– रेल्वेच्या लाकडी स्लीपरने डोक्यावर प्रहार
– पहाटे सव्वा तीन वाजताची घटना
– घटनेपूर्वी एका प्रवाशाला केली मारहाण
– लोहमार्ग पोलिसांची पेट्रोलिंग असती तर वाचला असता प्रवाश्यांचा जीव: रेल्वे स्थानकावर चर्चा
नागपूर,ता.७ ऑक्टोबर २००४: एका माथेफिरूने इसमाने पन्नास किलो वजनी रेल्वेच्या लाकडी स्लीपरने झोपेतील प्रवाशांचे डोके ठेचून रक्तबंबाळ केले. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून चारही जखमींना मेयो रूग्णालयात नेले असता दोघांचा मृत्यू झाला. ही थरार घटना सोमवारी पहाटेच्या सुमारास नागपूर रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफार्म नंबर ६/७ वर घडली.
गणेशकुमार डी. (५२) रा. तामिलनाडू असे मृतकाचे नाव आहे. दुसर्या मृतकाची ओळख पटली नाही. भगवान जखरेल (५०) आणि बलवंत जाटव (४५) रा. ग्वॉलेर अशी
जखमींची नावे आहेत. लाकडी स्लीपर गाढ झोपलेल्या प्रवाश्यांना मारण्यापूर्वी आरोपीने दिनेश मेश्राम या प्रवाशालाही हातबुक्कीने मारहाण केली. लोहमार्ग पोलिस पेट्रोलिंगवर असते तर ही घटना घडलीच नसती अशी रेल्वे स्थानकावर चर्चा आहे.
या घटनेमुळे प्रवाशात भीतीचे वातावरण पसरले आहे.घटनेची गंभीरता लक्षात घेता लोहमार्ग पोलिस अधीक्षक डॉ. अक्षय शिंदे यांनी घटनास्थळी भेट देवून घेतली आणि गुन्हा नोंदविण्याचे निर्देश दिले. पोलिसांनी आरोपी विरूध्द हत्येचा गुन्हा नोंदवून घटनेच्या काही वेळातच आरोपीला अटक केली. जयराम केवट (४५) रा. उत्तरप्रदेश असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. दिनेशच्या माहितीवरून पोलिस आरोपीच्या शोधासाठी निघाले. दरम्यान आरोपी रेल्वे रूळावर एका मुलाशी बोलत होता. त्याच वेळी पोलिसांनी त्याला पकडले.
या थरार ज्या प्रत्यक्षदर्शीने बघितला तो दिनेश मेश्राम (३५) बडनेरा येथे राहातो. तो बुटीबोरी परिसरात मजुरीचे काम करतो. घरी जाण्यासाठी तो नागपूर रेल्वे स्थानकावर गेला होता. सकाळी तो रेल्वेने बडनेर्यासाठी निघणार होता. रात्र झाल्यामुळे तो फलाट क्रमांक ६/७ वर आराम करीत होता. दरम्यान आरोपी जयराम केवट हा फलाटावर आला. त्याने दिनेश सोबत वाद घातला. चप्पल आणि हातबुक्कीने मारहाण केली. घाबरलेला दिनेश जीव मुठीत घेवून पळाला.
दरम्यान, आरोपीने रेल्वे रूळाशेजारी पडलेली लाकडी स्लीपर उचलली. स्लीपरने गाढ झोपेतील प्रवाशांच्या डोक्यावर, छातीवर मारले. प्रवासी रक्तबंबाळ झाले. घटनास्थळी रक्ताचा सळा पडला होता. यानंतर आरोपी फुट ओव्हर ब्रिजने ईटारसी मार्गाकडे निघाला. हे दृष्य दूरवर उभा असलेल्या दिनेश पाहात होता.
या घटनेची माहिती आरपीएफ कंट्रोलकडून लोहमार्ग पोलिसांना मिळाली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून जखमींना मेयो रूग्णालयात दाखल केले. त्यापैकी दोघांचा मृत्यू झाला. एका जखमीवर खाजगी रूग्णालयात उपचार करण्यात आले. दिनेश हा प्रत्यक्षदर्शी असल्याने पोलिसांनी त्याचे बयान नोंदवून घेतले. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. या घटनेचा तपास पोलिस निरीक्षक गौरव गावंडे करीत आहेत.
…………………………………