बदलापूरमध्ये फुटले फटाके!
स्वसंरक्षणासाठी पोलिसांचा गोळीबार:सत्ताधा-यांचा दावा
एनकाऊंटर फर्जी:विराेधकांचा आरोप
नागपूर,ता.२३ सप्टेंबर २०२४: आज सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास बदलापूर शाळेतील दोन शालेय चिमुरडींवर बलात्काराचा आरोपी अक्षय शिंदे याला तळोजा कारागृहातून बदलापूर पोलि,अधिक चौकशीसाठी बदलापूर पोलिस ठाण्यात घेऊन जात असताना कल्याण शिळफाटाजवळ आरोपी अक्षयने पोलिसाच्या हातातील बंदूक हिसकावून तीन राऊंड फायर केले,एक गोळी पोलिस अधिकारी निलेश मोरे यांच्या पायाला लागली.स्वसंरक्षणार्थ पोलिसांनी आरोपीवर गोळ्या झाडल्या.यात तो जखमी झाल्यानंतर पोलिसांनी त्याला ठाणे पालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल केले असता तो मृत झाल्याची चर्चा आहे.अद्याप अधिकृतरित्या अक्षयच्या मृत्यूची घोषणा करण्यात आली नाही.
बदलापूरची घटना ही १३ ऑगस्ट रोजी शाळेत घडली होती.१५ ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मुंबई महानगरपालिकेच्या नव्या इमारतीचे उद् घाटन होते त्यामुळे या घटनेची फिर्याद दाबून ठेवण्यात आली असल्याचा आरोप करण्यात आला. ही घटना १७ ऑगस्ट रोजी समोर आल्यानंतर बदलापूरमध्ये प्रचंड जनक्षोभ उसळला.आंदोलनका-यांनी बदलापूर रेल्वे वाहतून तब्बल आठ तास रोखून धरली होती.या नंतर पोलिसांनी लाठीचार्ज केला होता.चिमुरडीची गर्भवती आई व इतर एका फिर्यादी आईला बदलापूर पोलिसांनी एफआयआर नोंदवून घेण्यासाठी तब्बल १२ तास पोलिस ठाण्यात बसवून ठेवले होते,ज्या शाळेत ही घटना घडली ती भारतीय जनता पक्षाच्या नेत्याची शाळा असल्याने प्रकरण दाबण्याचा आरोप झाला व त्याचे पडसाद तीव्र जनआंदोलनात उमटले .
या घटनेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे या बालेकिल्ल्यातच त्यांच्या विरोधात प्रचंड रोष दाटून आला.ही घटनाच पराकोटीची संतापजनक आणि तितकीच वेदनादायी असल्याने, दिल्लीच्या निर्भया घटनेतील क्रोर्याची तुलना बदलापूरच्या घटनेशी करण्यात आली.२०१२ च्या डिसेंबर महिन्यातील दिल्लीच्या निर्भया घटनेनंतर २०१४ मध्ये प्रचंड जनक्षोभातून दिल्लीतील काँग्रेसची सरकार कोसळली,तीच परिस्थिती मुख्यमंत्री शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात उद् भवली.महत्वाचे म्हणजे महाराष्ट्रात येत्या दोन महिन्यात निवडणूका आहेत.अशयावेळी जनक्षोभातून सत्ता हातातून निसटण्याची वेळ येऊ नये म्हणून,जनतेच्या मनातील हा रोष कमी करण्यासाठी अक्षय शिंदे चकमक घडवून आणण्यात आल्याचा आरोप केला जात आहे.
बदलापूरमध्ये या चकमकीनंतर ज्याप्रमाणे फटाके फूटले व जल्लोष साजरा झाला ते बघता जणू ठाणे जिल्ह्यात शिंदे गटाने निवडणूकीत वर्चस्व पुन्हा सिद्ध केले,असा नजारा भासतो, आरोपीची पहीली पत्नी अचानक समाेर येऊन त्याच्या विरोधात लैंगिक अत्याचारी तक्रार नोंदवते काय,या तक्रारीवरुन अधिक तपासासाठी आरोपीला बदलापूर पोलिस ठाण्यात आणत असताना ही चकमक घडते काय,हे सर्व कोण्या चमत्कारासारखं महाराष्ट्राच्या जनतेला आता भासत आहे.हा सगळा प्रकार ‘घडवून’आणण्यात आला असल्याचा आरोप विरोधक करीत आहे.
