फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeब्रेकिंग न्यूजसंकेत बावणकुळेच्या ऑडीचा पहीला अपघात मानकापूरमध्ये!

संकेत बावणकुळेच्या ऑडीचा पहीला अपघात मानकापूरमध्ये!

अपहरणकरुन मारहाणीचा गुन्हा ही लपवला!
चौथा कोण?पोलिसांनाही चौकशी करण्याची गरज भासत नाही!
विकास ठाकरेंना दोन दिवसांनंतर मतदारसंघात घडलेल्या घटनेची आली जाग
दूर्घटनाग्रस्त ऑडी आधी गॅरेजमध्ये मग पोलिस ठाण्यात!नेमप्लेट्सचेही गौडबंगाल
बावणकुळे ऑडी कार घटना:सुषमा अंधारे सीताबर्डी ठाण्यात
शहरात साढे तीन हजार सीसीटीव्ही कॅमरा पण ‘कामाचे’ फूटेज नाहीत
‘साहेबांचा’ फोन आला आणि….
हाय प्रोफाईल घटनेमुळे पोलिस दबावात:अंधारे यांचा आरोप
नागपूर,ता.११ सप्टेंबर २०२४:नागपूरमध्ये रविवारी रात्री साढे बारा वाजताच्या दरम्यान भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावणकुळे यांचा मुलगा संकेत बावणकुळे याच्यासह आरोपी रोनित,अर्जुन तसेच एक चौथा मित्र धरमपेठेतील लाहोरी बारमध्ये खानपान करीत बसले होते.त्यातही ‘हिंदूत्वावादी’ नेत्याच्या लेकाने बिफ-कटलेट मागवून खालले. मानकापूरवरुन कोराडीला जाताना मानकापूरला पहीली धडक दिली,तिकडे त्यांचे अपहरण करुन मारामारीचा ड्रामा झाला,लोकांनी संकेत आणि त्याच्या मित्रांना चोप दिला,त्यांना तहसील पाेलिस ठाण्यात आणण्यचा प्रयत्न करण्यात आला.तिथून संकेत बावणकुळेने पळून जाण्यचा प्रयत्न केला.पळून जात असताना रामदासपेठमध्ये त्याने पुन्हा दोन कार आणि तीन दूचाक्यांना धडक दिली.
त्यातील एक कार प्रेस क्लबचे कर्मचारी जितेंद्र सोनकांबळे यांची होती.त्यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली मात्र,त्यांची एफआयआर होत नव्हती कारण पोलिसांची कोणाल तरी अडकवण्याची मानसिकता नव्हती.गुन्हा नोंद करवून घेण्याची ईच्छा नव्हती.मात्र,ज्यांच्या गाड्यांचे नुकसान झाले त्यांना एफआयआरच्या कॉपीशिवाय गाडीचा विमा मिळाला नसता त्यामुळे एफआयआर झाली.दूसरीकडे पोलिस दावा करीत आहे की घटनेच्या दिवशीच आम्ही आरोपींचा ताबा घेतला आहे आणि त्याच दिवशी आरोपींची वैद्यकीय तपासणीसुद्धा केली असे पोलिस सांगतात.ऑडी मात्र गॅरेजमध्ये पाठवण्यात आली.ऑडीचे कोणतेही विस्तृत विवरण आणि ऑडी मालकाचे नाव एफआयआरमध्ये नाही.महत्वाचे म्हणजे संकेत आधी ऑडीमध्ये नव्हता असे पोलिसांनी सांगितले,मग सांगतात मागच्या सीटवर बसला होता,मग सांगतात वाहनचालकाच्या बाजूला बसला होता,लवकरच पोलिस सांगतील संकेत बावणकुळे हाच वाहन चालवित होता,असा दावा शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केला.पोलिस निरीक्षक चंद्रकांत चकाटे काय लपवित आहेत?असा प्रशन त्यांनी केला.आज सकाळी सीताबर्डी पोलिस ठाण्यात घटनेचा तपशील घेतल्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी वरील आराेप केले.
