‘देवा’भाऊंच्या जाहीरातींमुळे ओबीसी महासंघांमध्ये उभी फूट
खोटी जाहीरात दिल्याचे सिद्ध झाल्यास फडणवीसांवर दाखल करणार एफआयआर
महाराष्ट्रात ओबीसींच्या जीवावर हरियाणाची खेळी यशस्वी होणार नाही
नागपूर,ता.१४ ऑक्टोबर २०२४: आज शहराच्या झाडून पुसून हिंदी,मराठी,इंग्रजी अश्या सर्वच दैनिकांमध्ये पान भरुन एक जाहीरात प्रसिद्ध झाली.ज्यामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे संत तुकाराम महाराजांच्या वेषात असून ‘बहूजन हितासाठी ‘मी’ देवाभाऊंच्या पाठी,धन्यवाद देवेंद्रजी’असा मजकूर प्रसिद्ध झाला,ही जाहिरात राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या नावाने प्रसिद्ध झाल्याने आज शहरात एकच हलकल्लोळ माजला.डॉ.बबनराव तायवाडे समर्थक व विरोधक यांनी या जाहीरातीवरुन वेगवेगळी पत्रकार परिषद घेऊन, तायवाडे यांना जाब विचारला तर समर्थकांनी त्यांच्या बचावाचा पवित्रा घेतला मात्र,या जाहीरातीला तायवाडेंचा पाठींबा असल्याचे सिद्ध झाले तर आम्ही तायवाडेंचा राजीनामा घेऊ,अशी घोषणाच पत्रकार परिषदेत मंचावर बसलेल्या सदस्यांनी केली.
ओबीसी समाज हा संपूर्ण महाराष्ट्रात असून त्यांची कुठल्याही पक्षाशी बांधिलकी नाही,त्यांचे जे काही प्रश्न असेल ते वेगवेगळ्या व्यासपीठावर सोडवण्याचा ते प्रयत्न करीत असतात.पण,आजच्या जाहीरातीत भारतीय जनता पक्षाने असे चित्र उभे केले की महाराष्ट्रातील समस्त ओबीसी समाज त्यांच्या पाठीशी आहे.,त्यामुळे या जाहीरातीच्या पाठीशी कोण आहे?या जाहीरातीचा खर्च कोणी केला?ही जाहीरात राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या नावाने प्रसिद्ध करण्यात आली असून याला संमती देताना संपूर्ण ओबीसी समाजाचे पदाधिकारी या निर्णयात सहभागी होते का?याची चौकशी झाली पाहिजे मात्र,आमच्या असे लक्षात आले आहे की असा कुठला ही निर्णय झाला नसून एकतर्फी ,एका व्यक्तीने आपल्या स्वार्थासाठी घेतलेला हा निर्णय आहे.,त्यामुळेच आम्ही ही पत्रकार परिषद घेत असल्याचे सांगून, आम्ही या जाहीरातीचं जाहीर निषेध करीत असल्याचे त्यांनी सांगितले.कुठलीही ओबीसी संघटना राष्ट्रीय ओबीसी संघटनेच्या नावाने प्रसिद्ध झालेल्या जाहीरातीशी सहमत नसल्याचे त्यांनी सांगितले.
(छायाचित्र : हीच ती जाहिरात!)
एकीकडे ओबीसींचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत,अश्यावेळी अशी जाहीरात प्रसिद्ध करणे ही ओबीसीं समाजाच्या डोळ्यात निव्वळ धुळफेक आहे.छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासूनच ओबीसींमध्ये फूट पाडण्याचे षडयंत्र चालत असल्याचे एका प्रश्नाच्या उत्तरात त्यांनी सांगितले.
राष्ट्रीय ओबीसी संघटनेच्या पदाधिकारी कल्पना मानकर यांनी आज प्रसिद्ध झालेली जाहीरात आमच्या ओबीसी समाजासाठी फार मोठी शोकांतिका असल्याचे सांगितले.आज महाराष्ट्रात जाती-जातीमध्ये भांडणे लावली जात असल्याचे सांगून, महायुती सरकारला हे माहिती झाले आहे की त्यांची सत्ता परत येणार नाही,त्यामुळेच दिशाभूल करणा-या अश्या जाहीराती प्रसिद्ध केल्या जात आहे.ओबीसी महासंघ कोणत्याही राजकीय पक्षाच्या दावणीला बांधलेली नाही,असे जर असेल तर ही शाेकांतिकाच आहे.आमच्या जाहीरनाम्यात २४ संत आणि महापुरुषांचे विचार असून त्यांच्या विचारांवर चालणारी आमची संघटना आहे.ही जाहीरात खरंच राष्ट्रीय ओबीसी महासंघाने दिली आहे का?या विषयी आमचं बोलणं तायवाडे यांच्याशी झाले नाही कारण त्यांनी फोन उचलला नाही.त्यांनी ही जाहीरात दिली नसेल तर याची चौकशी झाली पाहिजे,अशी मागणी त्यांनी केली.
