मानसिक बलात्कार,लैंगिक भेदभाव,मानवाधिकाराचे हनन
आत्महत्येसाठी केले प्रवृत्त:नेहा खत्री हिचा गंभीर आरोप
नागपूर,ता. १ सप्टेंबर २०२४: एकविसाव्या शतकाचे तिसरे दशक उलटून वर आणखी चौथे वर्ष सुरु आहे मात्र,समाजात घडणा-या काही घटना या अजूनही आपण मध्ययुगीन काळात जगत असल्याची साक्ष देत असतात.किमान मानसिकतेच्या बाबतीत कुठलाही बदल झाला नसून, स्त्री ही पुरुषांपेक्षा दुय्यम असून तिने त्याच ‘लायकी’ने जगणे आज ही काही पुरुषांना अपेक्षीत आहे.आपले कर्तृत्व,बुद्धिमत्ता,प्रामाणिकता आणि परिश्रमातून ती वरचढ होता कामा नये,असे घडल्यास कामाच्या ठिकाणी तिच्यासोबत किती क्रोर्य घडू शकतं,हे अनेक घटनांवरुन दिसून पडतं.अर्थात वृत्तपत्र माध्यमे देखील याला अपवाद नाहीच कारण तिथे ही शेवटी याच मानसिकतेचे पुरुष काम करीत असतात.दैनिक भास्करच्या अकोला आवृत्तीत नेहा खत्रीने गेल्या वर्षी प्रदीर्घ काळ तिच्यासोबत घडलेल्या मानसिक बलात्कारामुळे परिस्थिती समोर हार पत्करुन, चौदा वर्षांची या वृत्तपत्रातली आपली उज्वल,नेत्रदिपक कारर्कीद संपवली, नोकरीतून १ मार्च २०२३ रोजी राजीनामा दिला मात्र,एवढ्या खोल नैराश्यात गेली की सोशल मिडीयावर या दैनिकातील संपादक आणि सहका-याच्या विरोधात तिने जणू आभासी माध्यमावर युद्धच छेडले.
मालकाला लिहलेल्या आपल्या लांबलचक राजीनामा पत्रात तिने आपले संपूर्ण अंर्तमन उलगडले,तरी देखील ती कुठेही रिकामी झालीच नाही! या वृत्तपत्रात तिची कारर्कीद २००९ पासून सुरु झाली होती.तिच्यातील कर्तृत्व बघून तत्कालीन संपादकांनी तिला ‘वुमन भास्कर’चे संपादक पद दिले.महिलांशी संबंधित आपल्या या एडिशन प्रति नेहा इतकी समर्पित होती की पाच वर्षात तिने कधीही सुटी घेतली नाही.वयाच्या २२ व्या वर्षी ती या नोकरीत रुजू होणारी पहीली अशी मुलगी होती ती रात्रीच्या ३-३ वाजे पर्यंत रात्रपाळीतही काम करीत होती.२०१५ पर्यंत सगळं काही सुरळीत सुरु होतं.महिला संबंधीचे अनेक संवेदनशील विषय ती लिलया हाताळत असे.स्त्री भ्रूण हत्येवरील तिचे एडिशन वाखाण्या जोगे होते.त्यांना गर्भात खुरडून मारुन टाकण्यापेक्षा त्यांच्या पंखांना बळ देऊन मोकळ्या आकाशात उडू द्या,तिचे हे आवाहन तिच्यातील संवेदशनशीलतेची साक्ष देणारे आहे.
सकाळी ११ वा.दैनिकाच्या कार्यालयात येत असे तर मध्यरात्री आपले काम संपवित असे.महिलांसंबधित अनेविध इवेंट्स ती पार पाडत होती.या शिवाय नागपूर,औरंगाबाद,मराठवाडाच्या अंकांसाठी ती समन्वयक देखील होती.याशिवाय भास्कर प्लस एडिशनसाठी देखील काम पाहत होती.पत्रकारिता हा तिचा पॅशन होता,झपाटलेपणातून ती या वृत्तपत्रासाठी काम करीत होती.त्या कामातून आणि अविरत कष्टातून तिला आनंद मिळत असे.शेवटी नावलौकिक कोणाला प्रिय नसतं?२००९ पर्यंत कुण्या महिला पत्रकाराची फार-फार तर सिंगल कॉलमची बातमी प्रसिद्ध होत असे मात्र,नेहाने सलग महिलासंबंधी विषयाला घेऊन साढे तीन हजार पाने संपादक म्हणून प्रसिद्ध केली जो एक जागतिक र्कितीमान आहे.या कामा दरम्यान अकोला येथील ६१ विविध महिला संघटनेच्या अध्यक्षांना तिने वुमन भास्करसोबत लिलया जोडले.महत्वाचे म्हणजे महिला या कधीही जाहीरात देत नाहीत मात्र,नेहाने आपले कसब वापरुन २५ लाखांच्या जाहीराती या वृत्तपत्राला फक्त महिलांकडून मिळवून दिल्या.महिलांसाठी ४५० पेक्षा अधिक वेगवेगळे इवेंट्स आयोजित केलेत.अकोला शहरातील महिलांना तिने ‘वूमन भास्कर’सोबत जोडून ठेवण्याचे काम केले.
