एकवीस लाख सव्वीस हजार मतदार ठरवणार नागपूरच्या उमेदवाराचे भाग्य!
नागपूर: भारत निवडणूक आयोगाद्वारे रविवारी सायंकाळी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०१९ ची घोषणा झाली व देशात लगेच आदर्श संहिता आचारसंहिता लागू झाली. जगातील सर्वात मोठ्या लोकशाही असणाऱ्या भारतात मतदार हाच ‘राजा’असतो. महाराष्ट्रातील लोकसभा मतदारसंघाच्या रचनेेनुसार अनुक्रमाने दहावा येणारा मतदारसंघ म्हणजे ‘नागपूर‘लाेकसभा मतदार संघ आहे. नागपूरात दि.११ एप्रिल रोजी मतदान होणार असून शहरातील एकूण एकवीस लाख, सव्वीस हजार, पाचशे चौऱ्यातर मतदार हे नागपूरच्या उमेदवाराचे भाग्य ठरविणार आहेत. यात १०,४५,९३४ स्त्री मतदार असून १०,८०,५७४ पुरुष मतदार आहेत तर रामटेक मतदार संघात एकूण १८,९७,६२३ मतदार हे रामेटेकच्या उमेदवाराचे भाग्य पेटीबंद करणार असून यात ९,१२,०६१ स्त्री मतदार तर ९,८५,५३९ पुरुष मतदार आहेत.
नागपूर लोकसभा मतदार संघात नागपूर जिल्ह्यातील ६ विधानसभा मतदारसंघाचा समावेश असून यात नागपूर दक्षिण-पश्चिम, नागपूर-दक्षिण नागपूर- पूर्व,नागपूर- मध्य,नागपूर- पश्चिम व नागपूर- उत्तर या विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे. पुर्नरचनेत कामठी मतदारसंघ हा रामटेक लोकसभेला जोडण्यात अाला. नागपूर जिल्ह्यातील आदर्श आचार संहितेची काटेकोर अंमलबजावणी करण्याकरिता सर्व राजकीय पक्ष्, सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालय,संस्था तसेच प्रशासकीय नियंत्रणाखालील महामंडळे, सार्वजनिक,उपक्रम इ. यांना आदर्श आचार संहितेचे दिशा-निर्देश जारी करण्यात आल्याची माहिती सोमवारी जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी छत्रपती सभागृह जिल्हाधिकारी कार्यालय येथे अायोजित पत्र-परिषदेत दिली. याप्रसंगी महानगरपालिका आयुक्त अभिजित बांगर, पोलिस आयुक्त भूषणकुमार उपाध्ये आदी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी मुदगल यांनी ‘निवडणूक निर्णय अधिकारी’ ‘सहा.निवडणूक अधिकारी यांची सविस्तर माहिती दिली. नागपूरसाठी मुदगल हे स्वत: जिल्हा निवडणूक अधिकारी व जिल्हाधिकारी म्हणून काम बघतील तर रामटेकसाठी श्रीकांत फडके निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम बघतील. रामटेक मतदारसंघासाठी श्रीकांत उंबरकर हे काटोल, संजय पवार हे सावनेर, सुरज वाघमारे हे हिंगणा, जे.पी.लोंढे हे उमरेड, श्रीमती व्ही.सवरंगपते या कामठी तर जोगेंद्र कट्यारे हे रामटेक मतदारसंघासाठी सहा.निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून कर्तव्य बजावतील.
नागपूर लोकसभा अंतर्गत येणाऱ्या विधानसभा मतदारसंघात शिरीष पांडे हे नागपूर दक्षिण-पश्चिम, जगदीश कातरकर हे नागपूर-दक्षिण, श्रीमती शीतल देशमुख या नागपूर- पूर्व, व्ही.बी.जोशी हे नागपूर- मध्य ज्ञानेश भट हे नागपूर-पश्चिम तर श्रीमती सुजाता गंधे या नागपूर-उत्तर मतदार संघाचे सहा.निवडणूक निर्णयअधिकारी म्हणून कर्तव्य बजावतील अशी माहिती त्यांनी दिली. रामटेक येथील एकूण मतदार केंद्राची संख्या २३४५ एवढी असून नागपूरात २०३७ मतदार केंद्रे असणार आहे. यात नागपूर दक्षिण-पश्चिम भागात ३७२, नागपूर-दक्षिण ३४४, नागपूर-पूर्व ३३४, नागपूर-मध्य ३०५, नागपूर-पश्चिम ३३१,नागपूर-उत्तर ३५१ मतदार केंद्रे असणार आहे. नागपूर जिल्ह्यातील १२ विधानसभा मतदार संघाची अंतिम मतदार यादी दिनांक ३१.९.२०१९ रोजी सर्व पदनिर्देशित ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आली असून त्याच्या प्रती व सी.डी. सर्व मान्यताप्राप्त राजकीय पक्षांना देण्यात आल्याचे मुदगल यांनी सांगितले. ३१ जानेवरी रोजी मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतरसुद्धा मतदार नोंदणी प्रक्रिया राबविण्यात आलेली असून विहित मुदतीपर्यत प्राप्त अर्जाची छाननी करुन संबंधित भागनिहाय पुरवणी यादी संलग्न करुन ‘अंतिम मतदार यादी’ प्रसिद्ध करण्यात येणारे असल्याचे ते म्हणाले.
दिव्यांगाना विशेष सुविधा-
निवडणूकीतील सर्वसमावेशकता जपण्यासाठी दिव्यांगाना विशेष सुविधा पुरविण्यात येणार असल्याचे मुदगल यांनी सांगितले. सर्व मतदार केंद्रावर पाणी-शौचालयाची सुविधा राहणार असून मागणी केल्यास दिव्यांगाना येण्या-जाण्यासाठी वाहन देखील उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. सध्या ७ हजार दिव्यांग मतदारांची नोंद असल्याचे ते म्हणाले.
२६ मार्च आवेदन भरण्याची अंतिम तारीख-
उमेदवारांना निवडणूकीच्या दहा दिवस आधी म्हणजे २६ मार्च पर्यंत आपले आवेदन अर्ज भरता येईल. २८ मार्चपर्यंत अर्ज मागे घेता येईल. ११ एप्रिल रोजी मतदान होणार असून २३ मे रोजी मत मोजणी केली जाणार असून कळमना गोडाऊन येथे ही प्रक्रिया पार पडेल. या निवडणूकीत प्रमुख नवीन बाब म्हणजे पहील्यांदाज ‘व्हीव्हीपॅट’चा उपयोग केला जाणार आहे. नागपूर व रामटेक मतदार केंद्रासाठी ६१११ व्हीव्हीपॅट उपलब्ध झाले असून ३८०० भागात याविषयी जनजागृती करण्यात आली तर पावणे दोन लाख मतदारांनी यात वोट देऊन बघितले तर दोन लाख लोकांनी याविषयीची माहिती समजून घेतली. याशिवाय आचार संहितेचा भंग केल्याच्या तक्रारी निवरणाकरीता सक्षम यंत्रणा उभारली असून जिल्हा प्रशासन‘ पारदर्शक’पणे निवडणूका पार पाडण्यास सज्ज असल्याचे मुदगल यांनी सांगितले.