ऐन निवडणूकीच्या तोंडावर ही जाहीरात नेमकी कोणी दिली?या जाहीरातीच्या मागील उद्देश्य नेमका काय आहे?ओबीसी समाजाला गृहीत धरण्याचा प्रयत्न नेमका कोण करत आहे?किवा ओबीसी समाजाच्या जीवावर राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न कोण करत आहे?ओबीसींच्या टाळूवरील लोणी खाण्याचा प्रयत्न करणा-यांचा जाहीर निषेध करण्यासाठी आणि ओबीसी समाजाची प्रांजळ भूमिका स्पष्ट करण्यासाठी ही पत्रकार परिषद घेत असल्याचे विधान जिल्हा परिषद सदस्य अवंतिका लेकूरवाळे यांनी केले.आजच्या जाहीरातीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमचे प्रेरणास्थान असणारे संत तुकाराम महाराज यांचा जो पेहराव केला आहे ते समाजाची दिशाभूल करणारे असून हे एखाद्या बहूरुप्याचे काम असल्याचे त्या म्हणाल्या.संत तुकाराम महाराज हे अतुलनीय असून त्यांची कोणाशी तुलना होऊच शकत नाही,आमच्या संतांची वेशभूषा धारण करुन जाहीरात प्रसिद्ध करने याचा देखील आम्ही जाहीर निषेध करतो,असे त्या म्हणाल्या.
राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉ.बबनराव तायवाडे यांनीच जर ही जाहीरात प्रसिद्ध केली असेल हे सिद्ध झालं तर तुमची भूमिका काय असणार?असा प्रश्न केला असता,त्यांचे समर्थन या जाहीरातीला असेल हे स्पष्ट झाल्यास आम्ही त्यांचा राजीनामा घेऊ,असे विधान ओबीसी संघटनांच्या पदाधिका-यांनी केले.आम्हाला असं वाटत नाही की तायवाडे यांचे समर्थन या जाहीरातीला असेल पण याचा शोध घेतला पाहिजे,असे लेकुरवाळे म्हणाल्या.या जाहीरातीच्या मूळाशी कोण आहे,हे स्पष्ट झालं पाहिजे,असे त्यांनी सांगितले.राष्ट्रीय ओबीसी महासंघाची एक विचारधारा आहे,त्या विचाराधारेला जर धक्का पोहचवला जात असेल तर त्याचा आम्ही विरोध करतो मात्र,अजूनही अध्यक्षांकडून स्पष्ट भूमिका आली नाही.त्यांनी राजकारण विरहित संघटना बांधली असून समाजाचे प्रश्न सोडवले आहे.परंतू,भारतीय जनता पक्षाच्या अंतर्गत ओबीसींचा प्रश्न नेला जात असेल तर बहूसंख्य ओबीसी हे खेड्यामध्ये राहतात,शेती करतात,त्यांच्या मालाला भाव नाही,मोठ्या प्रमाणात आत्महत्या होत आहेत.
आम्ही राष्ट्रीस स्वयंसेवक संघाचे जे स्वयंसेवक आहेत देवेंद्र फडणवीस यांना पाठींबा देण्याचा प्रश्नच येत नाही कारण,संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे खोट्या आरोपामध्ये ओबीसी असणारे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना १३ महिने तुरुंगात डांबण्यात आले.त्यांना कोणी तुरुंगात टाकले,कोणता तो नेता आहे हे सर्वांना माहिती आहे त्यामुळे भाजपच्या अश्या नेत्याला ओबीसी संघटनांनी समर्थन देण्याचा प्रश्नच उद् भवत नसल्याचे याप्रसंगी ओबीसी संघटनांच्या पदाधिका-यांनी सांगितले.
महाराष्ट्रात आज राजकीय असुरक्षीतता निर्माण करण्याचं काम कोणी केलं?हे सर्वांना माहिती आहे.जो महाराष्ट्र सुसंस्कृत होता त्याला बिहार सारखे राज्य कोणी बनवले?अश्या नेत्याला पाठींबा देण्याचं ‘महापाप’ओबीसी महासंघाच्या माध्यमातून जर कोणी करत असेल तर राष्ट्रीय ओबीसी महासंघटनेतील विविध ओबीसी संघटना या, ओबीसी महासंघटनेचे अध्यक्ष असो किवा इतर कोणी,या देशातला,या महाराष्ट्रातला,पुरोगामी विचारांचा ओबीसी ,त्या विचारधारेला समर्थन देणार नाही,राष्ट्रीय स्वयंसेवक संघ तसेच त्या विचारधारेचे नेते यांना संबंध महाराष्ट्रात निवडून न येऊ देणे हीच आमची भूमिका राहणार असल्याचे मंचावरील पदाधिकारी यांनी स्पष्ट इशारा दिला.
