Homeराजकारणआचारसंहितेची ऐसीतैसी!शासनाच्या आकाशवाणीलाच आचारसंहितेचे वावडे!

आचारसंहितेची ऐसीतैसी!शासनाच्या आकाशवाणीलाच आचारसंहितेचे वावडे!

नागपूर,ता. २ डिसेंबर: नागपूर जिल्ह्यात विभागीय आयुक्त डॉ.संजीव कुमार यांच्या आदेशान्वये ८ नोव्हेंबर २०२० पासूनच पदवीधर मतदारसंघाच्या निवडणूकीनिमित्त आदर्श आचार संहिता लागू झाली,येत्या ८ डिसेंबरपर्यत ही आचारसंहिता लागू असणार आहे मात्र नागपूर आकाशवाणीच्या अधिकारी वर्गावर शासनाची ही आदर्श आचार संहिता जणू लागू होत नसल्याचा प्रत्यय आकाशवाणीच्या श्रोत्यांना आला व शासनाचे नियम शासनाचीच संस्था कसे बिंदासपणे पायदळी तुडवते, याबाबत नागपूर आकाशवाणीच्या श्रोत्यांमध्ये आश्‍चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

शासनाच्या नियमानुसार आचारसंहितेच्या काळात आकाशवाणीवरुन कोणत्याही राजकीय व्यक्ति किंवा त्यांचे नातेवाईक तसेच राजकीय व्यक्तिंशी संबंधित अश्‍या कोणत्याही व्यक्तिच्या कार्यक्रमाचे प्रसारण केले जाऊ शकत नाही मात्र नागपूर आकाशवाणीवरुन दि.१८ व १९ नोव्हेंबर रोजी सकाळी ६.४५ वा. आकाशवाणीच्या ‘आरोग्यधनसंपदा’या कार्यक्रमाअंतर्गत भाजपचे विधान परिषदेचे आमदार परिणय फूके यांचे बंधू डॉ.परिमल फूके यांचे सलग दोन कार्यक्रम ‘एमआरआय‘या विषयावर प्रसारित करण्यात आले.

या कार्यक्रमाचे प्रसारण होताच आकाशवाणीच्या अनेक श्रोत्यांच्या भूवया उंचावल्या.आ.परिणय फूके हे राजकीय व्यक्ति असून त्यांचे बंधू असणारे डॉ.परिमल फूके यांच्या कार्यक्रमाचे अश्‍यारितीने प्रसारण होणे हे शासनाच्या नियमांची सरळसरळ पायमल्ली आहे.मात्र सध्या नागपूर आकाशीवाणीतील कार्यक्रम अधिकारी यांना मात्र शासनाच्या नियमांशी कोणतेही सोयरसूतक नसल्यानेच त्यांनी ‘बिंदासपणे’या कार्यक्रमाच्या प्रसारणाला हिरवी झेंडी दिली असावी.

विशेष म्हणजे प्रसारित झालेले हे दोन्ही भाग पूर्व प्रसारित आहेत.ऐन आचारसंहितेच्या काळात शासनाचे नियम मोडून त्याचे पुर्नप्रसारण करण्यास काय औचित्य होते? असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.प्रसारित झालेले हे भाग पूर्वप्रसारित नसून फ्रेश असते तर आकशवाणीच्या कार्यक्रम अधिका-यांना कदाचित दूबळे समर्थन करता आले असते की प्रसारणाची नियोजित वेळ होती व करोनामुळे इतर कार्यक्रमांची वाणवा आहे,त्यामुळे प्रसारित केले मात्र आचारसंहिता लागू असताना, राजकीय व्यक्तिच्या सख्या भावाच्या कार्यक्रमाचे पुर्नप्रसारण करणे हे कार्यक्रम अधिका-यांचे शासनाविरुद्धचे धाडसच म्हणावे लागेल,अशी चर्चा सुरु आहे.

‘सत्ताधीश‘ने या संबधीची माहिती आकाशवाणीच्या ड्यूटी रुममधील कर्मचारीकडून खात्री करुन घेतली असता आकाशवाणीच्या ‘लॉकबूक‘मध्येही या कार्यक्रमाच्या पुर्नप्रसारणाची नाेंद सापडली. थोडक्यात एकीकडे विभागीय आयुक्त तसेच संपूर्ण शासकीय यंत्रणा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणूकानिमित्त आचारसंहितेच्या भंगासंबधी डोळ्यात तेल घालून त्याचे पालन होत आहे की नाही,हे बघण्यास सज्ज असताना,शासनाच्याच नागपूर आकाशवाणीने मात्र ‘आचारसंहितेची ऐसीतैसी!‘ही भूमिका स्वीकारलेली दिसते.

याबाबत विभागीय आयुक्तांकडून आता कार्यक्रम अधिकारी यांच्यावर कोणती कारवाई हाते,याकडे नैतिक मूल्य जपणारे व आकाशवाणीवर निस्सीम प्रेम करणा-या श्रोत्यांचे लक्ष् लागले आहेत.

Latest बातम्या