अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
……………………………