(रविवार विशेष)
नागपूर,ता.१५ जुलै २०२४: शहरातील उड्डाणपूलावरुन खाली कोसळून काल आणखी एका तरुणाचा मृत्यू झाला.सकाळी साढे अकरा वाजता २७ वर्षीय योगेश्वर चुटे हा पारडी उड्डणपूलावरुन जात असताना,ओव्हरटेक करण्याचा प्रयत्नात त्याची दूचाकी स्लीप झाली.त्याचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले आणि तो उड्डाणपूलाच्या संरक्षण भिंतीवरील दिशादर्शक फलकासह ४० फूट उंचीवरुन खाली पडला.डोक्यावर गंभीर दुखापत झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.कालच दूपारी चार वाजताच्या सुमारास २० वर्षीय तरुणी डॉली देशमुख ही विद्यार्थिनी मोपेडने कळमना उड्डाणपूलावरुन घराकडे जात होती.तिला समोरुन अज्ञात वाहनाने धडक दिली,यामुळे तिचे वाहन स्लिप होऊन तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली यात तिचाही मृत्यू झाला.
या दोन घटना पुन्हा एकदा समाजमन सुन्न करुन जाणा-या होत्या.पारडी येथे राहणारी डॉली काही कामानिमित्त यशोधरा नगर येथे गेली होती.ती बी.कॉम ची विद्यार्थिनी होती.तिच्या घरी तिची आई व भाऊ तिची वाट पाहत होते…!घरुन जिवंत निघालेले हे तरुण उड्डाणपूलांवरील अपघातानंतर भवानी रुग्णालय तसेच मेयो रुग्णालयाच्या शवागृहात पोहोचले.त्यांच्या घरात अाता ‘श्मशान’शांतता आहे.शहराचा झालेला ’विकास’आणि या विकासाची साक्ष देणारी उड्डाणपुले,ही वाहतूकीच्या सोयीसाठी निर्मित झाली असली तरी, आतापर्यंत शेकडो नागपूरकरांना यमसदनी धाडणारी ठरली आहे,हे अनेक घटनांवरुन सिद्ध झाले आहे.सीताबर्डी उड्डाणपूलावर कारने दुचाकीला धडक दिल्याने १० सप्टेंबर २०२२ रोजी दोघांचा हकनाक मृत्यू झाला होता.
सप्टेंबर महिन्यात अनंत चर्तुदर्शीच्या दिवशी आपल्या लहान भावाच्या घरातील गणपती विसर्जना नंतर घरी परतत असताना पाचपावली उड्डाणपूलावर झालेल्या अपघातात खापेकर कुटूंबातील चार जणांच्या मृत्यूने समाजमन सुन्न झाले होते.आईला ‘टाटा’करुन बाबांच्या दुचाकीवर आपल्या आज्जीसोबत,काकांकडे गेलेले ते दोन चिमुरडे त्या अपघातात,बाबा व आज्जीसोबत दगावले होते.४० फूटांवरुन खाली फेकल्या गेलेल्या त्या दोन्ही भावांच्या मुखातून शेवटचा कोणता शब्द निघाला असावा?‘सत्ताधीश’ने त्या अपघातात मृत्यू पावलेल्या व आपलं सर्वस्व गमावलेल्या त्या पत्नीची व दोन चिमुरड्यांच्या आईची भेट घेतली असता,त्यांनी खाली पडताना घाबरुन मला ’आई’म्हणून हाक मारली असावी आणि त्यावेळी मी त्यांच्या जवळ नव्हते,असे सांगून हमसून-हमसून रडणा-या त्या आईच्या काळजाची अवस्था ही शब्दात मांडताना,शब्दांचाही थरकाप उडाला होता.मद्यप्राशन करुन वेगात कार चालवणा-याने मोबाईलवर बोलता-बोलता खापेकर कुटूंबियांच्या दुचाकीला जोरात धडक दिली आणि ते चौघेही ४० फूटांवरुन खाली कोसळले!