अर्थात,त्या दोन चिमुरड्यांना जी वेदना आरोपीने पोहोचवली आहे,ती बघता जनसामान्यांमध्ये अारोपीच्या अश्या मृत्यूवर यत् किंचितही सहानुभूती नाही,हे वास्तव आहे.आरोपीच्या आईने मात्र,पुन्हा एकदा टाहो फोडत तो निर्दोष असल्याचा कंठशोष केला.मृतदेह देखील स्वीकरणार नसल्याचे आरोपीच्या माता-पित्यांनी माध्यमां समोर सांगितले.एकीकडे बदलापूर प्रकरणाच्या एका महिन्यानंतर देखील शाळा संचालक आपटे हा अद्याप पोलिसांना गवसला नाही!दुसरीकडे गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर ही अशी चकमक घडली व अरोपी ठार झाला यातून ‘मोठे मासे’वाचवण्यासाठीची ही खेळी असल्याचा आरोप केला जात आहे.
अक्षयला कायद्याच्या योग्य चौकटीतून फाशी व्हायला हवी होती. गृह विभागाचा हा हलगर्जीपणा संशयास्पद असल्याची प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली.अर्थात निर्भया प्रकरणात आरोपींना फाशी देण्यासाठी तब्बल बारा वर्षांचा कालावधी लागला होता,हे देशवासी विसरले नाहीत.
आता शाळेच्या विश्वस्तांना क्लीन चीट मिळणार का? निष्पक्ष न्यायालयीन चौकशी होणार का?असा सवाल खासदार सुप्रिया सुळे यांनी करत ,न्यायव्यवस्थेतील शासन पुरस्कृत थट्टा असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली. तर, आरोपीला फाशीची मागणी करणारे विरोधक आता आरोपीची बाजू घेत असल्याचा आरोप मुख्यमंत्री शिंदे यांनी केला. निलेश मोरे या पोलिसाच्या पायाला आरोपीने जखमी केले. कळवा हॉस्पिटलमध्ये ठाणे येथे ते ऍडमिट आहेत,असे मुख्यमंत्री म्हणाले.अर्थात,आरोपीने बंदूक हिसकावून ती निलेश यांच्या नेमकी ‘पायालाच’ का मारली,छाती किवा शरीराच्या इतर कोणत्याही भागात का गोळी लागली नाही?याचा तपास साक्षात ब्रम्हदेव देखील करु शकणार नाही. विरोधकांनी आरोपीची बाजू घेणे निंदाजनक असल्याची प्रखर टिका शिंदे यांनी केली.
विरोधकांनी राजकारण करण्याची गरज नाही असे गृहमंत्री फडणवीस म्हणाले.पोलिसांनी सेल्फ डिफेन्स मध्ये गोळीबार केला असल्याचा बचाव(बनाव?)फडणवीसांनी केला.
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी तर हा संपूर्ण प्रकारच हास्यस्पद असल्याची टिका केली. गोळी खरंच झाडली की या मागे दुसरं काही दडलं आहे?अशी विचारणा त्यांनी केली तसेच, बदलापूर प्रकरणी पोलिसांच्या भूमिकेवर संशय व्यक्त करुन,चव्हाण यांनी शाळेच्या विश्वस्तांना अद्याप अटक का नाही केली?असा सवाल त्यांनी केला.सरकार कोणाला वाचवते आहे?सरकार स्वतःला वाचवते असे उत्तर असू शकतं, पोलीस इतकी बेसावध कशी असू शकते? बंदूक ओढेपर्येत पोलीस झोपेत होते का?पृथ्वीराज चव्हाण यांचा सवाल होता. सरन्यायाधीश मुंबई उच्च न्यायालयाच्या कार्यक्रमासाठी मुंबईत असताना ही घटना घडते!त्यांनी सुमोटो घेऊन घटनेची दखल घ्यावी पृथ्वीराज चव्हाण यांनी अशी मागणी करीत, कुठल्यातरी उच्च पदस्थ व्यक्तीला वाचवण्याचा प्रयत्न झाला असून, फडणवीसांना गृहमंत्री पदावर राहण्याचा अधिकार नाही. महाराष्ट्र पोलिसांकडून अशी अपेक्षा नव्हती,अशी हताशा त्यांनी व्यक्त केली.
बदलापूर प्रकरणी कोणीही राजकारण करू नये असे ॲड.उज्जव निकम म्हणाले तसेच आरोपी विरुद्ध एटीएसकडे भक्कम पुरावे असल्याचे त्यांनी सांगितले. गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा,असे अंजली दमानिया म्हणाल्या.एन्काऊंटर खरा की खोटा? बाळासाहेब थोरात यांनी सवाल केला तर एन्काऊंटर घडवून आणणं न्यायव्यवस्थेचा अपमान असल्याचे जितेंद्र आव्हाड म्हणाले.विरोधक सटरफटर कांगावा करतात ,असे चित्रा वाघ म्हणाल्या.
