फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeब्रेकिंग न्यूजइतवारीत प्रशासनाला वाट ..कोचिंग क्लास दूर्घटना घडण्याची!

इतवारीत प्रशासनाला वाट ..कोचिंग क्लास दूर्घटना घडण्याची!

बेसमेंटमध्येही दूकानांची भरमार:अतिक्रमणाची ‘अति‘
अग्निशमन यंत्रणा धाब्यावर:’पंजवानी’ मार्केट आर्दश उदाहरण
‘सत्ताधीश‘ऑन द स्पॉट:(भाग-२)
नागपूर,ता.१० ऑगस्ट २०२४: महानगरपालिकेचा नगर रचना विभाग, गांधी बाग झोनचे अधिकारी व इमारत मालकांच्या ‘आने दो’कारभारातून इतवारीतील अनेक आंतरिक भाग नागरिकांच्या जीवावर उदार झालेले आढळतात.केवळ दूकानासमोरील भाग हडपण्यापुर्ती लोभ न साधता,एकावर एक अनाधिकृत इमले चढवणे तसेच बेसमेंटमध्ये देखील दूकाने थाटण्याचा हव्यास, दिल्लीतील राजेंद्रनगर भागात अतिवृष्टीमुळे पुराचे पाणी शिरुन कोचिंग सेंटरच्या इमारतीच्या बेसमेंटमध्ये बुडून स्पर्धा परिक्षांची तयारी करणा-या तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला होता,त्याची आठवण करुन देतात.तीच धोकादायक स्थिती इतवारीमध्ये देखील ठिकठिकाणी दिसून पडते मात्र,प्रशासन राजकीय वरदहस्तातून आणि स्वत:च्या स्वार्थलोलूपतेतून मूग गिळून गप्प बसलेले आढळतात.
इतवारीतील तीननल चौकातील सुप्रसिद्ध पंजाबी कुल्फीवाले विरुद्ध असणारे ‘पंजवानी‘मार्केट याचे आदर्श उदाहरण आहे.या मार्केट इमारतीची निर्मिती १९८८ साली फक्त चार मजली करण्यात येणार होती मात्र,आजच्या तारखेत तिथे बेसमेंट,ग्राऊंड फ्लोरसहीत अनाधिकृत सात मजले चढून गेले आहेत.बेसमेंटमध्येच आठ कपड्यांची दूकाने आहेत.या इमारतीचे वैशिष्ठ म्हणजे बिल्डरनी शरण क्षेत्रावर देखील अतिक्रमण करीत संकटाच्या वेळी अग्निशमन वाहनांना आत जाण्याची देखील जागा सोडली नाही!
सुरवातीच्या काळात पंजवानी मार्केट इमारत व शेजारची रहीवासी इमारतीचा नकाशा नागपूर सुधार प्रन्यासने स्वीकृत केला होता.महत्वाचे म्हणजे,पंजवानी इमारत ही बिल्डरने रहीवासी इमारत म्हणूच नासुप्रकडून मंजूर करुन घेतली होती.मात्र,या इमारतीत फ्लॅट्स न काढता तब्बल ५० च्या वर दूकाने काढली!ती देखील अतिशय दाटीवाटीने…सुरक्षेचे कोणतेही नियम न पाळता.यात कहर म्हणजे पंजवानी मार्केटला लागून असलेल्या रहीवाशी इमारतीपर्यंत बांधकाम करुन त्या रहीवासी इमारतीचा जिना व लिफ्टचा उपयोग पंजवानी मार्केटसाठी केला जाऊ लागला.
या विरोधात इमारतीतील रहीवाश्‍यांनी नासुप्र व पुढे या इमारती महानगरपालिकेला हस्तांतरित झाल्यानंतर मनपा प्रशासनाकडे तक्रार नोंदवल्या.मनपाच्या अग्निशमन विभागाने देखील पंजवानी मार्केटला धोकादायक इमारत म्हणून नोटीस देखील पाठवल्या.अनाधिकृत बांधकाम व अतिरिक्त तीन मजले चढवण्यावर देखील आक्षेप घेण्यात आला.ओसीडब्ल्यू व एसएनडीएलला या इमारतीमधील वीज व पाणी कापण्याची सूचना देण्यात आली व त्या सूचना अमलता देखील आणण्यात आल्या.अग्निशमन विभागाच्या या कारवाई विरोधात राज्य सरकारच्या अग्निशमन विभागाच्या सचिवांशी पंजवानी इमारतीतील दूकानदारांनी संपर्क साधला.सचिवांनी तीन ते सहा महिन्याच्या आत इमारतीमध्ये अग्निशमन यंत्रणा तसेच आपातकालीन सुरक्षाव्यवस्था निर्माण करण्यासाठीचा वेळ दिला मात्र,आता या घटनेलाही एका दशकाहून अधिकचा काळ लोटून गेला असला तरी पंजवानी मार्केट जी इतवारी भागातील सर्वाधिक धोकादायक इमारत बनली आहे,त्या विरुद्ध प्रशासनाने पुढे कोणतीही कारवाई केली नाही.विशेष म्हणजे पंजवानी इमारतीतील वीज व पाणी कापण्यात आल्यानंतर तेथील दूकानदारांनी या कारवाईच्या विरोधात तत्कालीन महापौर प्रवीण दटके तसेच स्थायी समितीचे अध्यक्ष नरेंद्र उर्फ बाल्या बोरकर यांच्याकडे दाद मागितली होती!

