दिवंगत भावाच्या पत्नीने केली तक्रार
फूके कुटूंबियांनी आई-बहीणीवर अत्याचार करण्याची धमकी दिल्याचा आरोप
नागपूर,ता.३१ ऑगस्ट २०२४: भारतीय जनता पक्षाचे आमदार परिणय फुके यांच्यासह त्यांच्या कुटूंबातील सदस्यांच्या विरोधात अंबाझरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.यामुळे भाजपच्या गोटात खळबळ माजली आहे.ऐन निवडणूकीच्या तोंडावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ’खास’गोटातले असणारे परिणय फुके यांच्यावर त्यांच्या दिवंगत भावाच्या पत्नीने तक्रारीत गंभीर आरोप केले आहेत.
परिणय फुके यांचे दिवंगत बंधू संकेतची पत्नी प्रिया यांनी ही तक्रार नोंदवली आहे.या प्रकरणात फुके यांचे वडील रमेश गोविंदराव फुके(वय ७२),आई रमा फुके (वय ६७)पत्नी डॉ.परिणीता फुके(वय ४१)व नितीन फुके (वय ४०)यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारीनुसार संकेत फुके यांना किडनीचा आजार होता.मात्र,लग्नाच्या वेळी ही बाब लपवून ठेवण्यात आली होती.आमचे कुटूंब समाजात नावाजलेले असून राजकीय दबाव आणून आम्ही काहीही करु शकतो,जर तू शांत बसली नाही तर माणसे पाठवून तुझ्या आई-बहीणीव अत्याचार करवू,अशी धमकी सास-यांकडून देण्यात आल्याचा गंभीर आरोप प्रिया यांनी केला आहे.
तिला व संकेतला बाहेर फिरण्यास फुके कुटुंबियांनी मनाई केली होती.सप्टेंबर २०२२ मध्ये संकेतचा मृत्यू झाला.काही दिवसानंतर एटीएम,बँक पासबुक,पासवर्डच्या नोंदी,दागिने फुके कुटूंबियांनी जबरदस्तीने हिसकावून घेतले.अताशा आर्शीवाद बिल्डर्स या कंपनीत संकेत यांचे ४० टक्के शेअर्स होते.ते परस्पर सासूच्या नावे करण्यात आले.या बाबत नितीन फुकेला विचारणा केली असता शिवीगाळ करण्यात आली.
संकेतच्या मृत्यूनंतर प्रियाच्या युनियन बँकेच्या धरमपेठ शाखेच्या खात्यात चार कोटी आले.मात्र,त्यातील ३ कोटी ३० लाख रुपये खोटी स्वाक्षरी करीत सासरे रमेश फुके यांच्या खात्यात वळते करण्यात आले.बँक व्यवस्थापकाने देखील उडवाउडवीची उत्तरे दिली.परिणय व नितीन फुके यांनी जबरदस्ती सह्या घेत पारडी येथील प्लॉट देखील विकला,असे आरोप तक्रारीत नमूद आहे.
अंबाझरी पोलिस ठाण्यात सर्व आरोपींविरुद्ध भादंविच्या कलम ३४,५०६,५०४,४९८(अ)३२३ व २९४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत परिणय फुके यांनी हा कौटूंबिक वादातून घडलेला प्रकार असल्याचे सांगून तडजोडीचा प्रयत्न असफल झाल्याची प्रतिक्रिया माध्यमांना दिली.माझ्या आई-वडीलांनी देखील प्रिया यांच्या विरोधात तक्रार दाखल केली असून ,गेल्या महिन्यात जुलैमध्ये दुसरी तक्रार दाखल केली.माझ्या तडजोडीचा प्रयत्न अयशस्वी झाल्याचे ते म्हणाले.
………………………………