फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeक्राइमकुस्तीगीर...फेडरेशन लॉबी आणि पंतप्रधानांचे मौन

कुस्तीगीर…फेडरेशन लॉबी आणि पंतप्रधानांचे मौन

पदके मिळवली पण खेळासाठी नेमके काय केले?

लैंगिक शोषणाचा आरोप ‘फॅशन’झाली आहे का?

समाज माध्यमात उमटले दावे-प्रतिदावे

नागपूर,ता.१ मे २०२३: सध्या क्रीडा क्षेत्रात नावाजलेल्या कुस्तीपटूंच्या जंतर मंतरवरील आंदोलनाने देशाचेच नव्हे तर जगाचे लक्ष वेधले आहे.भारतीय कुस्ती फेडरेशनचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या विरोधात सात कुस्तीगिरांनी केलेल्या लैंगिक शोषणाच्या आरोपानंतर दिल्ली पोलिसांनी त्यांच्या विरोधात गुन्हा देखील दाखल केला.अर्थात या साठी सर्वोच्च न्यायालयात पिडीतांना दाद मागावी लागली.बृजभूषण शरण सिंह भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ खासदार असून त्यांच्या विरोधात याच कुस्तीगिरांनी याच वर्षी जानेवरी महिन्यातच आंदोलन केले होते.त्या वेळी त्यांनी कोणत्याही राजकीय पक्षाला आंदोलनात सहभागी होऊ दिले नव्हते.यावेळी मात्र एकमेव भाजप सोडला तर इतर अनेक राजकीय पक्षांनी कुस्तीपटूंच्या या आंदोलनाला पाठींबा दिल्याचं दिसून पडंतय.मात्र, एकीकडे हा लढा महिला कुस्तीपटूंच्या अात्मसन्मानाचा,न्यायाचा दिसून पडत असतानाच दुसरीकडे उत्तर प्रदेश विरुद्ध हरियाणा फेडरेशनची म्हणजे फेडरेशन विरुद्ध फेडरेशनची ही लढाई असून, केवळ वर्चस्व आणि पैशांची ही लढाई असल्याचाही सूर समाज माध्यमात उमटलेला दिसून पडतोय,विशेष म्हणजे गेल्या चार महिन्यांपासूनच्या या गंभीर आरोप प्रत्यारोपाच्या गदारोळात पंतप्रधानांचे मौन बरेच काही सांगून जाणारे आहे.

आंदोलनकारी हरियाणा फेडरेशनच्या कुस्तीगीरांनी अलीकडे पंतप्रधानांच्या मौनावरच आता हल्ले तीव्र केले असले, तरी गेल्या ८ वर्षात मोदी यांची कार्यशैली बघता ते प्रकरण थंड होण्याची वाट बघतात व प्रभावी असा निर्णय घेऊन सरळ सोक्षमोक्षच लावित असल्याचा दावा ही करण्यात आला आहे.या ही प्रकरणात ते दोन्ही गटांपासून अंतर राखून असल्याचेच दिसून पडतंय.किसान आंदोलनाच्या वेळी ही देशभर आंदोलन चिघळत असतानाच त्यांनी निर्णय बदलला नाही,नंतर मात्र देशाची माफी मागून चक्क तिन्ही कायदे परत घेतले,विरोधकांच्या सर्व परिश्रमावर पाणी फेरण्यात ते यशस्वी झाले.आंदोलनकारी कुस्तीगिर आणि भाजपचे बाहूबली खासदार या दोन्ही गटांना मोदीच ‘जोर का झटका‘ देणार असल्याच्या चर्चेलाही त्यामुळेच उधाण आलेलं आहे.

सुरवातीला हा वाद,आरोप आणि घटना काय आहे व नेमकी कश्‍यासाठी आहे?हा वादच भारतीयांना समजला नाही. जागतिक स्पर्धांमध्ये खेळणा-या अनेक तरुण महिला कुस्तीगिरांनी भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावर लैंगिक शोषणाचा गंभीर आरोप केला.त्यावेळी कुस्तीपटूंच्या आरोपांची चौकशी करण्यासाठी या आधी क्रीडा मंत्रालयाने खादार मेरी कोम यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती स्थापन केली होती.मोदी सरकारच्या क्रीडा मंत्रालयाच्या या कृतीवर आंदोलनकारी कुस्तीपटूंनी विश्‍वास ठेऊन, आपले आंदोलन मागे ही घेतले होते,मात्र या समितीने आपला अहवाल सादर करुन देखील या कुस्तीपटूंना तो अहवाल प्राप्त होऊ शकला नाही.या अहवालात नेमके काय आहे?

