फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeब्रेकिंग न्यूजकाही लोकांना कायदे जास्त ‘समान’

काही लोकांना कायदे जास्त ‘समान’

ऑडी कार दूर्घटना आणि सामान्यांचा रोष

नागपूर,ता.९ सप्टेंबर २०२४: रविवारी रात्री साढे बाराच्या सुमारास नागपूरातील रामदासपेठ येथील हॉटेल सेंटर पॉईंट समोर ताशी दिडशेच्या वेगाने भरधाव येणा-या जवळपास पाऊण कोटीच्या ऑडी कारने दोन कार आणि तीन दुचाक्यांना उडवून दिले.मनाचा थरकाप उडवणारे हे दृष्य अनेकांनी बघितले.नशीब बलवत्तर म्हणून कोणतीही जिवित हानि झाली नाही अन्यथा ऑडीचा वेग बघता, कार व दूचाक्यांवरील कोणीही जिवंत राहण्याची शक्यताच नव्हती.नागपूरकरांना मृतांचा आणि रक्तांचा सडा बघायला मिळाला असता.या दूर्घटनेत भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावणकुळे यांचे सुपुत्र संकेत बावणकुळे यांचे नाव समोर आले असून,स्वत: बावणकुळे यांनी ऑडी संकेतची असल्याचे माध्यमांसमोर कबूल केले आहे मात्र,मद्यधुंद असणा-या ऑडी चालकाचा शोध पोलिसांनी घ्यावा,सीसीटीव्ही कॅमरे तपासावे,सत्य समोर आणावे वगैरे वगैरे राजकीय जुमलेबाजी देखील बावणकुळे यांनी माध्यमांसमोर केली.
ऑडीमध्ये एकूण चार जण होते असे प्रत्यक्षदर्शी सांगतात,यात बावणकुळे यांचे जावई,मुलगा तसेच इतर दोन जण असल्याची चर्चा होत आहे,मात्र,सीताबर्डी पोलिसांनी ज्या तत्परतेने ऑडी संकेत बाणकुळे चालवित नसल्याची मखलाशी केली व ख-या दाेन आरोपींना ताब्यात घेतले असल्याची वल्गना केली,ते बघता ऑडी मालक व चालक हा बावणकुळेंसारख्या कद्दावर नेत्याचा मुलगा नसता व इतर कोणी सामान्य माणूस असता, तर आतापर्यंत गंभीर कलमा लाऊन आरोपी पोलिस ठाण्यात डांबल्या गेला असता किंवा तुरुंगात सरकारी पाहूणचारासाठी पोहोचला ही असता मात्र,असे घडले नाही त्यामुळेच कायदा हा सर्वांनासाठी समान असला तरी काही लोकांसाठी तो जास्त ‘समान’असतो,हे पुन्हा एकदा सिद्ध झाले.
ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी देखील बावणकुळे यांच्यासाठी पोलिसांचा कायदा हा वेगळा का?असे एक्सवर ट्टीट केले आहे.या अपघातानंतर ज्या वेगाने यंत्रणा हलली व सर्वात आधी ऑडीची नेमप्लेट काढून टाकण्यात आली, तो राष्ट्रपती पदक विजेता परफॉरमेन्स होता,अशी खरमरीत टिका समाज माध्यमांवर उमटली.पुण्याच्या हिट ॲण्ड रन घटनेत उसळलेला प्रचंड जनक्षोभ लक्षात घेता या प्रकरणात पोलिसांनी चांगलीच खबदारी घेत, दोन आरोपींना अटक केली.अर्जुन हावरे वय वर्ष २७ रा.खामला तसेच राेनित चिंतमवार वय वर्ष २७ रा.मनीष नगर यांच्यावर कलम २८१,१२५,१२५(अ)३२४(२)आर डब्ल्यू १८४ लावण्यात आल्या आहेत.संकेत बावणकुळे ऑडी चालवित नसून अर्जुन हावरे ऑडी चालवित असल्याचा ‘दावा‘पोलिसांनी केला.सीताबर्डी पोलिस ठाण्यातील सेकंड पीआई निर्मला अनिलराव मिर्झापुरे या घटनेचा तपास करीत आहेत.