अनंत चर्तुदशी असल्याने सर्वदूर गणपतीबाप्पांना निरोप दिला जात होता.संदल,बॅण्ड,गुलालाची उधळण,पोलिसांचा बंदोबस्त सगळं काही असताना,वाहतूक पोलिसांच्या नजरेतून तो मद्यपी कारचालक सूटला व पाचपावली उड्डाणपूलावर खापेकर कुटूंबियांसाठी काळ बनून आला.लहान निष्पाप मुलांचे कलेवर बघून जमलेल्या गर्दीलाही संताप अनावर झाला होता.त्या माऊलीला तर मेडीकलमध्ये पोहोचल्यावर आधी कोणाकडे धाव घेऊ!अशी अवस्था झाली होती.आयुष्याचा जोडीदार,प्रेमळ सासू आणि ज्यांना गर्भात घडवले,प्रसववेदना सहन करुन जगात आणले,जीवा पलीकडे संगोपन केले त्या ११ वर्षीय आणि ६ वर्षीय मुलांचे निपचित देह बघून तिचा टाहो मेडीकलच्या भिंतींनाही पाझर फोडून गेला होता.सर्वात आधी तिने आपल्या लहान मुलाकडे धाव घेतली होती,पण? पाचपावली उड्डाणपुलाची ‘उंची‘ त्या अपघातानंतर ही बरीच चर्चेत राहीली होती.केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांनी त्या दूर्घटनेनंतर त्या उधवस्त माऊलीच्या घरी भेट दिली होती,पण…!
२६ मे २०२३ रोजी सदर उड्डाणपूलावर वाहनाच्या धडकेत असाच एका माय-लेकीचा मृत्यू झाला.याच उड्डाणपूलावर २७ सप्टेंबर २०२३ रोजी कारच्या धडकेत दोन तरुणांचा मृत्यू झाला होता.१३ जुलै म्हणजे काल पारडीच्या उड्डाणपूलावरुन ४० फूट खाली फेकल्या गेल्याने २७ वर्षीय योगेश्वर चुटेचा मृत्यू झाला तर कळमना उड्डाणपूल काल अवघ्या २० वर्षीय तरुणीचा काळ ठरला.
अपघाताच्या या घटना,घटना नसून त्यांच्या कुटूंबियांसाठी कायमच्या मरणयातना देणा-या असतात.जाणारे तर अनंताच्या प्रवासाला निघून जातात मात्र जिवंत माणसे हे त्यांच्या आठवणीत होरपळत जगतात.आमच्यासोबतच असे हे इतके वेदनादायी क्रौर्य का घडले?या प्रश्नाचा शोध घेतात तेव्हा प्रशासन,उड्डाणपूले अाणि नागपूरच्या ‘विकासाला’ही जबाबदार धरताना दिसून पडतात.स्वत: रस्ते,वाहतूक व महामार्ग मंत्री गडकरी यांनी २ एप्रिल २०२२ मध्ये राज्यसभेत लेखी उत्तरात भारतात रस्ते अपघातात मृत्यूंचे प्रमाणा सर्वाधिक असल्याचे मान्य केले आहे.
जिनिव्हातील ‘इंटरनॅशनल रोड फेडरेशन’ने ‘वर्ल्ड रोड स्टॅटिस्टिक्स २०१८’मधील(डब्ल्यूआरएस)तपशीलानुसार अपघातात भारताचा जगात तिसरा क्रमांक असल्याचा अहवाल प्रसिद्ध केला होता.यात रस्ते अपघातांतील मृतांच्या संख्येत भारताचा पहिला तर जखमींच्या संख्येत तिसरा क्रमांक लागतो,असे गडकरी यांनी राज्यसभेत लेखी उत्तरात नमूद केले आहे.२०२० मध्ये रस्ते अपघातात मृत्यूमुखी पडलेल्यांमध्ये १८ ते ४५ वयोगटातील व्यक्तींचे प्रमाण ६९.८९ टक्के होते,अशी माहिती त्यांनी संसदेत दिली.