(छायाचित्र : पंजवानी मार्केटमधील आतील भाग.प्रत्येक मजल्यावर संकटकाळात इतकीच जागा धावण्यासाठी मिळेल!)

न्यायालयीन प्रक्रिया,दावे-प्रतिदावे,पंजवानी मार्केटची फाईल नासुप्रमध्येही न सापडणे,सतरंजीपुरा झोन मधून गहाळ होणे,त्या मार्केटची फाईलच झोनमध्ये नसल्याची ग्वाही झोनचे सहायक आयुक्त प्रकारश वराडे यांनी देने,मनपा मुख्यालयातील नगर रचना विभागात देखील या मार्केटची फाईल न सापडणे या संपूर्ण ‘कर्तव्य तत्परतेचा’भाग सोडून दिल्यास,या अतिशय धोकादाय मार्केटमध्ये खरेदी करण्यासाठी येणा-या ग्राहकांच्या जिवितेचं काय?याचे उत्तर गेल्या २६ वर्षांपासूनअनुत्तरित असल्यानेच, खापरे मोहल्ल्यातील एखादी सतरा वर्षीय अनुष्का हिचा इतवारीतील आग लागण्याचा दूर्घटनेत अकाली मृत्यू होतो,१५ वर्षीय भाऊ मानसिक आघात सहन करु न शकल्याने भ्रमित अवस्थेत पाहोचतो,बाकडे दाम्पत्य धूराचे थर फूफ्फूसात दाटल्याने जीवन-मृत्यूच्या संघर्षात सापडलेले आढळतात.
‘सत्ताधीश’ने या मार्केटमधील सर्व मजल्यांवर फेरफटका मारला असता,७ ऑगस्ट २०२४ रोजी म्हणजे तीनच दिवसांपूर्वी, इतवारीतील खापरीपुरा भागात अत्तराच्या दूकानाला आग लागल्यानंतर माणसे इतकी सहज का मरतात?याचा उलगडा झाला.अग्निशमन यंत्रणेसह आपात्कालीन परिस्थितीत कोणतीही सुरक्षेची यंत्रणा इमारतीत नसल्याने आग लागल्यावर या आठही मजल्यावरील दूकानातील शेकडो माणसे ही क्षणार्धात मृत्यू पावतील,इतक्या धोकादायक स्थितीत ही इमारत, प्रशासन व राजकीय नेत्यांचे तोंड चिडवित उभी असलेली आढळते.महत्वाचे म्हणजे आगीला आणखी रौद्र रुपात परिवर्तित करतील अशा ज्वलनशील कागदी पुठ्ठ्यांचे ढिग प्रत्येक मजल्यावर रचून ठेवण्यात आले आहे!प्रत्येक मजल्यावर इतक्या दाटीवाटीने दूकाने उभारण्यात आली आहे की,हे मार्केट आहे की कारागृह,असा प्रश्‍न पडतो. दोन पावले पायी चालायला देखील जागा पंजवानी मार्केटच्या त्या कल्पकबुद्धीच्या बिल्डरने सोडली नाही.