(छायाचित्र : ऑडीच्या नंबरप्लेट्स.पुढील नंबरप्लेट निघाली हे समजू शकतं मात्र मागची देखील नंबर प्लेट काढून ठेवण्या मागे काय हेतू आहे?असा प्रश्‍न उपस्थित करण्यात आला आहे)

समोर आलेल्या माहितीनुसार धरमपेठ येथील लाहोरी बारमधून ऑडीमधील मद्यपी बाहेर पडले होते.यानंतर काछीपूरा मार्गे लोकमत चौकाकडे येताना हॉटेल सेंटर पॉईंट समोरील कार व दुचाक्यांना जबरदस्त धडक ऑडीने दिली कारण ताशी दीडशे ते शंभरचा वेग ऑडीचा असल्याचे प्रत्यक्षदर्शी सांगतात.याचा अर्थ या ही घटनेत मेंदूची झिंग एका क्षणात निष्पाप लोकांना क्षणार्धात यमसदनी धाडण्यास सज्ज झाली होती!

दूर्घटनाग्रस्त ऑडी मानकापूरवरुन टो करुन सीताबर्डी ठाण्यात आणण्यात आली.दोन्ही आरोपींचे रक्ताचे नमुने रुग्णालयात पाठवण्यात आले.पुण्याच्या ससूनमध्ये रक्ताच्या नमुनामध्ये लाखो रुपये घेऊन जी लपवाछपवी झाली व ज्यात डॉक्टर्सपासून तर पॅथोलॉजी लॅबचा कर्मचारी ज्या प्रकारे आरोपी निघाले ते बघता,नागपूरातील ऑडी दूर्घटनेतही कोणता वेगळा निकाल निघेल,याबाबत आशा बाळगणे मूर्खपणाचे ठरेल.तिथे तर उन्मादी फार मोठ्या व्यवसायिकाचा मूलगा होता येथे तर अतिशय ताकतवर नेत्याच्या मूलावर संशयाची सुई रोखल्या गेली आहे,परिणामी भ्रष्ट आणि कुचकामी यंत्रणा ही सामान्यांवर तर शिरजोर होऊ शकते मात्र,राजकीय नेत्यांच्या लाडावलेल्या बाळांवर नाही कारण कायदा हा त्यांच्यासाठी जास्त ‘समान’ असतो,भारतात तर ही मानसिकता जणू संवैधानिक अधिकारासारखी खोलवर रुजलेली आढळते.परिणामी,रामझुल्यावर दोन मद्यधुंध महिला दोन निष्पाप तरुणांना सहज आपल्या कारने उडवून देतात,भोवाल नावाचा तपास पोलिस अधिकारी आरोपीला नव-याच्या कारमध्ये सहज घटनास्थळावरुन पळून लावतो,दबाव वाढल्यावर दुस-या दिवशी दूपारी आरोपी महिलांच्या रक्ताची तपासणी होते,पोलिसांच्या या कर्तव्यदक्षतेवर म्हणूनच न्यायालयाला ताशेरे ओढत,हा तपास सीआयडीकडे द्यावा लागतो!यावरुन नागपूरातील पोलिसांची तत्परता व कर्तव्यदक्षता लक्षात येते.नागपूरात तर दिवसाला तीन अपघाती मृत्यू होत असल्याचा धक्कादाय अहवाल प्रसिद्ध झाला आहे!याचा अर्थ तीन कुटूंबिय दररोज आपल्या आप्त-स्वकीयांना अपघातात कायमचे गमवत आहेत,२४ ऑगस्ट रोजी तर पोलिस उपनिरीक्षक दीपक ज्योतीराम चोरपगार रा.मानकापूर यांचा अपघाती मृत्यू मानकापूर उड्डाणपूलावर झाला.अज्ञात कारने त्यांना धडक देत पळ काढला होता.