त्याही पूर्वी गडकरी यांनी १७ जून २०२१ रोजी अपघातरहित पूल,सहापदरी मार्गाची घोषणा बुटीबोरी येथील महामार्ग प्राधिकरणाच्या पुलाचे लोकार्पण करताना केली होती!बुटीबोरी उड्डाणपूलासाठी उत्कृष्ट स्थापत्य आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा मेळ साधण्यात अाल असून,हा पूल अपघातरहित राहील,असा दावा त्यांनी त्यावेळी केला होता.१.६९ किलोमीटर लांबीच्या त्या उड्डाणपूलावर ७० कोटी रुपये खर्च झाले आहेत.तो पूल अपघातरहीत निर्माण करताना ज्या शहराचे खासदार म्हणून ते प्रतिनिधित्व करतात त्या शहरातील त्यांच्याच पुढाकारातून निर्मित अनेक उड्डाणपूलांनाही अपघातरहित व अत्याधूनिक तंत्रज्ञानाने सुरक्ष्त करण्याला प्राधान्य दिले असते तर…..२०२१ नंतर शहरातील विविध उड्डाणपूलांवर गेलेले हकनाक जीव यांचे प्राण कदाचित वाचले असते.अनंत चर्तुदशीच्या दिवशी आयुष्यात सगळंच काही एका क्षणात गमावलेल्या किरण खापेकरच्या घरी सांत्वनासाठी जाण्याची वेळ ही गडकरींवर आली नसती!
रोडमार्क फाऊंडेशनच्यावतीने आयोजित प्रथमोचार प्रशिक्षण अभियानाचा गडकरींच्या हस्ते ११ जून २०२३ रोजी प्रारंभ झाला.यावेळी बोलताना गडकरी यांनी शहरात एकही अपघात होणार नाही आणि अपघात झालाच तर कुणाचे प्राण जाणार नाही,यासाठी तत्पर राहण्याची गरज प्रतिपादीत केली होती.शंभर टक्के अपघात कमी करणे कठीण आहे मात्र,अशक्य मुळीच नसल्याचे ते म्हणाले.यासाठी शाळा,महाविद्यालये,समाजसेवी संस्था यांनी पुढाकार घेण्याची गरज प्रतिपादीत करीत ‘प्रदुषणमुक्त नागपूर सोबतच अपघातमुक्त नागपूर’चा संकल्प सोडण्याचे आवाहन केले होते.गडकरी म्हणाले,अपघातांमध्ये भारत पहिल्या क्रमांकावर आहे.दरवर्षी तरुण मुलांचे अपघातात मृत्यू झाल्यामुळे अनेक कुटूंबांनी आधार गमावला आहे.अशी वेळ कुणावरही येऊ नये,यासाठी अपघात रोखण्यावर भर दिला पाहिजे.जून महिन्यातील तो संकल्प मात्र प्रत्यक्षात उतरला असता, तर काल शहरातील दोन उड्डाणपूलांवर गेलेले तरुण बळी यांचे प्राण वाचले असते.निदान उड्डाणपूलांच्या संरक्षक भिंतींची जरी उंची ही वाढवली गेली असती किवा त्यावर लाेखंडी ग्रील बसवली गेली असती तर,जखमी हे निदान ४०-४० फूटांवरुन खाली पडले नसते.त्यामुळे तो ‘संकल्प’फक्त भाषणापुरतीच मर्यादित राहीला,असेच आता म्हणावे लागेल.
(छायाचित्र :पाचपावली उड्डाणपूल)
नागपूर शहरात कोणत्या चौकांमध्ये आणि कोणत्या रस्त्यांवर सर्वाधिक अपघात होतात,याची माहिती काढा.तो रस्ता महापालिका,एमएसआरडीसी,एनएचएआय यांच्यापैकी कुणाच्या अखत्यारित आहे,हे समजून घ्या आणि संबंधित कार्यालयाला नोटीस द्या.तरीही त्यांनी काहीच कार्यवाही केली नाही तर त्यांच्या कार्यालया पुढे आंदोलन करा.या आंदोलनाला माझाही पाठींबा असेल,असा विश्वास गडकरी यांानी त्या संकल्प साेडण्याच्या आवाहानाच्या कार्यक्रमात दिला होता.काल झालेल्या अपघातील मृतकांच्या कुटूंबियांनी आता पारडी आणि कळमना उड्डाणपूलांची निर्मिती करणा-या एनएचएआयच्या कार्यालयासमोर आंदोलन करावे का?गडकरींनी शब्द दिल्याप्रमाणे त्या आंदोलनाला त्यांचा पाठींबा राहील का?
