फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeब्रेकिंग न्यूजनागपूरात मुख्यमंत्र्याच्या लाडक्या बहीणींची अशीही क्रूर थट्टा! 

नागपूरात मुख्यमंत्र्याच्या लाडक्या बहीणींची अशीही क्रूर थट्टा! 

(संग्रहित छायाचित्र)

मेडीकलच्या वर्ग’ड‘परिक्षेचा फास:महिलांना वाडी केंद्रातील गेटवरुन बाहेर हकलले
मेडीकलच्या ६८० जागेवर कोणाच्या नियुक्त्या?
सुरक्षा रक्षकांची महिलांसोबत अरेरावी:कोणाचा आर्शिवाद?
अर्जासोबत भरलेले हजारो रुपयांचे शुल्क परत करावे: परिक्षार्थी महिलांची मागणी
नागपूर,ता.२६ ऑगस्ट २०२४: जिल्हा नियोजन समिती नागपूर अंतर्गत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय(मेडीकल)येथील वर्ग ‘ड’(वर्ग-४)पदाच्या परिक्षेत वाडी येथील केंद्रावर पराकोटीचा गोंधळ ‘घडवण्यात’आला असून, मुख्यमंत्र्यांच्या शेकडो लाडक्या बहीणींच्या डोळ्यातून अक्षरश: अश्रूंच्या धारा वाहू लागल्या कारण ५०च्या वर  परिक्षार्थी बहीणी या परिक्षा केंद्रावर नियोजित वेळेत पोहोचून देखील त्यांना परिक्षा देण्यापासून थांबवण्यात आले!
आज २६ ऑगस्ट २०२४ रोजी परिक्षार्थ्यांना सकाळी ७.३० वा.ची रिपोर्टिंग वेळ देण्यात आली होती,त्यानुसार परिक्षार्थी महिला व मुली या नियोजित वेळेत ION DIGITAL ZONE IDZ3 WADI
TECHGRESSOR SOFT SOLUTIONS PVT LTD.G-4/1/B MIDC HINGNA WADI
RD OPP MUNICH MOTORS BMW SHOWROOM केंद्रावर पोहोचल्या मात्र,फाटक बंद ठेवण्यात आले होते तसेच रस्त्यावरच लांबच लांब रांग लावण्यात आली.सूचना पत्रात कुठेही ओळखीच्या पुराव्यासाठी छायांकित प्रत आणण्याचा उल्लेख नसताना,गेटवरील सुरक्षा कर्मी ,महिलांना छायांकित प्रत आणण्यासाठी पाठवित होते.अनेक विवाहित महिलांनी आधार कार्ड,पॅन कार्ड यासह अनेक पुरावे दाखवून देखील विवाहाचा राजपत्रित पुरावा मागण्यात आला.अनेकींच्या पॅनकार्डवर वडीलांचे तसेच विवाहानंतरचे पतीचे असे माहेर व सासरकडील दोन्ही आडनाव असताना देखील पॅन कार्ड पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यास नकार देण्यात आला!
अनेकींनी घरी फोन करुन आपल्या पती तसेच मुलांकडून व्हॉट्स ॲपवर लग्नाच्या नोंदणीचा गेझेटेड पुरावा मागून तो सुरक्षा रक्षकांना दाखवला मात्र,जणू जिल्हा नियोजन समितीकडून आयोजित होणा-या या परिक्षेच्या आयोजकांनी,कमीत कर्मी परिक्षार्थ्यांना परिक्षा कक्षापर्यंत पोहोचू देण्याचे ठरवून टाकले होते,तश्‍या जणू सूचनाच या केंद्रावरील सुरक्षा रक्षकांना देण्यात आल्या होत्या,असा आरोप परिक्षार्थी महिलांनी केला.
