गृहमंत्री अमित शहा यांच्यासाठी संपूर्ण वर्धा रोड जायबंद
विद्यार्थिनी,महिला,नागपूरकर नागरिक भर पावसात तासनतास रस्त्यावरच!
नागपूर,ता.२४ सप्टेंबर २०२४: काेणत्याही शहरात अति महत्वाची व्यक्ति येणार असल्यास प्रशासन,पोलिस विभाग व संबंधित राजकीय पक्षाचे नेते मंडळी यांचे बैठकीत नियोजन होत असते मात्र,त्या नियोजनात सामान्य नागरिकांचा त्रास कुठेही गृहीत धरल्या जात नाही,याचा आणखी एक परम साक्षात्कार आज नागपूरकरांना देशाचे गृहमंत्री अमित शहा यांच्या नागपूर दौ-या निमित्त आला.
भर दूपारी भर पावसात आज संपूर्ण वर्धा रोड पोलिसांनी कठडे लाऊन बंद केल्याने खामला येथील सोमलवार शाळेत विद्यार्थ्यांना आणण्यासाठी निघालेल्या पालक वर्गाला भयंकर त्रास सहन करावा लागला.छत्रपती चौक,गडकरींचे निवासस्थान असलेले रेडीसन ब्ल्यू चौक,राजीव नगर,एअरपोर्ट चौकासह या मार्गावरील प्रत्येक चौक पोलिसांनी कठडे लाऊन बंद केले होते.
परिणामी,सोमलवार शाळेतील विद्यार्थी,पालक व शिक्षकांना पोलिसांच्या या ‘अति’उत्साही नियोजनाचा भर पावसात चांगलाच फटका बसला.पालक वर्गाला तर चिंचभवनच्या पूलावरुन वळण घेऊन खामला येथील सोमलवार शाळा गाठावी लागली.त्यातही पुन्हा वर्धा मार्गावर आल्यानंतर देखील वाहतूक कोंडीत भर पावसात तासभर रेंगाळत राहावे लागले.
हे ही नसे थोडके म्हणून, या मार्गावर कर्तव्यावर असलेले पोलिस कर्मचारी हे, या मार्गाचा उपयोग करीत असणा-या व वाहतूकीत अडकलेल्या वाहनचालकांना जणू,चंबलचे चोर-डाकू असल्यासारखी वागणूक देताना आढळले.केंद्रिय गृहमंत्र्यांचा ‘रुबाब’जणू आज पोलिस कर्मचा-यांमध्ये उतरला होता.एवढ्या मोठ्या व महान नेत्याच्या सुरक्षेची जबाबदारी निश्चितच पोलिस विभागावर असली तरी,या शहरातले सर्वसामान्य नागरिक यांना देखील अश्या व्हीव्हीआयपी नेत्यांच्या दौ-यात कोणताही त्रास होऊ नये,याची दखल घेणे कोणाचीच जबाबदारी नाही का?व्हीव्हीआयपींच्या दौ-यात भर पावसात विद्यार्थी,महिला,सर्वसामान्य नागरिक हे जर तासनतास अडकून पडत असतील तर,नागपूर पोलिसांच्या अश्या या नियोजनशून्यतेला ‘राष्ट्रपती’पदकाने गौरवान्वित करण्यात यावे,अशी मागणीच आज सोशल मिडीयावर उमटली.
व्हीव्हीआयपींच्या दौ-यात सर्वसामान्य नागपूरकरांना अश्या हालअपेष्टांसमोर जे नेते लोटतात, तेच निवडणूकीच्या काळात,या सर्वसामान्य लोकांच्या दारी जाऊन मत मागताना दिसून पडतात.त्या वेळी दिल्लीश्वर व्हीव्हीआयपींपेक्षाही हा सामान्य नागपूरकर या नेत्यांना मोठा वाटत असतो.भाजपच्या ज्या नेत्यांनी आज केंद्रिय गृहमंत्र्यांसाठी महामेट्रोचे व वर्धा मार्गावरील संपूर्ण पिल्लर्सवर जेवढे परिश्रम स्वागतपर फलके लावण्यात घेतली,त्यातील काही अंश, शहा यांच्या दौ-यामुळे,शालेय विद्यार्थी,पालक,या मार्गावरील विविध वस्तीतील रहीवाशी नागरिक यांना कोणताही त्रास होऊ नये,यासाठी थोडी जरी दक्षता घेतली असती तर,नागपूरकर ‘भरुन’पावले असते मात्र,असे न घडता,भर पावसात भाजपच्या नेत्यांनी त्यांना इंद्रदेवाच्या ढगांखाली ओलेचिंब होत,वाहतूक कोंडीत अडकवून, अश्रूंच्या पावसात भिजवण्याचा आनंद लृटल्याचे दृष्य या मार्गावर उमटले होते.
या मार्गावर ‘विकासाचे’ एवढे मोठे व भव्य उड्डाणपूल असताना,खालील मार्ग का रोखून धरण्यात आला?या प्रश्नाची उकल आता भुक्तभोगी नागपूरकर सोशल मिडीयावर करीत आहेत.भर पावसात खालील रस्त्यांवर झालेली वाहतूक कोंडी व एवढ्या किलोमीटरचा वळसा,या त्रासाला जो कोणी जबाबदार असेल त्याला देखील वरुणराजेच्या कृपेने त्या रस्त्यांवर भर पावसात तासनतास उभे राहण्याची शिक्षा व्हावी,अशी मागणी केली जात आहे.जेणेकरुन सामान्य नागपूरकरांचा त्रास त्यांना कळू शकेल.