नागपूर,ता.२९ ऑगस्ट २०२४: वृत्तपत्रे ही वाचकांच्या जीवनाशी,विचारांशी,ध्येयवादाशी,त्यांच्या सामान्य गरजांशी,त्यांच्यावरील अन्याय,त्यांचा अभिमान,आनंद आणि दु:ख अश्या वेगवेगळ्या प्रसंगाशी समरस झालेली असून,ज्या वृत्तपत्राला १८१ वर्षांची समृद्ध अशी गौरवाशाली परंपरा लाभली आहे,लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून वृत्तपत्रांचा व्यवसाय जो स्वत:ला मिरवून घेत असतो, त्या व्यवसायाला अलीकडच्या काही काळात अद्य:पतनाचे आणि ‘खंडणी’चे जे ग्रहण लागले आहेत ते थांबता थांबत नसून, अजून त्या अद्य:पतनात सातत्याने वाढ होताना दिसतेय.नागपूरात आज वृत्तपत्र व्यवसायातील आणखी एका खंडणीखोर शहर संपादकाला दहा लाख रुपयांच्या खंडणीच्या आरोपात सदर पोलिसांनी अटक केली असून,वृत्तपत्र माध्यमाला लागलेले हे आणखी एक ‘ग्रहण’म्हणावे लागेल.
प्रतिष्ठित आणि लोकप्रिय अश्या दैनिक भास्कर समुहातील नागपूरच्या आवृत्तीतील शहर संपादक सुनील हजारी यांना सदर पोलिसांनी आज सदर येथील व्हीसीए मैदाना जवळील,चाय विला दूकाना समोरील एका आईसक्रीम पार्लरमध्ये नाट्यमयरित्या खंडणी स्वीकारताना रंगेहात अटक केली.धनराज उर्फ टिटू शाहूराम शर्मा असे फिर्यादीचे नाव असून, त्याच्या तक्रारीवर सदर पोलिसांनी ही कारवाई केली.हजारी हे २०१७ मध्ये दैनिक भास्करच्या नागपूर आवृत्तीत शहर संपादक म्हणून रुजू झाले होते.या पूर्वी ते या समुहाच्या इंदौर आवृत्तीत कार्यरत होते.
दैनिक भास्करमध्ये प्रादेशिक परिवहन कार्यालय(आरटीओ)मध्ये गाड्यामधील ‘चेसिज’क्रमांकाचा जो फार मोठा घोटाळा सुरु आहे त्यावर अनेक वृत्त प्रसिद्ध झाली.या वृत्तानंतर आरटीओच्या काही अधिका-यांवर निलंबनाची कारवाई देखील झाली.अनेकांवर चौकशीचा ससेमिरा सुरु आहे.आरटीओमध्ये दलाल(एजेंट)असणारे शर्मा यांच्यासोबत शहर संपादक हजारी यांनी दोन-तीन महिन्यांपूर्वी संपर्क साधला व त्यांना दहा लाख रुपयांची खंडणी मागितली.मात्र,तडजोडीनंतर ही रक्कम ७ लाख रुपयांपर्यंत आली.
काल रात्री साढे दहा वाजता मेडीकल चौकात शर्मा यांनी खंडणीखोर हजारी याला एक लाख रुपये दिले.आज पुन्हा हजारी याने शर्मा यांना पैसे मागितले असता.शर्मा यांनी सदर पोलिसांना खंडणीविषयीची तक्रार दिली.पोलिसांनी सापळा रचून हजारी याला व्हीसीए येथील एका आईसक्रीम पार्लरमध्ये बोलावून घेतले.या ठिकाणी शर्मा यांनी हजारी याला ८० हजार रुपये हातात दिले.त्यावेळी आणखी २० हजार रुपये कुठे आहेत?अशी विचारणा हजारी याने केली.त्याचवेळी सदर पोलिसांनी मुद्देमालासह आरोपीला अटक करुन त्याच्यावर नव्या भारतीय न्याय संहितेनुसार ३०८(२),३०८(३)कलमांतर्गत खंडणीचा गुन्हा दाखल केला.