४ जून २०२३ रोजी राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमी(एनएडीटी)ते जरीपटका रेल्वे ओव्हर ब्रिज(आरओबी)आणि मेकोसाबाग ते सेंट्रल माईन प्लानिंग ॲण्ड डिसाईन इन्टिट्यूट(सीएमपीडीआय)या दोन्ही प्रकल्पांवरील उड्डाणपूलांच्या संदर्भात झालेल्या तांत्रिक चुकांसाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने पाच सदस्यीय समिती गठीत केली.न्या.अतुल चांदूरकर आणि न्या.महेंद्र चांदवाणी यांच्या समक्ष याचिकाकर्ते रमेश वानखेडे यांच्या याचिकेवर सुनावणी झाली.याचिकेनुसार अभियंत्यांनी ‘अज्ञात’व्यक्तीच्या दबावाखाली एनएडीटी जरीपटका आरओबीच्या मूळ आराखड्यात बदल केला तसेच गरज नसताना मेकोसाबाग-सीएमपीडीआय उड्डाणपूलाचा प्रकल्पात समोवश केला!
४ जून २०२३ रोजी हॉटेल सेंटर पॉईंट येथे मोदी सरकारच्या कारभाराला ९ वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त घेतलेल्या पत्रकार परिषदेत गडकरी यांनी संविधान चौकातील पुलाचे बांधकाम चुकलेच,अशी जाहीर कबुली दिली!संविधान चौक ते मानकापूर याठिकाणी उड्डाणपूल बांधण्यात अाला.मात्र,मानकापूरकडून येताना हा पूल ज्या ठिकाणी उतरतो त्या मार्गावरील काही भाग बंद ठेवण्यात आल्याबद्दल त्यांना विचारणा करण्यात आली होती.यावर,या उड्डाणपुलाचे डिझाईन चुकलेच’अशी जाहीर कबुली दिली.मेट्रोच्यावतीने आता या ठिकाणी काही तरी उपाययोजना करण्यात येतील.जेणेकरुन,वाहतूकीची कोंडी होणार नाही.त्याचबरोबर भुयारी मार्गाच्या पर्यायायची चाचपणी करण्यात येईल,अशी माहिती त्यांनी दिली .मानकापूरकडून येताना पूल ज्या ठिकाणी उतरतो त्या ठिकाणचे भू-संपादन होऊ न शकल्याने डिझाईनमध्ये बदल करावा लागला,अशी माहिती त्यांनी दिली होती.मूळात,अश्या सदोष उड्डाणपूलांची निर्मिती करण्याची कोणती घाई झाली होती?डिझाईन चुकले यात नागपूरकरांचा काय दोष आहे?पारडी,कळमनासह अश्या किती सदोष उड्डाणपूलांची निर्मिती नागपूर शहरात झाली आहे?पारडी उड्डाणपूलाचंी मुदत २०१९ मध्येच संपली असताना अद्याप २०२४ मध्ये देखील तो उड्डाणपूल अपूर्णच आहे,याबाबत गडकरी स्वत:च्याच मंत्रालयातील अधिका-यांना धारेवर किमान कालच्या अपघाती मृत्यूनंतर तरी धरतील का?कितीवेळा पारडी उड्डाणपूलाचे डिझाईन बदलण्यात आले?हा पूल अपूर्ण असताना देखील अमरावती महामार्गावरील दोन उड्डाणपूलांचे काम ही सुरु झाले!
(छायाचित्र : सक्करदरा उड्डाण पूल!)
