असामाजिक तत्वांचा वावर:स्थानिकांमध्ये भयाचे वातावरण
‘सत्ताधीश’ऑन द स्पॉट
नागपूर,ता.१८ ऑगस्ट २०२४: महाराष्ट्राच्या उपराजधानीत राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांचे तसेच केंद्रिय मंत्र्यांचे निवासस्थान आहे,याशिवाय नागपूर मतदारसंघात एकूण सहा विधानसभा मतदारसंघाचा समावेश होतो,इतक्या सा-या राजकीय नेत्यांची मांदियाळी या शहरात असताना देखील, उपराजधानीच्या एखाद्या भागातील नागरिक हे चक्क ‘दहशतीत’राहत असतील तर अश्या भागाची तुलना अफगानिस्तानमधील तालिबान राजवटीशी नकळत जोडली जाण्याची संभावना आहे.नागपूरातील मानकापूर भागातील गाडगे बाबा सोसायटीच्या मैदानाजवळील परिसर हा सध्या अशाच प्रकारच्या भयाच्या वातावरणात दिसून पडला.
मूळात हे मैदान गाडगे बाबा सोसायटीचे होते,सोसायटीने ते नागपूर सुधार प्रन्यासकडे हस्तांतरित केले.गेल्या दोन-तीन वर्षांपासून मात्र या परिसरातील वातावरणात एक प्रकारचा तनाव निर्माण झाला.या मैदानावर खेळण्यासाठी संपूर्ण परिसरातील नागरिकांची मुले खेळायला येत होती कारण इतक्या मोठ्या परिसरात हे एकमेव मैदान परिसरातील मुलांसाठी उपलब्ध आहे मात्र,याच परिसराला लागून असणा-या ताज नगर झोपडपट्टीतील काही असामाजिक तत्वांमुळे व त्यांच्या कृत्यांमुळे सध्या हे मैदान ‘गाजत’आहे.
तीन वर्षांपूर्वी येथील एका सुखवस्तू नागरिकाच्या घरासमोरील चारचाकीची काच फोडण्यात आली.त्या घरातील तरुण मुलाने काच फोडणा-या मुलाच्या कानशिलात लगावली.कारच्या काचा या महागड्या असतात,कोणीही यावे व दगड मारुन त्या फोडाव्या एवढी मोगलाई निश्चितच पुरोगामी महाराष्ट्रात कोणी खपवून घेणार नाही. क्रियेला प्रतिक्रिया असतेच.मात्र,अवघ्या काही वेळातच मानकापूर झोपडपट्टीसह टिमकी येथील झोपडपट्टीच्या २५-३० लोकांनी त्या तरुणाचे घर गाठले.त्यांच्या हातात काठ्या व शस्त्रे होती,असे त्या तरुण मुलाच्या आईने सांगितले.त्या मुलाला जबर मारहाण करुन घराबाहेर ओढत असताना,तरुणाच्या आईने आपल्या मुलाला जमावाच्या तावडीतून सोडवले व माफी मागून प्रकरण निभावून नेले.या घटनेनंतर त्या मुलाला बाहेर गावी पाठवण्यात आले.
याच परिसरातील एक मुलगा हा मैदानात खेळत असताना,त्याला हाकलून लावण्यात आले.हे आमचे मैदान असल्याची धमकी त्या मुलाला देण्यात आली.ही घटना सहा महिन्यांपूर्वी घडली.मुलाचे वडील केंद्रिय सेवेत मोठे अधिकारी असल्याने त्यांनी त्यांच्या मुलाशी दमदाटी करणा-या मुलांना जाब विचारला.त्या अधिका-याचा रसूख व ओळखपत्र पाहून त्या क्षणी दमदाटी करणारे थोडे नम्र पडले.मानकापूर झोपडपट्टीतील तरुण मुले लहान मुलांच्या घसरगुंडीवरुन घसरताना परिसरातील महिलांनी त्यांना हटकले असता,तुमच्या बापाचे मैदान आहे का?अश्या भाषेत महिलांना उत्तर मिळाले!
याहून कहर म्हणजे रात्रीच्या ११-११ वाजता शेकडो दुचाक्या मैदानाच्या फाटकासमोर उभ्या असतात.मैदानाच्या आत अंधारात काय-काय घडत आहे?हे बघण्याची तसदी येथील नागरिक ’चुकूनही’घेत नाहीत.एकदा तर मैदानात रात्रीपर्यंत ‘वाढदिवस’साजरा करण्यात आला.ज्याचा नागरिकांना बराच त्रास झाला.
सर्वात जास्त धक्कादायक बाब म्हणजे माजी महापौर दयाशंकर तिवारी यांच्या पुढाकारातून नागपूरात स्वातंत्र्याच्या पंचाहत्तर वर्षाच्या निमित्ताने नागपूरातील विविध भागात स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने आरोग्य केंद्र साकारण्यात आली त्यातील एक आरोग्य केंद्र या गाडगे बाबा सोसायटीच्या मैदानात एका कोप-यात साकारले आहे.त्या केंद्राचा वापर रात्री असामाजिक तत्व हे ‘गणिका’ आणून उपभोगण्यासाठी करतात,असा धक्कादायक आरोप येथील महिलांनी केला!हे मैदान म्हणजे सभ्य नागरिकांसाठी फोर मोठी डोकेदुखी झाली असून, याच केंद्रात एका अल्पवयीन सोबत बलात्काराची घटना घडली असल्याचे ते सांगतात.ती मुलगी गर्भवती राहील्याने बिंग फूटले,यानंतर आरोपीला अटक करण्यात आली.
