तत्पूर्वी कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी कांचन गडकरी, आळंदीचे ह.भ.प राम महाराज जिंतूरकर, नागपूरचे ह.भ.प प्रमोद महाराज ठाकरे, ह.भ.प संदीप महाराज कोहळे आणि कोलबा स्वामी देवस्थानचे ह.भ.प विकास भिशीकर महाराज, विश्वनाथ कुंभलकर यांनी दीपप्रज्वलन केले आणि विठ्ठलाची पूजा करून कार्यक्रमाची विधिवत सुरवात केली. यावेळी किरण रोकडे, महिला अध्यक्ष, पतंजली पीठाच्या योगासन शिक्षिका उर्मिला जुवारकर, पतंजलि नागपूरच्या माधुरी ठाकरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
जय जय राम कृष्ण हरी, गजर हरिनामाचा, विठू माझा लाडका, ज्ञानबा तुकाराम .. अश्या विविध भजनांवर वारकऱ्यांसह उपस्थित लहान मोठ्या सर्वांनी ताल धरला. यावेळी टाळकरी, वारी मधल्या हरिनाम भजनांवर कश्या प्रकारे चालले जाते, कुठले खेळ खेळले जातात याची प्रात्यक्षिके करून सर्वांना सहभागी करून घेत होते. काही महिलांनी यावेळी विठ्ठल रुक्मिणीची वेशभूषा केली होती. याशिवाय वारीची खरी गंमत अत्यंत उत्साहाने अनुभवता यावी म्हणून योगाभ्यास घेण्यात आला. शरीर आणि मन शुद्ध करणाऱ्या योग – हरिनाम यांचा संयुक्त अनुभव उपस्थितांनी घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रेणुका देशकर यांनी केले.
संत्रानगरीत अवतरली अवघी पंढरी
– आबाल वृद्ध वारकऱ्यांच्या भव्य रिंगणाने डोळ्यांचे फिटले पारणे
– -खासदार सांस्कृतिक महोत्सवाचा पाचव्या दिवशी
जीव ब्रम्ह ऐक्याचा अमृतानुभव; दिव्य भक्तीरसाने श्रोते मंत्रमुग्ध
आषाढ सरींचा पहिला शिडकावा आला की ओढ लागते ते पंढरपूरच्या वारीची. जनसामान्यांच्या मनात असलेली सगुण – निर्गुण, निराकार स्वरुपातील त्या भक्तवत्सल सावळाईच्या भेटीची अभिलाषा आज संत्रानगरीत भाविकांना पूर्ण करता आली.
निमित्त होते विश्व वारकरी सेवा संस्थेतर्फे २००० वारकऱ्यांनी टाळ मृदुंगाच्या गजरात सादर केलेल्या ‘अभंगवारी’ – या नाट्य, नृत्य व संगीतमय आविष्काराचे.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या व कलागुणांचा संगम असलेल्या खासदार सांस्कृतिक महोत्सवाच्या आज, पाचव्या दिवशी हा अप्रतिम भक्तिरसमय कार्यक्रम सादर करण्यात आला. हनुमाननगरातील क्रीडा चौक येथील ईश्वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या पटांगणात हा महोत्सव सुरू आहे. याप्रसंगी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, संस्कार भारतीच्या प्रमुख कांचन गडकरी, हभप विठ्ठल महाराज नामदास, संजय पाचपोर, श्रीरामपंत जोशी, प्रमोद ठाकरे, प्रशांत धर्मापुरीकर, सचिन पवार, ज्ञानेश्वर रक्षक, संभाजी पाटील निलंगेकर, उद्योगपती अतुल गोयल, आयुर्वेद विद्यालयाचे प्राचार्य डॉ. मिश्रा, उद्योगपती नितीन खारा, आ. प्रवीण दटके, आ. मोहन मते, राम झिंझुरकर आळंदे , अनिल अहिरे, आ. अडसड, आ. समीर कुणावर आदी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
रामकृष्ण हरी हा वारकरी संप्रदायाचा बिजमंत्र व पांडुरंगाच्या ध्यानाचे वर्णन करून, महाराष्ट्राच्या समृध्द सांस्कृतिक संस्कृतीचे अविभाज्य घटक असलेल्या ‘अभंगवारी ‘ चा प्रारंभ झाला, तेव्हा मंचावर तीर्थक्षेत्र पंढरपूर अवतरल्याची अनुभूती रसिकांना आली. १००० टाळकरी , ५० मृदंगवादक , ५० तबलावादक, २५० गायक , ५०० नाट्य कलाकार, घोडे , पालख्या , भालदार , चोपदार , पताकाधारी असलेला हा संपूर्ण भारतातील वारीचा पहिला भव्य कार्यक्रम होता.
