जरा विसावू या वळणावर..
‘भले बुरे ते घडून गेले,विसरुन जावू सारे क्षणभर,जरा विसावू या वळणावर..’ भक्ती आणि भावगीतांचा सुरेल कार्यक्रम नुकताच नुपूर संगीत अकादमी आणि कला आराधनातर्फे हिंगणा टी-पॉईंट येथील गजानन महाराज मंदिरात पार पडला. ‘ओंकार स्वरूपा’ या अभय पांडे यांनी गायलेल्या भक्ती गीताने कार्यक्रमाची सुरवात झाली. या नंतर ‘गण गण गणात बोते’ हे गीत रचना खांडेकर-पाठक हिने समरसून सादर केले. शहरातील ज्येष्ठ गायक गुणवंत घटवाई यांचे विशेष मार्गदर्शन या गीतासाठी रचना यांना मिळाले.
यानंतर भाग्यश्री शिंगरू यांनी’मोगरा फुलला’,पूजा पाठक यांनी’तुझं मागतो मी आता’,वैशाली सिरसट यांनी’विसरू नको श्री रामा मला’,महेश मगरे यांनी’पंढरीचा राजा’,करुणा दांडेकर यांनी ‘अरे अरे ज्ञानदेवा मला’,दीपाली जोगळेकर यांनी ‘आई भवानी तुझ्या कृपेने’,नंदा तायडे यांनी’ज्योत से ज्योत जगाते चलो’, अभय पांडे यांनी ‘या जन्मावर या जगण्यावर’ इ एकाहून एक सरस गीते सादर करून श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. रचना यांनी नूतन वर्षांनिमित्त श्रींच्या चरणी ‘भले बुरे ते घडून गेले’ ही स्वर सुमानंजली वाहिली. पुष्पा जोगे यांनी ‘सत्यम शिवम सुंदरम’ ‘तुम आशा विश्वास हमारे’ ही गीते सादर केली.महेश मगरे यांनी गायलेल्या ‘अयोध्येचा राजा’भैरवीनी कार्यक्रमाची सांगता झाली. निवेदन कांचन भालेकर यांचे होते. संवादीनीवर ज्येष्ठ वादक प्रशांत उपगडे तर तबल्यावर विशाल नायडू यांनी उत्कृष्ट साथसंगत केली. मंदिराचे अध्यक्ष अशोक नारखेडे यांनी आभार मानले.