दोन वर्षांपूर्वी अशीच एक घटना उमाशंकर पुरोहित या अवघ्या २६ वर्षीय तरुणासोबत घडली होती.नागपूर महानगरपालिकेचे उपायुक्त राम जोशी यांच्या १७ वर्षीय मुलाने भरधाव वेगाने दुचाकी चालवत जयप्रकाश नगर येथील रुग्यालयाजवळ उभ्या असलेल्या या तरुणाला जोरदार धडक देत पळ काढला.दूभाजकावर डोके आपटून या तरुणाचा मृत्यू झाला.शंभरच्या जास्त वेगाने राम जोशी यांच्या मुलाच्या दुचाकीचा वेग होता असे प्रत्यक्षदर्शीने सांगितले.पाच पिढ्यांमध्ये उमाशंकर हा शेवटचा वंशाचा दिवा होता,त्यांच्या कुटूंबात कोणीही उरले नाही.त्याच्या दोन्ही विवाहित बहीणी एक राजस्थानच्या जैसलमेर तर एक हरियाणाच्या गुडगावमध्ये असून राम जोशी यांच्या मुलाच्या विरोधात दाखल केलेल्या तक्रारीचे पुढे काहीच झाले नाही.तेच राम जोशी मागील तीन वर्षांपासून केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांच्या दरबारात खास दरबारी म्हणून रुजू आहेत.ऐन करोनाच्या काळात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना राम जोशी यांची उचलबांगडी चंद्रपूरला करण्यात आली होती.मात्र,सर्वांशी ‘मधूर‘संबधांतून जोशी यांची बदली थांबिवण्यात यश मिळाले,जोशी हे तब्बल ५ वर्षांपसून एकाच शहरात एकाच पदावर होते हे विशेष.नेत्यांची मर्जी असल्याशिवाय नागपूरात हे घडणे शक्य नाही.निवृत्तीनंतर तेच राम जोशी गडकरी यांना मनपातील ‘अनुभवाचा‘भरपूर ‘फायदा‘ पोहोचविताना दिसून पडत आहेत.मूळात,मृत उमाशंकरला न्याय मिळालाच नाही कारण काही लोकांसाठी कायदा हा जास्त ‘समान’असतो.
हिट ॲण्ड रन प्रकरणातील नवा कायदा सांगतो,घटनास्थळावरुन पळून गेलेल्या चालकावर कलम (१०४)(२)अन्वये गुन्हा दाखल करावा,चालकाने पोलिसांना किंवा दंडाधिका-याला माहिती न दिल्यास त्याला जास्तीत जास्त दहा वर्षांची शिक्षा आणि तब्बल ७ लाख रुपये दंड ठोठावण्याच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे.नागपूरात दररोज घडणा-या अपघातांपैकी किती आरोपींना अशी शिक्षा झाली?पोलिसांनी गुन्हेगारांना शिक्षा देण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले?
नागपूरात मागच्याच महिन्यात ५२ किलो एमडीसह ७८ कोटींचे साहित्य पोलिसांनी जप्त केले होते.याचा अर्थ नागपूर हे एमडीचे देखील हब झाले आहे,हे वास्तव नाकारता येणार नाही.सहज मिळणारे मेफेड्रोन मेंदूवरील ताबा सोडून देत असल्याने कार चालकांचा हैदोस नागपूरच्या रस्त्यांवर निष्पापांचा बळी घेत सर्रास फिरताना दिसून पडताे.पाचपावलीत तर ड्रगचा कारखानाच पोलिसांनी उघडकीस आणला होता.नागपूरात घराबाहेर पडणारा माणूस सुखरुप घरी परतण्याचे दिवस आता संपले कारण एमडीची नशा करुन साक्षात ‘यमदूतच’नागपूरच्या रस्त्यांवरुन फिरताना दिसून पडत आहेत.