शासनाच्या लिखित सूचनेत कुठेही छायांकित प्रतींची मागणी नसताना अनेक महिला व मुलींना छायांकित प्रत आणण्यासाठी पाठवण्यात आले व त्या जेव्हा गेट जवळ आल्या तेव्हा ,पाच मिनिटांचा उशिर झाला असल्याची सबब सांगून त्यांच्यासाठी फाटक उघडण्यात आलेच नाही.अनेक मुलींनी रडारड सुरु केली तर काहींनी दगड हातात घेऊन फाटकावर मारीत फाटक उघडण्याचा प्रयत्न केला.महत्वाचे म्हणजे एक पोलिस कर्मी हे संपूर्ण नाट्य लांब खूर्चीवर बसून बघत होता मात्र,मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहीणींचे अश्रू पुसण्यासाठी त्याने कोणतीही तसदी घेतली नाही.
परिक्षार्थींना सूचना पत्रावर सकाळी ७.३० ची वेळ दिली असताना या केंद्राच्या दर्शनीस्थळी परिक्षेची वेळ ही सकाळी १०.३० वा.असल्याची नोटीस लावण्यात आली होती.मग सकाळी ७.३० वा.पासून परिक्षा केंद्राच्या आत जाऊ पाहणा-यांना रोखून १०.३० वा.नेमक्या कोणाच्या परिक्षा घेण्यात आल्या?असा प्रश्‍न उपस्थित करण्यात आला.या परिक्षेसाठी खुल्या वर्गाकडून एक हजार रुपयांचे शुल्क आकारण्यात आले असून ओबीसी वर्गातील परिक्षार्थ्यांनी ९०० रुपये शुल्क भरले आहेत.अनुसूचित जाती-जमातीच्या परिक्षार्थ्यांनी ६००,३०० रु.शुल्क दिले असल्याचे अनेक महिलांनी सांगितले.परिक्षेपासून आम्हाला वंचित ठेवण्याचा घाटच घातला होता तर परिक्षेचा फास कसासाठी केला?असा संतप्त सवाल त्यांनी केला.
या केंद्रावर महिला व मुलींना फाटकावरील कंत्राटी सुरक्षा रक्षक महिला व पुरुषांकडून अतिशय उद्धट वागणूक मिळाली,अनेक सुरक्षा रक्षकांनी महिला परिक्षार्थ्यांना ‘चला निघा’म्हणून पाठीवरुन धक्का देत बाहेर काढले!आम्ही परिक्षेचे शुल्क भरले असल्याने आम्ही परिक्षा देणारच,असे अनेक विवाहित महीलांनी सांगताच,पैश्‍यांचा दम कोणाला देता?म्हणत,महिलांना फाटका बाहेर हाकलण्यात आले!हा संपूर्ण घटनाक्रम सीसीटीव्हीमध्ये कैद झाला असून वाडी येथील या परीक्षा केंद्रावर कश्‍याप्रकारे नियोजित वेळेत तसेच संपूर्ण कायदेशीर ओळखपत्र घेऊन आले असतानाही, शेकडो महिला व मुलींना ही परीक्षा देण्यापासूनच रोखण्यात आले!त्यांना फाटकाच्या आत देखील येऊ देण्यात आले नाही,ही मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहीणींची क्रूर थट्टा नाही तर आणखी काय आहे?असा प्रश्‍न ते करतात.