येथील नागरिकांनी चार-पाच वेळा मैदानाच्या मुख्य फाटकाला कुलूपं लावली मात्र,ती असामाजिक तत्वांनी सर्रास तोडून टाकली.फाटकावर सतत त्यांचा वावर असतो,कोणी हटकले तर ते तरुण भीतीदायकरित्या चक्क डोळे वटारुन पाहतात,झाेपडपट्टीतील वाहन चालक याच परिसरातील नागरिकांच्या घरांना रेटून मोठमोठी वाहने लाऊन ठेवतात.यामुळे देखील सतत वाद होतो.
(छायाचित्र : नागरिकांच्या घरांना लागून मोठ मोठ्या वाहनांची अशी अनाधिकृत पार्किंग केली जाते)
अश्या अगणिक तक्रारींचा पाढाच येथील महिलांनी वाचला.परिसरातील नागरिकांनी पदरातले पैसे खर्च करुन ६ हजार रुपये महिना पगारावर सुरक्षा रक्षक देखील नेमला होता मात्र,तो देखील टिकू शकला नाही.रात्री अपरात्री फटाके फोडले जातात.तलवारीने केक कापले जातात.येथील नागरिकांची मागणी आहे अय्याशीचा अड्डा झालेले मैदानातील ते आरोग्य केंद्र त्वरित पाडण्यात यावे.मेयो रुग्णालयाचे नव्या वाढीव खाटांचे रुग्णालय याच परिसरात येत असल्याने ,आता या अश्या आरोग्य केंद्राची गरज राहणार नसल्याचे येथील महिला सांगतात.या ठिकाणी दिवसा व रात्र पाळीसाठी सुरक्षा रक्षक नेमावे.पोलिसांनी रात्रीची गस्त या परिसरात वाढवावी,अशी मागणी येथील रहीवासी करतात.
(छायाचित्र : एक दैनिकाचा वाहनचालक देखील दररोज असे वाहन पार्क करुन झोपडपट्टीतील त्याचा घरात निघून जातो!ही दररोजची डाेकेदुखी झाल्याचे येथील रहीवासी सांगतात!)
मानकापूरचा हा भाग पश्चिम नागपूरमध्ये येतो व या भागाचे प्रतिनिधित्व काँग्रेसचे आमदार विकास ठाकरे करतात.आजच विकास ठाकरे यांच्या हस्ते मानकापूर भागात ‘निर्णयात ठेवली गती,साधत आहे पश्चिम नागपूरची प्रगती’या स्लोगन खाली भूमिपूजनाचे कार्यक्रम पार पडले.यात लुंबिनी नगर मानकापूर येथे शौचालयाचे बांधकाम,त्रिमुर्ती अपार्टमेंट मानकापूर येथील मोकळ्या मैदानातील विविध स्थापत्य काम,आंबेडकर सोसायटी मानकापूर येथे योगा भवनाचे बांधकाम,आंबेडकर सोसायटी मानकापूर येथील मोकळ्या मैदानातील विविध स्थापत्य कामाचे भूमिपूजन पार पडले.या कार्यक्रमांची निमंत्रण पत्रिका या परिसरातील नागरिकांच्या व्हॉट्स ॲप ग्रूप्सवर देखील व्हायरल झाली.ठाकरे यांनी मानकापूर मधील ज्वलंत अश्या गाडगे बाबा सोसायटीच्या मैदानाचा लवकरात लवकर विकास करण्याची मागणी येथील रहीवाश्यांनी केली.
गाडगे बाबा सोसायटीत बांधले २५ लाखांचे सभागृह:आ.विकास ठाकरे
या सोसायटीत २५ लाख रुपये खर्च करुन सभागृह बांधून दिले ज्यामध्ये नवरात्रीचा धार्मिक उत्सव पार पाडला जातो.२१ जणांची कमेटी दूर्गोत्सवासाठी असून,या भागातील नागरिकांनी आमदार म्हणून कधीही माझ्याकडे अश्या प्रकारची तक्रार केली नाही.माझ्या घराजवळ देखील शास्त्री ले-आऊट आहे.त्या भागातील मैदानात देखील जवळपासच्या झोपडपट्टीतील मुले खेळतात ज्यांच्या त्रासाबद्दल शास्त्री नगरमधील नागरिक माझ्याकडे तक्रार करतात.त्यांनाही असभ्य भाषेत बोलले जाते.२५ वर्षांपासून मी राजकारणात आहे,मात्र,नागरिक ‘दहशतीत’ राहत असल्याची तक्रार कधीही ऐकू आली नाही.त्याच परिसरात भारतीय जनता पक्षाचे, सोसायटीचे अध्यक्ष अशोक धोटे राहतात.त्यांनी देखील कधीच अशी तक्रार कानावर घातली नाही,याचा अर्थ या तक्रारींमध्ये ‘तथ्य’ नाही.यात ‘राजकारण‘असू शकतं.नासुप्रकडून या मैदानाच्या विकासाची फाईल तयार झाली आहे,लवकरच या मैदानाचा आम्ही विकास करु.
(अतिशय गंभीर अश्या प्राप्त झालेल्या तक्रारींबाबत अशोक धोटे यांच्याशी संपर्क केला असता,कॉल रिसिव्ह झाले नाहीत)