या प्रसंगी बोलताना त्यांनी सांगितले की,फक्त अर्जुन आणि रोनितची वैद्यकीय तपासणी करण्यात आली,ऑडीमध्ये संकेत होता तर संकेतची तपासणी पोलिसांनी का नाही केली?असा प्रश्‍न त्यांनी उपस्थित केला.पोलिसांचे म्हणने आहे गाडी एक जण चालवित होता तर वैद्यकीय तपासणी एकाचीच न करता दोघांची का केली?अपघाताच्या गाडीचा जागेवरच पंचनामा करण्यात आला नाही.गाडीचं वय अवघं २८ दिवसांचं आहे,ती साढे तीन कोटींची इलेक्ट्रीक गाडी असून अतिशय नवीन गाडी होती ,याचा अर्थ निष्काळजीपणे गाडी चालविण्याचा गुन्हा घडला होता.ती गाडी दीडशेच्या वेगाने होती,ऐरवी सामान्यांनी दहाने वेग वाढवला तरी पोलिस तात्काळ चालान कापून मोकळी होते.या घटनेत मात्र पोलिसांनी कारवाईच करने टाळले.अपघाताच्या गाडीचा पंचनामा होऊन गाडी पोलिस ठाण्यात जमा करण्या ऐवजी ती गॅरेजमध्ये पाठवण्यात आली.रविवारची रात्रीची घटना असून सोमवारी आम्ही जेव्हा समाज माध्यमांवर हा प्रश्‍न उपस्थित केला तेव्हा ती गाडी पोलिस ठाण्यात आणण्यात आली.गॅरेज ते पोलिस ठाणे याचे व्हीडीयो फूटेज,गाडी आणताना आणि नेतानाचे मी समाज  माध्यमावर टाकले असल्याचे त्या म्हणाल्या.
पोलिस सांगतात त्यांना दुर्घटनेबाबत उशिरा कळले,त्यातल्या त्यात ती गाडी संकेत बावणकुळेंची आहे हे पोलिसांना कळलच नाही,फार गमतीदार गोष्ट आहे असा टोला त्यांनी हाणला.बावणकुळे तर इतके प्रामाणिक आहेत की सायंकाळी एकदम प्रगट झाले आणि सांगितले गाडी माझ्या मुलाची आहे,पोलिसांनी त्याची चौकशी करावी,कशी चौकशी करणार पोलिस?त्यांच्या मुलाचे नाव साधं एफआयआरमध्ये ही आले नसताना पोलिस कशी चौकशी करणार?असा सवाल त्यांनी केला.
या घटनेत किती जण जखमी झालेत,ते कोण होते,कोणत्या रुग्णालयात त्यांना भरती करण्यात आलं,याविषयी देखील पोलिसांकडून त्यांना कोणतीही माहिती मिळाली नसल्याचे अंधारे यांनी सांगितले.ही घटना कोणत्याही प्रिंट आणि इलेक्ट्रोनिक माध्यमांकडे जाणार नाही,याची भरपूर काळजी घेण्यात आली होती.दोन दिवस या घटनेची माहिती दडवण्यात त्यांना यश आले होते,असे त्या म्हणाल्या.
सलमान खान वर्सेस स्टेट तसेच परेरा वर्सेस स्टेट या दोन्ही खटल्यांमध्ये न्यायालयाचे जजमेंट आहे की,एखाद्यी व्यक्ती भले ही ती गाडी चालवत नसेल परंतू तिच्यामुळे तो अपघात झाला आहे,त्याने एखाद्या मद्यपीला गाडी चालवायला दिली असेल तरी देखील तो दोषी आहे.संकेत लाहोरी बारमध्ये ’मसाले दूध’ पिण्यासाठीच गेला असेल,बाकीच्या मित्रांनी मद्य प्यायले असले मात्र,मसाले दूध पिलेल्या संकेतने आपली अडीच कोटीची ऑडीची चावी एका प्रचंड दारु पिणा-याच्या हातात दिली,ही चूक नाही का?एखाद्या कंपनीत एखाद्या कामगाराचा मृत्यू झाला आणि जरी मालक ते यंत्र चालवत नसेल तरी अपघातासाठी कंपनीच्या मालकावर गुन्हा दाखल होतो.या न्यायानुसार संकेत बावणकुळेवर सलमान खान वर्सेस स्टेट खटल्यामध्ये न्यायालयाचे जे जजमेंट आहे ते लागू झाले पाहिजे,अशी मागणी याप्रसंगी अंधारे यांनी केली.