हरियाणामध्ये जाट विरुद्ध ओबीसी हा लढा झाला आणि ओबीसी समाज हा भाजपच्या पाठीशी उभा राहीला त्यामुळे हरियाणात भाजपला सत्ता स्थापन करता आली,आता अश्या जाहीरातींच्या माध्यमातून भाजपला तीच खेळी महाराष्ट्रात खेळायची आहे का?ओबीसींच्या मतांशिवाय भाजपला हरियाणासारखीच महाराष्ट्रात देखील सत्ता मिळू शकत नाही,हरियाणाचा प्रयोग महाराष्ट्रात केला जात आहे असं तुम्हाला वाटतं का?असा प्रश्न केला असता,हे सत्य आहे ओबीसींच्या पाठींब्याशिवाय महाराष्ट्रात भाजपची सत्ता येऊच शकत नाही त्यामुळेच त्यांचे ओबीसी संघटनांमध्ये फूट पाडण्याचे प्रयत्न सुरु आहे.भाजपला ओबीसींमध्ये फूट पाडायची आहे.त्यांनाही हे कळलं आहे की महायुतीला महाराष्ट्रात कुठेही यश मिळत नाही,त्यांचे सगळे सर्वेक्षण नकारार्थी आले आहेत,मराठवाड्यात मराठे भाजपच्या पाठीशी न राहील्यानेच लोकसभेत ते हरले,आता ओबीसींच्या पाठींब्याने त्यांना सत्ता हस्तंगत करायची असल्याने ते हा नेरेटीव्ह सेट करीत आहेत की संपूर्ण ओबीसी संघटना त्यांच्या पाठीशी आहे.परंतू महाराष्ट्रात पन्नास ओबीसी संघटना आहे,त्यांची स्वतंत्र विचारसरणी आहे,महाराष्ट्रातील संपूर्ण ओबीसी समाज भाजपच्या पाठीशी नाही,हे त्यांनी समजून घेतले पाहिजे,असे उत्तर त्यांनी दिले.
संपूर्ण महाराष्ट्रात ६० टक्के ओबीसी समाज आहे.हा समाज विचारधारेवर मतदान करणारा समाज आहे,उमेदवार हा समाजाचे हित करणारा आहे का?हे बघून मतदान करणारा आहे,जाहीरात बघून मतदान करणार नाही.आेबींसींचा वापर कोणी राजकारणासाठी करीत असेल तर त्याला धडा शिकवल्या शिवाय राहणार नाही,असा इशारा यावेळी देण्यात आला.
२८ ऑगस्ट ते ६ सप्टेंबर दरम्यान विदर्भात‘जागर यात्रा’काढण्यात आली.अनेक सभा घेण्यात आल्या.प्रत्येक जिल्ह्यात समाजबांधवांसोबत चर्चेच्या फे-या झडल्या.जागर यात्रेनंतर एक ‘संवाद यात्रा’ काढण्यात आली मात्र,ओबीसी समाज बांधवांनी एकाही जिल्ह्यात संवाद यात्रा यशस्वी होऊ दिली नाही,तुम्ही शासनाचे दलाल आहात,असा आरोप केला यावरुन पाणी कुठे मुरतंय,हे लक्षात येतं,असे ओबीसी महासंघाचे नागपूर शहर उपाध्यक्ष अशोक काकडे यांनी सांगितले.
राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या पदाधिकारी डॉ.रेखा बाराहाते यांनी या जाहीरातीला महासंघाचा पाठींबा नाही,आम्ही या जाहिरातीचे खंडण करीत असल्याचे सांगितले.ही संघटनेला बदनाम करण्याची खेळी असल्याचे त्या म्हणाल्या.आमचे अध्यक्ष तायवाडे हे नेहमी सांगतात संघटनेत राजकीय पक्षाचे जोडे बाहेर काढून यायचे त्यामुळे राजकीय पक्षाच्या जाहिरातीला समर्थन देण्याचा प्रश्नच उद् भवत नाही.
एका प्रश्नाच्या उत्तरात ओबीसी संघटनेचे पदाधिका-यांनी सांगितले की,ही जाहीरात खोटी निघाली तर फडणवीसांच्या विरोधात एफआयआर दाखल करु.
या पत्रकार परिषदेनंतर राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या तायवाडे समर्थकांची पत्रकार परिषद झाली,त्यांनी देखील महासंघाचे या जाहीरातीला समर्थन नसल्याचे सांगून २१ ऑक्टोबर रोजी तायवाडे हे बाहेर गावावरुन नागपूरात परत आल्यानंतर त्यांची भूमिका मांडतील,असा बचावात्मक पवित्रा घेतला.
थोडक्यात,‘जाहीरात फडणवीसांची आणि फूट ओबीसी संघटनांमध्ये’,असे चित्र आज दिवसभर नागपूरात उमटले होते.काँग्रेसचे आमदार सुनील केदार यांच्या समर्थकांनी या जाहिराती विरोधात पत्रकार परिषद घेतल्याची चर्चा देखील रंगली.निवडणूकीच्या तोंडावर घडलेल्या या घटनेनंतर पुढील काळात हेवे-दावे आणि दावे-प्रतिदावे यांचा रंगलेला खेळ मतदारांना बघायला मिळणार आहे,यात शंका नाहीच.
पत्रकार परिषदेत समीर अरबट,पांडूरंग काकडे,सुनील जुमडे,कल्पना मानकर,अशोक काकडे,ॲड.बाराहाते,जिल्हा परिषद सभासद उज्वला बोधने,अवंतिका लेकुरवाळे,नरेश सावरकर आदी उपस्थित होते.