याप्रसंगी भक्तिभाव निर्माण करणारी काकड आरती, रखुमाईचे आर्जव, सकल संतांची दिंडी, वारीची परंपरा, तुळशीधारी महिलांची आळवणी, वारीचा दैदिप्यमान प्रस्थान सोहळा, संतांच्या पालखी सोहळ्याचा इतिहास, वारीचा प्रवास, गवळण, वारीतील संतांच्या भेटीचा अविस्मरणीय क्षण, अश्वाचे गोल रिंगण, पावल्या, हमामा फुगडी धावा इत्यादी मैदानी खेळ , संतांचे पंढरपुरात होणारे आगमन, पंढरपुरात साजरा होणारा आषाढी पर्व काळ व्यासपीठावर अभूतपूर्वरित्या उभा करण्यात आला. कर्म, धर्म, जीवन, मुक्ती, जीवाशिवाचा विसावा असलेल्या विठ्ठलाच्या दिव्य जयघोषाने परिसर दुमदुमून गेला. जीव ब्रम्ह ऐक्याच्या अमृताभवाने रसिक तृप्त झाले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रेणुका देशकर आणि विश्व वारकरी संस्थेचे संदीप कोहळे यांनी केले.
उपस्थित मान्यवरांचे स्वागत खासदार सांस्कृतिक महोत्सव आयोजन समितीचे अध्यक्ष प्रा. अनिल सोले, अशोक मानकर, दिलीप जाधव, सचिव जयप्रकाश गुप्ता, कोषाध्यक्ष प्रा. राजेश बागडी, सदस्य बाळासाहेब कुलकर्णी, सारंग गडकरी, डॉ. दीपक खिरवडकर, गुड्डू त्रिवेदी, आशिष वांदिले, नितीन तेलगोटे, मनिषा काशीकर, पिंटू कायरकर, बाळासाहेब कुलकर्णी यांनी केले.
मंचावर उभारले महाद्वार
जय जय रामकृष्ण हरी लिहिलेली व विठ्ठल रुखमाईच्या धीरगंभीर मंदिराचा आभास निर्माण करणारी, वारकरी पंथाला साजेशी मंच सजावट आज करण्यात आली होती. विठ्ठल – रखुमायीची गळ्यात तुळशीमाळ ल्यालेली व कटीवर कर ठेऊन उभी असलेली सजीव मूर्ती उपस्थितांचे लक्ष वेधून घेत होती
कॅलिग्राफीतून ‘अक्षरवारी’
अक्षरायन स्कूल ऑफ कॅलिग्राफीचे
राजीव चौधरी यांनी कॅलिग्राफीतून वारी दर्शन घडवले. अक्षर कुंचल्यातून त्यांनी विठुरायाच्या कलात्मक प्रतिमा रंगवून कार्यक्रमात रंग भरले. त्यांना सरोज चौधरी, संजय वानखेडे, संजीव मेंढे, आसावरी मेंढे, दर्शन कढव, शुभम तरेकर, साची मारवाडे यांचे सहकार्य लाभले.
***
आज महोत्सवात…
बुधवार, १८ रोजी सकाळी ७ वा. भक्तिमय वातावरणात श्री गणपती अथरवशीर्ष पठण व सायं. ६ वा. अभिजात मराठी – भव्य सांगीतिक कार्यक्रम होईल. या कार्यक्रमातून संत ज्ञानेश्वर, चार्वाक, संत तुकारामांपासून ग. दि. माडगूळकर, पु. ल. देशपांडे, वि. वा. शिरवाडकरांपर्यंत सर्वांना मानाचा मुजरा करणा-या या कार्यक्रमात अजित परब, मुग्धा वैशंपायन, सावनी रविंद्र, सोनिया परचुरे, संकर्षण क-हाडे, आनंद इंगळे, मृण्मयी देशपांडे, भार्गवी चिरमुले, गिरीजा ओक यांच्यासह अनेक कलाकारांचा समावेश राहील.
***
२३ तारखेच्या केवळ ‘डिजिटल पासेस’
खासदार सांस्कृतिक महोत्सवाचा समारोप सोमवार, २३ डिसेंबर रोजी प्रसिद्ध पार्श्र्वगायक जुबिन नौटियाल यांच्या ‘लाईव्ह इन कन्सर्ट ‘ ने होणार आहे. या कार्यक्रमाच्या पासेस प्रिंट करण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे रसिकांना केवळ डिजिटल स्वरूपातील पासेस मिळतील. या पासेस विविध प्रसिध्दी माध्यमांवर असलेला ‘क्यूआर कोड ‘ स्कॅन करून मोबाईलवर प्राप्त करता येतील व कार्यक्रमाचा आनंद घेता येईल. पासेससाठी कार्यालयात गर्दी करू नये, असे आवाहन आयोजन समितीतर्फे करण्यात आले आहे.