याचा अर्थ हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न सुरु असल्याचा आरोप करीत या कुस्तीपटूंनी पुन्हा एकदा आंदोलनाचा मार्ग स्वीकारलेला दिसून पडतोय.मात्र फेडरेशन आणि वर्चस्वाच्या या लढाईत लैंगिक शोषणाचे आरोप हे खोटे असल्याचे देखील समाज माध्यमात बोलले जात आहे.लैंगिक शोषनाचे आरोप अलीकडे स्वार्थसिद्धीचे साधन झाले असल्याची टिका करीत ,अलीकडे असे आरोप म्हणजे ‘फॅशन‘झाली असल्याचा जळजळीत सूर ही उमटलेला दिसतोय.प्रत्येकच क्षेत्रात जिथे स्त्री-पुरुषांचा संबंध कामाच्या ठिकाणी येतो अश्‍या अनेक क्षेत्रात,कॉरपोरेट क्षेत्र,चित्रपट सृष्टिपासून तर अगदी पत्रकारितेच्या क्षेत्रातही लैंगिक शोषणाच्या घटना घडतात,काही समोर येतात काहींना वाचाही फूटत नाही मात्र,कुस्तीगिरींच्या या आरोपामागे फेडरेशन्सच्या वर्चस्वाची लढाई असल्याचा आरोप केला जात आहे.

एवढ्या गंभीर आरोपानंतर दिल्ली पोलिसांनी फक्त ब्रिजभूषण हे भारतीय जनता पक्षाचे बाहूबली नेते असल्यामुळेच एफआयआर दाखल केली नाही,असेही म्हणता येणार नाही.या मागे अनेक कारणे गुंफलेली असून ,संघांवर वर्चस्व व पैशांचं राजकारण या मागे दडलं असल्याचा ही आरोप केला जात आहे.मात्र,दिल्लीश्‍वरांकडून काहीच हालचाल होत नसल्याचे बघून कुस्तीगिरांनी सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले आणि सर्वोच्च न्यायालयाचे लैंगिक शोषणाविषयी गंभीर निर्देश आहेत, की पोलिसांनी त्यांच्याकडे आलेली लैंगिक शोषणाची कोणतीही तक्रार तातडीने व गांर्भियाने आधी नोंदवावी,नंतर तपास करावा.देशाच्या राजधानीत मात्र विपरितच घडले.

चार महिन्यांच्या आंदोलनानंतरही पोलिसांनी एवढ्या गंभीर आरोपांची दखल न घेतल्याने सर्वोच्च न्यायालयाला तसे आदेश द्यावे लागले.आता ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या विरोधात पोस्कोसारख्या गंभीर गुन्ह्यासोबतच लैंगिक शोषणाची कलम देखील लाऊन गुन्हा नोंदविण्यात आला आहे.याचा अर्थच भाजपच्या या बाहूबली नेत्याला प्रदीर्घ अशी राजकीय लढाई लढावी लागणार आहे.स्वत:ला निर्दोष सिद्ध करावं लागणार आहे तोपर्यंत त्यांची राजकीय कारकीर्दच चांगलीच उतरणीला लागणार आहे.यासोबत त्यांच्या खासदार पत्नी,एक आमदार मुलगा व दुसरा मुलगा जो रेसलर फेडरेशनच्या अध्यक्षपदी आहे त्यांच्या देखील राजकीय सोपाणाला चांगलाच हादरा बसल्याशिवाय राहणार नसल्याचे बोलल्या जात आहे.मोदींच्या ‘खामोशीत’ खूप काही दडलं असतं हे एव्हाना त्यांच्या विरोधकांनीच नव्हे तर समर्थकांनी देखील ओळखून घ्यायला हवे,असे देखील ‘अंदाज-ए- बयां’समाज माध्यमांवर वाचायला मिळत आहे.

निश्‍चितच देशाचे नाव या कुस्तीगिरांनी उंचावले मात्र वैयक्तिकरित्या खेळांसाठी कोणते योगदान दिले?असा सवाल आता या आंदोलनजीवींना अनेक क्रीडापटूंतर्फे विचारला जात आहे.पदके मिळवली पण खेळाच्या विकासासाठी काय केले?ग्रामीण भागातील खेळ प्रतिभा उंचावण्यासाठी कोणता पुढाकार घेतला?आंदोलनाला बसले मात्र हे सगळं करुन यातून खेळाचं काय भलं झालं?विशेष म्हणजे कोणाचं भलं झालं?या आंदोलनामुळे जागतिक पाातळीवर देशाचे नाव बदनाम झाले हे कोणीही नाकारु शकत नाही मात्र अन्याय झाला असेल तर न्याय हा मिळालाच पाहिजे.यासाठीच मोदींनी आता या दोन्ही गटांना व या दोन्ही गटांच्या समर्थकांना खेळ,संघ आणि आरोप-प्रत्यारोपांपासून तातडीने दूर केले पाहिजे,अशी मागणी अनेक क्रीडापटूच आता करीत आहेत.