या घटनेत संकेतला अटक केली तरी खूप झाले तर २४ तासात सोडून देण्यात येईल किंवा त्या पूर्वीच त्याला अटकपूर्व जामीन देखील मिळू शकतो मात्र,इथे मुद्दा हा कायदा आणि सुव्यवस्थेचा आहे.संकेत बावणकुळेवर अपघात आणि बेपरवाईने गाडी चालवण्यासाठी का कलम लावली जात नाही आहे?समाजात हा संदेश जातोय की मोठ्या बापांची बिघडलेली औलाद ही गरीबांना कधीही रस्त्यांवर चिरडू शकतात,असे अंधारे म्हणाल्या.संकेत बावणकुळे याचं नाव एफआयआरमध्ये नोंद झाली नाही तर कायदेशीर कारवाई करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला.

चौथा आरोपी कोण होता,तो सुद्धा भाजपच्याच एका आमदाराचा मुलगा होता,अशी चर्चा आहे,असा प्रश्‍न केला असता,चौथा आरोपी कोण होता याची मला माहिती नसून ती माहिती मिळवण्याचा मी प्रयत्न करीत असल्याचे अंधारे यांनी सांगितले.चौथा तर सोडा जे तीन आरोपी आहेत त्यांच्याबद्दल देखील पोलिसांनी चकार शब्द काढला नाही,लाहोरी बार,मानकापूर मध्ये पोलो कारला ठाेकणे,अपहरण,मारहाण,रामदासपेठमधील दुर्घटना हे सगळच अगम्य असल्याचे त्या म्हणाल्या.
आज शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी संकेत बावणकुळेने लाहोरी बारमध्ये बीफ-कटलेट खालले,तुम्ही देखील तोच आरोप केला मात्र,लाहोरीच्या मालकाने त्याच्या बार व रेस्टॉरेंटमध्ये बीफ मिळत नसल्याचे सांगितले, या विषयीचं बिल तुमच्याकडे आहे का किंवा पोलिसांकडे तुम्ही ते दिलं का? असा प्रश्‍न विचारला असता,जिथे डीसीपी मदने यांच्यासारख्या  पोलिसांवर इतका दबाव आहे तर बार चालवणा-या मालकावर किती दबाव असेल?असा प्रतिप्रश्‍न अंधारे यांनी केला.नागपूरात ३,५०० सीसीटीव्ही फूटेज असून,त्या फूटेजमधून जे आपल्याला पाहिजेत नेमके तेच ‘गायब ’आहेत.हे आश्‍चर्य नाही का?एक मोठी महाशक्ती दोषींना वाचवण्यासाठी तत्पर झाली असल्याचा आरोप त्यांनी केला.
आमदार विकास ठाकरेंना सुनावले खडे बोल-
काँग्रेसचे आमदार विकास ठाकरे यांनी तर त्यांच्या मतदार संघात अशी कोणती घटना घडलीच नाही,असे छातीठोकपणे सांगितले.त्यांनाही आपलं मत व्यक्त करायला मंगळवार का उजाडावा लागला?रविवारी रात्री ही घटना घडली,साेमवारी सकाळी किवा सायंकाळी ठाकरे व्यक्त झालेच नाही.मंगळवारी सकाळी ही व्यक्त झाले नाही तर तब्बल ३६ तास विकास ठाकरे यांना या घटनेवर बोलण्यास का लागले?याचे उत्तर आमच्याकडे असल्याचे अंधारे यांनी सांगितले.एकीकडे विकास ठाकरे म्हणतात,मी इथला आहे,मला सगळं माहिती आहे,आम्ही मुंबईत बसून सगळी माहिती गोळा केली आणि महाराष्ट्राच्या जनतेला सांगितली.या मागेे विकास ठाकरे यांचा काय हेतू असेल तो असेल.मात्र,गृहमंत्र्यांच्या शहरात गोरगरीबांना सुरक्षीत जगण्यासाठी पोषक वातावरण नाही अशी परिस्थती भाजपने आज निर्माण केली असल्याचा आरोप त्यांनी केला.

