

मुंबईतील सामाजिक कार्यकर्ते सरसावले : ठाणेदार हिवरे आणि कर्मचाऱ्यांची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार
नागपूर, ता. ६ ऑक्टोबर:जगभरातील ३५ टक्के महिला या शारिरीक हिंसेला बळी पडण्याचे धक्कादायक निष्कर्ष नुकतेच एका जागतिक संस्थेने प्रसिद्ध केले त्यातही ६० टक्के महिला या सोशल मिडीयाद्वारे मानसिक हिंसेला बळी पडत असल्याचे हा निष्कर्ष सांगतो.याला महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर हे शहर देखील अपवाद नाहीच, हे काल वकील महिलेला लकडगंज पोलिस ठाण्यात झालेल्या मारहाणीच्या व्हायरल झालेल्या व्हिडीयोतून सिद्ध झालं. मात्र पोलिसांच्या या असंवेदनशील कृत्याची तक्रार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत पोहोचली असून,मुंबईतील सामाजिक कार्यकर्ते या अन्याया विरुद्ध सरसावले आहेत.
एका वकील तरुणीला लकडगंज पोलिसांनी पोलीस ठाण्याच्या आतमध्ये जबर मारहाण केल्याचा व्हीडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला. या प्रकरणी मुंबईतील सामाजिक कार्यकर्त्यांनी समाजमाध्यमांवर जाहीर नाराजी व्यक्त करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून ठाणेदार नरेंद्र हिवरे आणि संबंधित कर्मचाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्याची मागणी केली.
सूत्रांच्या माहितीनुसार, गेल्या २५ मार्चला कुत्र्याला अन्न व पाणी टाकल्यावरून एकाच सदनिकेत राहणाऱ्या व्यक्तीसोबत वाद झाल्यानंतर अॅड. अंकिता शाह या लकडगंज पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेल्या होत्या. यावेळी पोलिसांसोबत त्यांचा वाद झाला. यावेळी पोलिसांनी त्यांच्यासोबत अरेरावी केली होती. या वादातून त्या पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांच्या वागणूकीची मोबाईलने शूटिंग करीत असताना त्यांना पकडून पोलिसांनी ठाण्यातील सीसीटीव्ही नसलेल्या बाजूला नेले व त्यांना बेदम मारहाण केली.
त्यावेळी ठाणेदार नरेंद्र हिवरे यांनीच मारहाण करण्याचे आदेश दिल्याचा आरोप ॲड. अंकिता यांनी केला आहे. या संदर्भातील चित्रफित सहा महिन्यांनी समाजमाध्यमांवर व्हायरल झाली. या घटनेचे पडसाद सर्वत्र उमटत असून पोलिसांच्या कृत्याची निंदा होत आहे. दुसरीकडे अंकिताने अनेक ठिकाणी तक्रार करून संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. घटनेची चित्रफित व्हायरल झाल्यानंतर मुंबईतील सामाजिक कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री अनिल देशमुख, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, राज्याचे मुख्य सचिव संजय कुमार, गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव सीताराम कुंटे यांना पत्र लिहिले.
त्यांच्या पत्रानुसार मोकाट कुत्र्यांच्या अधिकारासाठी लढणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्याला अशा पद्धतीने पोलिसांकडून मारहाण होणे, आणि ते ही स्वत:गृहमंत्री अनिल देशमुखय यांच्या गृहनगरा हे अत्यंत निंदनिय आहे. आजही सामान्य नागरिक पोलीस ठाण्याची पायरी चढण्यासाठी घाबरतात. सामान्य नागरिकांना पोलीस ठाण्यात चांगली वागणूक मिळत नाही. ही बाब या घटनेने अधोरेखित केली आहे. या घटनेची दखल घेऊन संबंधितांविरुद्ध योग्य व कठोर कारवाई झाली तरी भविष्यात राज्यातील कोणत्याही पोलीस ठाण्यात असा प्रकार घडणार नाही, अशी मागणी त्यांनी संबंधितांकडे केली आहे.
———-




आमचे चॅनल subscribe करा
