विरोधकांचे गृहमंत्र्यावर ताशेरे
नागपूर,ता.१९ ऑगस्ट २०२४: राज्याचे उपमुख्यमंत्री व गृहखातंच ज्यांच्या हातात आहे अश्या देवेंद्र फडणवीस यांच्या शहरातील एका पोलिस ठाण्यातील व्हायरल झालेल्या व्हिडीयोने राज्यात चांगलीच खळबळ माजवली. कळमना पोलीस चौकीत अंगावर खाकी वर्दी मध्ये असतानाही तेथील कर्मचारी चक्क चौकीतच जुगार खेळतानाची चित्रफित समाजमाध्यमांवर व्हायरल झाली. त्यामुळे पोलीस दलात एकच खळबळ उडाली.इतकंच नव्हे तर पोलिस चौकीतील खाकी वर्दीतील कर्मचारी चक्क सिगारेटचे झुरके घेत पत्ते खेळण्याचा आनंद घेत असताना दिसून पडत आहे. या घटनेमुळे विरोधकांना गृहमंत्री फडणवीस यांच्यावर तोंडसुख घेण्याची चांगलीच संधी मिळाली.राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी फडणवीस यांनी आधी त्यांच्या शहरात त्यांच्याच अख्त्यारित असणा-या गृहविभागात काय घडतंय याची काळजी वाहावी ,असे सांगत फडणवीस यांच्या कारभारावर खरपूस टिका केली.उपराजधानीतील पोलिसांच्या या करामतीचे वृत्त आज सगळ्या प्रादेशिक वृत्त वाहीन्यांमध्ये ठलकपणे प्रसारित झाले व संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोप-यात ते बघितले गेले!
या व्हायरल व्हीडीयोमुळे पोलिसांची प्रतिमा ‘पुन्हा’एकदा मलिन झाली.(या पूर्वी ती अनेकदा झाली आहे,हे सांगायची गरज नाही)पोलीस उपायुक्त निकेतन कदम यांनी दोन्ही दोषी पोलीस कर्मचाऱ्यांवर निलबंनाची कारवाई केली मात्र,हा व्हिडीयो लांबून घेण्यात आल्यामुळे इतर आणखी कोण या ‘सत्कृत्यात‘ सहभागी होते,याचा छडा आता पोलिसांनाच ‘प्रामाणिकपणे‘ लावायचा आहे,हे विशेष.
कळमना पोलीस ठाण्यातील वादग्रस्त पोलीस कर्मचारी मनोज घाडगे आणि शाहू साखरे यांच्यासह काही कर्मचारी कळमना गाव पोलीस चौकीत चक्क जुगार खेळत होते. तसेच एक पोलीस कर्मचारी सिगारेटचे झुरके घेत होता. बराच वेळ पोलिस चौकीत ही ‘बेकायदेशीर’कवायत सुरु होती.यादरम्यान चौकीत तक्रार करण्यासाठी एक तक्रारदार आला. त्यावेळी पोलीस कर्मचारी जुगार खेळण्यात व्यस्त होते. त्या तक्रारदाराचे कुणीही ऐकून घेत नव्हते. त्यामुळे हतबल झालेल्या तक्रारदार व्यक्तीने शेवटी आपल्या भ्रमनध्वणीने, जुगार खेळणाऱ्या पोलिसांची चित्रफित बनवली.
ही चित्रफित किमान एक वर्ष तरी जुनी असल्याची चर्चा आहे.मात्र,ती चित्रफित समाजमाध्यमांवर आता व्हायरल झाली. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी या चित्रफितची गांभीर्याने दखल घेतली,ती घेणे कायदेशीररित्या भाग होते,कारण गुन्हा हा कितीही आधी घडला असला तरी,काळाच्या ओघात त्याचे ‘गांर्भीय‘कमी होत नाही.या घटनेत तर बेकायदेशीर कृत्यात स्वत: पोलिस कर्मचारीच ‘उजागिरीने’सहभागी होते.ना जनाची,ना मनाची,ना कायद्याची,ना वरिष्ठांची भीती त्यांच्यात होती. पोलिस चौकीच्या आत बसून बेकायदेशीर कृत्य करणे जणू हा त्यांचा ‘कायदेशीर’ हक्क आहे,असा त्यांचा समज दृढ असल्याचे व्हायरल झालेल्या व्हीडीयो मधून दिसून पडतो.
शहरातील विविध पोलीस ठाण्यात कधी कोणते दृष्य उमटेल याचा नेम नाही मात्र,किमान एका वर्षानंतर का होईना व्हायरल झालेल्या व्हीडीयोने असे बेकायदेशीर कृत्य करणा-या पोलिस कर्मचा-यांना ही समज दिली आहे‘कानून के हात सचमूच बहोत लंबे होते है!’त्यामुळे इतरही पोलिस ठाण्यात जुगार खेळणे,सिगारेट ओढने, मद्य प्राशन करने,खंडणी मागणे,पैसे उकळणे,तक्रार दाबून ठेवणे,एफआयआर मधून काही नावे अर्थपूर्ण कारवाईतून गायब करने,असे कृत्य करणा-यांना योग्य समज मिळाला आहे,असा ‘भाबडा’ समज नागपूरकरांचा झाला आहे.
या प्रकरणी कडक शिस्तीचे पोलीस आयुक्त काय कारवाई करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. पोलीस ठाण्यात किंवा गुन्हे शाखेच्या युनिटमध्ये पोलीस कर्मचारी जुगार खेळत असल्याचे यापूर्वीही उघडकीस आले आहे. काही वेळा त्या संदर्भातील व्हीडीयोज ही सोशल मिडीयावर व्हायरल झाल्या आहेत. काही महिन्यांपूर्वी पोलीस निरीक्षक मुकुंद ठाकरे यांच्या नेतृत्वात कार्यरत असलेल्या गुन्हे शाखेच्या युनिट तीनमधील काही कर्मचारी जुगार खेळत होते. एका पोलीस कर्मचाऱ्यानेच त्यांचे छायाचित्रण केले आणि प्रसारमाध्यमांना पाठवले होते. तसेच गिट्टीखदान आणि वाडी पोलीस ठाण्यातील डीबीचे कर्मचारीसुद्धा जुगार खेळताना आढळले होते. तसेच परिमंडळ पाचच्या एसीपी कार्यालयातही पोलीस कर्मचारी मद्य प्राशन करताना व जुगार खेळताना आढळले होते!
दोन्ही पोलीस कर्मचारी निलंबित-
मनोज घाडगे हा कर्मचारी वादग्रस्त असून पूर्वी कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रेती वाहतूक करणाऱ्यांकडून वसुली करण्यासाठी ओळखला जायचा. मनोजसह त्याचे दोन अन्य साथिदारही वसुलीत मग्न होते.सध्या दोन्ही कर्मचारी बीट मार्शल म्हणून कार्यरत नाहीत. दोन्ही पोलीस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली आहे, अशी प्रतिक्रिया पोलीस उपायुक्त निकेतन कदम यांनी दिली.