फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeब्रेकिंग न्यूजअस्मिता टिकवायची तर मराठी भाषा टिकवा- लक्ष्मीकांत देशमुख

अस्मिता टिकवायची तर मराठी भाषा टिकवा- लक्ष्मीकांत देशमुख

 अस्मिता टिकवायची तर मराठी भाषा टिकवा- लक्ष्मीकांत देशमुख

नागपूर: भाषा मरते तेव्हा देशही मरतो आणि संस्कृतीचा दिवा विझतो, मराठी भाषा ही आपली अस्मिता आहे मात्र आपली अस्मिता टोकदार नसल्याचे विधान सुप्रसिद्ध साहित्यिक व विचारवंत लक्ष्मीकांत देशमुख यांनी केले. ते उच्च तंत्र शिक्षण विभाग, महाराष्ट्र शासन व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातर्फे मराठी भाषा दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी रातुम विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सिद्धीविनायक काणे, प्र-कुलगुरू डॉ.प्रमोद येवले,प्रभारी कुलसचिव डॉ.नीरज खटी उपस्थित होते.

पुढे बोलताना देशमुख म्हणाले,की २०१० साली करुणानिधी यांनी तमिल साहित्य संमेलनात ५०० कोटी रुपये खर्च केले,याच देशात एकेकाळी हिंदी आणि उर्दूमध्ये शिक्षण घेऊन यशस्वी वकील,डॉक्टर्स घडले होते, त्याकाळी इंग्रजी भाषेची अनुवादित पुस्तके भारतीय भाषेत झाली होती मात्र आज चित्र हे निराशाजनक असुन पुन्हा मराठी साहित्याकडे वळले पाहिजे. आज पुस्तक विक्रीची व्यवस्था नाही.शासनाने प्रत्येक तालुक्याला विक्री पुस्तक योजना राबवावी,अनुवादक केंद्र स्थापन करावे,प्रत्येक विद्यापीठात मराठी भाषा विभाग स्थापन करून ‘गाव तिथे ग्रंथालय’ चळवळ राबवावी. आज महाराष्ट्रातील ४० हजार गाव असलेतरी फक्त १२ हजार ग्रंथालय आहेत. वाचन संस्कृती आणि वाचन संस्कार नष्ट होत चालली आहे. देहाला अन्न लागतं त्याप्रमाणे आत्म्याला साहित्य किंवा ग्रंथ लागतात. अन्नाने शरीर बळकट होते मात्र मनाची वाढ आणि विचारांची बळकटी ग्रंथानीच वाढते. मराठी भाषा निदान घराततरी बोला, उत्तम इंग्रजीसह उत्तम मराठीही शिका कारण मराठी ही आपली ज्ञान भाषा असल्याचे ते म्हणाले. येत्या ३० वर्षात मराठी भाषा जपली नाही तर पुढच्या पिढीत मराठी राहणारच नाही. गुगलमध्येच आज १२० भाषेचे भाषांतरण उपलब्ध आहे यात मराठी भाषेचाही समावेश आहे. हे तंत्रज्ञान आणखी अद्यावत होत राहणार परिणामी आज मराठी भाषा न जपल्यास पुन्हा मराठी भाषा प्रतिष्ठापित करू शकणार नाही. महाराष्ट्रनामक संस्कृतीचे ऱ्हासपर्व सुरू झाले असून मराठी आणि महाराष्ट्रपण गमावून एक समृद्ध भाषा आणि संस्कृतीला आपण मारतोय,ही अपरिमित हानी असून भाषा मरते तेव्हा देश ही मरतो असे ते म्हणाले. केंद्र सरकारकडुन मराठीला अभिजात दर्जा मिळावा अशी मागणीही त्यांनी याप्रसंगी केली.

गडकरी अर्धसत्य सांगतात!!-

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे नेहमीच अमेरिकेतील रस्त्यांचे खूप कौतुक करतात मात्र ते अर्ध सत्य सांगतात. अमेरीकेत फक्त रस्ते नव्हे तर ग्रंथालयेही खूप समृद्ध आहेत. एका-एका ग्रंथालयात १६ ते २२ लाख ग्रंथ असून वाचन संस्कृती तिथे खोलवर रुजली आहे. एकाच वेळेस २५ ग्रंथ तेथील वाचक वाचनासाठी घेत असतो. वाचन हाच तिथे अभ्यासाचा भाग आहे,आपली अस्मिता मात्र टोकदार नाही,अशी खंत लक्ष्मीकांत देशमुख यांनी व्यक्त केली.

‘मराठीत्व’अमर आहे- कुलगुरू काणे

इंग्रजी भाषा ही परकीय असलीतरी आपण तिला इतर भारतीय भाषांप्रमाणेच सामावून घेतले आहे. आपण सुदैवी भारतीय असून आपल्याला अनेक भाषांची देणगी मिळाली आहे. मराठीत्व हे देखील अमर आहे,ती कधीही,कोणत्याही काळात विसरली जाऊ शकणार नाही असे विधान रातूम विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. काणे यांनी केले. आजही ठेच लागली की मुखातून ‘आई गं’ मातृभाषाच निघते, गेल्या २५ पिढ्या या ज्या प्रमाणे मराठी होत्या,पुढल्या २५ पिढ्याही मराठीच राहतील, मराठीला मरण नाही,असे ते म्हणाले. कुसुमाग्रज असो,ग.दि.माडगूळकर असो किंवा पु.लं असो, थोर साहित्यिकांची ही गंगा अबाधितच राहणार. पुढच्याही पिढीत कवी,साहित्यिक घडतच राहणार त्यामुळे आपल्या भाषेचे जतन करून,टिकवून इतर भाषांना सांभाळून घ्यायला काही हरकत नाही. खऱ्या अर्थाने हाच भाषा दिवस साजरा करण्याचा उद्देश्य आहे. बदल हा अविभाज्य घटक असल्याचे त्यांनी सांगितले. याप्रसंगी त्यांनी सावरकरांनी उद्रुत केलेली ‘सागरा प्राण तळमळला’ यातील ‘आईची झोपडी प्रासादापेक्षाही प्रिय वाटते’ या ओळी ऐकवून पुलवामा घटनेत जे ४४ सैनिक हुतात्मा झालेत आणि भारत सरकारच्या कारवाईने समस्त भारतवासीयांना जो आनंद झाला, भाषेच्या बाबतीतही अशीच समरसता असल्याचे उदाहरण त्यांनी दिले.

- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या