२०१५ मध्ये संपादकाची बदली झाली व एक मराठी संपादक त्या पदावर रुजू झालेत.नेहाच्या आरोपानुसार हे संपादक साधे पदवीधर देखील नव्हते तसेच हिंदीमध्ये त्यांना साधी बातमी देखील लिहता येत नव्हती.संगणकावर बातमी टाईप करण्याची कला अवगत नव्हती,अश्यावेळी प्रूफ रिडरसोबत नव्या संपादकाची फारच चांगली गट्टी आणि भट्टी जमली.साठी ओलांडलेल्या या ज्येष्ठ वयाच्या प्रूफ रिडरला एकेकाळी नेहा हिनेच अनेक तांत्रिक बारकवे शिकवले होते व आपल्या कामात निष्णात केले होते.मात्र,एका लहान वयाच्या मुलीकडून त्यांना शिकण्याची वेळ आल्याने कदाचित तो ही राग ‘पुरुष‘म्हणून त्यांच्या मनाला सलत असले मात्र,जुने संपादक असे पर्यंत तो कधीही व्यवहारात उमटला नाही.
नेहाच्या दूर्भाग्याने नवीन संपादकाकडेच यूनिट हेडची देखील जबाबदारी देण्यात आली.जुने संपादक असताना नवीन संपादकाने नेहा यांच्या लोकप्रियतेबाबत अनेकदा टिका केली होती मात्र,जुन्या संपादकांनी त्यांच्या टिकेकडे लक्ष दिले नाही.नेहा हिची लोकप्रियता सुरवातीपासून खटकणा-या संपदाकाला नेहाचे पंख छाटण्याची जणू संधीच मिळाली.हळूहळू या नव्या संपादकांनी एक-एक जबाबदारी नेहाकडून काढण्यास सुरवात केली.वूमन भास्कर सोबतच मुख्य आवृत्ती निघत असे त्यातील वूमन भास्कर वाचण्यासाठी महिला आपल्या पतीलाही वेळेवर वृत्तपत्र वाचायला देत नसत.महिला या आवृत्तीला त्याचं ‘माहेर‘संबोधित असे.या आवृत्तीचा वर्धापन सोहळा देखील मोठ्या थाटात साजरा झाला होता.वूमन भास्करला बातमी देण्यासाठी महिला या रात्रीच्या ११ वा.देखील कार्यालयात येत होत्या.तो काळ व्हॉटस ॲपचा नव्हता.त्यांचे पती नेहाला ओळखत असल्याने विश्वासाने पत्नीला या वृत्तपत्राच्या कार्यालयात एवढ्या रात्री देखील जाऊ देत असत.
मात्र,२०१५ नंतर या संपूर्ण यशाला जणू ओहोटी लागली.प्रिंट लाईनमधून नेहाला हटविण्यात आले. वूमन भास्करची संपादक म्हणून तिच्याकडून सगळे अधिकार काढून घेण्यात आले.तिला जिल्हापरिषदचे बिट देण्यात आली!सायंकाळी ८ वा.घरी निघून जाणारा संपादक व्हॉटस ॲपवर पाने तपासू लागला.नेहाकडे पान १४ असायचे जे सायंकाळी साढे सहापर्यंतच संपूर्ण मजकूरासह तयार असायचे मात्र पान १५,१६,१७ आधी तपासले जाऊ लागले.रात्रीच्या १० वा.पान १४ तपासून त्यातही अनेक बदल करण्याची सूचना मिळू लागल्या!कोणत्याही वृत्तपत्रात एखाद्या पानावर रात्रीच्या १० वा.बदल करने म्हणजे छापखान्यात संपूर्ण भार येणे स्वाभाविक होते.त्या पानावर काय चूकीचे आहे,असे विचारल्यास चूका देखील संपादकाला सांगता येत नसल्याचा आरोप नेहा करते.