विकास ठाकरेंनी म्हटले आहे की संकेत बावणकुळेंच्या घटनेवरुन नेत्यांनी बोध घ्यावा आणि आपल्या मुलांना या घटनेवरुन बोध घेत सावध करावे.यापेक्षा त्यांनी ‘संस्कार वर्ग’ उघडावे,असा टोला अंधारे यांनी काँग्रेसचे आमदार विकास ठाकरेंवर लगावला.विकास ठाकरेंचा हा सल्ला तसाच आहे जे पुण्याच्या पोर्शे कार प्रकरणामध्ये दोन तरुणाईचा जीव घेणा-या ‘बडे बापच्या औलादीला’ पाच पानांचा निंबध लिहून सोडण्याचा निर्णय झाला होता,मग संकेत बावणकुळेला देखील पाच पानांचा निबंध लिहू द्यावा.निबंध लिहला की संपला विषय.म्हातारी मेल्याचं दूखं नाही मात्र काळ सोकावतोय.अशी जर चुकीची प्रथा पडली तर येत्या काळात ‘हिट ॲण्ड रन’कायद्याला कोणीही जुमानणार नाही,असे त्या म्हणाल्या.
गृहमंत्र्यांपेक्षा बावणकुळेंची ताकत ‘भारी’-
परिमंडल क्र.२ चे उपायुक्त मदने आणि सीताबर्डी पोलिस ठाण्यातील पोलिस निरीक्षक चंद्रकांत चकाटे यांना पंचनामा आणि वैद्यकीय तपासणी या संदर्भात मी काही प्रश्‍न विचारले होते,त्यांनी सांगितले त्यांचा तपास सुरु आहे.त्यामुळेच मी त्यांना विचारले की आता तुम्हाला घटनेतील सहभागी असणा-यांची नावे माहिती झाली असल्याने नावे आणि कलमा आपल्या एफआयआरमध्ये वाढवत का नाही?असा सवाल मी त्यांना केला असता,त्यांनी ‘मौन’बाळगले.कदाचित गृहविभागापेक्षा बावणकुळे यांची ताकत ‘भारी’पडत असेल त्यामुळे संकेत बावणकुळेचं नाव एफआयआरमध्ये घ्यायला आणि कलमा वाढवायला ते नाकारत आहे,असे अंधारे यांनी सांगितले.