देशातील पारदर्शी क्रीडपटूंना या क्रीडा संघांची धूरा सोपविण्यात यावी आणि खेळाचे भले करावे.सर्वात आधी तर ‘पक्षाचं’राजकारण बाजूला ठेऊन क्रीडा मंत्र्यांचीच उचलबांगडी करावी जे सध्या सत्तेच्या मस्तीत मदमस्त डूलत असल्याची टिका करीत, ज्यांना भारतीय क्रीडा जगताची जगात झालेली बदनामी थांबवता आली नाही,आंदोलनकारी कुस्तीगिरांच्या अारोपांबाबत तातडीने प्रभावी अशी कारवाई करता आली नाही.हे क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांच्या कामगिरीचे अपयशच असल्याचे आता बोलले जात आहे.अश्‍या प्रभावहीन व कर्तृत्वशून्य मंत्र्यांचा भार आणि कार्यभार मोदी सरकार उचलत राहील्यास यातून कोणातेही भले होणार नाही.

याप्रकरणामुळे अतिशय खालच्या स्तरावरचे राजकारण खेळले जात आहे ज्यात सर्वच राजकीय पक्ष अगदी रॉबर्ट वाद्रा ज्यांचे स्वत:चे भ्रष्टाचाराचे किस्से हरियाणाच्या जमीनीच्या संदर्भात व अशाच काही फेडरेशनच्या संदर्भात जगभर रंगले आहेत, त्यांनी येऊन आंदोलनकारी कुस्तीगिरांना समर्थन जाहीर करावे हे म्हणजे जरा ‘अतिच’झाले असल्याचा रोष ही समाज माध्यमात उमटलेला दिसून पडतो.हे म्हणजे कंबरेचं सोडून डोक्याला गुंडाळण्याचाच प्रकार झाला.

या आंदोलनासाठी गाद्या,पंखे,कूलर,जेवण न्यायालयीन लढाई इत्यादीवर कश्‍याप्रकारे काटकसरीने आपापल्या खिशातून खर्च होत आहे याची यादीच आंदोलनकारींनी माध्यमांपुढे वाचली तर दूसरीकडे भाजपचे बाहूबली हे देखील आज दिवसभर माध्यमांसमोर आपले निर्दोषत्व मांडताना दिसून पडत होते.एफआयआर,न्यायालय,न्यायावरचा त्यांचा विश्‍वास…हे सर्व ऐकण्या सारखं होतं!

मोदी सरकारने आता भारतीय कुस्ती महासंघाच्या निवडणूकाच स्थगित केल्या असून, या निवडणूका घेण्यासाठी एक हंगामी समिती स्थापित करण्याची सूचना भारतीय ऑलिम्पिक संघटनेला कालच सोमवारी दिली.मोदींची कार्यशैली बघता या दोन्ही गटांना आता खेळ आणि खेळ संघांच्या राजकारणापासून दूर ठेवले जाईल आणि तेच भारतीय खेळाच्याही हिताचे राहील,असा देखील सूर उमटलेला दिसून पडतोय.

येणारा काळच कोण खरं,कोण खोटं?याचे उत्तर देईल. या आंदोलनामुळे देशाला काय फायदा झाला?याची चर्चा आता सुरु झाली आहे.हे आंदोलन स्वार्थासाठी असून देशासाठी नाही असे देखील बोलले जात आहे.अव्वल माजी धावपटू पी.टी.उषाने या आंदोलनकारी कुस्तीपटूंच्या विरोधात घेतलेली भूमिक़ा यापासून तर मराठी मनाचे नेते राज ठाकरे यांना अयोध्येत रामललाच्या दर्शनासाठी अयोध्येत पाय ही न ठेऊ देण्याची वल्गना करणारे व त्यासाठी अयोध्येत मोठा रोड शो करुन दंड थोपटणारे भाजपचे बाहूबली खासदार ब्रिजभूषण, यांनाच आता रामललांसारखा त्यांच्याच पक्षाकडून राजकीय वनवास मिळतो का?किंवा बिहारच्या लालू यादवांसारखी कारागृहातील जीवनशैली अंगिकारावी लागेल?याकडे आता संपूर्ण जगाचेच लक्ष लागले आहे.

…………………………………………………

 

- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या