३ मे २०२३ रोजी वाहतूकीचे नियम पाळल्यास बक्षीस मिळवण्याची घोषणा गडकरी यांनी ३ मे २०२३ रोजी एका ॲपच्या उद् घाटनाप्रसंगी केली.वाहतुकीचे नियम तोडणा-यांना दंड ठोठावला जातो.मात्र,नियमांचे पालन करणा-यांना काहीच मिळच नाही.या पालनकर्त्यांना प्रोत्साहन मिळण्यासाठी,आता विविध उत्पादनांच्या खरेदीवर सवलत मिळणारी योजना नागपूरात राबविण्यात आली.या योजनेच्या ॲपचे उद् घाटन गडकरी यांच्या हस्ते झाले.हजारो लोकांचे जीव वाचविणारा हा प्रकल्प संपूर्ण देशात लागू करण्याची घोषणा त्यांनी त्यावेळी केली.सोशल इम्पॅक्ट इनोव्हेशन प्रा.लि.च्या वतीने हा प्रकल्प राबविण्यात आला.मनपा व व्हीएनआयटीने यासाठी पुढाकार घेतला.या यंत्रणेचे पुढे काय झाले,हा संशोधनाचा विषय असून, वाहतूकीचे नियम तोडणा-यांना किमान भारतीय दंड संहितेनुसार तातडीने शिक्षा होण्याचे प्रमाण वाढवणा-या ॲपची खरी गरज त्यावेळी प्रतिपादीत करण्यात आली होती.
त्याही पूर्वी ४ सप्टेंबर २०२१ रोजी राष्ट्रीय महामार्गावर जखमींसाठी हेलिकॉप्टरची सोय लवकरच केली जाणार असल्याची घोषणा गडकरींनी केली होती.विभागीय प्रत्यारोपण समन्वय केंद्र(झेड.टी.सी.सी)वनामती,इंडियन मेडीकल असोसिएशन,रोटरी क्लब ऑफ नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने अवयवदानाचे देवदूत म्हणून विविध क्षेत्रातील नागरिकांच्या सत्कार समारंभात गडकरी यांनी ही घोषणा केली होती.देशातील राष्ट्रीय महामार्गावर हेलिपॅडची सोय केली जात असून तेथे हेलिकॉप्टर तैनात राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.रस्त्यांचे रुंदीकरण झाल्याने वाहनांचा वेग वाढलेला आहे.राष्ट्रीय महामार्गावर अपघातातील जखमी होणा-यांच्या संख्येत ही वाढ झाली आहे.त्यांना तातडीने विविध रुग्णालयात हलवण्यासाठी हेलिपॅडसह हेलिकॉप्टरची सोय लवकरच केली जाणार असल्याची घोषणा गडकरी यांनी २०२१ मध्ये केली होती.
या पार्श्वभूमीवर,ज्या शहराचे ते खासदार म्हणून प्रतिनिधित्व करतात,त्या शहरात आधी अपघाताचे प्रमाण आटोक्यात आणण्यासाठी प्रभावी उपाययोजना करणे,घडणा-या प्रत्येक अपघातानंतर, गरजेचे असल्याचे बोलले जात आहे.घोषणा भरपूर झाल्या,उपायांसाठी संपूर्ण यंत्रणेला कामाला लावण्यासाठी मात्र, बैठक घेतल्याचे ऐकिवात नाही.शहरातील सिमेंट-काँक्रिटचे रस्ते आणि उड्डाणपुले ही वाहतुकीसाठी आता अतिशय धोकादायक बनली आहेत.राष्ट्रीय महामार्गावर जखमींना तातडीची मदत मिळण्यासाठी हेलिकॉप्टरची मदत मिळणे नक्कीच अभिनंदनाची बाब ठरेल मात्र,शहरातील वाढत्या व तितक्याच जीवघेण्या अपघातावर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रभावी उपाययोजना राबविणे हे देखील शहराचे खासदार म्हणून गडकरी यांचीज जबाबदारी ठरते.घरातून सकाळी कामासाठी निघणारे यांना सुखरुप घरी पाेहोचण्याचा हक्क आहे.सदोष उड्डाणपूलांवरुन वाहतूक अशीच होत राहील तर,जगात ज्याप्रमाणे अपघातात मृत्यूमुखी पडणा-यांमध्ये भारताचा प्रथम क्रमांक आहे,त्याच धर्तीवर भारतात अपघातात मृत्यूमुखी पडणा-या शहरात नागपूर शहराचा क्रमांक प्रथम असेल,यात शंका नाही.
…………………………….