माझ्या मुलाला गोळ्या घातल्यास आम्हालाही गोळ्या घाला अक्षयच्या आईने टाहो फोडला.अर्थातच जगातील कोणत्याही आईला आपला मुलगा कितीही कुकर्मी असला तरी आईची ममता ही आंधळीच असते,यात वाद नाही.महत्वाचे म्हणजे,कायद्याच्या न्यायालयात आरोपीवर गुन्हा सिद्ध झाला नव्हता.गुन्हा सिद्ध होईपर्यंत कोणताही आरोपी गुन्हेगार ठरत नसतो.त्यामुळे आरोपीच्या आईलाही मुलगा जरी तुरुंगात असला तरी सुखरुप आहे,इतका दिलासा खूप होता.आरोपीच्या वडीलांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना,आरोपीची आई तुरुंगात त्याला भेटली असता त्याने एक कागदाचा तुकडा आईला दिला होता व आई हे वाच,असे सांगितले मात्र,आईला वाचता येत नसल्याने आईने तो त्याला फेकून द्यायला सांगितला.कदाचित त्या कागदावर अक्षयने लिहले असावे त्याला ठार केल्या जाऊ शकतं म्हणून!अशी शंका आरोपीच्या वडीलांनी व्यक्त केली.
पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांचा या सर्व घटनेच्या मागे हात त्या ऑर्डर देतात आणि पोलीस त्या फॉलो करतात असा सरळ आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोळे यांनी केला.
पोलिसांची बंदूक ही सहसा लॉक असते आणि बंदूकीचे लॉक,अनलॉक करणे हे सामान्य माणसाला जमू शकत नाही ,असे ॲड.असीम सरोदे म्हणाले.आरोपीला बदलापूरच्या पोलीस स्टेशन मध्ये का नेण्यात आलं याचं कारण माहिती नाही,अक्षयला हायकोर्टा ऐवजी बदलापूरच्या पोलिस ठाण्यात घेऊन जाणे संशयास्पद असल्याचे सरोदे यांनी सांगितले.
पोलिसांवर विश्वास बसत नाही असे माजी गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले.ती शाळा भारतीय जनता पार्टीच्या नेत्याची होती त्यामुळे आरोपीचे एन्काऊंटर करून हे प्रकरण संपवायचे, अशा पद्धतीची ही घटना असल्याचे त्यांनी सांगितले. निवृत्त हायकोर्ट जज कडून या घटनेचा तपास झाला पाहिजे अशी मागणी अनिल देशमुखांनी केली.
कॉंग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी देखील या चकमकीवर संशय व्यक्त करीत,ही बनावट चकमक असल्याचे सांगत,हायकोर्टाच्या निवृत्त न्यायाधीशामार्फत या घटनेचा तपास झाला पाहिजे,अशी मागणी केली.काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड,शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी देखील या चकमकीवर संशय व्यक्त केला.
थोडक्यात,आजपर्यंत देशातील उत्तरप्रदेश तसेच जम्मू काश्मीर राज्यांमध्ये बनावट चकमकीची काही प्रकरणे सर्वोच्च न्यायालयात सिद्ध झाली असून अनेक पोलिसांना यासाठी तुरुंगवास भोगावा लागला आहे.बंगलौरमध्ये राष्ट्रीय महामार्गावरुन रात्रीच्या सुमारास घरी परतत असताना एका तरुणी अभियंताच्या गाडीतील पेट्रोल संपल्यानंतर चार तरुणांनी तिला मदत करण्याच्या बहाण्यातून,तिच्यावर बलात्कार करुन निघृण खून केल्याची घटना घडली.या विरोधात पराकोटीचा जनक्षोभ उसळला असताना,चारही आरोपी अशाच पद्धतीने त्याच घटनास्थळी चकमकीत मारले गेले जेव्हा ते पोलिसांना घटना कुठे व कशी घडली दाखवित होते.त्या चकमकीचे संपूर्ण देशाने स्वागत केले होते.यावर सर्वोच्च न्यायालयाने देखील ‘हा चुकीचा पायंडा‘असल्याचे परखड मत व्यक्त केले होते.मात्र,जनतेच्या नजरेत तो खरा ‘न्याय’ठरला होता.मुंबईत देखील एकेकाळी ‘टोळी युद्धातून’काही बनावट चकमकीची प्रकरणे न्यायालयात गेली होती.
बदलापूर प्रकरणात जी चकमक घडली,त्यावर सत्ताधारी आणि विरोधक ज्याप्रकारे ‘व्यक्त‘ होत आहेत ते बघता,याचे पडसाद निश्चितच येत्या विधान सभेच्या निवडणूकीत ‘सकारात्मक किवा नकारात्मक ’उमटतील,यात शंका नाही.
…………………………….