
भाजपचे जिल्हा निवडणूक प्रमुख जाहीर
नागपूर,ता. १० नोव्हेंबर: १ डिसेंबर राेजी होणा-या पदवीधर निवडणूकीसाठी भारतीय जनता पक्षाचे निवडणूक प्रमुख चंद्रशेखर बावणकुळे यांनी आज मंगळवार दि. १० नोव्हेंबर रोजी विविध निवडणूक समित्यांची घोषणा केली.
केंद्रिय मंत्री नितीन गडकरी,माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनात निवडणूक संचालन समिती गठीत करण्यात आली असून माजी आमदार प्रा.अनिल सोले,सुधाकर देशमुख,आ.डॉ.रामदास आंबटकर,आ.गिरीश व्यास,आ.परिणय फुके,खासदार रामदास तडस,खा.अशोक नेते,खा.सुनील मेंढे,प्रदेशमंत्री व माजी महापौर अर्चना डेहनकर,प्रदेशमंत्री धर्मपाल मेश्राम,राजेश बकाने,तारिक कुरैशी,सुधीर दिवे तसेच माजी आमदार चरण वाघमारे यांचा या संचालन समितीमध्ये समावेश करण्यात आला आहे.
याशिवाय पदवीधर निवडणूकीसाठी चंद्रशेखर बावणकुळे यांनी आज सर्व जिल्हा निवडणूक प्रमुखांची घोषणा केली.नागपूर शहरासाठी आ.प्रविण दटके,नागपूर ग्रामीणसाठी डॉ.राजीव पोतदार व अरविंद गजभिये,भंडारासाठी बाळा काशिवार,गोंदियासाठी आ.विजु रहांगडाले,गडचिरोलीसाठी किसन नागदिवे,चंद्रपूरसाठी राजेंद्र गांधी,चंद्रपूर ग्रामीणसाठी देवराव भोंगळे तर वर्धा जिल्ह्यासाठी डॉ.शिरीष गोडे यांची नियुक्ती करण्यात आली.
गड कायम राखणार-संदीप जोशी
या बैठकीत मनोगत व्यक्त करताना महापौर संदीप जोशी यांनी गेल्या अनेक टर्मपासून पदवीधर मतदारसंघ हा फक्त आणि फक्त भाजपचाच गड राहीला असून यावेळी देखील हा गड कायम राखणार असा विश्वास व्यक्त केला.या वेळी पक्षाने माझ्यावर विश्वास टाकला असून हा पक्ष् नेहमीच सर्वसामान्य कार्यकर्त्यांना संधी देत असल्याचे ते म्हणाले.सर्वसामान्य कार्यकर्त्याचा देखील हा पक्ष विचार करीत असतो.जवळपास २२ वर्षांपूर्वी युवा मोर्चाचा साधा कार्यकर्ता म्हणून पक्षाशी जुळलो.मग युवा मोर्चा मंडळाचा अध्यक्ष्,मग नागपूर शहर युवा मोर्चाचा पहील्यांदा महामंत्री,दुस-यांदाही महामंत्री यानंतर नागपूर शहर युवा मोर्चाचा अध्यक्ष्,मंडळ भारतीय जनता पक्षाचा अध्यक्ष्,नागपूर शहर भारतीय जनता पक्षाचा उपाध्यक्ष् यानंतर सलग सात वर्ष नागपूर शहर अध्यक्ष् ही पदे भूषवली.
२००२ मध्ये मला पक्षाने नगरसेवक म्हणून लढवलं.यानंतर महानगरपालिकेत विविध महत्वाची पदे भूषवली.सर्वोच्च मानाचे असे महापौर पद ही गेल्या २२ नोव्हेंबर रोजी मला पक्ष्श्रेष्ठींच्या आर्शिवादातून प्राप्त झाले.आता पदवीधर मतदार संघाच्या निवडणूकीसाठी माझ्यावर विश्वास दाखवला.तुमच्या सर्वांच्या सहकार्याने व आर्शिवादाने हा गड कायम राखणार,असा विश्वास पक्षाच्या निवडणूक समिती बैठकीत त्यांनी व्यक्त केला.
गुरुवारी भरणार नामांकन अर्ज-
महापौर संदीप जोशी हे गुरुवार दि. १२ नोव्हेंबर रोजी सकाळी १०.३० वा. जिल्हाधिकारी कार्यालयात नामांकन अर्ज दाखल करणार आहेत.तत्पूर्वी ते संविधान चौकात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना माल्यापर्ण करतील.

आमचे चॅनल subscribe करा