मुंबई: अरबी समुद्रात उभारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाची रचना बदलण्याचा विचार राज्य सरकारच्या स्तरावर सुरू आहे. याबाबत चार पर्याय समोर आले आहेत. शिवस्मारकाच्या तांत्रिक समितीची बैठक 27 नोव्हेंबर 2018 रोजी झाली होती. त्या बैठकीत शिवरायांचा अश्वारूढ पुतळा उभारण्यात येणाऱ्या अडचणींसोबतच अन्य पर्यायांचा विचारही करण्यात आला होता. गुजरातेत नर्मदा नदीच्या काठावर उभारलेल्या सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्यापेक्षा उंच पुतळा उभारण्याबाबत चाचपणी सुरू असल्याचे सरकारी अधिकाऱ्यांनी सांगितले.
छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारताना घोडीचे पुढील दोन पाय हवेत आणि मागील पाय चबुतऱ्यावर दाखवावे लागणार आहेत. अरबी समुद्रातील हवेचा जोरदार प्रवाह पाहता, अशा पद्धतीची रचना अयोग्य वाटत असल्याचे मत समितीच्या काही सदस्यांनी व्यक्त केले आहे. याच बैठकीत सल्लागार समितीने घोडीच्या पायांत काही बदल करत, स्मारकाच्या तीन रचना सादर केल्या.
सरदार वल्लभभाई पटेल यांच्या स्मारकाप्रमाणे शिवाजी महाराजांचा उभा पुतळा उभारावा, असा चौथा पर्यायही पुढे आला. विलेपार्ले येथे पश्चिम द्रुतगती महामार्गाजवळ छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाशेजारी असलेल्या शिवरायांच्या पुतळ्याच्या धर्तीवर अरबी समुद्रातील पुतळा असावा, असा पर्यायही समितीसमोर ठेवण्यात आला. या पर्यायांच्या प्रतिकृतींचे सादरीकरण समितीपुढे करण्यात आले. परंतु, अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही.
पटेल यांच्या स्मारकाहून अधिक उंच?
छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा सरदार वल्लभभाई पटेल यांच्या स्मारकाप्रमाणे साकारण्याचे निश्चित झाले; तर शिवस्मारकाची उंची 153 मीटर म्हणजे सरदार पटेल यांच्या पुतळ्याच्या 152 मीटर उंचीपेक्षा एक मीटर जास्त असावी, असे समितीने सुचवले आहे. सध्याच्या आरेखनानुसार शिवस्मारकाचा चबुतरा 88.8 मीटरचा असून स्मारकाची एकूण उंची 123.2 मीटर आहे.