(छायाचित्र : आरोपी शहर संपादक सुनील हजारी)
नागपूर आवृत्तीमध्ये रुजू झाल्यानंतर त्यांनी‘कामाची’ माहिती देणारी एक टोळीच गठीत केली असून त्यांच्याद्वारे वेगवेगळ्या क्षेत्रातील‘आसामींचा ’शोध घेतला जात होता,अशी माहिती समोर आली आहे.फिर्यादीने देखील याचा उल्लेख केला आहे.वृत्तपत्राची नोकरी म्हणजे प्रतिष्ठेसह बक्कळ कमाई कमावण्याचा ‘शाही’मार्ग अश्या काही खंडणीखोर पत्रकारांना गवसला आहे.हजारी याचा देखील नागपूरातील धनाढ्य समजल्या जाणा-या भागात अडीच कोटींचा बंगला असल्याची माहिती समोर आली आहे.एखाद्या वृत्तपत्रातील एखाद्या कर्मचा-याला अख्ख्या हयातीत नोकरी करुनही अडीच काेटी रुपये कमावता येत नाही मात्र,अश्या काही खंडणीबहाद्दरांचे ‘वृत्तपत्रे’ही बक्कळ कमाईचे साधन झालेली असून कोणाचे छत्तीसगडमध्ये पंचतारांकित हॉटेल झाले आहे,कोणाचे बेसा भागात कोट्यावधीचे बंगले झालेत तर अनेकांचे मुंबई,पुण्यात फ्लॅट्स आहेत!
समाजातील पराकोटीचा भ्रष्टाचार,अनागोंदी कारभार,भ्रष्ट नोकरशाही,राजकीय भ्रष्टाचार,राजकीय हिंसाचार इत्यादी विषयी वृत्तपत्रात सामान्य वाचकांना वृत्ताच्या माध्यमातून सत्य सांगणे,इतका पराकोटीचा ’पवित्र’हेतू या माध्यमाचा असताना,अलीकडे या हेतूला काळीमा फासून,वाचकांच्या लाख मोलाच्या विश्वासहर्तेला,स्वार्थाच्या लोभात गुंडाळून नागपूरातील अनेक पत्रकार हे कोट्याधीश झाले आहेत.ज्यांचे बिंग फूटले त्यांची हकालपट्टी झाली,ज्यांची अद्याप फूटायची आहेत ते खूर्ची उबवत आहेत मात्र,‘पिते दूध डोळे मिटून जात मांजराची’वृत्तपत्राच्या जगतात त्यांची नावे ही खंडणी आणि कोट्याधीशांच्या यादीत चांगलीच चघळली जाते.
अर्थात वृत्तपत्रातील हे खंडणीखोर ठरवतात,कोणती बातमी प्रसिद्ध करायची,कोणती दाबून ठेवायची!ही वाचकांची प्रतारणा नाही का?सत्य समोर आणने हे वृत्तपत्रांचे ’नीतीमूल्य’ असताना,सत्य दाबून स्व:ची तुंबडी भरणे वरुन स्वत:ला प्रतिष्ठित म्हणून मिरवणे आणि जनता,शासन व प्रशासनाने देखील त्यांची मिजाज ठेवणे, अशी अपेक्षा करने,हा नवाच पायंडा खंडणीखोर पत्रकारांनी पाडलेला दिसून पडतो.एका मराठी वृत्तपत्रातील क्राईम बिट बघणा-या एका ‘मूर्ती लहान पण किर्ती महान’ पत्रकाराने तर चक्क पोलिसांनाच तीन लाखांची खंडणी मागण्याचे धाडस दाखवले होते,ही घटना अद्याप नागपूरकर विसरले नाहीत.महत्वाचे म्हणजे या अश्या खंडणीखारोंना कामावर ठेवणारे,पोसणारे मालक हे इतके ‘अजाण’का असतात?यावर आचार्य पदवीसारखे संशोधन करण्याची नितांत गरज आता निर्माण झाली आहे.वृत्तपत्रे ही अलीकडे खोटी बातमी प्रसिद्ध करण्याची धमकी देण्याचे व खंडणी उकळण्याचे माध्यम झाले आहेत का?याचा विचार वृत्तपत्रांच्या मालकांनी करने गरजेचे आहे.