(छायाचित्र : लाकडी प्लायवूड आणि कागदी पुठ्ठे…पंजवानी मार्केटच्या सगळ्या मजल्यावर हेच दृष्य आढळून येतं!)

या ठिकाणी सर्वात पहीला अपघात घडला होता तो २१ जून १९७१ रोजी जेव्हा जीर्ण झालेली इमारत कोसळून पडली व त्या दुर्घटनेत याच ठिकाणी एकूण ७ जणांचा मृत्यू झाला होता त्यात वयोवृद्धांपासून तर लहान बालकांचा देखील समावेश होेता.५३ वर्षांच्या कालावधीनंतर देखील या वास्तूच्या धोकादायक स्थितीत कोणतेही परिवर्तन झाले नसून, उलट ती आणखी जास्त धोकादायकच्या श्रेणीत असलेली आढळून येते.तेव्हा सात जणांचा एकसाथ मृत्यू झाला होता,आता शेकडो लोकांचा मृत्यू एकसाथ ओढवू शकतो!मनपा प्रशासन मात्र यावर गप्प असून जणू दुर्घटनेचीच वाट बघत आहे.दिल्लीतील कोचिंग क्लासच्या दुर्घटनेनंतर दिल्ली पालिकेच्या दोन अधिका-यांची नोकरीवरुन हकालपट्टी करण्यात आली,नागपूर महानगरपालिकेचे संपूर्ण प्रशासनच पंजवानी मार्केटमध्ये आगीची घटना घडल्यास आरोपीच्या पिंज-यात उभे  राहणार आहे,कारण या इमारतीला अद्यापही अग्निशमन विभागाचे ना-हरकत प्रमाणपत्र मिळालेले नाही!मग इमारत सुरु कशी?
देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने दिल्लीच्या घटनेत राजेंद्र नगर येथील शिकवणी वर्ग म्हणजे मृत्यूचे सापळे असल्याची कठोर टिपण्णी केली होती.इतवारी भागातील पंजवानी मार्केटमध्ये आगीची घटना घडल्यास,बेसमेंटसह वरच्या इमारतीत कुठेही इंचभर धावायलाही जागा नसल्याने, जे महाभयंकर दृष्य उमटेल त्याची कल्पनाही कोणत्याही संवेदनशील मनाचा माणूस करु शकत नाही.मात्र,निगरगट्ट झालेले भ्रष्ट मनपा अधिकारी व काही राजकीय नेते यांना मात्र ,नागपूरातील माणसे आगीत होरपळून मृत्यूमुखी पडली तरी कोणताही फरक पडत नाही.असे नसते तर नाकासमोर उघडपणे चढलेले अनाधिकृत इमले,बेसमेंटमधील अतिक्रमण,फूटपाथवरील अतिक्रमणामुळे ६ फूटांचा रस्ता ग्राहकांसाठी फक्त २ फूटांचा सोडणे,दाटीवाटीच्या गल्लीबोळ्यात थाटलेल्या बाजारांच्या गल्ल्या,तूफान गर्दीतून संभाव्य चेंगराचेंगरीची होऊ शकणारी घटना,आग लागल्यास लहानग्यांसह माता-भगिनींवर ओढवू शकणारा मृत्यू,याची वेळीच दखल घेऊन योग्य कारवाई केली असती,असे मात्र घडत नाही.उलट,बेसमेंटमधील अतिक्रमणावर कारवाई करीत असल्याची ‘संख्या‘ नागपूर खंडपीठात ‘मूजोर‘ अधिकारी सांगत असतात व न्यायालयाशी दिशाभूल करतात,त्या संख्येत अतिशय धोकादायक असलेले इतवारीतील पंजवानी मार्केटचा समावेश का नाही?