संपदकाच्या या संपूर्ण मनमानी कारभारामुळे नेहा त्रस्त झाली.मी संपूर्णपणे तुटली पाहिजे,हार मानली पाहिजे,त्याच्या समोर गयावया केली पाहिजे,त्याच्या मनातील दूषित हेतू पूर्ण करु,यासाठी तो हे सर्व करीत असल्याचा आरोप नेहाने आपल्या पत्रात केला.इतकंच नव्हे तर नेहा झूकत नाही बघून तिला नोकरीवरुन काढण्यासाठीची नोटीस तयार केली मात्र,नोटीस देण्याची कधी हिंमत त्याला झाली नाही.कारणे दाखवाची मात्र नोटीस तिला मिळू लागल्या.तिला कामावरुन काढण्याचा सुगावा तिला लागताच,तिच्या स्वाभिमानी मनाला ते रुजलं नाही आणि १ मार्च २०२३ रोजी तिने राजीनाम दिला.दैनिक भास्करच्या नागपूरात बसलेल्या शीर्षस्थ पदाधिका-यांना तिने पत्र लिहले मात्र,त्या संपादकावर ना मालकाने ना शीर्षस्थ पदाधिका-यांनी कोणती कारवाई केली.मी महिला होते…त्यामुळे मला सगळ्यांनी मिळून हरवलं….अशी व्यथा ती मांडते.
त्या संपादकाने मला का झूकवण्याचा इतका प्रयत्न केला?याचे उत्तर नेहाला या वृत्तपत्राच्या मालकाकडून मिळालेच नाही.महत्वाचे म्हणजे आपली व्यथा सोशल मिडीयावर मांडल्यावर त्यावर त्या ६१ महिला संघटनांच्या अध्यक्षांचा साध कमेंट देखील आला नाही!कारण…आता नेहाच्या मागे या वृत्तपत्राचा ’ब्रॅण्ड‘नव्हता!त्यांच्या बातम्या छापून आणण्यासाठी नेहा ही आता ‘निरुपयोगी’होती!पुरुषांनी जे केले ते तर दुखंद होतंच मात्र,महिलांच्या स्वार्थीपणानेही नेहाला अगदी आतून तोडले.माझ्यासोबत जे घडले तो मानसिक बलात्कार होता,लैंगिक भेदभाव होता,मानवाधिकाराचे हनन होते,असा आरोप करीत नेहाने त्या संपादकाच्या विरुद्ध पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.मात्र,कोणतीच कारवाई झाली नाही.
२ सप्टेंबर २०२३ रोजी दिल्लीच्या महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालिवाल यांच्याकडे लिखित तक्रार दिली.तीच तक्रार नेहाने त्याच दिवशी महाराष्ट्राच्या महिला आयोगाकडे केली.दिल्लीतील मालीवाल यांनी नेहाला महाराष्ट्राच्या महिला अायोगाच्या अध्यक्षांसोबत बोलण्यास सांगितले.महाराष्ट्राच्या महिला आयोगाच्या अध्यक्षांनी अकोला पोलिस ठाण्यात नेहाच्या तक्रारी वर कारवाई करण्यास व तसा अहवाल सादर करण्याची सूचना पत्राद्वारे केली.अकोलामध्ये नेहाने एका फार मोठ्या,नावाजलेल्या दैनिकाच्या संपादकासोबत उघडपणे वैर घेतल्याने तिला जीवाची भीती वाटू लागली.तिने अकोला सोडले व मध्यप्रदेशमध्ये आली.
पोलिसांनी तिला बयाण नोंदवण्यासाठी अकोला येथे बोलावले असता,पिडीतेचे बयाण पोलिसांना तिच्या घरी येऊन नोंदविण्याचा कायदा असल्याचे नेहा यांनी पोलिसांना कळवले.याशिवाय तिच्या जिवाला भीती असल्याचे सांगितले,मात्र,वेळेवर हजर न राहील्यास आम्ही हे प्रकरण बंद करण्याचे पत्र तिला पोलिसांकडून मिळाले!नेहाने महाराष्ट्र राज्याच्या पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांना देखील मेलवर सविस्तर माहिती पाठवली व न्यायाची मागणी केली.अद्याप प्रतिसाद मिळाला नसल्याची खंत ती व्यक्त करते.पोलिस महासंचालक या स्वत: एक महिला असल्यामुळे महिलांच्या वाट्याला येणारा जीवघेणा संघर्ष त्या योग्यरितीने समजू शकतात,म्हणून त्यांच्याकडून न्यायाची अपेक्षा असून अकोला पोलिसांना त्यांनी धारेवर धरावे,अशी अपेक्षा नेहा व्यक्त करते.
आज ही नेहा तिच्यावरील अन्यायविरोधात कायदेशीर लढा देत आहे.हा माझा एकटीचा लढा नाही,असे ती सांगते.माझ्यासारख्या खूप आहेत ज्या दैनिकांच्या कार्यालयातील भिंतींच्या आत सन्मानासाठी घुसमटतात आहेत.ज्या स्वाभिमानी आहेत,चारित्र्यवान आहेत त्यांच्याच वाट्याला संघर्ष येतो.ज्या पोलिसांनी माझ्या तक्रारीवर कायदेशीर चौकशी करुन कारवाई करायला हवी,त्या एस पी च्या बातम्या या दैनिकात मोठ्या प्रमाणात लागत असल्याचा आरोप नेहा करते!