(छायाचित्र : परिक्षार्थी नूतन यांचा पॅन कार्ड,यात लग्नापूर्वीचे नूतन नामदेव मोरे तसेच लग्नानंतरचे गोवर्धन माधव झाडे हे आडनाव स्पष्ट दिसत असल्यावरही विवाहाचा राजपत्रित पुरावा मागण्यात आला व नूतन यांनाही परीक्षा देण्यापासून वंचित ठेवण्यात आले!)

९ महिन्यांपूर्वी ही परिक्षा शासनाने घोषित केली होती.९ महिन्यांपासून हजारो परिक्षार्थी शासकीय नोकरीकडे डोळे लाऊन बसले होते.यासाठी कसून तयारी केली मात्र,आज वाडीच्या या केंद्रावर जे घडले ते अनपेक्षीत नसून, परिक्षार्थ्यांच्या भावना व शासनावरील विश्‍वासासोबत हा नेहमीसारखाच ‘क्रूर खेळ’खेळण्यात आला!.
याच केंद्रावर तलाठीची देखील परिक्षा पार पडली त्यावेळी परिक्षार्थ्यांचे आधार कार्ड,पॅन कार्ड ग्राह्य धरण्यात आले होते मग मेडीकल मधील गट ‘ड’च्या परिक्षेसाठी तेच शासनमान्य पुरावे,शासनाच्याच जिल्हा निवड समितीला का मान्य नव्हते?लपूनछपून आधीच मेडीकल मधील गट ’ड‘च्या ६८० जागेवर कोणत्या राजकीय पक्षांच्या कोणत्या कार्यकर्त्यांची वर्णी लावण्यात आली?असा खडा सवाल परिक्षा केंद्रावरील संतप्त महिला परिक्षार्थ्यांनी केला.या केंद्रावरील प्रभारीकडे काही महिलांनी कैफियत मांडली असता,पॅन कार्ड बघून परिक्षार्थ्यांना परिक्षा देण्यासाठी मंजुरी दिली जाईल,असे त्यांनी सांगितले मात्र,त्यांची ही बोळवण,‘बोलाचीच कढी बोलाचाच भात ’उक्ती ठरली.दोन मिनिटेही फाटक उघडून महिलांना आत घेण्यातच आले नाही.
अनेक महिलांनी ‘एफटीपीएस’वेबसाईटवर मेल केले,याशिवाय स्वत:वरील पराकोटीच्या अन्यायावरील वाचा फाेडण्यासाठी दूसरा पर्याय त्यांना सूचत नव्हता.समाजातील सर्वसाधारण परस्थितीतून मार्ग काढत,स्वत:च्या कुटूंबासाठी,मुलांच्या शिक्षणासाठी,संसाराला हातभार लावण्यासाठी शेकडो महिला आज डोळ्यात सरकारी नोकरीचे स्वप्न घेऊन वाडी येथील परीक्षा केंदावर पोहोचल्या होत्या मात्र,प्रशासन नावाच्या मुर्दाड व्यवस्थेने पुन्हा एकदा त्यांची थट्टा केली.तिचं मनोधैर्य खचवण्याचं काम केलं.हेतुपुरस्सर परीक्षा देण्यापासून तिला वंचित ठेवण्यात आलं.पूर्वी कोणतीही सूचना न देणा-या शासनाने त्यांना वेळेवर लग्नाचे प्रमाणपत्र मागितले,राजपत्रावरील नोंदणी पत्र मागितले.मेडीकलचे अधिष्ठाता व जिल्हा निवड समितीचे सदस्य सचिव डॉ.राज गजभिये यांच्या स्वाक्षरीनिशी परिक्षार्थींना पाठवण्यात आलेल्या सूचना पत्रावर प्रवेश,पत्रासह ओळखपत्र म्हणून आधार कार्ड किंवा पॅन कार्ड,पारपत्र,वाहन चालक परवाना,निवडणूक आयोगाचे ओळखपत्र सोबत आणावे,या ओळखपत्रांची छायांकित प्रती गाह्य धरल्या जाणार नाही,असे स्पष्टपणे नमूद आहे,मग वाडी येथील परिक्षा केंद्रावरुन शेकडो महिलांना व मुलींना फाटकावरील सुरक्षा रक्षकांनी ज्या उद्देशाने छायांकित प्रति आणण्याच्या सूचना केली त्यावरुन ‘दाल मे काला नसून,पुरी दाल ही काली थी‘या शंकेला वाव आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयासाठी एकूण ६८० जागेकरिता ही परीक्षा घेण्यात आली होती.अनेक महिलांनी आपल्या लहान-लहान मुलांना घेऊन परीक्षा केंद्र गाठले होते.मात्र,महाराष्ट्राच्या उपराजधानीत आज मुख्यमंत्र्यांच्या शेकडो लाडक्या बहीणींवर प्रशासनाच्या उद्दाम ,भ्रष्ट व मस्तवाल भूमिकेतून, उपमुख्यमंत्र्यांच्या शहरातच, हुंदके देऊन रडण्याची वेळ आली. ही संपूर्ण परीक्षा रद्द करण्यात येऊन पुन्हा परीक्षा घेण्याची मागणी करण्यात आली आहे.
भाऊरायाच्या ओवाळणीत आपलं ही आयुष्य ओवाळून टाकणा-या स्त्रीवर अन्याय झाल्यास ती पेटून उठते,त्या ज्वाळेत भाऊरायांनी होरपळून निघण्यापूर्वी, न्याय मिळण्याचा इशारा प्रस्थापितांना या लाडक्या बहीणींनी दिला आहे.लवकरच पत्रकार परिषद घेऊन या संपूर्ण अन्यायाला वाचा फोडण्यात येईल तसेच मुलांबाळांसह संविधान चौकात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा महिला परिक्षार्थ्यांनी दिला आहे.
…………………………………..
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या