नऊ वर्षीय मुलीवर बलात्कार करणारा गजाआड
परिसरातच राहत होता ५६ वर्षीय आरोपी
नागपूर,ता.२२ सप्टेंबर २०२४: पारडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहणा-या नऊ वर्षीय मुलीवर बलात्कार करुन फरार झालेल्या बलात्कारी आरोपीला गुन्हेशाखा पोलिसांनी अखेर शोधून काढले.शर्ट व मोटरसायकलवरील सीटकव्हर बदलले तरी पोलिसांनी त्याला गजाआड केले.सलून,पेपर वितरक व लाँड्रीवाल्यांकडून त्याची माहिती घेत त्याला अटक केली.
पोलिस अायुक्त डॉ.रवींद्रकुमार सिंगल यांनी शनिवारी सिव्हिल लाइन्समधील पोलिस भवन येथे पत्रपरिषदेत याबाबत माहिती दिली.
गणपत तानाजी जयपूरकर(वय ५६,रा.पारडी)असे अटकेतील इसमाचे नाव आहे.दोन वर्षांपूर्वी गणपतविरुद्ध गणेशपेठ पोलिस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल आहे.गणपत हा सुतारकाम करतो.त्याचा पत्नीसोबत वाद सुरु आहे.१५ सप्टेंबरला त्याच्याकडे गणपतीची पूजा होती.भटजी शोधण्यासाठी तो मोटारसायकलने निघाला होता.यादरम्यान त्याला पारडी परिसरात दोन मुली घरी एकट्या दिसल्या.तो त्यांच्या घरात घुसला.त्याने नऊ वर्षीय चिमुकलीवर बलात्कार केला.तिच्या हातात २० रुपये ठेऊन पसार झाला.
सायंकाळी ही घटना उघडकीस आली.या घटनेने पोलिसांमध्ये खळबळ उडाली.सिंगल यांनी या घटनेचा तपास गुन्हेशाखेचे उपायुक्त राहूल माकणीकर यांच्याकडे सोपवला.माकणीकर,साहाय्यक आयुक्त डॉ.अभिजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हेशाखेच्या पाच पथकानी बलात्कार करणा-या आरोपीचा शोध घेतला.पोलिसांना आरोपीचा शर्ट व दुचाकीच्या सीटकव्हरचा रंग माहिती होता.सीसीटीव्ही व दूकानदारांकडून माहिती गोळा करण्यात आली.
सीसीटीव्ही फूटेजच्या आधारे त्या परिसरातून आरोपी बाहेर पडताना दिसलाच नाही त्यामुळे आरोपी परिसरातीलच असल्याची पोलिसांची शंका खरी ठरली.आरोपीच्या स्केचच्या आधारे परिसरातील दूकानदारांकडून माहिती मिळताच पोलिस आरोपीच्या दारावर पोहोचले.खात्री पटताच,आरोपीला अटक करण्यात आली.त्याने लाल रंगाचे सीटकव्हर जाळल्याची माहिती पोलिसांना दिली.
पोलिसांची पाच पथके-
उपायुक्त राहूल माकणीकर यांनी आरोपीचा शोध घेण्यासाठी संपूर्ण गुन्हेशाखेला कामाला लावले.भरोसा सेलच्या निरीक्षक सीमा सुर्वे यांच्याकडे पीडित मुलगी व तिच्या नातेवाईकांकडून आरोपीबाबत माहिती गोळा करण्याचे काम सोपविले होते.यूनिट पाचचे निरीक्षक राहूल शिरे यांनी अभिलेखावरील गुन्हेगारांची झाडाझडती घेतली.त्यांनी,सलून,दारुभट्टी व कपडे प्रेस करणा-यांकडूनही माहिती गोळा केली.साहाय्यक पोलिस निरीक्षक मयूर चौरसिया यांनी पारडीपासून ते आरोपीच्या घरापर्यतचे सीसीटीव्ही फूटेज तपासले.उपनिरीक्षक अनिल इंगोले यांनी संशयित व घटनास्थळा परिसरातील नागरिकांचे बयाण नोंदवले.सायबर सेलचे विवेक झिंगरे यांनी मोबाईल टॉवरचा डमडेटा व संशयितांच्या मोबाईल क्रमांकाचे विश्लेषण केले.पारडीचे पोलिस उपनिरीक्षक अरविंद कोल्हारे यांनी श्रमिकांची माहिती गोळा केली होती.
पत्रकार परिषदेला अतिरिक्त पोलिस आयुक्त संजय पाटील,उपायुक्त राहूल माकणीकर व साहाय्यक पोलिस आयुक्त डॉ.अभिजित पाटील उपस्थित होते.
……………………..