फिर्यादी जितेंद्र सोनकांबळे यांच्यावर प्रचंड दबाव-
सकाळी विमानतळावर पत्रकारांकडून मला ऑफ द रेकॉर्ड कळले, की फिर्यादी जितेंद्र सोनकांबळे आपली तक्रार मागे घेत आहेत.संविधानाच्या सीआरपीसी कायद्याच्या १६९ अन्वये तपासा अंती एबीसीची समरी करुन,तपासा अंती तथ्य आढळून आले असे म्हणत, त्याचा अहवाल सादर करावा लागतो,तर एखादी एफआयआर रद्द होते किंवा ४८२ अन्वये न्यायालयात जाऊन त्याची कायदेशीर प्रक्रिया करावी लागते,नंतर एफआयआर रद्द करण्याची कारवाई केली जाते.या घटनेत ज्या अर्थी फिर्यादीने फिर्याद मागे घेतली असे फक्त तोंडी सांगून एक अफवाह पसरवली जात असल्याचे अंधारे म्हणाल्या.याचा अर्थ जितेंद्र सोनकांबळे या फिर्यादीवर प्रचंड दबाव असल्याचे स्पष्ट दिसून येतंय.जितेंद्र सोनकांबळे हे अनुसूचित जातीमधून येत असून, त्यांच्यावर प्रचंड दबाव आणण्याचा प्रयत्न होत असल्याचे सिद्ध होतं.अजूनही जितेंद्र सोनकांबळे हे माध्यमा समोर आले नाहीत,एका शब्दाने देखील घटनेविषयी बोलले नाहीत,ते कुठल्या दडपणा खाली वावरत आहेत,मला त्यांच्या हिताची जास्त काळजी असल्याचे अंधारे म्हणाल्या.त्यांना पोलिस संरक्षण असलं पाहिजे.त्यांच्या जीवाला संरक्षण मिळालं पाहिजे आणि बावणकुळे म्हणत असतील की तपास निरपेक्ष व्हावा, त्यांना आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना खरंच कायद्याची चाड असेल ,तर त्यांनी डीसीपी मदने यांना आदेश द्यावे की संकेत बावणकुळेचं नाव आरोपीमध्ये सहभागी करा,अजून कलमा वाढवा,हे त्यांना बाेलावं लागेल.

फडणवीसांचं ‘राजकारण’खलनायकाच्या डायलॉगसारखं-
फडणवीस म्हणतात, या घटनेचं राजकारण करु नका,हे त्यांचं नेहमीचं पालूपद आहे.एखाद्या चित्रपटात एखाद्या खलनायकाच्या तोंडी जसा एखाद्या डायलाॅग असतो,तसा एकच डायलॉग घेऊन फडणवीस बसले आहेत.काहीही झालं की,‘राजकारण करु नका,राजकारण करु नका’.फडणवीस हे विसरलेत का की पूजा चव्हाणसारख्या एका अश्राप जीवाच्या अब्रूचं मातेरं उधळणारा तुमचाच पक्ष होता ना?ज्या मंत्र्याचा राजीनामा त्या घटनेसाठी मागितला होता,त्याच मंत्र्याचा मांडीला मांडी लाऊन ते बसत आहेत.  तेव्हा त्या घटनेचं कोणी ‘राजकारण’ कोणी केलं?असा सवाल त्यांनी केला.
भागवत यांच्यावरही टिका-
काल राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघसंचालक मोहन भागवत यांनी कोणतीही गरज नसताना शिवस्मारक आणि शिवजयंतीचा वाद उकरुन काढत टिळक-फूले अशी तुलना सुरु केली.जिवंत माणसे तर सोडा तुम्ही महापुरुषांनासुद्धा राजकारण करताना सोडत नाही,खरं तर शिवस्मारक हे टिळकांनी शोधून काढलं नाही,असे सरसंघचालक म्हणाले.असे सांगून टिळकांची उंची आणि कर्तृत्व कमी होत नाही,पण जाणीवपूर्वक टिळकांचे आणि फूल्यांच्या अनुयायांमध्ये सामाजिक आणि जातीय संघर्ष निर्माण करण्याचा प्रयत्न करण्याची सुप्त आणि घाणेरडी ईच्छा ज्यांची आहे,जे  महापुरुषांच्या जीवावर राजकारण करतात,ते सांगतात आम्हाला आम्ही राजकारण करायचं नाही!असा टोला अंधारे यांनी हाणला.