थोडक्यात ,पुणे येथील कल्याणीनगर अपघातात दोन अभियंते तरुणाईचा हकनाक बळी घेणा-या घटनेत देखील बांधकाम व्यवसायिक विशाल अगरवालने धनमस्तीच्या बळावर मोटारीचा चालक बदलण्याचा प्रयत्न केला होता.त्या ही अपघातग्रस्त मोटारीत चालकासह चार जण होते,त्या घटनेत देखील चालकाबाबत माहिती दडवण्यात आल्याची बाब समोर आली .स्वत: पुण्याचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी ही माहिती पत्रकार परिषदेत दिली होती.येरवडा पोलिसांच्या तपासात काही चुका झाल्याची कबुली देखील अमितेश कुमार यांनी दिली.प्राथमिक चौकशीत पोलिसांचा दोष आढळून आल्याने त्यांच्यावर कारवाई करणार असल्याचा सूतोवाच त्यांनी केला होता.
२००२ मध्ये सलमान खान याच्या हातून हिट ॲण्ड रन प्रकरण घडले होते.त्यावेळी हा टूटे दिलाचा देवदास भरपूर मद्यपान करुन होता.फूटपाथवर झोपलेल्या निष्पाप गरीब मजूरांना चिरडत त्याची आलिशान कार निघून गेली.त्या वेळी त्याच्या गाडीचा वेग ताशी १८० ते २०० होता.या घटनेचा एकमेव साक्षीदार शिपाई रवीन्द्र पाटील याचा देखील संशयास्पद मृत्यू झाला होता.त्याच्या एकमेव साक्षीने या खटल्याचा निकाल पालटण्याची शक्यता होती मात्र,असे कोणी तरी होते जे पाटील याला न्यायालयात साक्षीसाठी उपस्थित राहू देऊ इच्छित नव्हते.परिणामी सलमान खानच्या विरुद्ध पुरेसे पुरावे नसल्याने पुढे हे प्रकरण बंद करण्यात आले!२०१५ मध्ये मुंबई उच्च न्यायालयाने सलमान खानची निर्दोष मुक्तता केली.या ही घटनेत वाहनचालक बदलला होता,सलमान ऐवजी आरोपी वाहनचालकाला करण्यात आले होते.
नागपूरात बावणकुळे यांच्या मुलाच्या नावे असणा-या ऑडी कार दूर्घटनेत प्राथमिक चौकशीत नागपूर पोलिसांनी दोष ठेऊ नये ,कारण ज्या वेगाने व ज्या मस्तीत ऑडी चालकाने कार चालवित अनेकांचा जीव धोक्यात घातला होता,ते बघता सत्ता मस्तीतील दिवट्यांचा माज उतरवणे गरजेचे झाले आहे.नागपूरातील पोलिस आयुक्त डॉ.रविंद्र सिंघल हे करतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.हाय प्रोफाईल प्रकरण असल्यामुळे प्रकरण दाबल्या जाऊ नये,आरोपी कोणीही असो,गुन्ह्याला क्षमा नसावी,हाच जनतेचा विश्‍वास सार्थक करणारी कृती पोलिस आयुक्तांकडून या घटनेत अपेक्षीत आहे.
बावणकुळे उवाच…
सर्वांसाठी न्याय एकसारखा असावा, दोषींवर कारवाई व्हावी. नागपूर येथे झालेल्या अपघात प्रकरणाचा तपास करताना पोलिसांनी पूर्ण चौकशी करावी, कोणालाही वेगळा न्याय लावू नये व दोषींवर कारवाई व्हावी, अशी स्पष्ट भूमिका भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मांडली.
ते मुंबई येथे माध्यमांशी बोलत होते. अपघात घटनेतील गाडी माझ्या मुलाच्या नावे असल्याचे सांगून बावनकुळे म्हणाले, मी कुठल्याही पोलीस यंत्रणेशी बोललो नाही. पोलिसांनी तपास करताना सीसीटिव्ही फुटेज तपासावेत,कोणतेही दडपण न ठेवता योग्य कार्यवाही करावी. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवित हानी झाली नाही, यासाठी मी परमेश्वराचे  आभार मानतो. परंतु या घटनेची चौकशी व्हावी, असे त्यांनी स्पष्ट केले.
………………………..

- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या