एफआयआरमधील नोंद-
मी टिटू शर्मा उर्फ धनराज शाहूराम शर्मा वय वर्ष ५५,रा.प्लाट क्रमांक ५६४,बाबा दिपसिंग नगर,सुगत नगर.पो.ठाणे कपिल नगर नागपूर.या पत्त्यावर मी गेल्या वीस वर्षांपासून कुटुंबियांसह राहत आहे.प्रादेशिक परिवहन विभाग नागपूर ग्रामीण कार्यालयात ग्राहकांना ऑनलाईन अर्ज भरुन परवाना देण्याचे काम एजेंट म्हणून करतो.अंदाजे मे २०२४ मध्ये,प्रादेशिक परिवहन विभागाचे काही अधिकारी व कर्मचारी यांच्याविरुद्ध भ्रष्टाचाराच्या आरोपात मुंबई पोलिसांनी कारवाई केली त्यात माझे देखील नाव दैनिक भास्करने छापले.१० जुलै २०२४ रोजी माझा भाचा पवन अरोरा वय वर्ष ४५ रा.टेका नाका नागपूर याने सांगितले की दैनिक भास्करचे पत्रकार सुनील सुखलाल हजारी,वय वर्ष ४५ यांनी भेटायला मेडीकल चौकातील हल्दीरामच्या हॉटेलमध्ये बोलावले आहे.त्या भेटीत मी सुनील हजारे याला माझे नाव का छापत आहात,यामुळे माझी बदनामी होत असल्याचे सांगितले.यावर हजारी यांनी मला,मला सेवापानी करावी लागेल,जी पण किंमत ठरेल ते तुझ्या भाच्याला पवन अरोराला मी सांगून देईल,असे तो म्हणाला.
त्यानंतर सायंकाळी पवनने मला सांगितले हजारी १० लाख रुपये मागत आहे.पैस मिळाले तर वृत्तपत्रात नाव छापणार नाही,असे सांगत आहे.यावर मी इतके पैसे देऊ शकत नसल्याचे पवनला सांगितले.पवनने ही गोष्ट हजारी याला सांगितली असता त्याने पुन्हा आग्याराम मंदिर,गणेशपेठ येथे मला बोलावले.२२ ऑगस्ट २०२४ रोजी पवन सोबत मी हजारी याला भेटलो त्यावेळी मी हात जोडून हजारेला सांगितले इतकी मोठी रक्कम मी देऊ शकणार नाही,यावर हजारी याने किमान ७ लाख रुपये द्यावेच लागतील असे सांगितले.यावर मी फक्त ३ लाख रुपये देऊ शकतो असे हजारीला सांगितले.यानंतर हजारी हा दररोज पवनला फोन करुन पैशांची मागणी करीत होता.पूर्ण बातमी तयार आहे,अशी धमकी देत होता,यानंतर घाबरुन मी २८ ऑगस्ट रोजी रात्री साढे दहा वा.पवनसोबत मेडीकल चौकात,एस.बी.आय च्या एटीएम जवळ हजारीच्या हातात एक लाख रुपये दिले.यानंतर ही हजारे याने ‘७ लाख रुपयाे का बंदोबस्त करो,इतने पैसे से कुछ नही होगा,मेरे पास की आपकी न्यूज पेपर मे डाल देता हूं,कल मुझे और पैसे चाहीये’असे म्हणून निघून गेला.
आज २९ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वा.पवन याने मला कॉल करुन सांगितले की हजारी आजच्या आज आणखी एक लाख रुपये मागत आहे.व्हीसीए समोर येण्यास सांगितले आहे.नाही तर उद्या बातमी छापेल अशी धमकी देत आहे.मी पुन्हा पैश्यांचा बंदोबस्त केला व ८० हजार रुपये घेऊन आलो.यानंतर पवन मला म्हणाला,तुमची काहीच चूक नसताना का भीता?तो तुमच्याकडून बदनामीची भीती दाखवून ’वसुली’करत आहे.पवन ने मला हिंमत दिल्यामुळे मी सदर पोलिस ठाण्यात हजारी विरोधात तक्रार दिली.पोलिसांच्या दिशानिर्देशानुसार मी हजारीला व्हीसीए समोर दूपारी अडीच वा.भेटलो.यानंतर पोलिसांनी खंडणी स्वीकारताना हजारी याला रंगेहात पकडले.मी दैनिक भास्करचा पत्रकार सुनील हजारी याच्या विरोधात ही रितसर तक्रार देत आहे.