गृहमंत्र्यांच्या नागपूरात आणखी एका तरुणीची हत्या-
रामटेकच्या जंगलामध्ये २४ वर्षीय तरुणीचा मृतदेह सापडला.तिची हत्या करुन तिचा मृतदेह पुरण्यात आला.प्रिया बागडे असे त्या तरुणीचे नाव आहे.या ही प्रकरणात गाडीची नंबर प्लेट बदलण्यात आली होती.खरं तर पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न म्हणून त्या दिवशी कर्तव्यावर असणा-या पोलिसांना देखील सहअारोपीच केले पाहिजे.सहआरोपी पोलिसांवरच गुन्हे दाखल झाले पाहिजे.गृहमंत्र्याचा राजीनामा तरी देखील आम्ही मागणार नाही,देऊच नका राजीनामा,आणखी पाच-पन्नास हत्याकांड घडल्यावरही तुम्हाला काय फरक पडणार आहे?बदलापूरात तुम्ही काय केलं ते सगळ्या जगाला माहिती आहे,अशी टिका यावेळी अंधारे यांनी केली.

पोलिसांची अपहरणाची ‘थ्योरी’-
संकेतने,मानकापूर परिसरात ऑडी थांबविल्याने पोलो(एमएच ०२ सीएच ७७६५)कारने मोहम्मद फैजान व त्याचे दोन साथीदार घटनास्थळी आले.त्यांनी अर्जून व रोनितला बाहेर काढले.पोलोत दोघांना डांबून तहसील पोलिस ठाण्याच्या हद्दीतील टिमकीत घेऊन गेले.याच दरम्यान अर्जुनने पत्नीला मोबाईलवर लोकेशन पाठवून घटनेची माहिती दिली.तिघांनी टिमकीत रोनित व अर्जुनला मारहाण केली.त्याच्याकडील सोनसाखळी व सोन्याचे ब्रेसलेट ही हिसकावले.लाईव्ह लोकेशनच्या अाधारे तहसील पोलिस टिमकीत पोहोचले.अर्जुन व रोनितची सुटका केली,असे पोलिसांनी पत्रकार परिषदेत सांगितले मात्र,अपहरण व मारहाण करणा-या मोहम्मद फैजान व त्याच्या दोन साथीदारांविरुद्ध पोलिसांनी एफआयआर नोंदवली नाही.या घटनेकडे अंधारे यांचे लक्ष वेधले असता,पोलिसच ही घटना पत्रकार परिषद घेऊन सांगतात आणि पोलिसच त्या घटनेची एफआयआर नोंदवत नाहीत,त्यावर बोलत नाही याचा अर्थ पोलिसांसाठी ‘कूछ राज अच्छे होते है‘त्यांना काही रहस्य हे रहस्य ठेवायचे असतील,कदाचित पुढे पोलिसांकडून अजून काही रहस्य येऊ शकतात,असा उपरोधिक टोला अंधारे यांनी हाणला.

……………………………………………
तळटीप-
साहेबांचा फोन आला आणि…
सीताबर्डीचे पोलिस निरीक्षक चंद्रकांत चकाटे हे सुषमा अंधारे यांच्या प्रश्‍नांना उत्तर देत असताना इलेक्ट्रॉनिक मिडीया ते लाईव्ह दाखवत होते.काही काळानंतर चकाटे यांना एक फोन आला.स्क्रीनवर पोलिस आयुक्त डॉ.रविंद्र सिंघल यांचा नंबर बघताच,अंधारे यांना आयुक्त साहेबांचा फोन आहे,असे सांगून चकाटे हे ’हो साहेब,हो साहेब’म्हणू लागले.यानंतर लगेच मिडीयाकर्मींना बाहेर जाण्याचा आदेश चकाटे यांनी दिला.सुषमा अंधारे यांना जे काही विचारायचे आहे ते त्या बाहेर गेल्यावर विचारा,असे चकाटे म्हणाले व त्यांच्या कक्षातील मिडीयाकर्मी बाहेर पडले.मात्र,अंधारे व चकाटे यांचा प्रश्‍नोत्तराचा क्लास संपूर्ण महाराष्ट्र डोळे लाऊन बघत असतानाच,साहेबांचा फोन खणाणला.संपूर्ण प्रादेशिक वृत्त वाहीन्यांवरील हे दृष्य बघून,त्या ‘साहेबांना’ कोणत्या ‘साहेबांचा’फोन आला?यावर माध्यमकर्मींमध्ये चांगलीच चर्चा झडली.
…………………..
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या