(छायाचित्र : याला काय म्हणावे?सुरक्षेचे उपाय की धूळफेक?)

न्यायालयाच्या शब्दात हे मृत्यूचे सापळे मोकळे करण्याची कोणाची जबाबदारी आहे?महानगरपालिकेची नाही का?पंजवानी मार्केटच्या बेसमेंटमध्ये शॉट सर्कीटमुळे लागणारी फक्त एक चिंगारी पुरेशी ठरेल,पळायलासुद्धा बिल्डरने जागा सोडली नाही,इतकी भीतीदायक स्थिती असून वरील मजल्यांवर एका वेळी फक्त एक माणूस चढू किवा उतरु शकेल एवढ्या लहान पाय-या(जिना)तिथे बनवण्यात आल्या आहे.अतिवृष्टिमुळे बेसमेंटमधला पायवा सरकेल किवा आगीमुळे खालची धग वर पोहोचेल त्यावेळच्या संकटांची कल्पना देखील करु शकणार नाही इतकी धोकादायक इमारत महाराष्ट्राच्या उपराजधानीत एक केंद्रिय मंत्री व उपमुख्यमंत्री,गृहमंत्री व पालकमंत्र्यांच्या शहरातील इतवारी भागात पंजवानी मार्केटच्या नावाने दिमाखात उभी आहे.ज्या इमारतीत अनाधिकृत बांधकामाशिवाय अग्निशमनाचे संपूर्ण नियम पायदळी खुलेआम तुडवले गेले आहेत तरी देखील त्या इमारतीवर कोणतीही कारवाई होत नाही,पाणी,वीज कापली जात नाही,इमारतीची फाईल शोधली जात नाही,याचा अर्थ इतवारी भागात वारंवार घडणा-या आगीच्या घटनेपासून प्रशासन व राजकारणी कोणताही बोध घेऊ इच्छित नाही,असाच होतो.

न्यायालयाने देखील अंदाजे पाच वर्षांपासून या पंजवानी मार्केटच्या इमारतीवरील कारवाईवर दिलेल्या स्थगितीचा आणि निष्पाप नागपूरकर नागरिकांच्या जिविताचा विचार करुन तातडीने यावर आदेश पारित करण्याची गरज या भागातील अनेक रहीवाश्‍यांनी प्रतिपादीत केली.महानगरपालिकेचे ‘निष्णात’वकील जे प्रत्येक मनपाच्या याचिका मागे अंदाजे अडीच लाखांच्या मानधनाची उचल करीत असतात,त्यांच्यावर देखील मनपा आयुक्त डॉ.अभिजित चौधरी यांनी जबाबदारी निश्‍चित करावी,अशी मागणी ते करतात.दिल्लीतील कोचिंग सेंटर दुर्घटनेचा तपास सर्वोच्च न्यायालयाने तातडीने सीबीआयकडे दिला,इतवारी येथील दूकानदारांची ‘जो होगा देखा जायेगा’ची वृत्तीच अवघ्या १७ वर्षीय अनुष्का बाकडेच्या मृत्यृला कारणीभूत ठरली,दूकानदारांच्या या वृत्तीवर जगातील कोणतेही न्यायालय कोणती तपासयंत्रणा बसवणार?
थोडक्यात,संपूर्ण इतवारीच केमिकलच्या आणि ज्वलनशील पदार्थांच्या गोदामांवर वसलेली असून आतापर्यंत अगणिक आणि वारंवार झालेल्या आगीच्या घटनांमधून प्रशासन व राजकीय नेत्यांनी कोणाताही बोध घेतला नसून,येथील दूकानदारांच्या आणि घरमालकांच्या व्यवसायिक लोभाच्या हव्यासाचा अंत कसा आणि कुठे होणार आहे,याविषयी साक्षाम ब्रम्हदेव देखील न्यायालयात सांगू शकणार नाही,हेच खरे.
…………………………..
हे पण वाचा….
मी विझल्यावर त्या राखेवर….
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या